बदक: हा पक्षी सगळ्यांना माहीत आहे. ॲनॅटिडी पक्षिकुलाच्या ॲनॅटिनी या उपकुलात याचा समावेश केलेला आहे. या उपकुलात सु, १२० जाती असून दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. बदक हा पाणपक्षी आहे. काही जाती केवळ गोड्या पाण्याच्या जवळपास राहणाऱ्या असतात, तर काही केवळ समुद्री असून त्यांची वीण नदीमुखाजवळ किंवा समुद्र-किनाऱ्यावर होते.

आ. १. मॅलार्ड बदकः (ॲनॅस प्लॅटिऱ्हिंकस ) मादि (वरील) व नर

बदक हंसापेक्षा लहान आणि शरीराने स्थूल असते. मान आणि पाय आखूड असतात. पाय शरीराच्या बऱ्याच मागच्या बाजूला असतात. त्यांचा रंग पिवळा असून त्यांच्यावर पुढे तीन व मागे एक बोट असते पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात. चोच मोठी, रुंद, चापट व पिवळी असते ती पातळ त्वचेने झाकलेली असते. चोचीच्या दोन्ही कडांवर बारीक दात असतात.सामान्यतः नर व मादी यांच्या शरीराची रंगव्यवस्था वेगळी असते. पाळीव बदकांचा रंग सामान्यपणे पांढरा असतो पण काहींचा काळा किंवा तपकिरी असून त्यात हिरवट चमक असते काहींचे धड पांढरे पण डोके व मान काळी असते. अंगावरील पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेलग्रंथीचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना नेहमी चोपडतात त्यामुळे पाण्यात पोहताना ती पाण्याने भिजत नाहीत. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून निवारण होऊन शरीराची उष्णता कायम रहाते. पिसे दर वर्षी गळून पडून नवी येतात. 

बदके जमिनीवर डुलत डुलत चालतात. ती उत्तम पोहणारी व बुड्या मारणारी आहेत. ती वेगाने उडू शकतात, काही जातींची बदके फार दूरवर उडत जातात. पाण्यातील व जमिनीवरचे लहान-सहान प्राणी व किडे, धान्य, बी आणि रसाळ मुळे हे यांचे भक्ष्य होय. यांची घरटीसामान्यतः जमिनीवर असतात परंतु काही जाती झाडाच्या ढोलीत घरटी करतात. मादी ५-१२ पांढरी अंडी घालते. पाळीव बदकांना खुराड्यात ठेवतात व त्यांची अंडी कोंबड्यांकडून उबवितात. सुमारे एक महिन्याने पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात.

कर्वे, ज. नी.

बदक – पालन: अतिप्राचीन काळापासून माणूस मांसाकरिता बदकाची शिकार करीत आला आहे पण बदके माणसाळविणे जास्त फायद्याचे असल्यामुळे ती माणसाळविली गेली.  इसवी सनाच्या पहिल्या शतकात त्यांना प्रथम माणसाळविण्यात आले अशी समजूत आहे पण चीनमध्ये ती त्यापूर्वीच माणसाळविली गेली होती, याला पुरावा मिळतो. पाश्चात्य देशांत विशेषतः अमेरिकेत बदक-पालनाचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात चालू आहे. भारतात फारच थोडे लोक बदके पाळतात.

आ. २. पाळीव बदके : इंडिअन रनर (डावीकडील) व खाकी कँबेल

कोंबड्याप्रमाणे अंडी व मांस यांच्या उत्पादनासाठी बदके जगामध्ये सर्वत्र पाळली जातात. तथापि व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर ती फारच कमी प्रमाणात पाळण्यात येतात. भारतामध्ये बदके मुख्यत्वे अंड्यांसाठी पाळण्यात येतात. भारतात अमेरिका व युरोपमधील देशांप्रमाणे त्यांचे मांस खाणे फारसे पसंत केले जात नाही. इंडोनेशिया (२.२ कोटी), तैवान ( ६५.८ लाख) व आग्नेय आशियातील काही देशांमध्ये बदकांची संख्या बरीच आहे. अमेरिकेतील ६० टक्के बदके लाँग आयलंड या भागामध्ये आहेत. भारतामध्ये कुक्कुटपालनामधील एकुण पक्ष्यांमध्ये बदकांची संख्या ९ टक्के असून बहुसंख्य बदके पूर्व व दक्षिण भारतामध्ये आहेत. १९६६ च्या पशुधन गणनेनुसार भारतातील बदकांची संख्या ९९ लाखाच्या आसपास होती. पश्चिम बंगालमध्ये त्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ५३ लाख ३० हजारांच्या आसपास होती व त्यानंतर आसाम, तमिलनाडू, आंध्रप्रदेश, केरळ बिहार व ओरिसा या राज्यांच्या क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील बदकांची संख्या ४२,८०० होती. देशी कोंबडीच्या मानाने गावठी बदके प्रतिवर्षी ३० ते ४० जास्त अंडी देतात. शिवाय त्यांची देखभालही फारशी करावी लागत नाही यामुळे खेड्यामध्ये ती पाळली जातात, असे दिसते. भारतामध्ये अंड्यांच्या एकूण उत्पादनापैकी १६ टक्के अंडी बदकांची (४०.१४ कोटी) असून प्रत्येक अंड्याचे वजनही कोंबडीच्या अंड्यापेक्षा १४ ते २१ ग्रॅम जास्त असते.बदकाच्या अंड्याचे पोषणमूल्य कोंबडीच्या अंड्याप्रमाणेच आहे. तथापि त्यांना मासळीसारखा वास येत असल्यामुळे बाजारात कमी दर मिळतो. छायाचित्रण, रंग इ. अनेक औद्योगिक क्षेत्रांत मगात्र त्यांचा वापर मोठ्या प्रमाणवर होतो.

पाळीव बदकांच्या १८ जाती आणि ३४ प्रकार असून ते सर्व दक्षिण अमेरिकेतील मस्कोव्ही व उत्तर गोलार्धातील मॅलार्ड या रानटी बदकांच्या दोन जातींपासून उत्पन्न झाले आहेत. पाळीव जातींमध्ये ‌ तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसून येतात शिवाय त्यांचे वजनही रानटी जातींपेक्षा तिप्पट असू शकते. बहुसंख्य जाती मॅलार्ड  या जातीपासून निघालेल्या आहेत. कँबेल जातीमधील खाकी कँबेल ही बदकाची जात अंड्याविषयी प्रसिद्ध असून तिच्यापासून सरासरीने वर्षाला ३६५ अंडी मिळालेली आहेत. कोंबड्यांची सरासरी क्वचितच ३०० अंड्यांपेक्षा अधिक असते. अंड्यांच्या बाबतीत खाकी कँबेलनंतर व्हाइट कँबेल, डार्क कँबेल व इंडियन (देशी) रनर या जातींचा क्रमांक लागतो. मस्कोव्ही, पेकिन व आयलेसबरी बया बदकांच्या जाती मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिका व युरोपातील देशांमध्ये पहिल्या दोन जाती पाळल्या जातात, तर इंग्लंडमधिल लोक आयलेसबरी बदके पसंत करतात. या देशांमध्ये मांसोत्पादक बदकाच्या पिलांचे उत्पादन करणे हा एक संघटित व्यवसाय आहे. आयलेसबरी बदकांचे मांस पांढरे तर पेकिनचे पिवळे असते. आयलेसबरी बदकांची पिले ८ आठवड्यांची झाल्यावर (वजन ३.२ किग्रॅ.) तर पेकिन बदकांची पिले लहान असल्यामुळे ९ आठवड्यांची झाल्यावर खाण्यासाठी मारतात. वरील जातींच्या संकराने तयार केलेली पिले मांसोत्पदनात सरस असतात. भारतामध्ये बदकांच्या पुढील जाती आहेत : इंडियन रनर, सिल्हेट मेटा व व्हाइट ब्रेस्टेड नागेश्वरी. इंडियन रनर बदके पांढऱ्या रंगाची असतात, तर सिल्हेट मेटा बदके तपकिरी रंगाची असून त्यांच्या पंखांची टोके काळी असतात व चोच पिवळी असते. नागेश्वरी जातीच्या बदकांचे शरीर काळ्या रंगाचे असते पण छाती व गळा पांढरा असतो. वरील काही जातींच्या बदकांच्या माद्या व नर यांची सर्वसाधारण किलोग्रॅममधील वजने पुढीलप्रमाणे आहेत : इंडियन रनर १.५८ व १.८१, खाकी कँबेल २.०३ व २.२७, पेकिन ३.६ व ३.६, आयलेसबरी  ४.०८ व ४.५४.


बदकांच्या संगोपनासाठी अगदी साधी व्यवस्था असली तरी चालते. खुराड्यावर छप्पर असले म्हणजे पुरे. तसेच जेथे इतर पशुपक्षी पालनाचा व्यवसाय करता येणार नाही व शेतीही पिकविता येणार नाही अशा पाणथळ, दलदलीच्या जमिनीवर, नदीकिनारी व रुतण जमिनीवर बदक पालनाचा व्यवसाय यशस्वीपणे करता येतो. अशा जमिनीवर बदक पालनाच्या व्यवसाय यशस्वीपणे करता येतो. अशा जमिनीवरील कृमिकीटक व चिंगाटी, कोळंबीवगैरे खाद्य खाऊन ते आपली उपजीविका करतात.  बदके दोन प्रकारांनी पाळतात : खुरट गवत असलेल्या मोठ्या मोक्ळया जमिनीवर व घरांच्या परसांमध्ये प. बंगालमध्ये बहुसंख्य बदके दुसऱ्या प्रकाराने पाळतात. केरळमध्ये नारळांच्या बागांमधील पाण्याच्या चारीमधील कृमिकीटक वगैरे खाऊन बदके आपले पोट भरतात. रात्रीसाठी त्यांना बंदिस्त जागेत कोंडण्याची व्यवस्था असते. कधी कधी त्यांना थोडा कोंडा, धान्य व कंदमुळे द्यावी लागतात. अमेरिका आणि यूरोपमधील बहुतेक देशांमध्ये संतुलित पशुखाद्य बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये बदकांसाठी गुलिकांच्या (लहान गोळ्यांच्या) स्वरुपात खाद्य तयार केले जाते. या खाद्यामध्ये ७०% प्रथिने असतात आणि रिबोफ्लाविन व मँगॅनीज सल्फेट यांचे प्रमाणही भरपूर असते.

सामान्यतः माद्या सकाळी व उघड्यावर अंडी घालतात. त्यामुळे अंडी घालून होईपर्यंत त्यांना मोकळे सोडत नाहीत. बदकांना पिंजऱ्यामध्ये अगर गादी पद्धतीने वाढविलेले मानवत नाही. तथापि मांसोत्पादनासाठी वाढविण्यात येणारी पिले ५०-६० च्या गटांनी ३.६ × १.८ मी अशा गाळ्यांमध्ये वाढविण्यात येतात.

प्रजननासाठी हलक्या बदकांच्या जातीच्या ८ माद्यांसाठी एका व वजनदार जातीमध्ये ४ ते ६ माद्यांसाठी एका नराची आवश्यकता असते. नर व माद्या एकत्र ठेवल्यानंतर आठ आठवड्यांनी उबविण्यासाठी अंडी गोळा करण्याला सुरुवात करतात. उबविण्यासाठी ठेवण्यात येणारी अंडी एका आठवड्यापेक्षा जास्त शिळी नसावीत. बदकांच्या माद्या खुडूक बसत नाहीत. त्यामुळे त्यांची अंडी खुडूक कोंबडीकडून किंवा उबवण यंत्राच्या साहाय्याने उबवितात. प्रजननासाठी ठेवण्यात येणाऱ्या माद्यांपासून मिळणारी ८० % अंडी सफल असतात व त्यांतील ८० % अंड्यातून पिले बाहेर येतात. ही पिले ४ ते ४.५ महिन्यांची होईतो (बदकांची पिले १६ ते १८ आठवड्यांची झाली म्हणजे वयात येतात) त्यांच्यातील ८ % मरण पावतात. याचा अर्थ उबविण्यासाठी १०० अंदी ठेवल्यास त्यांतून ४ ते ४.५ महिन्यांची ६० पिले मिळू शकतात. यांतील अर्धे नर असतात असे मानले तर एक अंडी देणारी मादी तयार होण्यासाठी ३ अंडी उबवावी लागतात.

बदकांची अंडी उबविण्यासाठी उबवण यंत्रातील तापमान पहिल्या दोन आठवड्यांत ३८०.३ से., तिसऱ्या आठवड्यात ३८०.९ से आणि त्यानंतर ३९०.४ से ठेवावे लागते. आर्द्रता पहिल्या २४ दिवसांत ६० ते ७० % ठेवतात. दिवसातून दोन वेळा अंडी फिरविणे जरूर असते. त्यामुळे अंड्याच्या सर्व बाजूंस सारखी उष्णता लागते. पिले बाहेर येण्याआधी ४ ते ५ दिवस अंडी फिरवित नाहीत. अंड्यात तयार झालेले पिलू बाहेर येण्याआधी २-३ दिवस चोचीने कवच फोडण्यास सुरूवात करते. मस्कोव्ही जातीच्या बदकाची अंडी उबविण्यास ३५ दिवस लागतात, तर इतर सर्व जातींमध्ये २८ दिवस लागतात. उबवण यंत्रातून पिले पूर्ण कोरडी झाल्यावरच पेटीवजा घरामध्ये हालवितात. या पेटीचे तापमान सुरवातीस ३२०.२ से. ठेवतात पहिल्या आठवड्याच्या शेवटी २६०.७ ,से. व दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस २१०.१ से. इतके कमी करीत आणतात. तिसऱ्या आठवड्यापासून त्यांना उष्णता देण्याची गरज नसते. पिले ६ आठवड्यांची झाल्याशिवाय त्यांना पोहोण्यासाठी सोडीत नाहीत. पिले  ४ ते ६ आठवड्यांची झाल्यावर खुराड्यामध्ये हालविण्यास हरकत नसते. तेथे त्यांना वर उल्लेखिल्याप्रमाणे ५० – ६० च्या गटांनी ठेवतात. बदकांना दिवसातून दोन वेळा खाद्य देतात. हे खाद्य सुक्या किंवा ओल्या स्वरूपात देतात. सुक्या खाद्यामध्ये कोंडा व धान्य यांचे प्रमाण २:१, तर ओल्या खाद्यामध्ये ३:१ असते.

बदकांमध्ये कोंबड्यांपेक्षा रोगराईंचे प्रमाण पुष्कळच कमी असते. बदकांची वाढ जलद होत असल्यामुळे खाद्यातील अन्नघटकांच्या कमतरतेमुळे विशेषतः जीवनसत्त्व अ आणि ड यांची न्यूनता नेहमी आढळते. या जीवनसत्त्वांच्या न्यूनतेमुळे नासाकोटराला (नाकाच्या हाडांच्या पोकळीला) सूज येते. बदके पोहत असलेल्या तळ्यातील पाणी गलिच्छ झाल्यास त्यांना अन्नविषबाधा होते. बदकांना मिठामुळे विषबाधा होते. यांशिवाय कोंबड्यांना होणारी पांढरी हगवण (पुलोरम रोग), गोचिडजन्य ताप (स्पायरोकीटोसिस), कॉक्सिडिओसिस हे सांसर्गिक रोग होतात [⟶कुक्कुटपालन]. यांशिवाय तीन आठवड्यांच्या आतील बदकांच्या पिलांना ‘बदकांचे व्हायरस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्हायरसांमुळे यकृतशोथ ( यकृताची दाहयुक्त सूज) हा रोग होतो व त्यामुळे ९० % पिले मृत्युमुखी पडतात. एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या पिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण बरेच कमी असते.

पहा : आयडर बदक काणूक नुक्ता.

संदर्भ :1. C.S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII. Livestock Supplement Including  Poultry, New Delhi, 1970.

          2. I. C. A. R. Handbook of Animal Husbandary. New Delhi, 1967.

 दीक्षित, श्री. गं.