द्यूत्रॉशे, रने झोआकिम आंरी : (१४ नोव्हेंबर १७७६–४ फेब्रुवारी १८४७). फ्रेंच वनस्पतिवैज्ञानिक. ⇨ तर्षणाचे वनस्पतिजीवनातील महत्त्व आणि तर्षणमापकाचा उपयोग हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय होता. त्यांचा जन्म फ्रान्समधील निऑन येथे झाला. काही काळ नाविक दलात नोकरी केल्यानंतर १८०२ मध्ये ते वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पॅरिसला गेले. १८०६ साली पदवी मिळविल्यानंतर १८०८ साली ते लष्करी वैद्यकीय अधिकारी म्हणून स्पेनला गेले. तथापि तेथे आंत्रज्वराने (टायफॉइडन) आजारी पडल्यामुळे ते फ्रान्सला परत आले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त होण्याचे ठरविले आणि आपले उर्वरित आयुष्य पॅरिस व तूरेन येथे नैसर्गिक विज्ञानासंबंधीच्या संशोधनात खर्च केले.

तर्षण व तर्षणमापकाचे प्रयोग प्रथमतः त्यांनीच केले व वनस्पतींच्या जीवनक्रियांतील कित्येक घटनांत तर्षणाचा वाटा मोठा आहे, असे मत व्यक्त केले. वनस्पती जमिनीतील पाणी मुळांच्या द्वारे तर्षणाने शोषून घेतात त्यामुळे उद्‌भवणाऱ्या मुळांतील दाबामुळे होणारा वसंत ऋतूतील रसस्राव हा पानांच्या पृष्ठभागातून होणाऱ्या बाष्पोच्छ्‌वासप्रवाहाहून भिन्न असतो, असे त्यांनी दर्शविले तसेच वनस्पती व प्राणी या दोहोंतील श्वसनक्रिया सारखीच असून त्या वेळी उष्णता निर्माण होते आणि त्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेतील बदलावर वाढ व वाढीशी संलग्न असे चलनवलन अवलंबून असते, हेही सिद्ध केले. पक्ष्यांच्या अंड्याचा विकास व पंखांची संरचना यांसंबंधीची माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली. पक्ष्यांच्या अंड्यातील एका भ्रूणस्तराला द्यूत्रॉशे यांचे नाव देण्यात आलेले आहे. प्रतानांच्या (तणाव्यांच्या) संवेदना-क्षमतेचे त्यांनी संशोधन केले. ⇨ प्रकाशसंश्लेषणामुळे पाण्यातील वनस्पतीच्या कापलेल्या भागापासून वर येणारे ऑक्सिजनाचे बुडबुडे मोजून प्रकाशसंश्लेषण-मापन करण्याच्या पद्धतीचे ते जनक होते. Memoires (१८३७) हा त्यांचा प्रमुख ग्रंथ होय. १८३१ मध्ये फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

पहा : वनस्पति व पाणी वनस्पतींचे चलनवलन.

जमदाडे, ज. वि.