रीत्ची-कूर्बास्त्रो, ग्रेगॉऱ्यो : (१२ जानेवारी १८५३−६ ऑगस्ट १९३५). इटालियन गणितज्ञ. केवल अवकलनशास्त्राचा (याला रीत्ची अवकलनशास्त्र असेही म्हणतात) शोध लावण्यात व त्याचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल विशेष प्रसिद्ध. या अवकलनशास्त्रालाच आता ‘प्रदिश विश्लेषण’ [⟶ प्रदिश] या नावाने ओळखण्यात येते.

रीत्ची यांचा जन्म लूगो येथे झाला. १८६९ मध्ये त्यांनी रोम विद्यापीठात एक वर्षभर गणित व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर १८७२ पासून त्यांनी बोलोन्या विद्यापीठात शिक्षण घेऊन १८७५ मध्ये भौतिक व गणितीय शास्त्रांतील डॉक्टरेट पदवी संपादन केली. १८७७-७८ मध्ये शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी म्यूनिक येथे फेलिक्स क्लाइन व ए. ब्रिल यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. पुढे पीसा येथे १८७९ साली यू. डिनी यांच्या हाताखाली गणिताचे साहाय्यक म्हणून काम केल्यावर १८८० मध्ये रीत्ची यांची पॅड्युआ विद्यापीठात गणितीय भौतिकीच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली व तेथेच त्यांनी अखेरपर्यंत अध्यापनाचे काम केले. प्रारंभी त्यांनी गणितीय भौतिकीत, विशेषतः विद्युत् मंडलाचे नियम व ⇨अवकल समीकरणे या विषयांत काम केले. प्रदिश विश्लेषण या त्यांच्या सर्वांत महत्त्वाच्या कार्याकरिता त्यांनी दहा वर्षे (१८८४−९४) संशोधन केले. प्रदिश विश्लेषण हे सहचल फलनांशी (म्हणजे एका सहनिर्देशक पद्धतीतून कोणत्याही अन्य सहनिर्देशक पद्धतीत रूपांतरित केल्यास समप्रमाण राहतात अशा गणितीय संबंधांशी) निगडित आहे. या विषयाचे मूळ बेनहार्ट रीमान यांच्या अवकल भूमितीत [रीमानीय भूमितीत⟶ भूमिती] आहे. प्रदिशांच्या योग्य तंत्राच्या विकासातील पहिले टप्पे ई. बी. क्रिस्टोफेल यांनी दाखविले होते आणि ई. बेल्ट्रामी व आर्. लिपशिट्झ यांनी महत्त्वाच्या संकल्पना मांडलेल्या होत्या. तथापि याचा पद्धतशीर सिद्धांत रीत्वी यांनी विकसित केला व पुढे त्यांचे शिष्य ⇨तुल्यो लेअव्हि-चीव्हिता यांनी या सिद्धांतात महत्त्वपूर्ण विस्ताराची भर टाकली.

काही काळ हे नवीन अवकलनशास्त्र दुर्लक्षित राहिले. नंतर ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांना आपला व्यापक सापेक्षता सिद्धांत [⟶ सापेक्षता सिद्धांत] मांडताना रीत्वी यांच्या पद्धती वापरणे अत्यावश्यक असल्याचे आढळून आले. आइन्स्टाइन यांनी रीत्वी व त्यांच्या पद्धती यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. पृष्ठांच्या अभ्यासात प्रादिश विश्लेषणाचा उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन करताना अधिपृष्ठांचे (तीनापेक्षा अधिक मितीय अवकाशातील पृष्ठांचे) अनेक मानीय (मापनाशी संबंधित असलेले) गुणधर्म रीत्वी यांच्या अवलोकनात आले. त्यांपैकी एक म्हणजे रीत्वी प्रादिश (Rij, रीमान-क्रिस्टोफेल वक्रता प्रदिशाचे एक रूप) हा होय. हा प्रदिश आइन्स्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षण समीकरणात येतो आणि पुष्कळदा त्याचा ‘आइन्स्टाइन प्रदिश’ म्हणून उल्लेख करतात. व्यापक सापेक्षता सिद्धांतातील प्रदिश विश्लेषणाच्या उपयोगामुळे अवकल भूमितीत व गणिताच्या इतर शाखांत त्याचा विस्तृत उपयोग होण्यास चालना मिळाली.

रीत्ची यांनी प्रदिश विश्लेषणावर २२ संशोधनपर निबंध १९००−२४ या काळात लिहिले. याखेरीज बीजगणित, अल्पमतीय कलनशास्त्र व संख्या सिद्धांत या विषयांवरही त्यांनी ग्रंथ व निबंध लिहिले. इन्स्तित्यूतो व्हेनेतो, ॲकॅडेमीया पाँटिफिया, पॅड्युअन ॲकॅडेमी इ. संस्थांचे ते सदस्य होते. संशोधन व अध्यापन यांखेरीज त्यांनी काही नागरी पदांवरही काम केले. लूगो येथे प्रांतिक सदस्य होते आणि पाणीपुरवठा, दलदलीतील पाण्याचा निचरा व इतर सार्वजनिक कामांत त्यांनी सहाय्य केले. पॅड्युआ येथे सामूहिक सदस्य या नात्याने सार्वत्रिक शिक्षण व अर्थ खाते यांच्याशी त्यांचा संबंध आला. ते बोलेन्या येथे मृत्यू पावले.

ओक, स.ज. मिठारी, भू. चिं.