पचनज व्रण : (पेप्टिक अल्सर). जठरांत्र मार्गाच्या (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून बनलेल्या अन्नमार्गाच्या) श्लेष्मकलास्तरावर (बुळबुळीत पातळ अस्तरावर) हायड्रोक्लोरिक अम्ल आणि ⇨ पेप्सीन यांच्या संयुक्त परिणामुळे उत्पन्न होणाऱ्या व्रणांना पचनज व्रण म्हणतात. अशा प्रकारचे व्रण जठर व ग्रहणी (लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) या भागांत प्रामुख्याने आढळतात. कधीकधी पचनज व्रण ग्रसिकेच्या (घशाच्या) खालच्या भागात आणि मेकेल अंधवर्धातही (काही व्यक्तींत जन्मजात विकृतीच्या स्वरूपात आढळणाऱ्या, लहान आतड्याच्या शेवटच्या भागात एका बाजूला असलेल्या पिशवीसारख्या भागातही जे. एफ्. मेकेल ज्युनिअर या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) होतात. जठर-रिक्तांत्र संमीलन (जठर व रिक्तांत्र–लहान आतड्याचा मधला भाग–एकमेकांस जोडून अन्नपदार्थ ग्रहणीत न जाऊ देता सरळ रिक्तांत्रात सोडणे) या शस्त्रक्रियेनंतरही पजनज व्रण रिक्तांत्रात होण्याची शक्यता असते. झोलिंजर-इलिसन लक्षणसमूह या विकृतीत जठररसाचे उत्पादन भरमसाट वाढते. या विकृतीचे मूळ कारण ⇨ अग्निपिंडात होणारे अर्बुद (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या निरुपयोगी गाठी) असते. गॅस्ट्रिन या हॉर्मोनाचे (उत्तेजक स्रावाचे) उत्पादन अतिशय वाढून परिणामी हायड्रोक्लोरिक अम्ल व पेप्सिनाचे प्रमाण भयंकर वाढते. या लक्षणसमूहातही पचनज व्रण रिक्तांत्रात होण्याची शक्यता असते.

पचनज व्रण साधारणपणे १ ते ३ सेंमी. लांबी-रुंदीचा असून त्याची कड स्पष्ट व विविक्त असते. व्रणाचा तळ स्नायुस्तराचा असून त्यावर श्लेष्म – अधःश्लेष्मकलास्तरातील कोशिकांचा (पेशींचा) चिकट व घट्ट थर असतो. त्याच्या बाहेरचा पर्युदराचा (उदरभित्तीच्या आतील बाजूस असलेल्या व उदरातील इंद्रियांवर आच्छादनासारख्या असलेल्या श्लेष्मकला अस्तराचा) थरही जाड झालेला असतो. व्रण बहुधा चिरकारी (दीर्घकालीन) असल्यामुळे त्याच्या तळाभोवती तंतुमय ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाचा) प्रसार होऊन आजूबाजूच्या इंद्रियांना तो चिकटतो. तसेच व्रण वारंवार होत गेल्याने त्या जागी उत्पन्न झालेल्या तंतूंचे संकोचन होते. या संकोचनामुळे जठर व ग्रहणी यांचा आकार बदलून त्यांतील अन्नमार्गाला रोध उत्पन्न होतो.

प्रकार : पचनज व्रणाचे दोन प्रकार आढळतात : (१) तीव्र आणि  (२) चिरकारी.

तीव्र पचनज व्रण : बहुधा एकापेक्षा जास्त असलेले हे व्रण जठराच्या सबंध श्लेष्मकलास्तरावर विखुरलेले आढळतात. ग्रहणीच्या पहिल्या भागातही ते असतात. श्लेष्मकलास्तरावर जागजागी उथळ अपक्षरण (काही भाग निघून जाणे) होते. व्रण छोट्या आकारमानाचे असून फक्त वरच्या थरापर्यंतच मर्यादित असतात. ते जलद व संपूर्ण बरे होतात. अन्नविषबाधा, मूत्रविषरक्तता (रक्तातील मूत्रघटकांच्या अस्तित्वामुळे निर्माण होणारी विषारी अवस्था), रक्तस्रावी रोग (रक्त गोठण्यास अतिशय वेळ लागत असल्याने रक्तस्राव आटोक्यात राहण्यात अडचणी उत्पन्न होणारा आनुवंशिक रोग), तीव्र संक्रामणजन्य (संसर्गजन्य) ज्वर तसेच ॲस्पिरीन, ब्युटाझोलिडॉन, कॉर्टिसोन इ. औषधांचे सेवन यांमुळे तीव्र व्रण उद्‌भवतात. वारंवार अल्पकाल टिकणारे अपचन हे प्रमुख लक्षण असते. कधीकधी रक्तमिश्रित वांत्या होतात. इलाजामध्ये सौम्य आहार, विश्रांती व अम्लप्रतिकारक (अम्लतेला रोध करणारी किंवा त्याचे उदासिनीकरण करणारी) ओषधे गुणकारी असतात. बहुतेक सर्व व्रण बरे होतात परंतु कधीकधी एखादा व्रण चिरकारी होण्याची शक्यता आहे.

चिरकारी पचनज व्रण : मानवामध्ये अधिकांश प्रमाणात आढळणारा हा रोग असून एका अंदाजाप्रमाणे इंग्लंडमधील प्रौढ पुरुष लोकसंख्येपैकी १५%  व्यक्ती या रोगाने पछाडलेल्या असाव्यात. यूरोप, अमेरिका, स्कँडिनेव्हियन देश या प्रदेशांत १९३० सालानंतर या रोगाचे प्रमाण सतत वाढत असल्याचे आढळले आहे. आफ्रिकन बांटू जमातीत त्याचे प्रमाण बरेच कमी आहे, तर नायजेरियन लोकांत ते अधिक आहे. भारतातही या रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले असून ग्रहणी व्रणाचे भारतातील प्रमाण जठर व्रणापेक्षा २०–३० पट अधिक आढळले आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यांत पचनज व्रणाचे प्रमाण उत्तर भारतापेक्षा अधिक असून त्या भागात तो एक नेहमी आढळणारा रोग आहे. काश्मीरमध्येही थोड्याबहुत प्रमाणात तो आढळतो.

हा रोग विशीच्या खालच्या वयात सहसा आढळत नाही. पुरुषांमध्ये १५ ते ६० वयापर्यंत तो केव्हाही उद्‌भवण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये ऋतुनिवृत्तीनांतरच्या वयात त्याचे प्रमाण वाढते. पुरुष-स्त्री रुग्णांचे गुणोत्तर ६ : १ असावे. ग्रहणी व्रण कोणत्याही वयात आणि कोणत्याही व्यावसायिकात होण्याचा संभव असला, तरी तो बहुतकरून बुद्धिमान, चाळीशीच्या वयातील, जबाबदारीचे काम करणाऱ्या आणि आधुनिक संस्कृतीतील मानसिक तणावाखाली सतत वावरणाऱ्या व्यक्तींत अधिक आढळतो, म्हणून तो डॉक्टर, अभियंते व व्यवसाय कार्याधिकारी (व्यवसाय प्रकल्पाचा आराखडा तयार करून तो आपल्या देखरेखीखाली अंमलात आणणे ही जबाबदारीची कामे करणारे अधिकारी) हे व्यवसाय करणाऱ्यांत अधिक आढळतो. याउलट जठर व्रणाचे प्रमाण अपुरा पौष्टिक आहार सेवन करणाऱ्या पन्नाशीच्या वयातील मजूरवर्गात अधिक आढळते.

नेहमी पचनज व्रणनिर्मिती होणारे भाग : (१) जठर लघुवक्र कडेलचा भाग, (२) ग्रहणीचा पहिला भाग.कारणे : चिरकारी पचनज व्रणाचे निश्चित कारण अज्ञात आहे. पुढील गोष्टी व्रणनिर्मितीस मदत करीत असाव्यात : (१) चिंता, मानसिक ताण आणि भावनाक्षोभ यांचा मेंदूतील अधोथॅलॅमस व प्राणेशा तंत्रिका केंद्रावर [ ⟶ तंत्रिका तंत्र ] उत्तेजक परिणाम होत असावा. त्यामुळे जठररसाचे उत्पादन भरमसाट वाढत असावे. (२) कॉर्टिकोस्टेरॉइड औषधांचे सेवन पचनज व्रण तयार होण्याचा धोका वाढवतात. ही औषधे जठररसातील श्लेष्मा-प्रथिने कमी करतात, तसेच एकूण रसाची श्यानता (दाटपणा) कमी करतात व त्यामुळे त्याचा संरक्षणात्मक गुणधर्म कमी होऊन श्लेष्मकलास्तरास इजा होण्याचा संभव वाढतो. (३) पचनज व्रण गर्भारपणात सहसा आढळत नाही. तसेच तो स्त्रियांच्या जननक्षम कालातही अत्यल्प प्रमाणात  आढळतो. यावरून हॉर्मोनांचा संबंध असावा. (४) ⇨ परावटू ग्रंथी, ⇨ पोष ग्रंथी, अग्निपिंड यांची अर्बुदे व पचनज व्रण यांचा संबंध प्रस्थापित झालेला आहे. या संदर्भात झोलिंजर-इलिसन लक्षणसमूहाचा उल्लेख वर आलेला आहे. (५) अम्ल-पेप्सिनाच्या सतत सान्निध्यात असूनही जठर श्लेष्मकलास्तराचे त्यांच्या परिणामापासून संरक्षण कसे होते, याविषयी अजून निश्चित माहिती नाही. जठररसातील म्युकोपॉलिसॅकॅराइडे [ ⟶ कार्बोहायड्रेटे ] या संरक्षणास कारणीभूत असावीत. पचनज व्रणाचे प्रमाण ‘ओ’  रक्तगट असणाऱ्यांत अधिक असल्याचे आढळून आले आहे. ‘ओ’  रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या जठररसात हे संरक्षणदायी घटक स्रवत नसल्यामुळे व्रण तयार होतात. ग्रहणी व्रण असलेल्या रोग्याच्या नातेवाईकास तो रोग होण्याची शक्यता तिपटीने अधिक असते. (६) श्लेष्मकलास्तरास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत सूक्ष्मजंतुसंसर्गामुळे विकृती होऊन रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तेथील कोशिकांची प्रतिकारशक्ती कमी पडून जठर अम्ल व पेप्सीन त्यांचे पचन करतात आणि व्रण तयार होतो. (७) काही अंशी अनियमित, पचनास जड, अतिउत्तेजक आहार व्रणनिर्मितीस मदत करीत असावा.


लक्षणे : चिरकारी पचनज व्रणाच्या लक्षणांत स्थानपरत्वे अगदी थोडा फरक असतो. प्रमुख लक्षण वेदना असून त्या बहुतकरून अधिजठर भागात मर्यादित व अधूनमधून होणाऱ्या अपचनासहित असतात. वेदनाही एकसारख्या नसून राहून राहून येतात. मंद, कुरतडल्यासारखे किंवा जाळल्यासारखे पोटात दुखते. दुखणे थांबल्यानंतर रोग्याला कित्येक आठवडे किंवा महिने आराम वाटत राहतो. शारीरिक कष्ट, अतिधूम्रपान, मानसिक ताण, भावनिक प्रक्षोभ यांमुळे वेदना पुन्हा सुरू होतात. अशा प्रकारची आवर्तता ग्रहणी व्रणात जठर व्रणापेक्षा जास्त सातत्याने आढळते. या वेदनांचा व अन्नसेवनाचा संबंध असल्याचे लॉर्ड मोयनिहॅन (बी. जी. ए. मोहनिहॅन) नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश शस्त्रक्रियाविशारदांनी प्रथम दाखविले. जठर व्रणाच्या रोग्यात वेदना अन्नसेवनानंतर ३०–६० मिनिटांनी सुरू होतात व सर्वसाधारणपणे १ ते २ तास टिकतात. दुसऱ्या वेळी तोच प्रकार पुन्हा होतो. याउलट ग्रहणी व्रणात जेवणानंतर १ १/२   ते २ तासांपर्यंत कोणत्याही वेदना होत नाहीत. मात्र वेदना सुरू झाल्यानंतर एक-दोन तास टिकतात. विशेष म्हणजे अन्नसेवनाने या वेदना शमतात. दोन्ही व्रणांच्या वेदना क्षारधर्मी (अम्लाचे उदासिनीकरण करणाऱ्या अल्कलाइन) पदार्थांच्या किंवा अम्लप्रतिकारकांच्या सेवनाने कमी पडतात. जठर व्रणामध्ये उलटी होणे, खाल्लेले सर्व अन्न पडणे हे एक लक्षण असते. कित्येक वेळा रोगी मुद्दाम उलटी करून अन्न पाडून टाकतो व वेदना शमविण्याचा प्रयत्नही करतो. ग्रहणी व्रणात सहसा उलटी होत नाही. कधीकधी रक्तमिश्रित वांत्या होतात. रक्तमिश्रित काळसर दुर्गंधियुक्त मलविसर्जन होते. व्रणाच्या तळाची रक्तवाहिनी मोठी असेल, तर फार रक्तस्राव होऊन रोग्याला मूर्च्छाही येते. रोग्याच्या अन्नवासनेवर परिणाम होत नाही परंतु जठर व्रणाचा रोगी वेदनांच्या भितीने अन्नसेवनच टाळू लागतो. परिणामी त्याचे वजन घटते. याउलट ग्रहणी व्रणाच्या रोग्याचे वजन वाढते कारण अन्नसेवनामुळे त्याच्या वेदना शमत असल्याने तो अधिक खातो.

निदान उपद्रव : निदानाकरिता बेरियम सल्फेट गिळावयास देऊन क्ष-किरण तपासणी, जठर अम्ल स्रवण परीक्षा, मलपरीक्षा, जठरदर्शन या परीक्षा उपयुक्त असतात. उपद्रवामध्ये तीव्र आणी चिरकारी असे दोन्ही प्रकारचे उपद्रव संभवतात. छिद्रण, रक्तस्राव व परिजठर विद्रधी (गळू) यांचा तीव्र उपद्रवांत समावेश होतो. अंतर्गमन (खोलवर चरत जाणे), जठरनिर्गमी संकोच (जठराच्या निर्गम द्वाराचे आंकुचन) आणि कर्करोगात रूपंतर होणे यांचा समावेश चिरकारी उपद्रवांत होतो.

चिकित्सा : इलाजांमध्ये प्रथम स्थान नेहमी औषधी इलाजांना देतात. वैद्यकीय सल्ल्यानुसार कार्यक्षम आणि योग्य अशा जोरदार औषधी इलाजानंतरही आराम न पडल्यास शल्यचिकित्सेचा विचार करावा लागतो. संपूर्ण विश्रांती, धूम्रपान व मद्यपान संपूर्ण वर्ज्य करणे, सौम्य आहार–विशेषेकरून दूध, साय, उकडलेल्या भाज्या (मसाले वर्ज्य), मऊ चपात्या किंवा भाकरी यांचा समावेश असलेला आहार या गोष्टी उपयुक्त ठरतात. औषधांमध्ये अम्ल-प्रतिकारके, कोलीनरोधके [ ⟶ कोलीन], कार्बेनोक्सोलोन सोडियम इ. औषधे देतात.

छिद्रण, रक्तस्राव, परिजठर विद्रधी यांसारखे उपद्रव झाल्यास शस्त्रक्रिया अपरिहार्य असते. कधीकधी जठरनिर्गमी संकोच व कर्करोगाची शंका आल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. सर्वसाधारणपणे पचनज व्रणाकरिता शल्यचिकित्सेचा अवलंब अगदी अत्यावश्यक भासेपर्यंत टाळावा.

भालेराव, य. त्र्यं. ढमढेरे, वा. रा.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : हे व्रण स्थानाप्रमाणे दोन असतात. एक आमाशयाला होणारा व दुसरा आमाशयाच्या खाली ग्रहणीच्या भागात होणारा.

आमाशय व्रण : जेवल्याने अन्नाचा स्पर्श व्रणाला होऊन क्षोभ होतो त्यामुळे शूल जास्त होत आसतो. पुष्कळ वेळा ह्यामध्ये जेवणानंतर वांती होते. आमाशय रिकामा असता शूल कमी असतो. उपचार : त्रिफलेचे सूक्ष्म चूर्ण मध आणि गायीचे तूप ह्यांबरोबर पोट रिकामे असताना सकाळी व दर चार तासांनंतर चाटवावे. ज्येष्ठमघ, आस्कंद ह्यांनी सिद्ध दूध मध घालून रिकाम्या पोटी पाजावे. आहारात तिखट व खारट पदार्थ वर्ज्य करावेत, कडू व गोड द्यावे. घन पदार्थ न देता पातळ पदार्थ द्यावेत. सूतशेखर शंखभस्म, कपर्दिक भस्म, लीलाविलास रस ही औषधे तूप व मधातून द्यावीत.

ग्रहणी व्रण : ह्यातही शूल असतोच. जेवणानंतर बरे वाटते व जेवणाला उशीर झाला, तर अधिक दुखते. ह्यात भात, तिखट व आंबट पदार्थ अजिबात वर्ज्य करावेत. घशाशी आंबट येत असेल, तर हिरडा मधाबरोबर चाटावा. शंखवटी जेवण झाल्यावर पाण्याबरोबर घ्यावी. आम्ल पित्तावरचे सर्व उपचार करावेत. शूल अधिक होत असल्यास नारिकेला लवण किंवा कपर्दिक भस्म मध व तुपाबरोबर द्यावे. लीलाविलास रस १ गुंज किंवा आनंदसूत १/४ गुंज मध व तुपातून द्यावा व वर दूध प्यावे. गरम पाणी भरलेली बाटली कपडा गुंडाळून पोटाशी धरावी व सौम्य शेक करावा. आमाशय व्रणज शूलातही असे करावे. व्रण भरून येण्याकरिता ज्येष्ठमध आणि आस्कंद ह्यांनी दूध सिद्ध करून सकाळ-संध्याकाळ द्यावे. वसंतकुसुमाकर रस १ गुंज सकाळी व सायंकाळी मधातून द्यावा. ह्यात रक्तस्राव होत असतो. शौचाला डांबरासारखे चकचकीत व काळे होत असते. त्या मळावर पाणी टाकले, तर ते पाणी लाल होते. त्या वेळी ताम्रभस्म मध व तुपातून द्यावे. त्या वेळी आहार म्हणूनही मोचरस, अश्वगंधा व ज्येष्ठमध ह्यांनी सिद्ध दूध तर तीन तासांनी द्यावे. चंद्रकला तापवून थंड केलेल्या पाण्यामध्ये मिसळून थोड्या थोड्या वेळाने एक चमचा पाणी पाजीत असावे. रक्तस्राव बंद झाल्यानंतर मध व शतावरी घृतातून वसंतकुसुमाकर किंवा मलावरोध असल्यास त्रिफला घृत आणि मध यांतून द्यावा.

पटवर्धन, शुभदा अ.