आरारूट : (इं. आरारूट). व्यापारी क्षेत्रात आरारूट हे नाव खाद्य पिठाला दिले असून हे ज्या अनेक वनस्पतींपासून काढतात त्यात पुढील वनस्पतींचा समावेश होतो : वेस्ट इंडियन ॲरोरूट (मॅरेंटेसी-कुलातील मॅरांटा ॲरुंडिनॅशिया ) क्वीन्सलँड ॲरोरूट (कॅनेसी-कुलातील कॅना इड्‌यूलिस नावाची ð कर्दळ) ईस्टइंडियन ॲरोरूट (झिंझिबरेसी-कुलातील कुर्कुमा अंगुस्तीफोलिया, ð तवकीर) फ्लॉरिडा ॲरोरूट

आराख्ट (वेस्ट इंडियन ॲरोख्ट) : (१) ग्रंथिक्षोडासह वनस्पती, (२) फूल.

(सायकेडेसी-कुलातील झॅमिया फ्‍लॉरिडॅना) टाका ॲरोरूट (टाका पिनॅटिफिडा) ब्राझिलियन ॲरोरूट (कसावा मॅनिहॉट एस्क्युलेंटस) इ. यांची ग्रंथिक्षोडे (बटाट्यासारखी गाठदार खोडे) सोलून, धुऊन व कुटून तो लगदा चाळणीच्या रुंद नळ्यांतून गाळतात व त्यातून मिळणारा पिठूळ पदार्थ पाण्याबरोबर टाक्यात जमल्यावर वाळवितात. हा नंतर बाजारात पांढरीस्वच्छ पूड अथवा लहानमोठ्या खड्यांच्या स्वरूपात मिळतो.हे पीठ पचण्यास हलके असल्याने लहान मुलांना व अशक्त माणसांना चांगले मानवते बिस्किटे, केक, पुडिंग व जेली यांत त्याचा उपयोग करतात, शिवाय सरस व चेहऱ्यास लावण्याची सुवासिक पूड यांकरिताही उपयोगात आहे. लगद्याचा चोथा गुरांना चारा म्हणून घालतात.

वेस्ट इंडियन ॲरोरूट : ही बारीक ०·६ – १·८ मी. उंचीची ðओषधी मूळची उष्ण अमेरिकेतली असून वेस्ट इंडीजमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे भारत, श्रीलंका, इंडोचायना इ. देशांत पिकवितात भारतात क्वचित जंगलात आढळते, परंतु मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, बंगाल, आसाम व केरळ येथे लागवड केली जाते. हिचे खोड भाजून किंवा शिजवून खातात. नवीन लागवड खोडाच्या तुकड्यांनी करतात. हलकी, चांगला निचरा असलेली जमीन व साधारण सावली या पिकाला आवश्यक असते. पिवळे व निळे खोड असलेले दोन प्रकार असून निळ्या खोडापासून अधिक स्टार्च मिळतो. दर हेक्टरी ९-१९ टन व जास्तीत जास्त २९·५ टन खोडाचे तुकडे निघतात व त्यात २५-३० टक्के स्टार्च असतो प्रत्यक्षात मात्र १५ टक्केच स्टार्च मिळतो.

रोग :उ. मलबारात पानांवर पेलिक्युलेरिया फिलॅमेंटोजा ह्या कवकामुळे पांढरट तपकिरी रंगाचे पट्टे पडतात पुढे पाने कुजतात. पावसाळ्यापूर्वी १ टक्का बोर्डो-मिश्रण दोन्ही बाजूंस फवारल्यास ते रोगप्रतिबंधक ठरते.

पहा : टॅपिओका मॅरांटा.

परांडेकर, शं. आ.