संयुक्त दाबछिद्रण व कातर यंत्र : डाव्या बाजूस दाबछिद्रणकाम तर उजव्या बाजूस कातरकाम केले जाते. मध्यभागी वरच्या अंगास विद्युत् चलित्र बसलिले आहे.

दाबछिद्रण व कातर यंत्र : (पंचिंग ॲँड शिअरिंग मशीन). संरचनात्मक जोडकामासाठी बाजारात उपलब्ध होणारे मृदू पोलादाचे निरनिराळ्या आकारांचे छेद फार मोठ्या प्रमाणावर वापरावे लागतात. उदा., पत्रा, पाट, पट्टी, सळई, कांब, कोन, पन्हळी, तुळई किंवा वासा. या छेदांचे हव्या त्या मापाचे तुकडे पाडण्यासाठी कातर यंत्राचा व अशा तुकड्यांत हव्या त्या मापाची आरपार छिद्रे पाडण्यासाठी दाबछिद्रण यंत्राचा उपयोग करतात. या कामासाठी दोन स्वतंत्र यंत्रे वापरण्याऐवजी एकाच विद्युत् चलित्रावर (मोटरवर) चालणारे एकत्र जुळणी केलेले ‘संयुक्त दाबछिद्रण व कातर यंत्र’ उत्पादन जलद व सुलभ करण्यास सोयीचे होते. अशी यंत्रे चालविण्यास ३ ते ५ अश्वशक्ती लागते. धातू करवतींनी अशा पोलादाचे तुकडे कापताना व त्यांत छिद्रकांनी भोके पाडताना धातूचा काही भाग कीस अथवा भुग्याच्या स्वरूपात वाया जातो व या दोन्ही क्रियांना बराच वेळही लागतो परंतु दाबछिद्रण व कातर यंत्रावर काम जलद होऊन धातूचा नाश होत नाही.

रचना : या यंत्राचा सांगाडा भक्कम बिडाचा केलेला असून त्याची डावी व उजवी बाजू उघड्या तोंडाची असते. डावीकडील तोंडात उच्‍च प्रतीच्या पोलादाची जरूर ती दाबछिद्रक व मुद्रा (डाय) जोडी आणि उजवीकडील तोंडात आवश्यक त्या धारपात्यांची जोडी बसविण्याची योजना केलेली असते. उघड्या तोंडातील खालच्या जबड्यावर हवी ती मुद्रा डावीकडे तर हवे ते धारपाते उजवीकडे पक्के बसवितात. वरच्या जबड्यातून हवा तो दाबछिद्रक अथवा धारपाते वरखाली सरकविण्याची व्यवस्था एका रेटकाच्या (वरखाली होणाऱ्या एका विशेष भागाच्या, रॅमच्या) साहाय्याने करतात. रेटकाची चाल यांत्रिक पद्धतीने भुजादंडाने किंवा कॅमदंडाने [→ कॅम] तसेच द्रवीय दाब निर्माण करून सतत वा खंडित करण्याची योजना केलेली असते. ही चाल दर मिनिटाला १२० पर्यंत आघात करू शकते. यंत्राची कर्तनक्षमता धातूच्या तुकड्याच्या जाडीवर व रुंदीवर ठरविली जाते आणि त्यासाठी लागणारा कर्तन दाब जास्तीत जास्त दर चौ. सेंमी. ला १०,५०० किग्रॅ. लागतो. दाबछिद्रणासाठी वापरलेल्या दाबछिद्रकास धार असून मुद्रेचा पृष्ठभाग सपाट असतो. मुद्रेच्या आरपार छिद्रातून दाबछिद्रक खाली उतरताना कापलेल्या धातूची गोल टिकली खाली पडते. ती छिद्रात चिकटून राहू नये म्हणून मुद्रेतील छिद्र खालच्या अंगास रूंदावलेले ठेवतात.

घातूच्या जाड छेदासाठी रेटकाची गती मंद असावी लागते.पोलादाच्या निरनिराळ्या आकारांच्या छेदाच्या छिद्रण व कर्तनासाठी निरनिराळ्या मापांच्या व आकारांच्या दाबछिद्रक व मुद्रा जोड्या तसेच धारपाती जोड्या वापराव्या लागतात.

संदर्भ : Habicht, F. H. Modern Machine Tools, New York, 1963.

ओक, वा. रा. दीक्षित, चं. ग.