मुख : पचनमार्गाच्या सुरुवातीच्या शरीरभागास ‘मुख’ म्हणतात. कोणत्याही गुहेच्या, पोकळीच्या किंवा नालीच्या आत शिरण्याच्या भागास मुख हा संज्ञा वापरतात. पचनमार्ग ही एक लांब नळीच असून तिचे वरचे टोक मुख आणि खालते टोक गुदद्वार असून दोन्हा उघडी असतात. मुखाच्या वरच्या बाजूस तालू व खालच्या अथवा तळभागी श्लेष्मकलाच्छादित (बुळबुळीत पातळ पटलाने आच्छादित) अशा मुख पोकळीत जिभेचा प्रमुख भाग व दात यांचा समावेश असतो [⟶ जीभ दात]. अन्नग्रहण करून त्याचे चर्वण करणे, लाळ मिश्रण, चव घेणे व गिळणे यांशिवाय ध्वनिक्षेपण व बोलणे या क्रियांमध्ये मुख-भित्तिकांचा वाटा असतो. सर्वसाधारण भाषेत मुखाचा उल्लेख ‘तोंड’ असा करतात.

मुख (मध्यरेषेतील उभा छेद) : (१) मृदू तालू, (२) कठीण तालू, (३) मुख-कोटर, (४) ओठ, (५) दात, (६) अधोहन्वस्थी (७) गिलायू (टॉन्सिल), (८) अधिस्वरद्वार, (९) जीभ, (१०) मुख्य मुख-पोकळी. मुख-पोकळी दोन भागांत विभागलेली असते : (१) ओठ व गालांचा आतील पृष्ठभाग पुढे व त्यास लागून मागे असलेल्या दात व हिरड्यांच्या कमानी यांमधील विभागाला ‘मुख-कोटर’ म्हणतात (२) दात व हिरड्यांच्या कमानीमागे असेलेला मुख्य मुख-पोकळी भाग. गाल फुगवले असता मुख-कोटराचे आकारमान वाढते. तोंड धुताना खळखळून चुळा टाकताना पाणी प्रामुख्याने मुख-कोटरातच असते. वरच्या आणि खालच्या ओठांमधील फटीला मुखरंध्र म्हणतात व ते बाह्य वातावरणात उघडते. मुख-पोकळीची मागची बाजू घशात मुख-ग्रसनी सेतूद्वारे [⟶ ग्रसनी] उघडते. मुख्य पोकळीचे छत कठीण व मृदू तालूचे बनते आणि तळभाग प्रामुख्याने जिभेमुळे बनतो. दोन्ही ओठांच्या आतील भागी मध्यरेषेवर श्लेष्मकलेचे उभे बंध असतात, त्यांना ओष्ठबंध म्हणतात.

जीभ, दात, लाला ग्रंथी हे शरीरभाग मुख-पोकळीशी निकट संबंधित आहेत व त्या सर्वांवर विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. मुख-पोकळीचा तळभाग पूर्णपणे मऊ ऊतकाचा (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहाचा) बनलेला असून त्याचा बहुतांश भाग जिभेने व्यापलेला असतो. संपूर्ण मुख-पोकळी (दोन्ही भाग) श्लेष्मकलाच्छादित असते. ओठांच्या कडांवर ही श्लेष्मकला चेहऱ्यावरील त्वचेशी सलग होते. मुख्य पोकळी अंशत श्लेष्मकलेमुळे व अधिकांश लाळेमुळे ओलसर ठेवली जाते.

मुखाच्या भ्रूणविज्ञानाविषयी माहिती ‘पचन तंत्र’ या नोंदीत दिली आहे.

रोग : यामध्ये प्रत्यक्ष मुख भागांमुळे उद्‌भवणारे रोग आणि सार्वदेहिक रोगामध्ये मुखावर होणारे दुष्परिणाम यांचा विचार करता येतो. मुखाच्या रोगांच्या विशेष महत्त्वामुळे वैद्यकातील या रोगांचा अभ्यास ज्या शाखेत करतात तिला ‘मुखरोगविज्ञान’ म्हणतात. जीभ, दात, लाला ग्रंथी यांच्या रोगांविषयीची माहिती अनुक्रमे ‘जीभ’, ‘दंतवैद्यक’ व ‘लाला ग्रंथी’ या नोंदींत दिलेली आहे.

मुख हा पचन तंत्राचा (पचन संस्थेचा) सुरुवातीचा भाग असल्यामुळे बाह्य वातावरणातील अन्नपदार्थ प्रथम तेथे शरीरात प्रवेश करतात. कधीकधी नाकाऐवजी श्वासोच्छ्‌वासातील हवा तोंडावाटे आत-बाहेर टाकली जाते. या कारणामुळे सुक्ष्मजंतूंच्या संसर्गाविरुद्ध काही नैसर्गिक योजना असूनही मुखाला संसर्गजन्य रोगांचा सतत धोका असतो. काही प्रमुख मुखरोगांची माहिती खाली दिली आहे.

परिसर्प व्हायरस प्रकार-१ चा साधा संसर्ग अथवा परिसर्प साधा संसर्ग : बालवयात दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी विशिष्ट व्हायरस संसर्गामुळे उद्‌भवणाऱ्या या तीव्र रोगात तोंड व घसा लाल होणे, हिरड्या सुजणे, श्लेष्मकलेवर फोड येणे व व्रण तयार होणे आणि ताप येणे ही लक्षणे उद्‌भवतात. सर्वसाधारण भाषेत याला ‘तोंड येणे ‘ असे म्हणतात. निद्रानाश, अस्वस्थता व क्षुधानाश अर्भकात त्रासदायी असतात. अंथरुणात झोपवून विश्रांती, मऊ अन्नपदार्थाचे सेवन व द्रव पदार्थांचा भरपूर पुरवठा यांवर विशेष भर देतात. झोपेकरिता योग्य शामके व श्लेष्मकलेवर लावण्याकरिता प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार देतात. सर्वसाधारणपणे ७ ते १४ दिवसांत रोग बरा होतो.

मणिकवक रोग : सर्वसाधारणपणे २०% ते ४०% व्यक्तींमध्ये मणिकवक (मोनिलिया या प्रजातीतील बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) तोंडातील सहभोजी (आपल्या आश्रयास कसलीही हानी न करता आपले जीवन लाभदायक करणाऱ्या) सूक्ष्मजीवांत आढळतात. मुखाचा मणिकवक रोग यामुळे बहिर्जात (बाह्य कारणांमुळे उद्‌भवणारा) असतो किंवा अंतर्जात (अंतर्गत कारणांमुळे उद्‌भवणारा) असतो, हे सांगणे कठीण आहे. मणिकवकाचा कोणताही प्रकार रोगोत्पादक असू शकतो परंतू मो. अल्बिकान्स प्रकार प्रामुख्याने रोगकारक असल्याचे आढळते. तोंडातील मणिकवक रोगाचे निरनिराळे प्रकार आहेत. बहुतेक सर्व कवक प्रतिरोधक औषधांनी बरे होतात [⟶ कवकसंसर्ग रोग].

व्हिन्सेंट हिरडीशोथ अथवा तीव्र व्रणोत्पादक हिरडीशोथ : (जे. एच्. व्हिन्सेंट या फ्रेंच वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा व हिरडीला दाहयुक्त सूज येणारा रोग). हा रोग सूक्ष्मजंतुजन्य असल्याचे सर्वंमान्य असले, तरी कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूच्या प्रकाराबद्दल एकमत नाही. बहुधा काही सूक्ष्मजंतूंची अंतर्विषे यास कारणीभूत असावीत. सूक्ष्मजंतूंशिवाय तोंडातील काही स्थानिक दोष रोगोत्पादनास मदत करतात. उदा., मुखाची अस्वच्छता, दातावरील सूक्ष्मजंतुजन्य पापुद्रे सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती कमजोर होणे वगैरे. बहुतकरून तंबाखू ओढणाऱ्या तरुणांत वेदनामय हिरड्यांतून रक्तस्त्राव होणे व तोंडास विशिष्ट दुर्गंधी येणे या लक्षणांनी रोगाची सुरुवात होते. मानेतील संबंधीत ⇨  लसीका ग्रंथीची वाढ व शरीराचे तापमान ३९° से. पर्यंत वाढणे ही लक्षणे उद्‌भवतात. रोग्यास अतिशय अस्वस्थता व अशक्तता जाणवते. तीव्र रोग बरा झाल्यानंतर तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास रोग पुन्हा उद्‌भवण्याची शक्यता असते. चिरकारी (दीर्घकालीन) प्रकार झाल्यास कायम मुख दुर्गंधी व हिरड्यांतील रक्तस्त्राव त्रासदायी असतात. या कारणामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला व उपचार करणे फायद्याचे असते.

मुखव्रण : तोंडातील श्लेष्मकलेच्या एकूण विकारांमध्ये १० ते ३४% निरनिराळ्या प्रकारच्या व्रणांचा समावेश होतो. बहुतांश व्रण श्वेतमुखपाक (पांढऱ्या स्त्रावाने आच्छादित) प्रकारात मोडतात. त्यांची संप्राप्ती अनिश्चित आहे. अभिघात (जखम वा इजा) हे प्रमुख कारण नसले, तरी दुय्यम कारण असू शकते. जीवनसत्त्वन्यूनता किंवा अन्न अधिहृषता (ॲलर्जी) कारणीभूत असल्याचा पूरावा उपलब्ध नाही. काही प्रमाणात आनुवंशिकता आढळते. विशेषेकरून मातापिता या दोघांतही रोग असल्यास मुलात उद्‌भवण्याची शक्यता असते. भावनिक ताण रोगोत्पदनास कारणीभूत नसला, तरी रोगावर परिणाम करतो. मुखातील व्रणांचे वर्गीकरण खाली दिले आहे.


मुखातील व्रणांचे वर्गीकरण

व्रण प्रकार 

उदाहरण 

आवर्ती मुखव्रण

श्वेत मुखपाक, बेसेट लक्षणसमूह (डोळा, जननेंद्रिये, सांधे, तंत्रिका तंत्र इ. शरीरभागात उद्‌भवणारी शोथोत्पादक अज्ञातहेतुक आणि एच्. बेसेट या तुर्की त्वचा रोगवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारी विकृती)

सूक्ष्मजीवजन्य

क्षयरोग, उपदंश या रोगांचे सूक्ष्मजंतू व्हायरसजन्य.

अर्बुदजन्य (नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे उद्‌भवणाऱ्या गाठीमुळे होणारा).

कर्करोग श्वेतकोशिकार्बुद (रक्तातील पांढऱ्या कोशिकांचा अर्बुदा सारखा पुंजका).

रक्तसंबंधी रोग

रक्तक्षय न्यूट्रोफिलन्यूनता (श्वेतरुधिर कोशिकांपैकी एक प्रकारच्या कणकोशिकांची कमतरता) ⟶ कणकोशिकान्यूनत्व

त्वचारोग

जलपीटिका (त्वचेवर फोड येणारी विकृती).

चिकित्साप्रेरित

औषध अधिहृषताः ⟶ प्रारण चिकित्सा औषधजन्य कणकोशिकान्यूनत्व.

आघातजन्य

कृत्रिम दात नैसर्गिक दात रासायनिक पदार्थ.

मुखातील श्वेत विकृतिस्थले : तोंडांच्या काही रोगांमध्ये अतिकेराटिनयुक्त (विशिष्ट तंतुमय प्रथिनांचे मोठे प्रमाण असलेल्या) पांढऱ्या विकृत जागा श्लेष्मकलेवर तयार होतात. जेव्हा अशी विकृती निश्चितपणे संसर्गजन्य असल्याचे दिसत नाही तेव्हा प्रत्येक वेळी ⇨ जीवोतक परीक्षा (जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकाची परीक्षा) करणे आवश्यक असते कारण पुष्कळ वेळा ती कर्करोगपूर्वावस्था असू शकते. श्वेत विकृतिस्थले निर्माण होणाऱ्या काही विकृतींची माहिती खाली दिली आहे.

(अ) श्वेतशल्कताः मुखातील श्लेष्मकलेवर अभिलग्न (चिकटल्यासारखा दिसणारा) स्पष्ट कडा असलेला पांढरा डाग तयार होणारी ही विकृती सर्वसाधारणपणे ४० ते ७० वर्षे वयाच्या पुरुषांत आढळते. मुखातील कोणत्याही ठिकाणी उद्‌भवणारी ही विकृती छोट्या डागापासून जागजागी डाग पसरलेल्या अवस्थेतही आढळते. रोग उद्‌भवण्यास तंबाखू, अल्कोहॉल, अयोग्य कृत्रिम दात, तुटके तीक्ष्ण धारदार बनलेले नैसर्गिक दात, उपदंश आणि अती मसालेयुक्त अन्नाचे सेवन यांपैकी कोणतेही एक किंवा एकत्रित रीत्या कारणीभूत होऊ शकते. श्वेतशल्कता परिवर्तनीय (पुनःपुन्हा होणारी) नसल्यास व अल्पप्रमाणात असल्यास शस्त्रक्रियेने काढून टाकणेच हितावह असते. श्वेतशल्कतेचा प्रत्येक रोगी दर ३ ते ६ महिन्यांनी तपासणे अपरिहार्य असून प्रत्येक नव्या डागाची जीवोतक परीक्षा करणे आवश्यक असते.

(आ) तालू केराटिनीभवन : तंबाखू ओढणाऱ्यांमध्ये, विशेषेकरून पाइप वापरणाऱ्यांमध्ये कठीण तालूवरील श्लेष्म ग्रंथी सुजतात व तेथील श्लेष्मकलेवर घड्या पडून काही पांढुरके करडे डाग उत्पन्न होतात. तंबाखू ओढणे थांबवताच श्लेष्मकला हळूहळू प्राकृतिक (नेहमीच्या) अवस्थेत येते.

(इ) लायकेन प्लेनस : श्वेतशल्कतेसारख्याच या विकृतीत अधिककरून गालांच्या श्लेष्मकलेवर वेदनामय व्रण तयार होतात. चिरकारी प्रकारात कर्करोग उद्‌भवण्याचा संभव असल्यामुळे वेळोवेळी जीवोतक परीक्षा करणे आवश्यक असते. कधीकधी रोग आपोआप बरा होतो. पुष्कळ वेळा वैद्यकीय सल्ल्याची व उपचारांची गरज असते.

कर्करोग : ओठ, जीभ, मुखाचा तळभाग, श्लेष्मकला, तालू, हिरड्या या मुख भागांच्या कर्करोगाचे प्रमाण एकूण मारक अर्बुद प्रकारात ५% पेक्षा जास्त आहे. मुख कर्करोग असलेल्या रोग्यांची पाच वर्षे उत्तरजीविता ३०% पेक्षा कमी आढळते. अलीकडे लवकर निदान व त्वरित उपचार यांमुळे ती दुप्पट झाली आहे. विकृती आकारमान ३ सेंमी पेक्षा कमी असून प्रक्षेपरहित (मूळ रोगस्थापासून नैसर्गिक वहनमार्गातून, उदा., रक्तवाहिनीतून, त्याच प्रकारचे कर्कार्बुद इतरत्र नव्या ठिकाणी न उद्‌भवलेली) अवस्था असल्यास निदान लवकर झाले असे मानतात. मुख कर्करोग वयस्कर व्यक्तींना होणारा रोग असून ९०% रोगी पंचेचाळीशीच्या वर व सर्वसाधारणतः साठीचे असतात. पुरुष-स्त्री प्रमाण २:१ असे आढळते. मुख कर्करोगाचे कारण अज्ञात आहे. तंबाखू व अल्कोहॉल रोगाची संभाव्यता वाढवितात, हे निश्चित झाले आहे. निश्चित निदानाकरिता जीवोतक परीक्षा आवश्यक असते. वाढलेल्या लसीका ग्रंथीची अशी परीक्षा केव्हाही करू नये कारण त्यामळे कर्ककोशिका प्रक्षेपित होण्याचा धोका असतो.

संदर्भ :1. Conn, H. F. Ed., Current Therapy, Philadelphia, 1983.

             2. Krupp, A. M. Chatton M. J., Ed., Current Medical Diagnosis and Treatment, Singapore, 1983.

             3. Petersdorf, R. G. and others, Ed., Harrison’s Principles of internal Medicine, Singapore, 1983.

             4. Warwick, R. Williams, P. L., Ed., Gray’s Anatomy, Edinburgh, 1973.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.