मॉर्ली (मोर्ले), एडवर्ड विल्यम्स: (२९ जानेवारी १८३८–२४ फेब्रुवारी १९२३). अमेरिकन भौतिकीविज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ. ⇨ आल्बेर्ट आब्राहम मायकेलसन यांच्याबरोबर स्थिर ईथरामधील [→ ईथर-२] पृथ्वीची गती शोधून काढण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयोगाकरिता ते विशेष प्रसिद्ध आहेत. हा प्रयोग ‘मायकेलसन-मॉर्ली प्रयोग’ म्हणून ओळखण्यात येतो. [→ प्रकाशवेग].

मॉर्ली यांचा जन्म न्यू जर्सी राज्यातील न्यूअर्क येथे झाला. नाजूक प्रकृतीमुळे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. नंतर त्यांनी उच्च शिक्षण विल्यम्सटाऊन येथील विल्यम्स कॉलेजात (१८५७–६०) व अँडोव्हर थिऑलॉजिकल सेमिनरीमध्ये (१८६१–६४) घेतले. १८६९–१९०६ या काळात त्यांनी प्रथम हडसन येथील वेस्टर्न रिझर्व्ह कॉलेजात आणि पुढे ही संस्था वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठाचे ॲडलबेर्ट कॉलेज म्हणून ओहायओं राज्यातील क्लीव्हलँड येथे स्थानांतरित झाल्यावर तेथे नैसर्गिक इतिहास आणि रसायनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले. १८७३–८८ या काळात त्यांनी क्लीव्हलँड मेडिकल स्कूलमध्ये रसायनशास्त्र व विषविज्ञान या विषयांचे प्राध्यापक म्हणूनही काम केले.

मॉर्ली हे अतिशय काळजीपूर्वक व शांतपणे प्रयोग करणारे म्हणून प्रसिद्ध होते. १८७८ मध्ये त्यांनी वातावरणातील ऑक्सिजनाच्या प्रमाणात होणाऱ्या बदलासंबंधी अभ्यास करण्यास प्रारंभ केला. नंतर १८८३–९४ या काळात त्यांनी हायड्रोजन व ऑक्सिजन यांचा जलरूपात संयोग होताना असणाऱ्या त्यांच्या वजनांच्या गुणोत्तरासंबंधी महत्त्वाचा अभ्यास केला. त्याकरिता हजारो नमुन्यांची वजने घेतल्यानंतर त्यांनी पाच दशांश स्थळांपर्यंत व तीन लक्ष भागांत एक भाग इतके अचूक वजनांचे गुणोत्तर मिळविले. १८८७ मध्ये त्यांनी मायकेलसन यांच्या बरोबर केलेल्या प्रयोगामुळे ईथर अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले आणि त्यामुळे पुढे आइन्स्टाइन यांच्या मर्यादित सापेक्षता सिद्धांताला प्रायोगिक आधार मिळण्यास मदत झाली. तथापि या प्रयोगाच्या नकारात्मक निष्पत्तीसंबंधी मॉर्ली यांचे पूर्ण समाधान झाले नाही आणि त्यांनी डी. सी. मिलर यांच्या समवेत आणखी काही प्रयोग केले परंतु प्रयोगात अनेक सुधारणा करूनही त्यांना कोणताच निर्णायक परिणाम आढळला नाही.

मॉर्ली हे नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. त्यांना रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक, फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे एलिअट क्रिसन पदक वगैरे बहुमान मिळाले. ते कनेक्टिकट राज्यातील वेस्ट हार्टफर्ड येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.