बालरोगविज्ञान : वैद्यकशास्त्राच्या ज्या शाखेत भ्रूणावस्थेपासून ते कुमारावस्थेपर्यंतच्या मानवी रोगांचा सांगोपांग विचार व अभ्यास केला जातो त्या शाखेला ‘बालरोगविज्ञान’ म्हणतात. विसाव्या शतकात या शाखेचा मोठा विस्तार झाला असून ‘नवजात वैद्यक’, ‘प्रसवकालीन वैद्यक’, ‘बालशस्त्रक्रियाविज्ञान’ ‘बालमनोदोष चिकित्सा’ यांसारख्या नव्या उपशाखा तयार झाल्या आहेत. संसर्गजन्य रोग, रोगप्रतिकारक्षमता, तंत्रिका तंत्रविज्ञान (मज्जासंस्थेचे कार्य व विकार यांसंबंधीचे विज्ञान), वृक्कविज्ञान (मूत्रपिंडाचे कार्य व विकार यांसंबंधीचे विज्ञान), हृद्रोगविज्ञान यांसारख्या वैद्यकाच्या शाखांतूनही लहान मुलांच्या या विकृतींसंबंधी विशेष विचार करण्यात येऊ लागला असून बालरोगविज्ञानात सतत भर पडत आहे. नवीन संशोधनाद्वारे ‘कावासाकी रोग’ [टोमिसाक कावासाकी नावाच्या जपानी शास्त्रज्ञांनी शोधलेला आणि तीव्र स्वरुपाचा ज्वर व मानेतील लसीका ग्रंथींची ( लसीका तंत्र) वेदनायुक्त वृद्धी होणारा लहान मुलांतील आजार] यासारख्या रोगांविषयी उपलब्ध होणाऱ्या माहितीमुळे बालरोगविज्ञानाची सातत्याने प्रगतीच होत आहे. रोगप्रतिबंधाकडे विशेष लक्ष पुरवण्यात येऊ लागल्यापासून ‘प्रतिबंधक बालरोगविज्ञान’ ही नवी उपशाखाच तयार झाली आहे.

इतिहास : ऐतिहासिक दृष्ट्या पहाता बालरोगांचा विशेष विचार रोग बरा करण्यापुरताच मर्यादित असावा व तो जगाच्या सर्व भागांत प्रसृत असावा. भारतातील ख्रिस्तपूर्व काळातील बालरोगांसंबंधीचे विचार विशेष उल्लेखनीय आहेत. ख्रिस्तजन्मापूर्वी काही वर्षे अगोदर लिहिलेल्या काश्यपसंहिता नावाच्या हिंदू वैद्यकावरील ग्रंथात ‘कौमारभृत्य’ म्हणजे बालसंगोपन या विषयावर सबंध प्रकरण आहे. सुप्रसिद्ध भारतीय वैद्य सुश्रुत (इ. स. सु. दुसरे शतक) यांनीही आपल्या ग्रंथात एक प्रकरण‘कौमारभृत्य’ म्हणूनच लिहिले आहे. जगातील बालरोगविज्ञानाचा पहिला उल्लेख या भारतीय ग्रंथातूनच झाला असावा. 

पाश्चात्य देशांत सुप्रसिद्ध ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ (इ. स. पू. ४६०-३७७) यांनी लहान मुलांच्या दात येण्यावर विस्तृत चिकित्सा लिहिली होती. याशिवाय बालकांच्या इतर काही रोगांसंबंधी उल्लेख केला होता. हिपॉक्राटीझ यांच्या नंतर सु.४५० वर्षे बालरोगांसंबंधी विशेष लिखाण झाले नाही. इ. स. पहिल्या शतकात ऑलस (ऑरीलिअस) कॉर्नीलिअस सेल्सस या रोमन वैद्यकीय लेखकांनी बालकांची बरीच निरीक्षणे करून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले. त्यांचे हिपॉक्राटीझ यांच्या विचारप्रणालीबाबत काही मतभेद होते. गेलेन (१३१-२०१) या ग्रीक वैद्यांनी नवजात अर्भकांची शुश्रूषा, संगोपन, त्यांना शांत कसे करावे, वाईट सवयी लागणे कसे टाळावे इत्यादींवर लेखन केले. इ. स. दुसऱ्या शतकात ग्रीसमधील सोरेनस ऑफ इफेसस यांनी आपल्या हस्तलिखित ग्रंथांत बालकांचे पोषण आणि आरोग्यविज्ञान या विषयांवर बुद्धिसंमत नियम सांगितले असून बालरोगांवर स्वतंत्र प्रकरण दिले आहे आणि त्यात ⇨ मुडदूस या विकृतीचे वर्णन केले आहे. बायझँटिन काळातील राजवैद्य ऑरिबेझिअस (३२५-४०३) यांनी लहान मुलांत नेहमी आढळणाऱ्या पुरळ, पडसे, खोकला, तोंड येणे, दात येणे इत्यादींचा उल्लेख आपल्या हस्तलिखितात केला आहे. यांशिवाय दूध पाजणे, धात्रीची (दूध पाजणाऱ्या दाईची) लक्षणे, दूध इत्यादींचाही परामर्श घेतला आहे.

बालकांच्या रोगांविषयीच लिहिलेले संपूर्ण पहिले हस्तलिखित रेझिस (राझी ८५०-९३२) या अरबी वैद्यांनी लिहिले होते.⇨कांजिण्या व ⇨देवी या रोगांतील फरक ओळखणारे ते पहिले वैद्य होते. १४८५ मध्ये त्यांच्या हस्तलिखिताची पहिली छापील आवृत्ती निघाली. त्यात तेवीस प्रकरणे असून आरोग्य व शुश्रुषा वगळून फक्त विकृतींचा विचार केला आहे.

मुद्रणकलेच्या शोधानंतरच्या सुरुवातीच्या काळात लिटल बुक ऑन डिसिझेस ऑफ चिल्ड्रेन हा पावलो बागेलार्डो यांचा ग्रंथ १४७२ मध्ये प्रसिद्ध झाला. वैद्यकीय विषयावरील तो पहिलाच छापील ग्रंथ असावा. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस १५१२-१३ च्या सुमारास युकॅरिअस रॉसलीन यांचा Rosegarten हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. बालरोगविज्ञानासंबंधीच्या या ऐतिहासिक महत्त्वाच्या अमूल्य ग्रंथामध्ये बालकांचे आजार व त्यांवरील उपचार याशिवाय गर्भवती स्त्रीची देखभाल आणि संबंधित उपचार यांविषयी माहिती दिलेली आहे. या पुस्तकाच्या चाळीस आवृत्त्या निघाल्या व इतर भाषांतून भाषांतरेही झाली. इंग्रजी भाषांतर १५४० मध्ये छापले गेले. त्यात तीस प्रकरणे असून आजारी बालकांत आढळणाऱ्या सर्व लक्षणांचा त्यात उल्लेख आहे. बालरोगविज्ञानावरील इंग्रजी भाषेतील पहिला स्वतंत्र ग्रंथ टॉमस फेयर यांनी लिहिला व तो १५४५ मध्ये प्रसिद्ध झाला.

  

रोमन काळापासून सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत बालरोगविज्ञानात फारशी भर पडली नव्हती. सतराव्या शतकात मुद्रणकलेच्या प्रगतीबरोबरच या शास्त्रात भर पडत गेली. त्या काळात वैद्यक व्यावसायिकांत फक्त बालरोगांवरच उपचार करणारे व्यावसायिक नसले, तरी वैद्यकाच्या या उपशाखेची सुरुवात याच काळात झाली असे म्हणता येते.

  

केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक फ्रॅन्सिस ग्लिसन यांचा अर्भकांतील मुडदूस या विकृतीसंबंधीचा प्रबंध १६५० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांनी अर्भकांच्या हिरड्या सुजून त्यातून रक्तस्त्राव होणाऱ्या विकृतीचे वर्णनही केले होते. टॉमस फेयर यांच्यानंतर शंभर वर्षांनी या विषयावरील आणखी दोन स्वतंत्र पुस्तके छापली गेली. १६८९ मध्ये वॉल्टर हॅरिन यांनी बालकांच्या तीव्र रोगांवर एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची अनेक भाषांतरे झाली व जवळजवळ शंभर वर्षे तो मान्यवर ग्रंथांत मोडत होता. १७४८ मध्ये विल्यम काडगॅन यांचा बालकांची शुश्रषा व संगोपन यांवरील एक निबंध प्रसिद्ध झाला.


आधुनिक बालरोगविज्ञानाची सुरुवात १७८४ मध्ये मायकेल अंडरवुड यांच्या या विषयावरील ग्रंथाने झाली. जवळजवळ साठ वर्षे हा ग्रंथ एक आधारग्रंथ मानला जात होता. बालकांच्या कृत्रिम आहाराची बीजे या ग्रंथांत प्रथमच आढळतात.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस एडवर्ड जेन्नर यांनी देवी रोगप्रतिबंधक लस शोधली व त्यामुळे बालवयातील या भयंकर साथीच्या रोगावर नियंत्रण करणे शक्य झाले. हा काळपावेतो म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस जनमानसात बालजीवनाचे महत्त्व रुजू लागून तत्कालीन भरमसाट बालमृत्यूंसंबंधी जाणीव होऊ लागली होती. १७९६ मध्ये इंग्लंडमध्ये गरीब अर्भकांकरिता खास दवाखाना प्रथम सुरू करण्यात आला. बालकांचे पोषण व संगोपन यांत सुधारणा होऊ लागली. 

बालकांत आढळणाऱ्या ⇨ लोहितांग ज्वर (ज्यात तळहात, तळपाय, नाक व ओठ यांखेरीज इतर शरीरभागावर लाल पुरळ उमटतो असा स्ट्रेप्टोकोकाय या सूक्ष्मजंतूंमुळे होणारा रोग), देवी व कांजिण्या यांतील फरक, क्षयजन्य मस्तिष्कावरणशोथ [मेंदू व मेरुरज्जू यांच्या वरील आवरणांची दाहयुक्त सूज मस्तिष्कावरणशोथ], ⇨धनुर्वात या रोगांसंबंधी महत्त्वाचे शोध या काळात लागले.

  

एकोणिसाव्या शतकात बालरोगविज्ञानात खूप महत्त्वाची प्रगती झाली. १८५० मध्ये व्हिएन्नाचे आलोईस बेडनर यांचा अर्भकांच्या रोगावरील ग्रंथ प्रसिद्ध झाला. नवजात अर्भकाचे तोंड व दृढ तालू साफ करतेवेळी होणाऱ्या संभाव्य इजेमुळे तेथे व्रण तयार होतो. या विकृतीला ‘बेडनर मुखपाक’ म्हणतात. १८७४ मध्ये ई. एच्. हेनॉक या जर्मन वैद्यांनी बालकांच्या रोगांवर काही उत्तम निबंध प्रसिद्ध केले. त्यांतील एकामध्ये त्यांनी एका ⇨ नीलारुपी रोगाचे वर्णन केले. आजही तो रोग हेनॉक व जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक जे. एल्. शन्लाइन यांच्या नावांवरून ‘हेनॉक- शन्लाइन नीलारुणी रोग’ म्हणूनच ओळखतात.

न्यूयॉर्क येथे १८६२ मध्ये पहिल्या बालरोग दवाखान्याची स्थापना झाली आणि त्यानंतर फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांतून या विषयावरील अनेक ग्रंथांची व नियतकालिकांची भर पडत गेली. बालरोगविज्ञानासंबंधी १८८३ मध्ये जर्मनीत, १८८९ मध्ये अमेरिकेत व ब्रिटनमध्ये १९०० साली खास संस्था व मंडळे स्थापन झाली. अमेरिकेत काही ठिकाणी बालरूग्णालये स्थापन झाली आणि बालरोगांचा अभ्यास व अध्यापन या खास रुग्णालयांतून सुरू झाले. 

आधुनिक बालरोगविज्ञानाची जोरदार प्रगती विसाव्या शतकात झाली. एब्राहॅम जाकोबी (१८३०-१९१९) या अमेरिकन वैद्यांनी बालरोगविज्ञानाचा शंभर वर्षांचा आढावा घेणाऱ्या आपल्या ग्रंथात तपशीलवार माहिती दिली आहे. बालकांचे रोग प्रौढातील रोगांपेक्षा निराळे असतात ही संकल्पना मांडणारे व त्या दृष्टीने शिकविणारे जाकोबी हे पहिलेच अमेरिकन प्राध्यापक होते.

  

विसाव्या शतकातच नवजात अर्भकांच्या आणि बालकांच्या आहारविषयक क्षेत्रात महत्त्वाची प्रगती झाली. पाश्चरीकृत दुधाचा [पाश्चरीकरण] उपयोग सुरू झाला व बालकांना हळूहळू नियंत्रित घट्ट पदार्थ देण्यास सुरुवात झाली. १९१३ नंतर बर्लिन येथील बालरोगतज्ञ जे. ओ. एल्. हूबनर यांनी अर्भकांच्या पोषणासंबंधी कॅलरी मूल्यावर (अन्नापासून उपलब्ध होणाऱ्या व किलोकॅलरी या उष्णता एककात मोजण्यात येणाऱ्या ऊर्जेच्या मूल्यावर) आधारित आहार पद्धत शोधली. जीवनसत्त्वांच्या योग्य पुरवठ्यामुळे कॅल्शियम न्यूनत्वजन्य आकडी, अतिसार इ. आजारांचे प्रमाण कमी झाले. शतकाच्या मध्यास घटसर्प, लोहितांग ज्वर यांसारखे आजार आटोक्यात आले. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांच्या शोधामुळे न्यूमोनिया, मध्यकर्णशोथ [ कान] इ. सूक्ष्मजंतुजन्य रोगांवरील योग्य उपचारांमुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले. ⇨ प्रसवपूर्व परिचयेंसारख्या प्रतिबंधक उपायांमुळे, प्रसूतीच्या वेळी योग्य काळजी घेतल्यामुळे आणि निरनिराळ्या रोगप्रतिबंधक लशींच्या शोधामुळेही बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले.

भारतासारख्या विकसनशील देशांतून या शास्त्राच्या प्रगतीस भरपूर वाव आहे हे कोष्टक क्रं. १ वरून सहज लक्षात येईल.

 

कोष्टक क्र. १ विकसित व विकसनशील देशांतील बालमृत्यू प्रमाण (दर हजारी). 

वयोगट 

विकसित देश 

विकसनशील देश 

अर्भकमृत्यू(१ महिना ते १वर्ष) 

२५ 

११३ 

१ ते ५ वर्षे 

१ 

४५ 

५ ते १४ वर्षे (शालेय वय) 

– 

७ 

 

बालरोगविज्ञानाच्याप्रगतीमुळे इंग्लंड मध्ये १९०० सालातील दर हजारी २०० हे अर्भकमृत्यूचे प्रमाण १९६१ मध्ये केवळ २५.३ वर आले आणि त्यानंतरच्या काळात ते आणखीनच कमी झाले आहे. 

बालरोगविज्ञानाच्या शैक्षणिक प्रगतीस पहिल्या महायुद्धानंतर प्रारंभ झाला. काही विद्यापीठांतून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर बालरोगविज्ञानाचे खास शिक्षण देण्याची पद्धत सुरू झाली. शिक्षणाला दुसऱ्या महायुद्धानंतर जोरदार चालना मिळून वैद्यकाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात बालरोगविज्ञानास विशेष महत्त्व प्राप्त झाले. जीवरसायनशास्त्र, व्हायरसविज्ञान इ. शास्त्रांच्या प्रगतीबरोबरच बालरोगविज्ञानात भर पडत गेली. बौद्धिक वाढ व मानसिक प्रगती यांचा अर्भक व बालवयातील वाढीशी असलेला घनिष्ठ संबंध असल्यामुळे ‘बालमनोदोष चिकित्सा’ ही उपशाखाच तयार झाली.⇨रोगप्रतिकारक्षमता या वैद्यकाच्या शाखेच्या प्रगतीतून ‘प्रतिबंधक बालरोगविज्ञान’ ही उपशाखा उदयास आली. अर्भकावर शस्त्रक्रिया करण्याकरिता विशिष्ट ज्ञानाची व कौशल्याची गरज असते या जाणीवेतून ‘बालशस्त्रक्रिया विज्ञान’ निर्माण झाले. जन्मजात ह्रद् विकृती, ⇨खंडतालुखंडौष्ट, आंत्रमार्ग (लहान आतडे व मोठे आतडे मिळून होणारा अन्नमार्ग) व मूत्रमार्ग यांच्या विकृती यांवर या विषयाच्या विशेषज्ञांकडून होणाऱ्या शस्त्रक्रिया निर्धोक व यशस्वी होऊ लागल्या. दंतक्षय व वक्रदंत चिकित्सा यांकडे बालवयातच लक्ष पुरवणे जरूरीचे असते या जाणीवेतून ‘बालदंतरोगविज्ञान’ ही उपशाखा तयार झाली.

भारतात बहुतेक राज्यांतील विद्यापीठांतून बालरोगविज्ञानाच्या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाची सोय असून बालरोगतज्ञ म्हणून पदवी किंवा पदविका दिल्या जातात. मुंबई विद्यापीठात एम्.डी. (बालरोगविज्ञान) आणि एम्. एस्. (बालशस्त्रक्रियाविज्ञान) या पदव्युत्तर पदव्यांची सोय आहे. पुणे, शिवाजी व मराठवाडा या विद्यापीठांत एम्.डी. (बालरोगविज्ञान) पदवी मिळविण्याची सोय आहे. अमेरिकन वैद्यकीय पदवीधारकांना पाच वर्षांच्या खास अभ्यासक्रमानंतर अमेरिकन बोर्ड ऑफ पेडिॲट्रिक्स या संस्थेकडून परीक्षोत्तर प्रमाणपत्र देण्यात येते. 

बालरोगविज्ञानातील पोषण व आहार, रोगप्रतिकारक्षमता, चयापचयजन्य (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींद्वारे उद्भवणाऱ्या) विकृती, बालमानसशास्त्र या विषयांवर सतत संशोधन चालू आहे. जुन्या कल्पना नव्या ज्ञानामुळे मागे पडत असून काही नव्या रोगांविषयी माहिती उपलब्ध होत आहे.


बालवयातील वाढीचे टप्पे : बालरोगविज्ञानाचा बालकाच्या वाढीच्या संपूर्ण काळाशी संबंध येतो. या काळाचे दोन प्रमुख भाग पाडता येतात. (१) प्रसूतिपूर्व आणि (२) प्रसूतिपश्च.

प्रसूतिपूर्व काळ : बालपणाची सुरूवात जन्मानंतर होते अशी सर्वसाधारण समजूत असली, तरी मातेच्या गर्भाशयातील प्रसुतिपूर्व काळहा वाढ व आरोग्य या दोन्ही दृष्टींनी अत्यंत महत्त्वाचा असतो. अलीकडील संशोधनामुळे नवविवाहित दांपत्यास भावी अपत्याच्या सुदृढतेविषयी किंवा संभाव्य जन्मजात आनुवंशिक विकृतीविषयी वैद्यकीय सल्ला विचारणे शक्य झाले आहे. म्हणजेच बालरोगविज्ञानाची सुरुवात गर्भधारणेपूर्वीच होते असे म्हणता येते. याशिवाय भावी अपत्याची शारीरिक, मानसिक व भावनिक वाढ त्याच्या माता-पित्यावर होणाऱ्या वैयक्तिक परिणामांवर अवलंबून असते. प्रसूतिपूर्व काळापैकी गर्भधारणेनंतर १२ आठवड्यांपर्यंत ‘भ्रूणावस्था’ आणि तेथून जन्मापर्यंतच्या काळाला ‘गर्भ-प्रावस्था’ असे संबोधितात. मृतजात (अर्भक मृत अवस्थेत जन्माला येणे), अकाल प्रसूती, प्रसूतीनंतर दिसून येणारी विद्रुपता या गोष्टी टाळणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. माता व अर्भक यांच्यातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास प्रसवपूर्व परिचर्या उपयुक्त ठरली आहे. अर्भक संगोपनाची माहिती या काळातच माता-पित्यांना दिल्यास संभाव्य धोके टाळणे शक्य असते.

प्रसूतिप्रश्च काळ : या काळाचा विचार करण्यापूर्वी प्रत्यक्ष प्रसवकाळाचा विचार करणे जरूर आहे. ब्रिटनसारख्या विकसित देशांतूनही प्रतिवर्षी १०,००० अर्भकमृत्यू केवळ जन्मवेळी झालेल्या इजांमुळे होतात, अशी नोंद आहे. म्हणून प्रत्येक प्रसूती शक्यतो तज्ञांच्या देखरेखीखालीच होणे आवश्यक आहे.

  

प्रसूतिप्रश्च काळची विभागणी खालीलप्रमाणे करतात :

(१) नवजात : जन्मानंतर १ महिना. 

(२) अर्भक : १ महिना ते १ वर्ष.

(३) अर्भकोत्तर अथवा जलद वाढीचा काळ : १ वर्षे ते २ वर्षे. 

(४) अतिशैशव अथवा शालीयपूर्व : २ ते ५ वर्षे. 

(५) मध्यबालवय अथवा शालीय : मुली–५ ते १० वर्षे.

                                          मुलगे–५ ते १२  वर्षे.

(६) यौवनपूर्व : मुली-१० ते १२ वर्षे

                    मुलगे-१२ ते १४ वर्षे 

(७) प्राप्तयौवन अथवा किशोरावस्था : मुली-१२ ते १८ वर्षे.

                                                       मुलगे- १४ ते २० वर्षे.

  

 बालवयाच्या या प्रत्येक कालखंडाशी निगडित असे शरीररचना, शरीरक्रियाविज्ञान, विकृतिविज्ञान, रोगप्रतिकारक्षमता, बौद्धिक व मानसिक वाढ यांसंबंधीचे स्वतंत्र प्रश्न असतात. वाढीच्या या विविध अवस्थांतील गुणधर्म व विवक्षित गरजा ओळखणे बालरोग चिकित्सेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते.

  

शरीराच्या प्रमाणबद्धतेतील फरक आ. १ मध्ये दाखविले आहेत. जन्मानंतर दुसऱ्या वर्षी वाढीचे प्रमाण पहिल्या वर्षाच्या मानाने एकदम कमी होते आणि हे लक्षात घेतल्यासच बालकाची भूक कमी होण्याची पार्श्वभूमी समजते. बालकाच्या निरनिराळ्या वयातील हा बदलता प्रतिसाद, त्याला होणाऱ्या विविध आजारांची कालक्रमणा आणि फलनिष्पत्ती यांवर परिणाम घडवून आणतो. [ नवजात अर्भक बालवस्था व बालसंगोपन].

  

प्राप्तयौवन काळात [ किशोरावस्था] लिंगभेद महत्त्वाचा असतो. मुलग्यांपेक्षा मुलींत हा काळ दोन वर्षे अगोदर सुरु होतो. या अवस्थेत शरीराची वाढ झपाट्याने होते. लैंगिक इंद्रिये व उपलक्षणांची वाढ होऊन अखेरीस प्रौढावस्था प्राप्त होते. किशोरावस्थेची सुरुवात, वाढ व परिपूर्णता होण्याचे वय निरनिराळ्या व्यक्तींत निरनिराळे असते, ही या बाबतीतील एक महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय गोष्ट आहे.


परिसरजन्य परिणाम : भोवतालच्या परिसरातील बऱ्याच गोष्टी व परिस्थिती नवजात बालक व अर्भक यांच्या आरोग्यावर खूप परिणाम घडवून आणतात. प्रौढावस्थेनंतर शरीराची परिसराशी जुळवून घेण्याची क्षमता वाढलेली असते. परिसरातील कोणता घटक विशेष परिणाम करतो हे ठरविणे कठीण असते. सामान्यपणे निकृष्ट परिसरात पुष्कळ अयोग्य गोष्टींचा अंतर्भाव असतो. कुटुंबाच्या आर्थिक हालाखीमुळे निकृष्ट अन्न, दाट वास्तव्य, अस्वच्छता, भरपूर उजेड 

आ. १. वायानुरुप शारीरिक प्रमाणबद्धता

व खेळती हवा नसलेले घर, अज्ञान, बालसंगोपनाची अनास्था इत्यादींची शक्यता उत्पन्न होते. १९६८ मध्ये स्कॉटलंडमधील एका पाहणीत गरीब व आर्थिक दृष्ट्या चांगल्या समाजातील अर्भकमृत्यू-प्रमाणात पुष्कळच फरक आढळला होता. गरीबात प्रसवकालीन मृत्यूचे दर हजारी प्रमाण ३१.५ होते, तर श्रीमंतांत ते १२.६ होते. भारतातील एका पाहणीत वडिलांचे उत्पन्न रु. २०० पेक्षा कमी असलेल्या गटात बालरोग्यांचे प्रमाण (दर हजारी) ७९४, रु. २०१-४०० उत्पन्नाच्या गटात १३० आणि रु. ४०० पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या गटात ४२ असल्याचे आढळले होते. 

ऋतुपरत्वे होणारे हवामानातील बदल अर्भकाच्या स्वास्थावर परिणाम करतात. अतिक्षारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण, विशेषेकरून नवजात अर्भकांत उन्हाळ्यात हिवाळ्यापेक्षा दुप्पट आढळते. श्वसन तंत्रासंबंधीच्या आजाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जानेवारीत जुलैपेक्षा तिप्पट आढळते. एकाच देशात भौगोलिक रचनात्मक फरकामुळे आजार व मृत्युसंख्या यांत ठळक फरक दिसतात. मुलांच्या मानसिक रोगांच्या निर्मितीतही परिसरीय वातावरण महत्त्वाचा भाग घेते. मातेची धनार्जनाकरिता नोकरी, माता-पित्यातील संघर्ष व भांडणे, घटस्फोट इत्यादींमुळे कौटुंबिक स्थैर्य धोक्यात येते आणि त्याचे गंभीर परिणाम बालकांच्या आरोग्यावर होतात. युद्धजन्य परिस्थिती जेथे प्रत्यक्ष युद्ध चालू असेल त्या देशातील बालकांच्या आरोग्यावर तत्काळ व दूरगामी परिणाम करते.

  

बालवयातील मृत्यूची कारणे : बालपणात होणाऱ्या आजारांची व मृत्यूची प्रमुख कारणे निरनिराळ्या देशांत निरनिराळी असतात. एकाच देशात ती स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळी असतात. वयाच्या कालखंडाप्रमाणेही कारणे बदलतात. 

नवजात : या काळात अकाल जन्म, जन्मजात विकृती व प्रसवकालीन इजेचे परिणाम मृत्यूस कारणीभूत असतात. इतर कालखंडांतील मृत्युप्रमाण आज घटले असले, तरी या काळातील प्रमाण कमी झालेले नाही. विकसित व विकसनशील अशा दोन्ही देशांतून मृत्यूची कारणे सारखीच आढळतात. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशांतून अतिसार हे आणखी एक कारण असू शकते. मद्रासमध्ये या कालखंडातील एकूण मृत्यूंच्या १.५% मृत्यू अतिसारामुळे झाल्याची नोंद आहे. या उलट ब्रिटनमध्ये या कारणामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 

अकाल जन्म : नवजाताच्या मृत्यूस अपुऱ्या दिवसांचा जन्म (कालपूर्व जन्म) प्रवृत्तीकर असतो. कारण अशा अर्भकात इतर आजारही उद्भवण्यामुळे मृत्यूप्रमाण वाढते. पूर्ण वाढ झालेल्या नवजात अर्भकांच्या मृत्यूपेक्षा कालपूर्व, जन्मलेल्या नवजातातील मृत्युप्रमाण पंधरा पटींनी अधिक असते. अकाल जन्म का होतो याची कारणे अद्याप अज्ञात आहेत परंतु प्रसवपूर्व परिचर्या आणि प्रसवकालीन काळजी व देखभाल योग्य असल्यास अकाल जन्म टाळणे शक्य झाले आहे. आता उपलब्ध झालेल्या नव्या ज्ञानामुळे अपुऱ्या वाढीच्या नवजातांना वाचविणे शक्य झाले आहे.


जन्मजात व्यंग : जन्मजात व्यंग वा विकृत निर्मिती हे नवजातांतील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. ही व्यंगे दीर्घकालीन पंगुत्वही उत्पन्न करतात. बऱ्याचशा जन्मजातविकृतींची सुरूवात गर्भधारणेच्या पहिल्या दोन महिन्यांत होते. काही विकृतींची कारणे ज्ञात असली, तरी बहुसंख्य विकृतींची कारणे अजूनही अज्ञातच आहेत. जन्मापूर्वी निर्माण होणाऱ्या शारीरिक व मानसिक विकृतींची कारणे आणि त्यांचा प्रतिबंध यांवर बालरोगविज्ञानातील महत्त्वाचे संशोधन चालू आहे. उल्ब पारवेध [अंत:क्षेपणाच्या-इंजेक्शनाच्या-साधनांचा उपयोग करून गर्भाशयातील उल्बद्रव काढून घेणे प्रसवपूर्व परिचर्या] आणि उल्बद्रव परीक्षा यांसारख्या अलीकडील शोधांमुळे काही दोष जन्मापूर्वीच सुधारणे शक्य झाले आहे. याला ‘गर्भ-बोधन’ असे म्हणतात. 

प्रसवकालीन इजा : प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या इजेमुळे उद्भवणाऱ्या नवजातातींल मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. अशी इजा काही वेळा बालकांना कायमचे शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व आणण्यास कारणीभूत असते. बहुसंख्य प्रसूतींत शिरोदर्शन होत असल्यामुळे (डोके योनिमार्गातून प्रथम बाहेर येण्यामुळे) कवटी व मेंदू यांना होणाऱ्या इजा अधिक प्रमाणात आढळतात.

कवटीवरील मऊ ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा-पेशींचा–समूह) आच्छादनात (शिरोवल्कात) रक्तस्त्राव होऊन तयार झालेले रक्तार्बुद (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेली व रक्तस्त्रावातील रक्त अंतर्भूत झालेली गाठ) आ. २ मध्ये दर्शविले आहे. याशिवाय प्रसवकालीन इजांमध्ये परिसरीय (शरीराच्या पृष्ठभागातील) तंत्रिका, स्नायू आणि अस्थी यांनाही इजा होण्याची शक्यता असते.

अर्भकीय कालखंड : जन्मजातविकृत निर्मिती, न्यूमोनिया व श्वसन तंत्राचे इतर विकार अपपोषण, अपघात आणि पचन तंत्राचे विकार ही या वयोगटातील बालकांच्या मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. या वयात बालक संपूर्णपणे माता किंवा इतर कोणातरी पालनपोषणकर्त्यावर अवलंबून असल्यामुळे ही जबाबदारी योग्य काळजीने पार पाडल्यास काही कारणे टाळता येतात. सर्व मानवी जातिवंशांतून या वयोगटातील पुरुष बालकांच्या मृत्यूचे प्रमाण स्त्री बालकांपेक्षा सतत अधिक आढळले आहे. तसेच ते उन्हाळ्यात जन्मलेल्या मुलांत इतर ऋतूंत जन्मलेल्यांपेक्षा अधिक आणि ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा अधिक आढळते. अर्भकीय मृत्यू-प्रमाण जेथे कमी आढळते तेथे 

आ. ३ मद्रास शहर व इंग्लंड येथील अर्भकीय मृत्यु-प्रमाणातील फरक दर्शविणारा आलेख.

आ.२ मस्तक रक्तार्बुद

सर्वाधिक मृत्यू एक महिन्याच्या आतील नवजातात झाल्याचे आढळले. आंध्र राज्यात अर्भकीय मृत्युप्रमाण १९५७ मध्ये दर हजारी ९२.७ होते ते १९६७ मधअये ५३.४ वर आले. मद्रास शहर व इंग्लंड येथील अर्भकीय मृत्यु-प्रमाणातील १९०१-५० या काळातील फरक दर्शविणारा आलेख आ. ३ मध्ये दिलेला आहे. 

अर्भकोत्तर अथवा जलद वाढीचा काळ : १ वर्ष ते ५ वर्षेपर्यंतच्या काळाला शालेयपूर्वकाळ असेही म्हणतात. विकसित व विकसनशील देशांतून या काळातील मृत्यूची कारणे व प्रमाण यांत पुष्कळच फरक आढळतो. विकसित देशांतून दर हजारी १, तर भारतासारख्या विकसनशील देशांतून दर हजारी ४५ मुले दगावतात. विकसित देशांतून १५ ते २५ % मृत्यू अपघातामुळे उद्भवतात. तसेच संसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. विकसनशील देशांतून अतिसार,अपपोषण, कृमिसंसर्ग, क्षय व इतर संसर्गजन्य रोग हे मृत्यूच्या प्रमुख कारणांत मोडतात आणि फक्त ०.२% मृत्यू अपघातजन्य असतात. भारतात या वयोगटातील बालक मृत्यूचे प्रमाण पन्नास वर्षापूर्वीपेक्षा आज निम्म्यावर आले असले, तरी ते विकसित देशांच्या मानाने ४५ ते ५० पटींनी अधिकच आहे.

  

मध्यबालवय अथवा शालेय वय : पाच ते चौदा वर्षे वयोगटात मृत्यूच्या कारणांत पाश्चात्त्य देशांतून अपघात हे प्रमुख कारण आहे. जवळजवळ ४५% मृत्यू अपघातजन्य असल्याचे आढळले आहे. याखेरीज कर्करोग, जन्मजात किंवा संधिज्वरनिर्मित ह्रदय विकृती आणि न्यूमोनिया यांचा मृत्यूच्या कारणांत समावेश होतो. विकसित देशांतून या वयोगटातील मृत्युप्रमाण अत्यल्प झाले आहे, तरी भारतात ते दर हजारी सात आहे.


किशोरावस्था अथवा प्राप्तयौवन काल : या वयोगटात अर्ध्यापेक्षा जास्त मृत्यू अपघातजन्य असतात. कर्करोग, ह्रदयविकार, न्यूमोनियाआणि आत्महत्या हे मृत्यूच्या इतर कारणांत मोडतात. मुलगे व मुलीत मृत्युकारणांत लक्षणीय फरक आढळतो. अपघातांचे प्रमाण मुलांत मुलींपेक्षा दुप्पट आढळते. प्रसुतीसंबंधित आजार हे मुलींच्या मृत्युकारणांत प्रमुख आहेत. या वयोगटाच्या वयोमर्यादेच्या अखेरपर्यंत (१८ वर्षे) मुलगी गर्भधारणेच्या दृष्टीने पूर्णतया प्रौढ (पक्व) झालेली नसते. म्हणून या वयातील गर्भधारणा अधिक धोकादायक असते. अवांधित गर्भधारणा अधिक धोकादायक असते कारण त्यामुळे प्रसूतीच्या वेळी योग्य काळजी न घेणे, गर्भपात, आत्महत्या इत्यादींचे प्रमाण वाढते.

  

दक्षिण भारतातील एका पाहणीत निरनिराळ्या वयोगटांतील शरीरभागानुरुप आढळलेली मृत्युसंख्या कोष्टक क्र. २ मध्ये दिली 

कोष्टक क्र.२ दक्षिण भारतातील एका पाहणीत निरनिराळ्या वयोगटांतील शरीरभागानुरुप आढळलेली मृत्युसंख्या.

शरीर भाग 

० ते २ वर्षे 

२ ते ४ वर्षे

४ व अधिक वर्षे 

एकूण 

श्वसन तंत्र ह्रद्रक्तवाहिन्या

१३७ 

३८ 

२२ 

१९७ 

तंत्र 

५ 

४ 

८ 

१७ 

जठरांत्र मार्ग 

३७३ 

११० 

४५ 

५२८ 

पोषण 

१०६ 

९२ 

५३ 

२५१ 

यकृत विकृती 

१९ 

१८ 

४ 

४१ 

तंत्रिका तंत्र 

६० 

४२ 

४२ 

१४४ 

मूत्रपिंड विकृती 

३ 

४ 

८ 

१५ 

क्षय 

५२ 

१८ 

१५ 

८५ 

रक्तजन्य विकृती 

– 

– 

१ 

१ 

इतर 

१३ 

१ 

३ 

१७ 

एकूण संख्या

९०१ 

३३६ 

२१३ 

१,४५० 

 

आहे. गरीबी, निरक्षरता, आरोग्यविज्ञानाविषयीचे अज्ञान, पोषण दोष, मातेचे आजार, मोठे कुटुंब इ. कारणे प्रत्यक्ष रोगोद्भवात मदत करतात.

पंगुत्वास कारणीभूत होणारे विकार : वर वर्णन केलेल्या बालकांच्या मृत्यूसंबंधीच्या विवेचनाशिवाय त्यांच्या पंगुत्वास कारणीभूत होणाऱ्या आजारांचाही उल्लेख बालरोगविज्ञानात करणे आवश्यक आहे.

खंडतालू, दृष्टिदोष, श्रवणदोष, वक्रपाद [पाऊल व त्यावरचा पायाचा भाग यांचा घोट्याच्या सांध्याशी असलेला नेहमीचा संबंध वेडावाकडा असणे, पावलाची कमान वाजवीपेक्षा अधिक वक्र असणे इ. निरनिराळे दोष पाऊल] तसेच अस्थी व सांध्यांच्या काही विकृती जन्मजात विकृतींत मोडतात. बालमस्तिष्क पक्षाघात (वयाच्या पहिल्या दोन वर्षांत उद्भवणारी मेंदूच्या प्रेरक तंत्रातील अप्रगतशील विकृती), मानसिक मंदता, संधिवाताभ संधिशोथ [ संधिशोथ], स्नायूंचे कष्टपोषण, दीर्घकालीन फुप्फुस विकृती हे आजार पंगुत्वास कारणीभूत होतात. मानसिक मंदता हे पंगुत्वकारी आजाराचे उत्तम उदाहरण आहे. मानसिक मंदतेचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. मूल स्वतंत्र सामाजिक स्थान मिळविण्यास असमर्थ बनते, अशी अपूर्ण मानसिक वाढ म्हणजे मानसिक मंदता असे या आजाराचे सर्वसाधारण वर्णन करता येते. एकट्या अमेरिकेत किमान दहा लक्ष मुले मानसिक दृष्ट्या शालीय शिक्षण पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे आढळले आहे. मानसिक मंदतेची बरीच निरनिराळी कारणे असून त्यांवर प्रतिबंध व उपचार या दृष्टीने संशोधन चालू आहे. 

अशा रुग्णांसाठी वैद्यकीय, व्यावसायिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींनी एकत्र येऊन प्रत्येक मुलाकरिता व्यक्तिश: योग्य अशा योजना व कार्यक्रम आखून ते राबवावयास हवेत. [ मंद मुलांचे शिक्षण].

आ. ४ वक्रपाद : एक प्रकार

अपंग मुलांसाठी असलेल्या खास संस्थेत मुलाला लवकर ठेवण्याने बहुसंख्य मुलांना फारसा फायदा होत नसल्याचे आढळले आहे. अशा संस्थेत मुलाला केव्हा ठेवावे आणि ती कशी असावी म्हणजे अशा रुग्णांना जास्तीत जास्त फायदा मिळेल यांकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा मुलांना जलद गतीने शिकविण्यासाठी शाळेत आणि घरी अवास्तव प्रमाणात प्रयत्न केल्यास मूळच्या बौद्धिक समस्येत भर पडून वर्तनविषयक समस्या निर्माण होतात.

अपंग मुलांच्या योग्य काळजीसाठी तज्ञ बालरोगवैज्ञानिक, तंत्रिका तंत्र विशारद, विकलांग चिकित्सक, मनसोपचारतज्ञ, व्यवसायप्रधान चिकित्सक,वाक्‌चिकित्सक (वाचा विकारांवर उपचार करणारा तज्ञ), रोपणशस्त्रक्रियातज्ञ (शरीरातील निरुपयोगी अवयवाच्या ठिकाणी निरोगी अवयव बसविण्याची शस्त्रक्रिया करणारा तज्ञ), भौतिकी चिकित्सक इ. वैद्यकाच्या अनेक शाखा विशेषज्ञांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता असते. ज्या वेळी एकाच रुग्णाची अनेक विशेषज्ञांकडून देखभाल होण्याची गरज असते तेव्हा त्यांच्यातील परस्पर सहकार्याची जबाबदारी बहुधा कौटुंबिक वैद्याकडे सोपवणे इष्ट असते. काही वेळा अपंग बालकास दीर्घकाल रुग्णालयात ठेवण्याची गरज असते. व उपचारही खर्चिक असतात. अशा वेळी सरकारी किंवा सामाजिक संस्थांकडून वैद्यकीय साहाय्याबरोबरच आर्थिक मदतीचीही गरज असते. [ अपंग : कल्याण व शिक्षण].


सद्यस्थिती : हिंदूंच्या प्राचीन कालीन वैद्यकात बालरोगांकडे विशेष लक्ष दिले गेले असल्याचा उल्लेख असला, तरी ज्याला आधुनिक बालरोगविज्ञान म्हणतात ते शास्त्र अगदी अलीकडील काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस उदयास आले आहे. भारतासारख्या विकसनशील देशांतून तर त्याला साधारण १९५० सालानंतरच महत्त्व प्राप्त झाले आहे. विकसित देशांतून बालरोगविज्ञानात किशोरावस्थेपर्यंतच्या वयातील (१८-२० वर्षे) व्यक्तींचा अभ्यास समाविष्ट केला जातो. भारतात मात्र साधारणपणे १० ते १२ वर्षेपर्यंतच्या मुलामुलींची आरोग्यविषयक देखभाल यात समाविष्ट असते.

पाश्चात्त्य देशांतून एकोणिसाव्या शतकापेक्षा आज बालरोगविज्ञानातील समस्यांत खूप फरक पडलेला आहे. बालकांना निर्जंतुक दुधाचा पुरवठा होत असल्यामुळे अतिसाराचे प्रमाण घटले आहे. जीवनसत्त्वांच्या उपलब्धतेमुळे मुडदूस, स्कर्व्ही यांसारखे रोग कमी प्रमाणात आढळू लागले आहेत. श्वसन तंत्राचे आजार आणि तीव्र संसर्गजन्य रोग यांविरूद्ध योग्य प्रतिबंधात्मक लशी आणि प्रतिजैव औषधे वापरण्यात येऊ लागल्यामुळे त्यांपासून होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण घटले आहे. एकेकाळी भयंकर गणल्या गेलेल्या देवीसारख्या रोगाचे पूर्ण उच्चाटन करण्यात यश मिळाले आहे. ⇨ रक्तगटाच्या असंयोज्यतेमुळे उद्भवणारी नवजात अर्भकातील रक्तविलयनोत्पादक (रक्तातील तांबड्या कोशिका नाश पावून त्यांतील हीमोग्लोबिन बाहेर पडणे) विकृती योग्य उपचारांनी टाळणे शक्य झाले आहे. गर्भबोधनातील नव्या तंत्रांच्या उपयोगामुळे प्रसूतिपूर्व, प्रसवकालीन आणि प्रसूतिपश्च काळजी घेण्यात प्रगती झाली आहे.

घातक आजार हळूहळू अधिक प्रमाणात काबूत आणले जात आहेत. या क्षेत्रात रोगप्रतिबंधक उपायावर भर देण्यात येत आहे. बालकाच्या पोषणासंबंधी सल्ला, विविध रोगप्रतिबंधक लशींचा उपयोग, बालकाच्या वाढीची मोजमापे वेळोवेळी घेणे, सर्वसाधारण आरोग्यापासून पडत असलेला फरक लवकरात लवकर ओळखणे, वेगवेगळ्या वयोगटांनुरुप वर्तनासंबंधी मार्गदर्शन करणे या गोष्टी बालरोगवैज्ञानिकांच्या प्रमुख जबाबदाऱ्यांत मोडतात. बहुसंख्य विशेषज्ञ आज त्यांच्या कामाचा दोनतृतीयांश वेळ निरोगी बालकांच्या देखरेखीत खर्च करतात. बालकाकडे वैयक्तिक लक्ष दिल्याने त्याचे विशिष्ट स्वाभावधर्म, वैयक्तिक गरजा वगैरे ओळखता येतात व त्याप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करता येते. किशोरावस्थेतील मुलांच्या समस्यांकडे नव्यानेच लक्ष वेधले गेले आहे. फक्त नवजातांच्या संगोपनापासून सुरू झालेली ही वैद्यकीय शाखा आज विस्तारून भ्रूणावस्थेपासून थेट किशोरावस्थेपर्यंतच्या वयोगटातील बालकांचे आजार, त्यांचा प्रतिबंध आणि उपचार, अपंगांचे पुनर्वसन, आरोग्य व शारीरिक क्षमता यांचे प्रस्थापन आणि शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक स्वास्थ या सर्वांशी निगडित बनली आहे. आजारी बालक ही राष्ट्राची जोखीम असते, तर सृद्दढ व निरोगी बालक राष्ट्राची संपत्ती असते, हा बालरोगविज्ञानाचा प्रमुख हेतू असतो.

पहा : अतिसार आकडी कांजिण्या किशोरावस्था क्वाशिओरकोर गोवर जंत डांग्या खोकला देवी धावरे नवजात अर्भक न्यूमोनिया बालक अन्न बालकंपवतात बालपक्षाघात बालमानसशास्त्र बालशोष         बाल्यावस्था व बालसंगोपन मुडदूस रोगप्रतिकारक्षमता वारफोड्या.

संदर्भ : 1. Achar, S. T. Vishwanathan. J. Pediatrics in Developing Tropical Countries, Madras, 1973.

            2.Gupta, Satya, Ed., Textbook of Pediatrics, New Delhi, 1973.

            3. Nelson, W. E. Ed., Textbook of Pediatrics, Philadelphia, 1964.

           4. Prasad, Lala Surajnandan, Ed., Robinson and Wallgren’s Manual of Pediatrics, Bombay, 1973.

वागळे, चं. शं. कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.