कांदा: (हिं. पियाज, प्याज; गु. डुंगली; क. उळळेगड्डी; सं. कंदर्प, पलांडू; इं.ऑनियन; लॅ. ऍलियम केपा ; कुल-लिलिएसी). या आवृत्तकंदयुक्त (आवरण असलेल्या कंदयुक्त) लहान ओषधीय [→ओषधि]  ओषधि वनस्पतीचे मूलस्थान इराण व त्या शेजारच्या प्रदेशत आहे. याची पीक म्हणून लागवड करतात. सर्वच भागाला विशेष उग्र वास असल्याने संस्कृतातील कंदर्प (कुत्सितो दर्पोयस्मात्‌) नाव पडले असावे. पाने मूलज (मुळापासून निघालेली आहेत अशी वाटणारी), शूलाकृती, पोकळ व रसाळ जानेवारीत येणाऱ्या महापुष्पाक्षावर चामरकल्प फुलोऱ्यात पांढरी किंवा निळसर सच्छद फुले येतात [→ फूल पुष्पबंध]. सामान्य शरीरिक लक्षणे ⇨लिलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे बोंडात पाच-सहा काळया बारीक बिया असतात. लागवड बियांपासून तयार केलेली रोपे लावून करतात. मागील सालात जमिनीत राहिलेल्या कांद्यामधूनही अंकूर निघून त्यांची वाढ होते (आ.१). कांदा लिखट, पौष्टिक, उत्तेजक, मूत्रल (लघवी साफ करणारा), कफोत्सारक (कफ मोकळा करणारा), वाजीकर (कामोद्दीपक), आर्तवजनक (मासिक पाळी सुरु करणारा) आहे. कांद्याच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन चरक संहिता, अष्टांग आयुर्वेद इ. ग्रंथांत केलेल आढळते. कांद्यात गंधक, साखर, कॅल्शियम, फॉस्फोरिक अम्ल, लिग्निन, अल्ब्यूमीन व अ, क आणि ब गटातील जीवनसत्वे असतात. कांद्यामध्ये बाष्पनशील तेल (अलिल प्रोपिल डायसल्फाइड) असल्यामुळे त्याला तिखटपण आलेला असतो.

आ. १. कांदा : अ – कंद, आ – फुलोरा, इ – फूल

विशिष्ट तिखटपणा आणि रुचकरपणामुळे शाकाहारी आणि मांसाहारी अशा सर्व लोकांना कांदा आवडतो. कांद्याचा विविध खाद्य पदार्थात उपयोग करतात. कांद्याचे निर्जलीकरण करुन त्याची पूड तयार करण्याचा एक कारखाना नाशिक जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे. या पूडीची निर्यात करण्यात येते. कांद्याच्या कोवळ्या पानांचा उपयोग भाजीसाठी करतात; ती शेतातील जनावरांनाही खाऊ घालतात.

शंभर ग्रॅम कांद्यामधील घटक
जलांश ८६.८ ग्रॅ. इतर कार्बोहायड्रेटे ११.० ग्रॅ.
वसा कॅल्शियम १८० मिग्रॅ.
तंतुमय भाग ०.६ ग्रॅ लोह ०.७ मिग्रॅ.
खनिजे ०.४ ग्रॅ. जीवनसत्वे व इतर १६.३ मिग्रॅ.
फॉस्फरस ५० मिग्रॅ. पोषण मूल्य ४९ कॅलरी
प्रथिन १.२ ग्रॅ.

 

आ. २ कांद्याचे प्रकार : अ-सपाट, आ-लांब गोल (ग्लोब), इ-गोल (ग्लोब), ई-आयत, उ-ऑब्लेट.

रान कांदा : (भुईकांदा; इं. इंडियन स्क्विल; लॅ. सिल्ला इंडिका). वरच्याप्रमाणे ही ओषधीय लहान वनस्पती ⇨लिलिएसी कुलातील परंतु अन्य वंशातील असून मे-जुलैमध्ये माळरानात उगवते. श्रीलंका व ॲबिसिनिया या देशांतही आढळते. ही कंदयुक्त असून कंदाचा व्यास दोन-चार सेंमी. असतो. पाने व फुले एकाचं वेळी (मे-जुलैमध्ये) येतात पाने मांसल, लांबट विविध आकारांची, तळ आवरक (वेढून टाकणारा) क्वचित टोकास मुळे फुटतात फुले हिरवट जांभळी व बोंड लहान पापुद्यासारखे. कंद कफोत्सारक, हृदयास पौष्टिक व मूत्रल असतो.

आ. ३. जंगली कांदा : (१) मुळे, (२) कंद, (३) पाने, (४) फुलोरा, (५) बोंड.

जंगली कांदा : (सं. वनपलांडू; इं. इंडियन ड्रग स्क्विल; लॅ.अर्जिनिया इंडिका). ही वरच्याप्रमाणे व पांढऱ्या कंदाची ओषधीय वनस्पती असून ती मूळची दक्षिण यूरोपातील अफ्रिकेत, ब्रह्मदेशात व भारतात (प.हिमालय, बिहार, कोकण व कोरोमंडळ किनारा) वालुकामय किनाऱ्यावर आढळते. पाने मुलज. मोठी सपाट, रोषाकृती असून ती फुलांनंतर येतात. फुले लोंबती, तपकिरी व लहान घंटाकृती असून जून-ऑगस्टमध्ये येतात बोंड लांबट गोलसर, दोन्हीकडे टोकदार, बिया सहा ते नऊ, सपाट व काळया असतात. कंदापासून उंदीर नाशक द्रव्य तयार करण्यात आलेले आहे. कंद हृदयास उत्तेजक व मूत्रल कंदाचे सरबत करतात. कफोत्सारक, दीपक (भूक वाढविणारे), आर्तवजनक, कृमिनाशक, रेचक इ. औषधी गुणही कंदात असतात.

जगताप, अहिल्या पां.

प्रसार : कांद्याची लागवड भारतात पुरातन काळापासून आणि अमेरिकेमध्ये १६३० पासून होत आहे. ईजिप्त, जपान, ब्राझील, स्पेन व पाकिस्तान ह्या देशांत लागवड विशेष प्रमाणात होते. भारतातील सर्व राज्यात कांद्याची लागवड होते. भारताततील कांद्याखालील एकूण क्षेत्र सु.एक हेक्टर आहे. जगातील कांद्याखालचे क्षेत्र सु.पाच लक्ष हेक्टर असून उत्पन्न पन्नास लक्ष टन असावे. महाराष्ट्र राज्यात कांद्याची लागवड पावसाळी आणि हिवाळी हंगामांत बरीच होते. नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनाबाबत प्रसिद्ध आहे. तेथील कांदा निर्यात केला जातो.

जाती : वनस्पतिविज्ञानाप्रमाणे जगात कांद्याच्या २०० पर्यंत जाती आढळतात. पण भारतात प्रत्यक्ष लागवडीखाली असलेल्या जाती दोन आहेत. एक तांबडा कांदा आणि दुसरी पांढरा कांदा. तांबडा कांदा जास्त तिखट असतो. त्याची लागवड सामान्यतः हिवाळी हंगामात आणि पांढऱ्या कांद्याची लागवड पावसाळी हंगामात करतात. कोकण भागात पांढरा कांदा हिवाळी हंगामात लावतात. यांखेरीज काही प्रकार आढळतात (आ.२).

हवामान : कांद्याची लागवड उष्णकटिबंधात सर्वत्र होते. अतिशय उष्ण आणि शीत हवामानात आणि १,००० मिमी. पेक्षा जास्त वार्षिक पर्जन्यमानात त्याची वाढ चांगली होत नाही. समुद्रसपाटीवरील अगर समुद्रसपाटीपासून १,५०० मी. उंचीवरील सर्व प्रदेशांत लागवड होते. लागणीनंतर पहिले दोन महिने थंड हवामान, पुढे दोन महिने गरम हवामान वाढीला पोषक असते.

जमीन : मध्यम प्रकारची पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन योग्य. भारी काळया चिकणवट अगर हलक्या जमिनीत कांदे पोसत नाहीत, बारीक राहतात आणि उत्पन्न कमी येते.

मशागत व लागवड : रोपे बदलून लावण्याकरिता निवडलेले शेत नांगरुन ढेकळे फोडून भुसभुशीत करतात. दर हेक्टरला २५ टनांप्रमाणे शेणखत घालतात. नंतर सपाट वाफे करतात किंवा सऱ्या काढतात. जमिनीचा मगदूर आणि उतार लक्षात घेऊन त्याप्रमाणे १.८ ग ३.६ मी किंवा ३.६ ग ६.०० मी. मापाचे सपाट वाफे तयार करतात. सऱ्या ३० सेंमी. अंतरावर काढतात. लागवड रोपे लावून सपाट वाफ्यात अगर सरीवरंबा पद्धतीने करतात. सामान्यपणे रोपे लावूनच लागवड करतात. परंतु उत्तर भारतामध्ये शेतात बी फोकून पी काढण्याची प्रथा आहे. अमेरिकेमध्ये बी पेरुन पीक घेतात. एक हेक्टर क्षेत्राच्या लागवडीसाठी १,४०० ते १,८०० चौ.मी. जागेत गादी वाफे अगर सपाट वाफे तयार करतात. त्यांत ६ ते ९ किग्रॅ. बी पेरतात. बी पेरताना वाफ्याच्या जमिनीत ७ ते १० सेंमी. समान अंतरावर बोटाने पन्हळी करुन त्यांच्यामध्ये बी हाताने पातळ पातळ टाकून पन्हळी बुजवून ते मातीने झाकतात. पावसाळी पिकासाठी बी जूनच्या शेवटच्या आठवडयात टाकतात. हिवाळी पिकांसाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात टाकतात. बी टाकल्याबरोबर पाणी देतात. पुढे दर ६ ते ८ दिवसांनी देतात. ६ ते ८ आठवडयांत रोपे २२ ते ३० सेंमी. उंच वाढतात. त्यावेळी ती बदलून लावतात. रोपांची वाढ होण्यासाठी बी उगवल्यानंतर एक आठवडयाने ३ चौ.मी. क्षेत्राला ४५० ग्रॅ. या प्रमाणात अमोनियम सल्फेट खत घालतात.

रोपे बदलून लावण्याकरिता काढून घेण्याच्या वेळी रोपांच्या वाफ्यांना पाणी देतात. त्यामुळे जमीन नरम होऊन रोपे सहज उपटता येतात, तुटत नाहीत. काही ठिकाणी या रोपांची मुळे आणि शेंडे लागवडीपूर्वी तोडण्याची प्रथा आढळते. पण तिचा पिकाच्या उत्पन्नावर काहीही परिणाम घडत नाही असे आढळते.

वाफ्यात रोपे ओळीत लावतात. पावसाळी पिकासाठी ओळीत अंतर १५ सेंमी. आणि ओळीतील रोपांमध्ये १० सेंमी. ठेवतात. हिवाळी पिकात हे अंतर ओळीत १३ सेंमी. आणि ओळीतील रोपांत ७.५ सेमी. ठेवणे चांगले असते.

पावसाळी पिकाची लागवड ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात म्हणजे शेतकऱ्यांच्या पोळयाच्या सणाच्या सुमारास करतात. म्हणून महाराष्ट्रात या पिकाच्या उत्पादनाला पोळकांदा म्हणतात. हिवाळी पिकाची लागवड डिसेंबरच्या दुसऱ्या अगर तिसऱ्या आठवडयात करतात.

सरीवरील पिकातील कांदे चांगले मोठे होतात, उत्पन्न जास्त येते. परंतु त्यात जोडकांद्यांचे प्रमाण जास्त असते. जोडकांदे चांगले टिकत नाहीत म्हणून त्यांना मागणी कमी असते. सपाट वाफ्यातील कांदे बहुतेक एकसारख्या मध्यम आकाराचे आणि टिकाऊ म्हणून त्यांना मागणी जास्त असते म्हणून भावही चांगला मिळतो. त्यासाठी सपाट वाफ्यात लागवड करणे श्रेयस्कर असते.

पाणी : रोपाची लागवड कोरडया जमिनीत करुन नंतर थोडे पाणी देतात. दुसरे पाणी ५-७ दिवसांनी देतात. रोपांनी मूळ धरल्यावर १२-१५ दिवसांनी आणि त्यानंतर १०-१२ दिवसांच्या अंतराने तीन महिने पाणी देतात. त्यापुढे कांदे पक्व होताना पाण्याची गरज असते म्हणून ७-८ दिवसांच्या अंतराने पाणी देतात. कांद्यांची काढणी करण्यापूर्वी १५ दिवस पाणी देत नाहीत. लवकर लवकर आणि जास्त पाणी दिल्यास पिकाला अपाय होतो, फुलकिडयांचा उपद्रव होण्याची शक्यता उद्‌भवते. हिवाळी पिकाला १२ ते १५ पाण्याच्या पाळया व पावसाळी पिकाला पाऊसमानाप्रमाणे पाण्याच्या पाळया द्याव्या लागतात.

खत : एक हेक्टर जमिनीमधून पीक १८० किग्रॅ. नायट्रोजन, ८० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि २५० किग्रॅ. पोटॅश काढून घेते म्हणून या पिकाला भरखते व वरखते जास्त घालावी लागतात. भरखत हेक्टरला २५ टनांप्रमाणे देतात. तागाचे हिरवळीचे खत श्रेयस्कर असते.

वरखत : हेक्टरी ४५ किग्रॅ. नायट्रोजन अमोनियम सल्फेटव्दारे, ४५ किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल सुपर फॉस्फेटव्दारे लागवडीच्या वेही देतात. लागवडीनंतर दीड महिन्याने ४५ किग्रॅ. नायट्रोजन अमोनियम सल्फेटमधून देतात. पोटॅशची आवश्यकता विशेषशी दिसून येत नाही. नायट्रोजनमुळे पालेवाढ होऊन फॉस्फोरिक अम्लामुळे कांद्यात घट्‌टपणा येतो.

काढणी : रोपांच्या लागवडीपासून सु.चार महिन्यांनी कांदा तयार झाला म्हणजे पाने हिरवी असतानाच देठांपासून वाकतात त्याला मान मोडणे म्हणतात. पिकातील सु.७५ टक्के झाडे अशी दिसली की, पीक तयार झाले असे समजतात आणि कांदे हाताने उपटून अगर लहान कुदळीने खणून काढतात, मुळे आणि पाने कापून ते स्वच्छ करतात. नंतर विक्रीसाठी बाजारात पाठवतात अगर हवेशीर जागेत साठवतात.

उत्पन्न : नाशिक जिल्हयात पावसाळी पिकाचे उत्पन्न हेक्टरी ४,८०० किग्रॅ. आणि हिवाळी पिकाचे ९,६०० किग्रॅ. पर्यंत सरासरीने येते, अर्थात मशागत, खते, पाणी वगैरेंबाबत विशेष काळजी घेतली असता, पावसाळी पिकाचे ६,८०० ते ९,००० किगॅ्र. पर्यंत आणि हिवाळी पिकाचे १८,००० किग्रॅं. पर्यंत इतके जास्त उत्पन्न दर हेक्टरी मिळू शकते. जगातील कोणत्याही देशापेक्षा नाशिक जिल्ह्यामधील दर हेक्टरी उत्पन्न अधिक आहे.

बी : कांद्याचे बी भारतामधून निर्यात केले जाते. बियांचे उत्पादन किफायतशीर असते. वियांसाठी वेगळया प्रकारे लागवड करतात. त्यासाठी जमीन, मशागत कांद्याच्या पिकाप्रमाणे करतात. लागवड सरीवरंब्यावर करतात. सऱ्या ४५-७५ सेंमी. अंतराने काढून वरंब्याच्या बगलेला मागील हंगामातील निवडक निरोगी, सरासरी ४० ग्रॅ.वजनाचे अथवा ७-८ सेंमी. व्यासाचे कांदे हेक्टरला ४,५००-५,५०० किग्रॅ. घेऊन प्रत्येकाचा शेंडयाकडचा एकचतुर्थांश भाग कापून टाकून बुडखे १५-२२ सेंमी. अंतरावर २.५ सेंमी. खोलीवर ऑक्टोंबरच्या दुसऱ्या ते चौथ्या आठवडयात लावतात. पाण्याच्या पाळया १०-१२ दिवसांनी देतात. दोन-अडीच महिन्यांनी फुलांचा दांडा (डोंगळा) निघतो. त्यानंतर ६-७ आठवडयांनी बी तयार होते. पिकाला लागणीच्या वेळी २२ किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल सुपर फॉस्फेटव्दारे आणि २२ किग्रॅ. नायट्रोजन देणे किफायतशीर होते.

एप्रिलच्या पहिल्या आठवडयात फलधारणा पुरी होऊन डोंगळे वाळू लागले म्हणजे ते जसे काढून स्वच्छ करतात. नंतर पाण्यात घालून तळावर खाली बसलेले जड बी वेगळे काढतात व ते उन्हात चांगले वाळवून बंदोबस्ताने वाठवून ठेवतात. एका वर्षाच्या साठवण काळात बियांची उगवण शक्ती ५० टक्क्यांनी कमी होते.

संशोधन : महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील संशोधन केंद्रात १९४६ पासून कांद्यावरील संशोधन कार्य सुरु करण्यात आलेले असून लागवड, साठवण, नवीन जाती शोधून काढणे वगैरे बाबतीत बरेच कार्य झालेले आहे. नवीन संशोधित जातींमध्ये हिवाळी हंगामाकरिता तांबडया रंगाचे २४१ हे वाण व पावसाळी हंगामाकरिता गुलाबी (गुलबद) रंगाचे निफाड ७ आणि पांढऱ्या रंगातील निफाड २५७-९-१ ही वाणे सरस ठरली आहेत.

कीड व रोग : फुलकिडयामुळे कांद्याच्या पिकाचे थोडेफार नुकसान होते. निरनिराळया कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे) साठवणीत कांदे काळे पडतात, सडतात व त्यांना दुर्गंधी येते. ते वेचून काढून नष्ट करतात. साठवण-घरात हवा खेळती ठेवतात.

संदर्भ : 1. Chaudhari, B. Vegetables, New Delhi, 1967.

2. Jones, H. A.; Mann, L. K. Onions and their Allies, London, 1963.

कुलकर्णी, चं. ज.