प्लॉटस, टायटस मॅक्सियस : (सु. २५४-१८४ इ.स.पू.). विख्यात रोमन सुखात्मिकाकार. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. असे म्हटले जाते, की तो अंब्रियातील सार्सिना येथे जन्माला त्याची मातृभाषा अंब्रियन (आज मृत म्हणून गणली गेलेली एक इटालिक बोलभाषा) होती लॅटिन भाषा तो रोमला शिकला रोमन रंगभूमीशी त्याचा संबंध एक कारागीर (सुतार) म्हणून आला (नट म्हणूनही तो आला असल्याची शक्यताही सूचित केली जाते) ह्या व्यवसायातून मिळालेला पैसा त्याने एका घंद्यात घातला धंद्यात खोट आल्यामुळे पिठाच्या गिरणीत काम करून त्याला काही काळ उदरनिर्वाह करावा लागला त्यानंतर तो नाटके लिहू लागला यशस्वी नाटककार म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली आणि ह्या विपन्नावस्थेतून तो सावरला.

नाटककार म्हणून प्लॉटसला एवढी मोठी कीर्ती प्राप्त झाली होती, की त्याचे अनुकरण करणाऱ्या अनेक सामान्य नाटककारांना आपल्या नाट्यकृतींवर त्याचे नाव घालण्याचा मोह होत असे. शिवाय अन्य नाटककारांच्या कृती तो संस्कारीतही असे. त्यामुळे प्लॉटसच्या नावावर आज १३० नाटके मोडतात. ⇨ व्हॅरो (११६-२७ इ. स. पू.) ह्या रोमन विद्वानाने निश्चितपणे प्लॉटसच्या म्हणून सामान्यतः मानल्या गेलेल्या एकूण २१ नाट्यकृतींची सूची दिलेली आहे. ह्या नाट्यकृती आज उपलब्ध आहेत तथापि त्यांतील ‘वॅलेट’ ह्या इंग्रजी शीर्षकार्थाची नाट्यकृती अत्यंत त्रुटित स्वरूपात मिळते. उर्वरित वीस नाटके इंग्रजीत अनुवादित झालेली असून द कंप्लीट रोमन ड्रामा (दोन खंड, १९४२) ह्या संग्रहात अंतर्भूत आहेत.

प्लॉटसच्या काळातील रोमन सुखात्मिकाकारांसमोर ग्रीक नवसुखात्मिकेचा आदर्श होता. ॲरिस्टोफेनीस ह्या विख्यात ग्रीक सुखात्मिकाकाराच्या निधनानंतर अवतरलेली ग्रीक नव-सुखात्मिका ही आचारविनोदिनीला (कॉमेडी ऑफ मॅनर्स) अधिक जवळची होती. सर्वसामान्यांच्या जीवनांतून तिची संविधानके घेतलेली असत. प्रेमी युगुलांची साहसे हा ह्या सुखात्मिकांचा एक नेहमीचा विषय. [⟶ ग्रीक साहित्य-सुखात्मिका]. प्लॉटसनेही ⇨मिनँडर, फिलीमन, डिफिलस ह्यांसारख्या ग्रीक नव-सुखात्मिकाकारांच्या नाट्यकृतींची लॅटिन रूपांतर केली. त्याच्या विशेष उल्लेखनीय सुखात्मिकांत ’अँफिट्रिऑन’, ’द टू बॅकाइड्स’, ’द कॅप्टिव्ह्‌ज, ’द व्टिन मेनीक्‌मी’, ’द ब्रॅगर्ट वॉरिअर’, ‘स्यूडोलस’, ’रोप’, ’द पॉट ऑफ गोल्ड’ आणि ’थ्री पेनी डे’ (सर्व इं. भा. आणि उपर्युक्त संग्रहात अंतर्भूत) ह्यांचा समावेश होतो. ही नाटके कोणत्या वर्षी रचिली गेली, ह्याबाबतचे निश्चित तपशील उपलब्ध नाहीत.

ग्रीक नव-सुखात्मिकांचा आदर्श समोर ठेवून प्लॉटसने आपल्या नाट्यकृती रचिलेल्या असल्यामुळे उपर्युक्त ग्रीक नव-सुखात्मिकाकारांच्या काळातील ग्रीक जीवन त्याच्या सुखात्मिकांत प्रतिबिंबित झालेले आहे तथापि त्यांत प्लॉटसच्या काळातील रोमन जीवनाची वैशिष्ट्येही चित्रित झालेली आहेतच. शिवाय प्लॉटस हा आंधळा अनुकारक नव्हता. ग्रीक नव-सुखात्मिकांतून उपलब्ध होणाऱ्या कथानकादी सामग्रीचा यथोचित उपयोग करून रोमन प्रेक्षकांच्या अभिरुचीशी सुसंगत अशी नाट्यकृती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले स्वायत्त कलात्मक भान त्याच्या ठायी होते विनोदनिर्मितीची स्वतंत्र प्रतिभा होती. आपणास हवा असलेला नाट्यपरिणाम साधण्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य प्लॉटसने निःसंकोचपणे घेतलेले आहे. रोमन कल्पना, नावे, चालीरीती रोमन न्यायालयांची कार्यपद्धती, रोम शहरातील रस्ते, इटलीतील शहरे ह्यांचे प्लॉटसच्या नाट्यकृतींतून आढळणारे उल्लेख हे प्लॉटसने मूळ ग्रीक नाट्यकृतींना रोमन वेश चढविताना त्याने दाखविलेल्या धार्ष्ट्याचेच द्योतक आहे. त्याच्या सुखात्मिकांतील बहुतांश भाग गीतांचा आहे त्यामुळे त्या संगीतिकांच्या जवळपास येतात. संविधानकाला नीटस घाट देण्याच्या बाबतीत प्लॉटस काहीसा निष्काळजी असल्याचे दिसते. प्रहसनात्मकतेवर त्याचा विशेष भर होता. त्याच्या काही नाटकांची संविधानके तर विविध प्रहसनात्मक प्रसंगांना वाव देण्यासाठी उभ्या केलेल्या निव्वळ चौकटीच होत. असे असले, तरी प्लॉटसच्या नाटकांना फार मोठी लोकप्रियता मिळाली होती कारण प्रेक्षकांच्या अभिरूचीचे नेमके भान त्याला होते. आपल्या नाट्यकृतींत एक प्रकारची यांत्रिक परिपूर्णता तो आणू शकला नसला, तरी नाट्याचा जोम आणि सामर्थ्य कायम टिकविण्यात तो यशस्वी झालेला आहे. शिवाय रंगभूमीच्या तांत्रिक अंगांचे त्याला उत्तम ज्ञान असल्यामुळे त्याचाही उपयोग यशस्वी नाट्यनिर्मितीसाठी त्याने करून घेतला. रांगडा विनोद, चुरचुरीत संवाद व मनोरंजक गाणी या वैशिष्ट्यांमुळे त्याच्या नाट्यकृतींना अपार लोकप्रियता मिळाली.

प्लॉटसच्या मृत्यूनंतरही, दीर्घकाळ त्याच्या सुखात्मिका रोमन रंगभूमीवर सादर केल्या जात होत्या. शेक्सपिअर, फ्रेंच नाटककार ⇨ मोल्येर ह्यांसारख्यांनी प्लॉटसच्या नाट्यकृतींच्या आधारे आपल्या काही नाटकांची निर्मिती केलेली आहे.

संदर्भ : Duckworth, G.E. The Nature of Roman Comedy, Princeton, 1952.

कुलकर्णी, अ. र.