सॅम्युएलसन, बेंग्ट इंगेमार : (२१ मे १९३४— ). स्वीडिश जीवरसायनशास्त्रज्ञ. ⇨प्रोस्टाग्लँडिने या हॉर्मोनसदृश संयुगांसंबंधी विशेष संशोधन केल्याबद्दल सॅम्युएलसन यांना सून कार्ल बर्गस्ट्रॉम आणि ⇨ जॉन रॉबर्ट व्हेन यांच्याबरोबर १९८२ सालचे शरीरक्रियाविज्ञान अथवा मानवी वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

सॅम्युएलसन यांचा जन्म हाल्मस्टॅड (स्वीडन) येथे झाला. त्यांनी लुंड विद्यापीठाची वैद्यक विषयातील पदवी संपादन केली. याच विद्यापीठात बर्गस्ट्रॉम हे त्यांचे प्राध्यापक होते. सॅम्युएलसन यांनी स्टॉकहोम येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये अध्ययन करून १९६० मध्ये जीवरसायनशास्त्रातील आणि १९६१ मध्ये मानवी वैद्यकातील डॉक्टरेट पदवी संपादन केली. ते याच इन्स्टिट्यूटमध्ये सहायक प्राध्यापक (१९६१–६६), रॉयल व्हेटेरिनरी कॉलेजमध्ये वैद्यकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक (१९६७–७२), पुन्हा कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकाचे व शरीरक्रियात्मक रसायनशास्त्र शाखेचे प्राध्यापक (१९७२), अध्यक्ष (१९७३–८३) आणि वैद्यक विद्याशाखेचे अधिष्ठाता (१९७८–८३) होते.

सॅम्युएलसन यांनी शरीरात ठिकठिकाणी आढळून येणाऱ्या प्रोस्टाग्लँडिने ह्या हार्मोनसदृश संयुगांच्या निर्मिती प्रक्रियेचे प्रथम वर्णन केले. त्यांच्यासोबत बर्गस्ट्रॉम व व्हेन यांनी प्रोस्टाग्लँडिनांचे विलगीकरण, अभिज्ञान आणि विश्लेषण केले. ही जीवरासायनिक संयुगे सस्तन प्राण्यांमध्ये रक्तदाब, शरीराचे तापमान, अधिदृर्षता प्रतिक्रिया आणि इतर शरीरक्रियावैज्ञानिक क्रिया यांचे नियंत्रण करतात तसेच आतड्याच्या आणि गर्भाशयाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

सॅम्युएलसन यांनी प्रोस्टाग्लँडिनांच्या जैव संश्लेषणाच्या यंत्रणा स्पष्ट करणारे संशोधन केले आणि त्यांच्या चयापचयाचे (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचे) मार्ग कसे असतात, याचेही अनुसंधान केले. त्यांनी अनेक प्रोस्टाग्लँडिनांच्या संरचना उघड केल्या व त्यांच्यातील परस्परसंबंध शोधले. सर्व प्रोस्टाग्लँडिने ही पाच कार्बन अणूंचे वलय व एकूण वीस कार्बन अणू असलेली कार्बॉक्सिलिक अम्ले आहेत, असे त्यांना आढळले. प्रोस्टाग्लँडिनांत असलेल्या १, २ वा ३ द्विबंधांवरून त्यांची विभागणी पीजी-१, पीजी-२ व पीजी-३ या मालिकांत करतात. प्रोस्टाग्लँडिनाच्या संरचनेतील ऑक्सिजन अणू किंवा हायड्रॉक्सिल गट (–OH) यांच्या स्थानांवरून भिन्न प्रोस्टाग्लँडिने वेगळी ओळखता येऊ शकतात.

सॅम्युएलसन यांनी व्यावसायिक नियतकालिकांमध्ये अनेक लेख लिहिले. त्यांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले. त्यांपैकी महत्त्वाचे पुरस्कार असे : लास्कर पुरस्कार (१९७७), सिबा-गायगी पुरस्कार (१९८०), गायर्डनर फौंडेशन पुरस्कार (१९८१).

गोगटे, म. ग.