संत्रे : ( नारिंग, संत्रा, रेशमी नारिंग हिं. संत्रा, संतरा, नारिंगी गु. संत्रा बं. कमला सं. ऐरावत इं. मँडरिन ऑ रेंज, लूज स्किन्ड ऑ रेंज, लॅ. सिट्रस रेटिक्युलॅटा, सि. क्रिसोकार्पा, सि.ऑरँटियम प्रकार ऑरँटियम प्रॉपर, रेस फर्स्ट सि. नोबिलिस कुल -रूटेसी ).

आ. १. फळे व पाने असलेला नागपुरी संत्रे हा प्रकार

सिट्रस  प्रजातीतील फळांपैकी संत्रा किंवा नारिंग ( ऑरेंज ) या नावाने ओळखला जाणारा फळांचा संत्रा किंवा नारिंग [स्वीट ऑरेंज → मोसंबे], आंबट नारिंग [→ लिंबू] व मँडरिन नारिंग असे मुख्य भेद आहेत. भारतात मँडरिन नारिंगाला सर्वसाधारणपणे संत्रे म्हटले जाते. याचे मूलस्थान चीन व कोचीन चायना मानतात. उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील विविध देशांत याची लागवड केली जाते. भारतात याची लागवड इसवी सनाच्या सुरूवातीपासून सुरू झाली असावी. संत्र्याचे झाड अधोमुख शंकूच्या आकाराचे, सदाहरित, बिनकाटेरी, झुडूपवजा, मध्यम आकाराचे असते. त्यांच्या फांदया बारीक असतात. पाने काहीशी लहान, बारीक असतात. ती अरूंद व छोटी असतात व मोसंब्यापेक्षा त्यांना जास्त तीव वास येतो. देठ आखूड व जवळजवळ पंखहीन असतो. फळ गोलाकार व वरून काहीसे चपटे व शेंडयाकडील (देठाच्या विरूद्ध ) भाग पसरट असतो. फळाची साल पातळ व आतील गरापासून सहज निघून येते. कच्चे फळ हिरवे व पूर्ण पिकल्यावर सालीचा रंग भडक नारिंगी किंवा शेंदरी असतो. [→  रूटेसी सिट्रस].

संत्र्याचे फळ रेचक ( शौचास साफ करणारे ), कामोत्तेजक, स्तंभक ( आकुंचन करणारे ), पौष्टिक असून त्यामुळे तहान शमते. ते उत्साहवर्धकही आहे. फळातील गर चवीला आंबट गोड असतो. त्याच्या योगाने तोंडास रूची येते. ते रक्तशुद्धीकारक व थंडावा देणारे आहे. त्यामुळे उलटी थांबते. फळांचा रस हवाबंद बाटल्यात भरतात. फळावरील सालीत बाष्पनशील तेल असते. त्यात डी-लिमोनीन, टर्पिन, कॅरीन, लिनॅलूल इ. घटक असतात. ते डोळ्यात गेल्यास डोळ्यांतून पाणी येते.

 संत्र्याचे रासायनिक विश्र्लेषण पुढीलप्रमाणे असते : १०० गॅम खादय भागात शेकडा प्रमाण जलांश ८७.८ प्रथिने ०.९ वसा ( स्निग्ध पदार्थ ) ०.३ खनिजे ०.४ अन्य कार्बोहायड्रेट १०.६ ऊष्मांक ५३ किलोकॅलरी कॅल्शियम ०.०५ (मिग्रॅ.),फॉस्फरस ०.०२( मिग्रॅ.),लोह ०.१ ( मिग्रॅ.) आणि अ जीवनसत्त्व ३५० ( आंतरराष्ट्रीय एकके ) क जीवनसत्त्व ६८( मिग्रॅ.). याशिवाय त्यात ब ( थायमीन ) जीवनसत्त्व ०.१२ ( मिग्रॅ.) ब जीवनसत्त्व ( रिबोफ्लाविन ) ०.०६( मिग्रॅ.), निकोटिनिक अम्ल ०.३ ( मिग्रॅ.) असतात. 

प्रकार : भारताच्या निरनिराळ्या भागांत संत्र्याचे विविध प्रकार लागवडीत आहेत. ते पुढीलप्रमाणे : 

आ. 2. नागपुरी संत्रे या फळाचा आडवा छेद नागपुरी : संत्र्याचा हा प्रकार जगात सर्वांत उत्तम समजला जातो. त्याचे झाड मध्यम उंचीचे, बिनकाटेरी व भरपूर फळे लागणारे असते. त्याचा देठाकडील भाग काहीसा बाहेर आलेला व खड-बडीत असून शेंडया-कडील भाग खोलगट असतो. फळात १०-११फोडी व मध्यम आकाराच्या बिया असतात. फळाचे वजन १२०-१८० ग्रॅम असते. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत व चकचकीत असतो. विदर्भ विभागात त्यांची लागवड होते. यात बट्टीदार ( भरीव ) व पोळा असे फळांचे प्रकार आहेत. बट्टीदार फळातील गोळा ( गर ) घट्ट व तो सालीला काहीसा चिकटलेला असतो. फळ वजनदार व गोल आकाराचे असते. पोळा प्रकारच्या फळातील गोळा सुटा असतो व फळ मानेजवळ थोडेसे दबलेले असते. बट्टीदार फळाला जास्त भाव मिळतो.

खासी : या प्रकारचे झाड सरळ वाढणारे, मध्यम ठेंगणे अथवा उंच असते. त्याला काटे असतात किंवा ते बिनकाटेरी असते. त्याला पाने व फळे भरपूर येतात. ती खोलगट काहीशी वाटोळी, १५०–२४० ग्रॅ. वजनाची असतात. त्यातील फोडींची संख्या ८-१३ व बियांची संख्या ८-२५  ( सर्वसाधारणपणे १०-१५) असते. नागपुरी प्रकारापेक्षा या प्रकारात आंबटपणा कमी असतो. आसामात प्रामुख्याने त्याची लागवड होते.  त्याची अभिवृद्धी( लागवड )  बियांपासून  करतात.  उत्पादनांच्या ठिकाणा वरून त्याला निरनिराळी स्थानिक नावे प्रचारात आहेत. 

कूर्ग : याच्या झाडाला काटे असतात. फळे पुष्कळ धरतात. ती पसरट अथवा वाटोळी असून देठापाशी खोलगट असतात किंवा देठाकडील भाग मानेसारखा वर आलेला असतो. फोडींची संख्या ९-११ व बियांची संख्या १४-३० असते. या प्रकारची लागवड दक्षिण भारतात व्यापारी ( मोठया ) प्रमाणावर होते.

देशी : ( पठाणकोट ). या प्रकारचे झाड मोठे, बिनकाटेरी, काहीसे पसरणारे असते. त्याला भरपूर फळे लागतात. ते अंडाकृती किंवा गोलाकार असतात.देठाजवळ माने सारखा वर आलेला भाग असतो.त्यात ३-७ बिया असतात.त्याची लागवड मुख्यत: पंजाबातील टेकडयांच्या भागात होते.

कमला : ( दार्जिलिंग, सिक्कीम ). या प्रकारची फळे साधारण लिंबा-एवढी व नागपूरच्या बट्टीदार संत्र्याप्रमाणे असतात. त्याचा रस मधूर व  चवदार असून आंबटपणा नागपुरी संत्र्यापेक्षा कमी असतो. यासाठी बंगाली लोक तो जास्त पसंत करतात.फळांचा हंगाम फेबुवारी अखेर संपतो.कोलकाता येथील बाजारात तो लोकप्रिय आहे.


हवामान : संत्र्याची लागवड सिक्कीमसारख्या हिमालयातील टेकड्यांच्या प्रदेशापासून नागपूरसारख्या उष्ण व कोरडया हवामानात यशस्वी होते. लागवडीच्या सपाटीच्या विभागात वार्षिक पर्जन्यमान ७५ सेंमी.   असते आणि टेकडी प्रदेशात २५०सेंमी.पर्यंत असते. कूर्ग ( कर्नाटक ) व आसपासच्या टेकडयांच्या प्रदेशात तापमान ९° ते ३२° से. असते परंतु विदर्भ विभागात उन्हाळ्यात ते ४०° से.पेक्षा जास्त असते. प्रखर (कडक  ) उन्हामुळे फळांचा सूर्याकडील भाग भाजल्याप्रमाणे दिसतो. या फळाला कडाक्याची थंडी व कडक उन्हाळा हे दोन्ही मानवत नाहीत, तरीही या पिकांची प्रतिकूल हवामानाला तोंड देण्याची शक्ती प्रशंसनीय आहे. नागपुरी संत्री जगात सर्वांत उत्तम प्रतीची मानली जात होती, अलीकडे राजस्थान व हरियाणा या ज्यांच्या सीमेला लागून असलेल्या भागातील कण्णू प्रकारची संत्री रंग, आकार व गोडी यांबाबतीत सरस असतात. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत जगातील सर्वांत जास्तक्षेत्र संत्र्याच्या लागवडीखाली आहे. त्या विभागाची समुद्रसपाटीपासून उंची  ३७०-६६० मी. असून कमाल व किमान तापमान अनुक्रमे ४७° व ६° से.च्या दरम्यानअसते.

विदर्भ व खानदेश विभागांत हे पीक मुख्यत: बागायताखाली घेतले जाते. येथील पर्जन्यमान १५०-२५० सेंमी. असून तेथे पाऊस मार्च–नोव्हेंबर अगर एप्रिल– डिसेंबर पर्यंत विभागून पडतो. 

दक्षिण भारत,प.बंगाल व बिहार मधील सु.३००मी.पेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात संत्र्याची लागवड यशस्वी होत नाही. राजस्थानमधील प्रदेशात कडक उन्हापासून झाडांच्या संरक्षणाची व्यवस्था केल्यास मर्यादित क्षेत्रावर संत्र्याची लागवड होते. आंध्र प्रदेशात सिरकारांमधील संकरित संत्री हिवाळ्यात आंबट राहतात, पण तीच कडक उन्हाळ्यात गोड चवीची होतात. सौम्य हिवाळ्याच्या प्रदेशांतील संत्री अधिक गोड असतात पण थंडीच्या प्रदेशात ती आंबट लागतात. त्याला जास्त आर्द्रतेची गरज असते.

दीर्घ कोरडया काळानंतर भरपूर पाऊस पडल्यास पालेवाढ होते व फुले कमी येतात. चुनखडीयुक्त जमिनीत फळाची प्रत चांगली येते व त्याची गोडी वाढते.

जमीन : उत्तम निचऱ्याच्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत संत्र्याची लागवड य़शस्वी होते. नागपुरी संत्री काळ्या, दुमट( लोम)व काहीशा भरड जमिनीत चांगली येतात. डोंगराळ उथळ जमिनीत झाडाची वाढ खुंटते व फळांत त्रूटिजन्य रोग दिसू लागतात. विदर्भ विभागातील जमिनी काळ्या सु. २ मी. खोल असून त्याखाली मऊसर मुरमाचा थर असतो. आसामातील जास्त पावसाच्या खासी वगैरे टेकड्यांत आणि दार्जिलिंग भागात वाळूसरायुक्त जमिनीत आणि कूर्ग व वायनाड ( केरळ ) भागात खोल, परंतु चांगल्या निचऱ्याच्या तांबूस दुमट जमिनीत ते चांगले येते. जमिनीचे पीएच मूल्य ५-८ असावे पण केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जमिनीचे पीएच मूल्य 4 पर्यंत असल्यास चालू शकते.

अभिवृद्धी : नागपुरी संत्री वगळता इतर सर्व प्रकारांची अभिवृद्धी बियांपासून तयार केलेली रोपे लावून करतात. बियांपासून गादी वाफ्यावर रोपे तयार करताना वाफ्यांतील खुरटलेली रोपे काढून टाकतात. नागपुरी संत्र्यासाठी डोळे भरलेली कलमे लावतात. त्यासाठी ⇨जंबुरी च्या खुंटावर डोळे भरतात. रंगपूर लाइम हाही ट्रिस्टेझा व्हायरस प्रतिकारक खुंट असून त्याची डोळे भरण्यासाठी खास शिफारस करतात. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशामध्ये करण ( कर्ण ) खट्टाचा खुंट डोळे भरण्यासाठी पसंत करतात. खासी प्रकारच्या डोळे भरून कलमे करण्याच्या प्रयोगात सोह मिन्डोंग हा जंबुरीसारखा खुंट चांगला असल्याचे आढळून आले आहे.

कलमांची शेतात लागवड, बागेची निगा, बहार धरणे व पाणी व्यवस्थापन : सिट्रस  प्रजातीतील सर्व फळांची बागेतील कामे एकसारखी असल्यामुळे त्यांची सविस्तर माहिती मराठी विश्वकोशा तील ‘ मोसंबे ’ या नोंदीत वर्णन केली आहे. फक्त संत्र्याचा आंबेबहार व मृगबहार यांपैकी कोणता बहार धरावा हे पाण्याची उपलब्धता, रोगकिडींचा प्रादुर्भाव व बाजारभाव यांवर अवलंबून असतात. मृगबहाराची फळे श्रेष्ठ प्रतीची असतात, त्यामुळे त्यांना बाजारात जास्त भाव मिळतो. उन्हाळ्यात ( एप्रिल-मे ) पाण्याची उपलब्धता दरवर्षी सारखी नसते ( विशेषत: विहीर बागायतातील बागा ), त्यामुळे संत्र्याचा मृगबहार आंबेबहारापेक्षा जास्त  यशस्वी होण्याची शक्यता असते. ठिबक सिंचनामुळे पाण्याच्या कमतरते-वर मात करता येते. यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा वापरही करतात. तसेच जैवकृषी ( शून्य अंदाजपत्रक ) तंत्राने उत्तम प्रतीची फळे विकीस उपलब्ध होतात.

निंदणी, खुरपणी, खणणी, कुळवणी करून तणांचा बंदोबस्त करतात. तसेच त्यासाठी तणनाशकांची फवारणी करतात. आंतरपीक म्हणून हिर- वळीच्या खताची पिके, कॉफी, अननस, पपई यांसारखी किंवा भाजी-पाल्याची पिके घेतात. त्यामध्ये एक व्दिदल धान्याचे ( चवळी, भुईमूग इ.) पीक घेतात. अलीकडे ठिबक सिंचनावर संत्र्याच्या बागेत आले, हळद,   एरंडी, वांगे अशी मिश्रपिके घेतली जातात. आंतरमशागत काळजीपूर्वक करतात. दुहेरी आळे पद्धतीने उन्हाळ्यात ३-४ सऱ्या पाडून पाणी   देतात. मध्यम प्रतीच्या जमिनीला १,३२५ घन मिलिमीटर पाण्याच्या २८-३० पाळ्या प्रतीवर्षी देतात.

खते : फक्त शेणखत दिल्याने संत्र्याचे चांगले उत्पन्न येते, असा फळबागायतदारांचा अनुभव आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे प्रत्येक झाडाला १५-५० किगॅ. चांगले कुजलेले शेणखत देतात. विदर्भात प्रत्येक झाडाला दरवर्षी ५०-६० किगॅ. शेणखत देतात. आसामातील जमिनीप्रमाणे जेथे जमिनी अम्लधर्मी असतात तेथे हेक्टरी १४०–२७५ किगॅ. चुनकळी ( लाइम ) दर ६-८ वर्षांनी नांगरण्याच्या वेळी जमिनीत मिसळतात. दरवर्षी बहार संपल्यावर नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ( एनपीके ) ही पोषक द्रव्ये असलेली मिश्रखते आणि फळधारणेपूर्वी अमोनियम सल्फेट व सुपर फॉस्फेट दिल्याने निश्चित फायदा होतो असा अनुभव आहे. उत्तर भारतात हिवाळ्यात खते देण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात मृगबहारासाठी झाडांना दिलेला ताण संपल्यावर पावसाळ्यापूर्वी व आंबेबहारासाठी ताण संपल्यावर जानेवारीमध्ये खते देतात. [→ मोसंबे].

फलधारणा : बियांपासून तयार केलेल्या झाडांना आठव्या वर्षी व डोळे भरून कलमे केलेल्या झाडांना चौथ्या वर्षी फळे धरतात. पूर्ण पीक अनुक्रमे दहाव्या व सातव्या वर्षी मिळू लागते. फुले आल्यापासून ८-११ महिन्यांनी फळे पक्व होतात. फळांची गळ नियंत्रित करण्यासाठी २,४- डी किंवा एनएए ह्या संप्रेरकाची ( हॉर्मोनांची ) फवारणी करतात.


काढणी व साठवण : संत्र्याची फळे पावसाळी हवेत काढत नाहीत कारण साल घासली गेल्यास कवक व सूक्ष्मजंतूच्या संसर्गाने फळे नासतात. फळे तोडताना देठाचा फक्त सालीलगतचाच भाग ठेऊन तोडतात. परगावी पाठवावयाची असल्यास ती मऊ व पातळ कागदात गुंडाळून पाठविल्याने वाहतुकीत होणारे नुकसान होत नाही. ती बैलगाडीत व ट्रकमध्ये मोकळी भरून किंवा प्रतवारी करून करंडया किंवा खोक्यांत भरून पाठवितात. काढणीनंतर ती एका आठवडयापेक्षा जास्त काळ चांगली टिकत नाहीत परंतु पिकलेली नागपुरी संत्री ४° – ५.५° से. तापमान व ८५-९०% सापेक्ष आर्द्रतेत तीन महिन्यांपर्यंत टिकतात. पूर्ण पक्व झालेली परंतु हिरव्या सालीची फळे  ११°१३° से. तापमानात ३-४ आठवडे ठेवल्यास फळांना एकसारखा रंग येतो. त्यानंतर ती ४° – ५.५° से. तापमानात ठेवल्यास २-३ महिने चांगली राहतात. पंजाब व उत्तर प्रदेशातील संत्री पोकळ व कमी प्रतीची असतात. ती २°४° से. तापमानात ४–६ आठवडे चांगल्या स्थितीत राहतात. कूर्ग संत्री ५.५°७° से. तापमानात व ८५–९०% सापेक्ष आर्द्रतेत १०– १२ आठवडे टिकतात.कडक उन्हातील फळे रवाळ बनतात व त्यातील रस वाळतो. त्याला खात्रीलायक इलाज नाही. फळे लवकर काढल्यास कमी नुकसान होते.

उत्पन्न : प्रत्येक झाडापासून दरवर्षी सर्वसाधारणपणे मृगबहारांची ८००–१,५०० व आंबेबहाराची ५०० – ६०० पर्यंत फळे मिळतात.  झाडे साधारणपणे २५–३० वर्षे टिकतात.

रोग : संत्रे, मोसंबी यांसारख्या लिंबू गटातील पिकांवर डिंक्या, शेंडा सुकणे, फळ कुजणे, खैरा, सल इ. रोग आढळून येतात.

डिंक्या रोग : हा फायटॉफ्थोरा जातीच्या कवकामुळे होतो. कलमाच्या डोळा भरलेल्या जागेतून किंवा बुंध्याजवळ झालेल्या जखमातून या कवकाचा झाडात शिरकाव होतो.या रोगाने झाडाच्या बुंध्याजवळजला-सक्त जागा तयार होतात व त्यातून डिंकासारखा पदार्थ बाहेर पडतो.  झाडांची साल फाटते व आतील लाकूड उघडे पडते आणि काही दिवसांनी झाड मरते. जंबुरीचे झाड या रोगास खूपच प्रतिकारक आहे. म्हणूनच जंबुरीच्या रोपांचा डोळे भरून कलमे करण्यासाठी खुंट म्हणून वापर   करतात.तसेच खुंटावर डोळा जमिनीपासून २३-२४सेंमी.उंचीवरभरणे श्रेयस्कर. बागेत कलमाच्या बुंध्याशी माती लावून उंचवटा तयार करतात.   त्यामुळे झाडाला पाणी देताना ते खोडास लागत नाही. झाडांवर रोग पडल्याचे आढळताच खोडावरील तपकिरी पडलेली साल खालच्या काष्ठमय भागास इजा होऊ न देता धारदार चाकूने तासून काढतात व खालच्या लाकडास ०.१ टक्का पारायुक्त कवक नाशकाच्या विद्रावकाने निर्जंतुक करतात वरून बोर्डोपेस्ट लावतात.

पानगळ व फळ कुजणे : हा रोगही फायटॉफ्थोरा या जातीच्या कवकापासून होतो. या रोगात पानाच्या देठाच्या बाजूस, पाण्याने भिजल्यासारखे ठिपके आढळतात. पाने कुजतात व गळून पडतात. कोवळ्या शेंड्यांना संसर्ग होऊन त्यांना तपकिरी रंग येतो. संसर्ग झालेली फळे मऊ पडतात, कुजतात व गळून पडतात. त्या फळांवर पांढरा कापसासारखा बुरशीचा थर वाढतो. जमिनीतील ओलाव्यात कवकाची वाढ होते. जमिनीलगतच्या फळांना त्याचा संसर्ग होतो. साधारण उष्ण व जास्त आर्द्रतायुक्त हवामान या रोगास पोषक असते. बोर्डोमिश्रण अगर तामयुक्त कवकनाशकाच्या एप्रिल ते जुलै दरम्यान महिन्याचे अंतराने तीन फवारण्या या रोगावर परिणामकारक ठरतात.

खैरा : बहुतेक सर्व लिंबू गटातील झाडांवर हा रोग आढळतो. कागदी लिंबावर याचे प्रमाण जास्त असते. हा रोग सूक्ष्मजंतूंपासून होतो. या रोगात झाडाची पाने, शेंडे, काटे व फळावरसुद्धा गर्द तपकिरी रंगाची त्वक्षायुक्त कठीण लाकडाप्रमाणे दोषस्थळे उदभवतात. पावसाळी हवेत यांची वाढ होते. वारा, पावसाचा झोत व इतर कीटक यांच्यामुळे याचा प्रसार होतो. रोगजंतू पानांवरील रंधातून प्रवेश करतात. रोगगस्त फांदयांची पावसाळ्यापूर्वी छाटणी करतात व झाडावर तामयुक्त बुरशीनाशक फवारतात.

शेंडा सुकणे : हा संत्रे व मोसंबी यांवरील एक कवकजन्य रोग असून झाडांच्या कोवळ्या अगस्थ फांदयांवर आढळून येतो. पानावर तपकिरी, ढगाळ ठिपके पडतात. फांदया कोमेजून त्यांची टोके वाळतात व त्यांना रूपेरी तपकिरी रंग चढतो. पाने, फुले व कोवळी फळे गळून पडतात. उत्तर भारतात या रोगाने बरेच नुकसान होते. या रोगात रोगट फांदयांची फेबुवारी महिन्यात छाटणी करतात. झाडांना जोम येण्यासाठी शेणखत घालतात आणि बोर्डोमिश्रणात फेरस सल्फेट मिसळून त्याचा फवारा मारतात.

गुलाबी रोग : हा रोग कार्टिसियम साल्मोनिकलर या कवकापासून होतो. संत्रे व मोसंबी या दोन्ही झाडांवर हा रोग आढळतो. रोगगस्त साल कोरडी व कठीण होते व लाकडास घट्ट चिटकून राहते. तिला उभ्या भेगा पडतात व त्यातून डिंकासारखा द्रव बाहेर पडतो. त्यावर गुलाबी रंगाचा कवक वाढत राहतो. या रोगात रोगट फांदया छाटून टाकतात व रोगट भाग खरवडून काढून त्यावर बोर्डोपेस्ट लावतात व बोर्डोमिश्रण फवारतात.

सल : प्रामुख्याने हा रोग संत्रे, मोसंबी व चकोतरा या झाडांवर आढळतो. १९१२ पासून महाराष्ट्रात तो दिसून आला आहे. तो एक विशिष्ट रोग नसून अनेक रोगांचे हे लक्षण आहे. या रोगांत झाडाच्या फांदया शेंडयाकडून वाळत जाऊन झाड मरते. सल रोगात मुख्यत्वे दोन विभाग पडतात : (१) व्हायरस रोगांचा प्रादुर्भाव, (२) मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा असमतोलपणामुळे आढळणारे रोग.

व्हायरसजन्य रोग : यामध्ये ट्रिस्टिझा, सोरॉसिस इ. रोगांचा समावेश होतो. यात झाडांच्या मुळ्यांना दुखापत झाल्यासारखी लक्षणे दिसतात.  पानेवरच्याबाजूनेगुंडाळलीजातातवफिक्यारंगाचीदिसतात.फळेलहान राहून टणक बनतात. झाडांना कमी पालवी फुटते. तंतुमय मुळे मरतात.  त्यांची साल सुटी होते इत्यादी लक्षणे आढळतात व शेवटी झाड मरते.  रोगाचा प्रसार रोगट झाडावरील डोळे कलमासाठी वापरल्यामुळे किंवा कीटकाव्दारे होतो. ट्रिस्टिझा हा रोग रोगट झाडावरील डोळे वापरल्यामुळे आणि खासी नारिंगाच्या रोपांचा खुंटासाठी वापर केल्याने होतो. डोळे भरण्यासाठी खुंट म्हणून मोसंबी रंगपूर लाईम, जंबुरी यांच्या रोपांचा वापर करतात. सोरॉसिस हा रोग कोणत्याही जाची रोपे खुंट म्हणून वापर केला तरी पडतो. या रोगात झाडांच्या सालीवर डिंकयुक्त अगर डिंकाशिवाय पापुद्रे येतात.रोगट डोळे कलमासाठी वापरल्याने याचा प्रसार होतो. डोळे निरोगी झाडापासूनच निवडून घेतले जातात. 

मूलद्रव्यांच्या असमतोलपणामुळे होणारे रोग : काही वेळा झाडांना नायट्रोजन, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगॅनीज, बोरॉन, ताम,लोह यांपैकी एक अगर जास्त घटकांच्या उणिवेमुळे अगर त्यांच्यातील असमतोलपणामुळे झाडे रोगट बनतात. अशा बागेतील माती तपासून वरीलपैकी कोणत्या द्रव्यांची जमिनीत उणीव आहे, ते पाहून त्यांचा पुरवठा केला जातो किंवा अशा द्रव्यांचा फवारा झाडावर मारतात, त्यामुळे झाडे सुधारतात.


कीड :संत्र्यामोसंब्यावरील सायला : लिंबू गटातील बहुतेक सर्व झाडांवर ही कीड आढळते पण विदर्भात व पंजाबात संत्र्याच्या पिकावर मोठया प्रमाणावर दिसून येते. हे किडे झाडाचे कोवळे शेंडे, पाने, कळ्या व फुलातून रस शोषून घेतात. त्यामुळे पाने मुरडली जातात, कळ्या व लहान शेंडे गळून पडतात आणि संसर्ग झालेल्या फांदया वाळून मरतात.  कीटकांच्या शरीरातून स्रवणारा गोड पदार्थ पानावर पसरतो व त्यामुळे कोंबावर काळी बुरशी वाढते. किडीचा प्रादुर्भाव विशेष तीव असेल तर झाडांना फळे धरत नाहीत. फांदया वाळू लागतात व केव्हा केव्हा झाड मरते. हे कीटक लहान तपकिरी रंगाचे असून त्यांचे पंख पारदर्शक पांढरे ठिपके असणारे व शरीरावर छपरासारखे धरलेले असतात. हे किडे झाडांच्या कोवळ्या भागात आपली सोंड खुपसून त्यातील रस शोषून घेतात. 

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी पॅरॉथिऑन, मॅलॅथिऑन, निकोटीन सल्फेट यांसारखी कीटकनाशके फुले येण्याच्या वेळी आठवडयाच्या अंतराने तीन वेळा फवारतात.

लिंबावरील अळी : ही अळी झाडांची कोवळी पाने खाऊन जगते. या अळ्या वाफ्यातील रोपे व नवीन लावलेली झाडे यांचे पावसाळी हवेत फार नुकसान करतात. यांचा पतंग मोठा, निळसर हिरव्या रंगाचा असून पुढच्या काळ्या पंखावर बरेच पिवळे ठिपके असतात. मागील पंख त्याच रंगाचे असून त्यांच्या टोकाला विटकरी रंगाचा लांबट ठिपका असतो. ते कोवळ्या पानांत पिवळट पांढरी सुटी अंडी घालतात. ३-४ दिवसांत अंडयातून अळी बाहेर पडून ती पाने खाण्यास सुरूवात  करते.  

उपाय : मॅलॅथिऑन, पॅरॉथिऑन किंवा निकोटीन सल्फेट यांसारख्या कीटकनाशकाचा फवारा मारतात. अळ्या वेचून नष्ट करतात.

फळातील रस शोषणारा पतंग : हा पतंग तयार झालेल्या फळांत रात्रीच्या वेळी आपली सोंड खुपसून त्यातील रस शोषून घेतो. सोंडेने फळास पडलेल्या छिद्रातून कवक व सूक्ष्मजंतूंचा फळात प्रवेश होऊन फळे कुजतात व गळून पडतात. हा पतंग मोठा असून त्याचे मागील पंख नारिंगी रंगाचे असतात. त्याच्या अळ्या बागेतील वनस्पतीवर पोसतात.

उपाय : गळलेली फळे गोळा करून नष्ट करतात. पतंग हातांनी पकडून मारतात. फिश ऑईल रोजीन सोप अगर बीएचसी व गॅमेक्झिन ( लिंडेन )  यांसारख्या  कीटकनाशकाचा फवारा मारतात.

पांढरी माशी : या किडीचे बरेच प्रकार आहेत. या किडीचे पतंग व अळ्या दोन्हीही पानांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने निस्तेज पडून सुकतात. त्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड स्रावामुळे पानावर काळी बुरशी वाढते. तीव प्रादुर्भाव असेल तर फळधारणा कमी होते, फळे गळून पडतात व उत्पन्न घटते.

उपाय : फिश ऑईल रोजीन सोप यासारख्या कीटकनाशकाचा फवारा मारतात.

मावा : हे कीटक पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने सुकतात.

उपाय : बीएचसी ५% चूर्ण फवारतात.

पिठया व खवले कीटक : हे कीटक पानातील रस शोषून घेतात.   त्यामुळे पाने व फांदयांत विकृती उत्पन्न होते. फांदयांवर गाठी तयार होतात. कीटक शरीरातून गोड स्राव स्रवतात.

उपाय : मॅलॅथिऑन यासारख्या कीटकनाशकाचा फवारा मारतात.

उपयोग : मुख्यत: संत्रे जेवणानंतर आवडीने खाल्ले जाते. सिट्रस प्रजातीतील इतर फळांपमाणे या फळात क जीवनसत्त्व पुष्कळ प्रमाणात असते. फळांचा रस बाटल्यांतून विकला जातो. तो पेय म्हणून घेतला जातो. संत्र्यापासून पुष्कळ व्यापारी उत्पादने घेतली जातात. बाष्पनशील तेले व स्थिर तेले, सायट्रिक अम्ल व पेक्टिन ही उत्पादने तयार करतात. फळांपासून रस, स्क्वाशेस व कार्डियल्स ही पेये बनवितात. तसेच मार्मालेड व जेलीचे उत्पादन केले जाते. सालीपासून बाष्पनशील तेले व पेक्टिने मिळतात. बाष्पनशील तेलाचा उपयोग स्वादकारक व सुगंधी द्रव्यांत करतात. तसेच यू-द-कोलोनमध्ये त्याचा उपयोग करतात. पाने व अगशाखांपासून पेटिटगेन तेल काढतात.

लाडू : ( लॅ. सि. पॅराटँजेरिना  कुल-रूटेसी ). या जातीच्या झाडाचे वैशिष्टय असे की त्याला बुंध्यापासून फांदया फुटत असल्यामुळे ते फांदया व पाने यांनी गच्च भरलेले दिसते. झाडाचा माथा भरगच्च व गोलाकार असतो. याच्या लागवडीचे तंत्र संत्र्याप्रमाणेच असते. फळे देठाकडे निमुळती, खाली फुगीर, टोकाला चपटी, मोदकाच्या आकारासारखी असतात. ती संत्र्यापेक्षा कमी गोड असतात. फळांत बिया बहुतेक नसतात. रंग संत्र्यापेक्षा कमी आकर्षक असतो. साल सैल असते. लाडूची लागवड मोठया प्रमाणावर होत नाही.

रेशमी नारिंग : ( लॅ. सि. रेशमी,  कुल-रूटेसी ). संत्र्याच्या प्रकारां-पैकी एक प्रकार. याचे झाड कमला संत्र्यासारखे दिसते. याला भरपूर फळे लागतात परंतु ती नागपुरी संत्र्यासारखी रसाळ नसतात. त्याच्या फळाचा आकार लहान असून त्यात थोडासा रस व पुष्कळ बिया ( सु. २०) असतात. त्याची लागवड तुरळक होत असावी. याच्या रोपाचा उपयोग डोळे भरण्यासाठी खुंट म्हणूनही होऊ शकत नाही. कारण त्याची साल खोडाच्या काष्ठमय भागापासून सहज सुटी करता येत नाही. हवामान, जमीन, मशागत, खत, पाणी वगैरेंबाबतचा तपशील संत्र्याप्रमाणे असतो.

पहा : चकोतरा जंबुरी फळबाग मोसंबे रूटेसी, सिट्रस. 

संदर्भ : 1. Cheema, G. S. Bhat, S. A. Naik, K. C. Commercial Fruits of  India, Bombay, 1954.

            2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

            3. Hages, W. B. Fruit  Growing in India, Allahabad, 1960.

            4. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.

            5. Singh, Ranjit Fruits, New Delhi, 1969.

            6. Singh, Sham Krishnamurti, S. Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963. 

           7. नागपाल, रघबीर लाल  अनु. पाटील, ह. चिं. , फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि पद्धती, पुणे, 1963.

           8. परांजपे, ह. पु. फळझाडांचा बाग, पुणे, 1950.

परांडेकर, शं. आ. पाटील, ह. चिं.