हॉली, रॉबर्ट विल्यम : (२८ जानेवारी १९२२–११फेब्रुवारी १९९३). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रथिन संश्लेषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या जननिक संकेत-लिपी प्रणालीचा [→ रेणवीय जीव-विज्ञान] शोध लावल्याबद्दल हॉली यांनामार्शल वॉरेन निरेनबर्गहरगोविंद खोराना यांच्यासमवेत १९६८ सालचे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. 

 

रॉबर्ट विल्यम हॉली
 

 हॉली यांचा जन्म अर्बॅना (इलिनॉय, अ. सं. सं.) येथे झाला. त्यांनी इलिनॉय विद्यापीठातून रसायनशास्त्रातील बी.ए. (१९४२) आणि कॉर्नेल विद्यापीठ (इथाका, न्यूयॉर्क) येथून कार्बनी रसायनशास्त्रातील पीएच्.डी. (१९४७) या पदव्या प्राप्त केल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठात रासायनिक संश्लेषित पेनिसिलीन तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबर काम केले (१९४४–४६). त्याच विद्यापीठात त्यांनी कृषिवैज्ञानिक प्रयोगशाळेत अनेक जीवरासायनिक समस्यांसंबंधी संशोधन केले (१९४८?६४). जेम्स फ्रेडरिक बॉनर यांच्यासमवेत कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे वर्षभर (१९५५-५६) अध्ययन केल्या-नंतर त्यांनी रिबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) यासंबंधी संशोधन सुरू केले. ते कॉर्नेल विद्यापीठात जीवरसायनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक (१९६२), जीवरसायनशास्त्र व रेणवीय जीवविज्ञान या विषयांचे प्राध्यापक (१९६४) आणि अध्यक्ष (१९६५-६६) होते. हॉली १९६८ मध्ये साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायॉलॉजिकल स्टडिज, लाजोला (कॅलिफोर्निया) येथे निवासी सदस्य म्हणून रुजू झाले. ते १९६९ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगो येथे प्राध्यापक झाले. 

 

हॉली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९६० च्या सुमारास असे दाखवून दिले की, रिबोन्यूक्लिइक अम्लांच्या लहान रेणूंचा (टी-आरएनए ट्रान्स्फर आरएनए) सहभाग ॲमिनो अम्लांच्या संयोगाद्वारे तयार होणाऱ्या प्रथिनांच्या निर्मितीत असतो. हॉली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोशिकेतील मिश्रणात असलेले विविध प्रकारचे टी-आरएनए वेगळे करण्याचे तंत्र शोधून काढले. त्यांनी १९६५ मध्ये टी-आरएनएची अशी संरचना (आकृतिबंध) शोधून काढली की, ती ॲलॅनीन या ॲमिनो अम्लाचे प्रथिन रेणूंत रूपांतर करते. याद्वारा न्यूक्लिइक अम्लातील न्यूक्लिओटाइडांची साखळी प्रथमतः निर्धारित करण्यात आली. त्यांचा उपयोग एंझाइमांद्वारा रेणूंचे पचन होणे, तुकड्यांची ओळख करणे आणि ते एकमेकांना कसे घट्ट बसतात हे दाखविणे यांसाठी होतो. तेव्हापासून असे दिसून आले की, सर्व टी-आरएनए रेणूंची संरचना ही सारखीच असते. 

 

हॉली यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांना यू. एस्. (अ. सं. सं.) डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर याचा उल्लेखनीय सेवा पुरस्कार (१९६५), बेसिक मेडिकल रिसर्चमधील ॲल्बर्ट लास्कर पुरस्कार (१९६५) आणि मॉलिक्यूलर बायॉलॉजी ऑफ द नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचा यू. एस्. स्टील फाउंडेशन पुरस्कार (१९६७) मिळाले. हॉली हे अनेक संस्थांचे सदस्य होते त्यांपैकी काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत : नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६८), अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, द अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स, द अमेरिकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स, द अमेरिकन केमिकल सोसायटी इत्यादी. 

 

हॉली यांचे लॉस गॅटोस (कॅलिफोर्निया, अ. सं. सं.) येथे निधन झाले. 

वाघ, नितिन भरत