कार्दूत्ची, जो झ्वे : (२७ जुलै १८३५ — १६ फेब्रुवारी १९०७). इटालियन कवी आणि समीक्षक. जन्म तस्कनीमधील व्हाल दी कास्तेल्लो येथे. शिक्षण पीसा विद्यापीठात. १८६० ते १९०४ या काळात बोलोन्या विद्यापीठात इटालियन साहित्याचा प्राध्यापक. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळविणारा (१९०६) तो पहिला इटालियन साहित्यिक.

सु.५० वर्षे त्याने कवितालेखन केले. Rime (१८५७) हा त्याचा पहिला कवितासंग्रह. Giambi ed epodi (इं.शी.आयॅंबिक्स अँड एपोड्‌स, १८६७ ते १८७९ मधील कविता), Rime nuove (१८६१ ते १८८७ मधील कविता), Odi barbare (इं.शी. बार्‌बॅरिअन ओड्‌स, १८७३ ते १८८९ मधील कविता) आणि Rime e ritmi (इं.शी.राइम्स अँड ऱ्हिधम्स, १८८५ ते १८९८ मधील कविता) हे त्याचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह.

कार्दूत्ची नव-अभिजाततावादाचा कट्टर पुरस्कर्ता होता. इटालियन साहित्यातील अभिजाततावादी परंपरांचे पुनरुज्जीवन करणे, हे त्याचे ध्येय होते. धर्माच्या बाबतीत तो पेगनच असल्यामुळे ख्रिस्ती धर्मांबाबत त्याची वृत्ती बंडखोरीचीच होती. ही वैशिष्ट्ये त्याच्या कवितांतून स्पष्टपणे प्रत्ययास येतात. राजकारणात तो काही काळ गणतंत्रवादी असला, तरी आयुष्याच्या अखेरीस तो राजनिष्ठ झाला होता. त्याचे राजकीय चिंतन त्याच्या अनेक कवितांतून आढळते. ‘Inno a Satana’ (१८६५) ह्या कवितेने वैचारिक खळबळ निर्माण केली. ह्या कवितेतील सैतान हा निसर्ग, विज्ञान आणि प्रगती ह्यांचे प्रतीक म्हणून आला असून तो अंधश्रध्देच्या विरुद्ध उभा राहिल्याचे दाखविले आहे. Rime nuove आणि Rime e ritmi ह्या दोन संग्रहांतील कवितांतून त्याच्या परिपक्व प्रतिभेचा विशेष प्रत्यय येतो.

त्याचे गद्यलेखन वाङ्मयेतिहास, वाङ्मयीन समीक्षा, इटालियन इतिहास व राष्ट्रवाद ह्या विषयांवर आहे. इटालियन साहित्येतिहासाचा तो एक साक्षेपी अभ्यासक होता. त्याच्या वाङमयीन निबंधांचे मोल काळाच्या ओघात टिकून राहिले आहे. बोलोन्या येथे तो निधन पावला.

आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) कुलकर्णी, अ.र.(म.)