काटलस, गेयसव्हालीअरिअस: (सु.८४-सु.५४ इ.स.पू.). श्रेष्ठ रोमन कवी. जन्म व्हेरोना येथे एका सुखवस्तू घराण्यात. लॅटिनबरोबरच ग्रीक भाषेवरही त्याने प्रभुत्व मिळविले होते. इ.स.पू.६२ च्या सुमारास तो रोमला आला आणि तेथील अभिजनवर्गात त्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली. तेथे क्लॉडिया नावाच्या एका सुंदर विवाहित स्त्रीच्या प्रमात तो पडला. तथापि तिने त्याची वंचना केली. त्याचे रचिलेल्या काही उत्कट भावकवितांमधील `लेस्बिआ’ हीच असावी. आनंद, दुःख, तिरस्कार, विरक्ती अशा अनेक भावभावनांचे प्रतिबिंब या भावकवितांत आढळते. त्याशिवाय त्याने लिहिलेल्या विलापिका आणि सीझरसारख्या राजकीय व्यक्तींवरील विडंबन काव्ये उल्लेखनीय आहेत. त्याने सुभाषितवजा लहान कविताही लिहिल्या. ग्रीक काव्याचा त्याचावर प्रभाव होता. भावकवी म्हणून  ⇨ सॅफो  आणि  ⇨शेली ह्यांच्याबरोबर त्याचे नाव घेतले जाते. त्याच्या काव्याने व्हर्जिलही प्रभावित झाला होता. ऑगस्टन युगातील कबींना त्याच्या बिलापिका मार्गदर्शक ठरल्या. रोम येथे तो निधन पावला.

संदर्भ:1. Havelock, E.A. The Lyric Genius of Catullus, Toronto, 1939.

2.Wheeler, A.L.Catullus anthe Traditions of Ancient Poetry, Berkeley, California, 1934.

हंबर्ट, जॉ. (इं.) कुलकर्णी, अ.र. (म.)