मार्कस टेरेन्शस व्हॅरोव्हॅरो, मार्कस टेरेन्शस : (११६-२७ इ. स. पू.). रोमन विद्वान आणि ग्रंथकार. इटलीतील रीएती येथे एका सुखवस्तू कुटुंबात जन्म. जन्मस्थळावरून तो ‘रीएतीनस व्हॅरो’ म्हणूनही ओळखला जातो. रोमन भाषाविज्ञ ल्यूशस ईलीअस स्टायलो आणि ग्रीक तत्त्वज्ञ ॲस्कलॉनचा अँटायओकस हे त्याचे गुरू. अँटायसओकसकडे तत्त्व ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी व्हॅरो अथेन्सला गेला होता. राजकारणात तो ⇨ गेयस ज्यूलिअस सीझरचा विरोधक पाँपी द ग्रेटचा समर्थक होता. परंतु पुढे सीझरशी त्याने जुळवून घेतले. सीझरने एका सार्वजनिक ग्रंथालयाचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक केली. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. तो कवी, उपरोधक, विधिवेत्ता, भूगोलज्ञ, व्याकरणकार आणि वैज्ञानिकही होता. तथापि त्याने रचिलेल्या ७४ ग्रंथांपैकी (या ग्रंथांची खंडसंख्या ६००) फारच थोडे उपलब्ध आहेत. त्यात दी रे रुस्टिका, दी लिंगुआ लॅटिना ह्या ग्रंथांच्या एकूण २५ खंडांपैकी ६ खंड आणि सातीरेऽ मेनिपेऽ ह्या गद्यपद्यात्मक उपरोधिकेच्या सु. ६०० ओळींचा अंतर्भाव आहे. दी रे रुस्टिका हा कृषिविज्ञान ग्रंथ आहे. तो त्याने वयाच्या ऐंशीव्या वर्षी लिहिला, असे त्या ग्रंथातील एका निर्देशावरून दिसते. ह्या ग्रंथाचे तीन खंड वेगवेगळ्या व्यक्तींना उद्देशून लिहिलेले असून, त्यांचे स्वरूप संभाषणात्मक आहे. शेती, तिच्यासाठी लागणारी विविध प्रकारची साधनसामग्री, वर्षातील विविध ऋतूंत करावयाची शेतीची कामे, पशुपालन, कुक्कुटपालन, मधमाशापालन अशा विविध विषयांचा परामर्श व्हॅरोने ह्या ग्रंथात घेतला आहे. कृषिविषयक लेखन करणाऱ्या पूर्वसुरींच्या ग्रंथांची पूर्ण सूची व्हॅरोने ह्या ग्रंथात दिली आहे. [→ विश्वकोश]. दी लिंगुआ लॅटिना हा त्याने लॅटिन व्याकरणावर लिहिलेला ग्रंथ (इ. स. पू. ४२) तो ⇨ सिसरोला केलेला आहे. सातीरेऽ मेनिपेऽ म्हणजे मेनिप्पस या ग्रीक तत्त्वज्ञाने (इ.स.पू. तिसरे शतक) औपरोधिक शैलीचे अनुकरण करून लिहिलेल्या गद्यपदात्मक उपरोधिका होत. तत्कालीन रोमन समाज हा त्यांचा विषय. विनोदी, हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेल्या ह्या उपरोधिकांना कायमची आस्वाद्यता आहे. आंटीक्कीटाटेस रीरूम हुमानाराऊम एट डिवीनारूम हा त्यांच्या पुरतत्त्वीय अभ्यासाचा ग्रंथ (४१ खंड). हा ग्रंथ आज उपलब्ध नसला, तरी ⇨ सेंट ऑगस्टीनने आपल्या De Civitate Dei (इं. शी. द सिटी ऑफ गॉड, २२ खंड) ह्या ग्रंथाच्या सहाव्या खंडात या ग्रंथाबद्दल लिहिले आहे. त्याच्या हेबेडोमाडेस किंवा इमागिनुम लिबरी XV ह्या ग्रंथात ग्रीक आणि रोमन व्यक्तींची चरित्रे आणि चित्रेही दिलेली होती. डिसिप्लिनेरमऽ लिबरी IX (इं. शी. नाइन बुक्स ऑफ डिसिप्लिन्स) हा व्याकरण, तर्कशास्त्र, वक्तृत्वशास्त्र, भूमिती, अंकगणित, फलज्योतिष, संगीत, वैद्यक आणि वास्तुकला अशा नऊ विषयांना वाहिलेला ज्ञानकोश होता. दी फिलोसोफिया हा त्याचा तत्त्वज्ञानावरील ग्रंथ.

सिसरोने अकाडेमिका ह्या आपल्या ग्रंथाची दुसरी आवृत्ती व्हॅरोला अर्पण केली. ‘सर्वांत विद्वान आणि व्यासंगी रोमन’ म्हणून ⇨ मार्कस फेबिअस क्विंटल्यन याने त्याची स्तुती केली. ‘व्हॅरोने इतके वाचन केले होते, की त्याला लिहायला वेळ कसा मिळाला ह्याचे आश्चर्य वाटते आणि त्याने एवढे लेखन केले होते, की त्याला वाचायला वेळ कसा मिळाला ह्याचा विस्मय वाटतो’ असे उद्गार सेंट ऑगस्टीनने त्याच्याबद्दल काढले आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू आणि सेंट ऑगस्टीन ह्यांच्या लेखनातून रोमन धर्माच्या आणि चालीरीतींच्या संदर्भात व्हॅरोचे अनेकदा निर्देश येतात. असे दिसते, की व्हॅरो हा एकेश्वरवादी होता. साऱ्या विश्वाला चैतन्यमय करणारी महान शक्ती म्हणून तो ⇨ ज्यूपिटर या देवतेकडे पाहत असे. रोमनांचे इतर देव म्हणजे त्याच महान शक्तीचे वेगवेगळे आविष्कार होत, अशी त्याची धारणा होती.

कुलकर्णी, अ. र.