क्षिप्रचला : भारतात आढळणाऱ्या या पक्ष्याचे शास्त्रीय नाव कर्सोरियस कोरोमंडेलिकस असून त्याचा समावेश कॅरॅड्रिफॉर्मिस गणाच्या ग्लेरिओलिडी पक्षिकुलात होतो. याचा प्रसार आफ्रिका, भारत (आसाम व्यतिरिक्त सर्वत्र), पाकिस्तान व श्रीलंकेच्या उत्तर भागात आहे. भारतात तो हिमालयाच्या पायथ्यापासून ते द्वीपकल्पात सर्वत्र आढळतो परंतु मलबार किनारा व दक्षिण बंगालमध्ये तो आढळत नाही. पश्चिमेस तो सिंधूच्या खोऱ्यापर्यंत आढळतो परंतु सिंधचा उत्तर भाग आणि पश्चिमव वायव्य पंजाबात तो फारसा आढळत नाही. हा भारतात कायमचा रहिवाशी आहे. 

क्षिप्रचलाच्या सु. ९ जाती असून त्यामध्ये पिवळसर पांढऱ्यारंगाचा क्षिप्रचला (क. कर्सर), बर्शेलस् क्षिप्रचला (क. रुफस), टेमिंक्स क्षिप्रचला (क. टेम्मिंक्की), भारतीय क्षिप्रचला (क. कोरोमंडेलिकस), जरडोन्स किंवा दुहेरी पट्ट्याचा क्षिप्रचला (क. बिटॉरक्वॅटस), दुहेरी पट्ट्यांचा क्षिप्रचला (स्मटसॉर्निस आफ्रिकन्स), तीन पट्ट्यांचा क्षिप्रचला (र्‍हिनोप्टिलस सिंक्टस), तांबेरी पंखाचा क्षिप्रचला (र्‍हि. कॅल्कोप्टेरस), जरडोन्स क्षिप्रचला (र्‍हि. बिटॉरक्वॅटस) यांचा समावेश होतो. र्‍हि. कॅल्कोप्टेरस ही जाती सर्व जातींमध्ये लांब असून तिची लांबी सु. ३० सेंमी. असते. तिचा आढळ आफ्रिकेत असून ती निशाचर आहे. 

क्षिप्रचलाची लांबी सु. २० सेंमी. असते. नर व मादी दिसायला सारखेच असतात. डोक्याचा माथा तांबूस पिंगट रंगाचा असतो व जेथे लांबटपंख काळा ठिपका झाकतात, तेथे तो (रंग) गडद झालेला असतो. डोळ्यांवर लांब पट्टे असून ते मानेच्या काट्याच्या मागे एकत्र मिळतात. शरीराच्या कडेवर खाली सर्वत्र एक काळा पट्टा असतो. काळ्या रंगाच्या मागे भडक पिवळसर गुलाबी ते मध्यम नारिंगी रंगाची कॉलर असते.वरचा पिसारा करड्या तपकिरी रंगाचा असतो. मोठी पिसे काळी असून अगदी आतील पिसे करडी असतात व पाठीचा रंग पांढरा होत जातो. शेपटीच्या तळाशी एक पांढरा चट्टा असतो. शेपटीची मधली (मध्यवर्ती) पिसे तपकिरी, तळाशी करडी तपकिरी, नंतर काळी व टोकाला पांढरी असतात. पुढे पांढऱ्या रंगाचे प्रमाण वाढत जाऊन अगदी बाहेरची जोडी पांढरी शुभ्र असते. चोचीखालचा भाग पांढरा असतो. मानेचा व छातीचा रंग भडक पिवळसर गुलाबी ते मध्यम नारिंगी असतो. छातीचा खालचा भाग व पोटाच्या वरच्या भागाचा काळा पट्टा यांची छटा तांबूस पिंगट रंगासारखी होत जाते. याची चोच काळी, बारीक, वाकडी व टोकदार असते. पाय भुरकट पांढऱ्या रंगाचे व लांब असून त्यांना प्रत्येकी तीन नख्या असतात. पंख टोकदार, शेपटी आखूड व चौकोनी असते. 

क्षिप्रचला हा पक्षी ओसाड, उघड्या, कमी-अधिक उजाड व मध्यम बागायती टापूत राहतो. नापीक खडकाळ जमीन किंवा पडीत भागातही तो आढळतो. उघड्या रेताड जमिनीवर वेगाने धावताना तो दृष्टीस पडतो. प्रजोत्पादनाच्या हंगामात ते जोडप्यांत आढळतात. इतर हंगामांत त्यांचे लहान थवे असतात. अन्न मिळविताना या पक्ष्याच्या कुतूहलजनक व वैशिष्ट्यपूर्ण हालचाली होतात. त्याला बुजविला असता विशिष्ट आवाज काढून तो उंच भरारी मारतो. तेव्हा पंख फार टोकदार दिसतात. त्याची भरारी जोरकस व सरळ असून पंखांची फडफड उल्लेखनीय असते. एका भरारीत थोडे अंतर कापून तो जमिनीवर येतो व अल्पकाळात वेगाने धावतो परंतु जेव्हा खरोखरीच त्याला धोका जाणवतो, तेव्हा तो फार उंच, जोरात व वेगाने उडतो व अशा क्षिप्रचलाला बहिरी ससाणाही पकडू शकत नाही. 

कोरड्या जमिनीवर आढळणारे लहान, काळे मुद्गल (भुंगे) हेत्याचे मुख्य अन्न होय. तसेच तो टोळ, मुंग्या, सुरवंट, इतर अळ्या वलहान मृदुकाय प्राणीही खातो. त्याचा विणीचा हंगाम मार्च–ऑगस्टअसतो. जमिनीवर, कधीकधी उजाड सपाट प्रदेशांत, तर इतर वेळेला गवताच्या झुपक्याखाली किंवा जंगलातील खुरट्या, वेड्यावाकड्या, खुज्या झुडपाच्या खालील साधा खळगा हे त्याचे घरटे होय. त्यात मादी दोन किंवा तीन अंडी घालते. ती गोलाकार व २५–३० मिमी. लांबीची असतात. ती मलईसारखी ते चकचकीत फिकट पिवळी असून त्यावर बहुरंगी, फिकट शाईसारखे करडे ठिपके असतात आणि त्यात काळसर तपकिरी, काळ्या व गर्द ऑलिव्ह रंगाच्या रेषा, चरे, ठिपके व चट्टेयांची नक्षी असते. क्षिप्रचला सर्वसाधारणपणे नैसर्गिक अधिवासातवर्ष ६७ वर्ष जगतो.

संदर्भ : Salim Ali, The Book of Indian Birds VIIth Edition, Bombay, 1964. 

जमदाडे, ज. वि.

 

क्षिप्रचला (कर्सोरियस कोरोमंडेलिकस) क्षिप्रचला (कर्सोरियस कर्सर)