लोरिस : (तेवांग, वानर मनुष्य). स्तनी वर्गातीलनरवानर गणाच्या लोरिसिडी कुलाते हे प्राणी आहेत.लेमुरांचे हे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. यांची लोरिस टार्डिग्रेडस ही एकच जाती असून ती आ. १. कृश लोरिसदक्षिण भारत आणि श्रीलंकेत आढळते. याला कृश (लुकडा) लोरिसही म्हणतात. हा वृक्षवासी असून नेहमी जंगलात राहणारा आहे. शरीराची लांबी २०-२५ सेंमी. व वजन २२०-३५०  ग्रॅ. असते. शेपूट नसते शरीरावर दाट, मऊ, लोकरीसारख्या केसांचे आवरण असते रंग गर्द करडा, मातट तपकिरी किंवा या दोहोंच्या मधला एखादा असतो, पोटाकडचा भाग फिकट करडा असतो डोळ्यांभोवती गर्द तपकिरी वर्तुळे असतात. याचे शरीर लुकडे आणि हातपाय लांब व काटकुळे असतात. हातापायांचे आंगठे इतर बोटांपासून अलग असून पकड घेण्याच्या वेळी ते इतर बोटांच्या समोर आणता येतात पण पायाच्या दुसऱ्या बोटावर नखर असतो. डोळे मोठे, वाटोळे आणि कान लहान, गोलसर असतात.

लोरिस निशाचर आहे डोके हातापायांत खुपसून अंगाचा चेंडू करून तो दिवसभर झाडाच्या फांदीवर, ती घट्ट पकडून झोपलेला असतो. फांद्या घट्ट धरून तो हळूहळू झाडावर हिंडत असतो. तो कधीही उड्या मारीत नाही.

आ. २. मंद लोरिसकिडे, सरडे (विशेषतःपाली), झाडांवरील बेडूक, पक्षी आणि अंडी हे याचे भक्ष्य होय भक्ष्य दृष्टीस पडताच तो दबदबत भक्ष्याजवळ जातो. हळूहळू उभा राहतो आणि एकदम झडप घालून दोन्ही हातांनी भक्ष्य पकडून तोंडाने आधी त्याचे डोके तोडतो व मग तो खातो.

हे प्राणी बहुधा एकेकटेच असतात, पण कधीकधी यांची जोडपीही आढळतात. गर्भावधी सु. सहा महिन्यांचा असतो. मादीला दर खेपेला एकच पिल्लू होते. याच्या डोळ्यांचा उपयोग काही नेत्ररोगांवर होतो, असा दक्षिण भारतातील लोकांचा समज आहे. 

 

मंद लोरिस या नावाने ओळखली जाणारी लोरिसची एक जाती आसाममध्ये व म्यानमारपासून (ब्रह्मदेशापासून) फिलिपीन्स बेटांपर्यंत आढळते पण ती वेगळ्या प्रजातीतील आहे तिचे नाव निकिट्‌ सबेस कूकँग  आहे. हा प्राणीदेखील वृक्षवासी व अरण्यात राहणारा आहे. याची शरीररचना आणि सवयी कृश लोरिससारख्याच असतात पण सगळ्या हालचाली मंद असतात. याची लांबी ३०-४०  सेंमी. व वजन १.१ किग्रॅ. असते. शेपटीचा अवशेष असतो रंग फिक्कट तपकिरी करडा किंवा गर्द तांबूस तपकिरी असतो. पाठीच्या मध्यरेषेवरून डोक्यावर एक तपकिरी पट्टा गेलेला असतो. शरीर गुबगुबीत आणि हातपाय आखूड असतात. कीटक हे याचे मुख्य भक्ष्य होय पण लहान सस्तन प्राणी, फळे, पानेदेखील तो खातो. मादीला एका खेपेला एकच पिल्लू होते.

मंद लोरिसला मधून मधून दोन्ही तळहातांनी तोंड झाकून घेण्याची सवय असते. त्याला भूत दिसले म्हणजे तो तोंड झाकून घेतो, असा मलायी लोकांचा समज आहे. याच्या निरनिराळ्या अवयवांच्या अंगी औषधी गुणधर्म आहेत, अशीही तिकडील लोकांची समजूत आहे.

पहा : नरवानर गण लेमूर.

संदर्भ : Walker, E.P. Mammals of the World, Vol.I, Baltimore, 1964.

डाहाके, ज्ञा.ल.