करडा तितर

तितर : याला तित्तिर असेही म्हणतात. फेजिॲनिडी या पक्षिकुलातील हा पक्षी आहे. तितराच्या तीन जाती भारतात आढळतात : करडा तितर, काळा तितर आणि रंगीबेरंगी तितर. यांपैकी करडा तितर हा ‘तितर’ या नावाने ओळखला जातो आणि तो भारताच्या सगळ्या भागांत आढळतो काळा तितर फक्त उत्तर भारतात व आसामात आढळतो आणि रंगीबेरंगी तितर मलबार किनारा सोडून सगळ्या दक्षिणेत सापडतो.

करड्या तितराचे शास्त्रीय नाव फ्रँकोलायनस पाँडिसेरिॲनस असे आहे. मोकळ्या कोरड्या प्रदेशातील दाट गवतात किंवा काटेरी झुडपांत तो राहतो. दाट जंगल, दमट प्रदेश किंवा पाणथळ जागा त्याला मानवत नाही. खेड्यापाड्यांच्या अथवा शेतीभातीच्या आसपास बहुधा तो आढळतो. हा साधारणपणे मध्यम आकारमानाच्या कोंबडीएवढा गुबगुबीत पक्षी आहे. याच्या पाठीचा रंग करडा तपकिरी असून त्यात तांबूस रंगाची छटा असते पोटाकडचा भाग पिवळसर आणि त्यावर काळसर तपकिरी नागमोडी रेघोट्या असतात शेपटी लांडी व काळसर तांबूस रंगाची असते गळा तांबूस पिवळा व त्याच्या भोवती अर्धगोलाकृती काळसर बारीक पट्टा असतो चोच काळसर आणि पाय मळकट तांबडे असतात. नर व मादी यांत फरक नसतो, पण नराच्या दोन्ही पायांवर ‘आर’ (बळकट व अणकुचीदार रचना) असते.

तितरांचे थवे भक्ष्य शोधीत हिंडत असतात हिंडताना नख्यांनी जमीन उकरतात व माती विखरून भक्ष्य टिपतात. धान्य, गवताचे आणि इतर बी, वाळवी, सुरवंट, टोळ आणि इतर किडे हे त्यांचे भक्ष्य होय. यांना हुसकले तर जलद पळून गवतात निरनिराळ्या ठिकाणी लपून बसतात. हा अतिशय जलद धावणारा आणि वेगाने उडणारा पक्षी आहे, पण तो फार लांबवर उडू शकत नाही.

पुष्कळ लोकांना याचा आवाज फार आवडतो म्हणून ते याला पिंजऱ्यात बाळगतात तसेच हा भांडखोर असल्यामुळे यांच्या झुंजी लावतात.

यांच्या विणीचा हंगाम ठराविक नसतो. झुडुपांमध्ये जमीन उकरून मादी खळगा करते आणि त्यात गवत घालून घरटे तयार करते. या घरट्यात मादी ४–८ फिकट पिवळसर किंवा पांढरी अंडी घालते.

कर्वे, ज. नी.