कापूस : वस्त्रप्रावरणाच्या निर्मितीकरिता लागणाऱ्या वनस्पतिज धाग्यासाठी उपयुक्त असलेली कापूस ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बोंडातून मिळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र तंतूमय भागालाही कापूस असे म्हणतात. कापासाच्या रानटी अवस्थेतील काही जाती उष्ण प्रदेशांत आढळत असल्याने तो मूलत: उष्णदेशीय असावा असे मानतात.

कापूस व कापसाच्या सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग ह्यांविषयीचे ज्ञान भारतीयांना फार पूर्वीपासून होते. ऋग्वेदात कापसाचा उल्लेख आहे. मनूनेही धर्मशास्त्रात सुती वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे. ज्ञात असे सर्वांत जुने कातलेले सूत मोहों-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले आहे. यावरून इ. स. पू. ३००० वर्षांपूर्वी भारतात कापूस लागवडीत होता असे दिसते. इतर ज्ञात प्राचीन सुती वस्त्रे म्हणजे इंका संस्कृतीच्या पूर्वीच्या काळातील पेरू देशातील थडग्यात सापडलेले कापड, इतिहासपूर्व काळातील ॲरिझोनाच्या प्वेब्लो भग्नावशेषात सापडलेले कापड वगैरे होत.

इ. स. पू. १५०० ते इ. स. अठराव्या शतकापर्यंत म्हणजे जवळ – जवळ ३,३०० वर्षे भारत कापूस उद्योगावर आघाडीवर होता. त्यानंतर मात्र इंग्रज सरकारच्या धोरणामुळे भारतीय कापूस उद्योगावर प्रतिगामी परिणाम झाला.

भारतातूनच कापसाचा व कापड विणण्याच्या कलेचा भूमध्य समुद्रालगतच्या देशांत आणि यूरोप खंडात प्रसार झाला. हीरॉडोटस (इ. स. पू. ४५०) यांनी भारतीय स्त्रिया सुती वस्त्रे कशा विणीत असत त्याचे वर्णन केलेले आहे. भारतीय अतिथ्य, शौर्य व स्वाभिमान यांविषयी अलेक्झांडर (इ. स. पू. ३२७) जितके प्रभावित झाले होते, तितकेच ते येथील कापूस उद्योगाविषयी व भारतीयांच्या सुती कपड्यांविषयीही प्रभावित झाले होते. ‘विशिष्ट रानटी झाडे फळाऐवजी लोकर देतात आणि ह्या लोकरीचे सौंदर्य व प्रत मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. भारतीय लोक त्यापासून तयार केलेले कपडे घालतात’, असा उल्लेख अलेक्झांडर यांनी केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी भारतातून परतताना कापूस ईजिप्त, ग्रीस व इतर भूमध्य समुद्रालगतच्या देशांमध्ये नेला. गंगेच्या खोऱ्यातील उत्कृष्ट मलमलीला ग्रीकांनी  गंगेवरून `गॅंजिटिकी’ असे नाव दिले. थीओफ्रस्टस यांनीही आपल्या वनस्पतिविज्ञानाच्या ग्रंथात भारतीय कापसाचे वर्णन केले आहे. ईजिप्तमध्ये जरी फ्लॅक्स उद्योगाला अग्रस्थान होते, तरीसुद्धा काही काळानंतर म्हणजे इ. स. ६०० पासून तेथे कापूस पिकवून त्यापासून कापड बनविण्याचा उद्योग सुरू झाला.

भारतातून कापसाचा प्रसार केवळ पश्र्चिमेकडेच नव्हे तर पूर्वेकडेही झाला. इ. स. सातव्या शतकात कापूस भारतातून चीनमध्ये गेला. सुरुवातीला शोभेची झाडे म्हणून चिनी लोक कापसाची झाडे आपल्या बागेत लावत असत. सु. नवव्या शतकानंतर तेथे कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊन त्यापासून सूत व कापड निर्माण होऊ लागले.

मेक्सिकोत कापसाच्या बोंडाचे अस्तित्व जरी इ. स. पू. ५००० वर्षे इतके प्राचीन असले, ती तेथे कापसाचा कापडासाठी उपयोग फक्त इ. स. पू. २५०० वर्षांपासूनच माहीत होता, असे ज्ञात पुराव्यावरून दिसते. त्याच सुमारास पेरू देशातील लोकही कापूस लावून त्यापासून कापड निर्माण करीत असत. कापसाच्या भरपूर पुरावठ्यासाठी इ. स. पंधराव्या व सोळाव्या शतकांत निरनिराळ्या संशोधन सफरी योजण्यात आल्या होत्या. १४९२ मध्ये कोलंबस यांना वेस्ट इंडीजमधील स्थानिक रेड इंडियन रहिवाशांनी कापसाचे सूत भेटी दाखल दिले होते.  इ. स. सतराव्या शतकात इंग्रजांनी उ. अमेरिकन वसाहतीत कापसाची लागवड केली. या लागवडीतूनच आजच्या अमेरिकेतील आधुनिक कापड व्यवसाय उदयाला आला आहे. यूरोपमध्ये आधीच तो व्यवसाय व्यापारी प्रमाणावर चालू होता.

कापूस ज्या झाडापासून मिळतो त्याला कपाशी (हिं. व गु. कपास, रुई क. हति सं. कार्पास, इं. कॉटन, लॅ. गॉसिपियम कूल – माल्व्हेसी) असे म्हणतात. कापसाच्या अनेक जाती असून त्या गॉसिपियम  या वंशात समाविष्ट आहेत. या वंशात काहींच्या मते ३० च्या वर जाती आहेत, तर काही तज्ञांच्या मते या वंशात मुख्य अशा तीनचारच जाती असून सर्व त्यांचे प्रकार आहेत.

ही उंच वाढणारी, वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणारी) ओषधी [→ औषधि]  किंवा क्षुप (झुडूप) असून तिची   उंची सु .१.५-२.५ मी. पर्यंत असते. खोडावर भरपूर प्रमाणावर फांद्या येतात. सामान्य शारिरीक लक्षणे ⇨माल्व्हेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. पाने साधी, हस्ताकृती, ३-९ खंडात विभागलेली, कधी अखंड व मध्यम आकाराची असून फुले पांढरी, पिवळी किंवा जांभळट असतात. अपिसंवर्त ३-५ छदांचा संवर्त पाच संदलांचा व पुष्पमुकुट पाच पाकळ्यांचा असतो. केसरदले एकसंध किंजपुटात ३-५ कप्पे [→फूल]  व प्रत्येकात ३-११ बीजके (सरकी) बोंड पुटक भिदुर (किंजदलाच्या मध्य अक्षांवर फुटणारे) बिया काळसर लहान, अनियमितपणे गोलसर व कमी जास्त लांबीच्या पांढऱ्या नाजूक धाग्यांनी वेढलेल्या असतात. हे धागे म्हणजेच कापूस होय. सरकी काढून टाकलेल्या कापसाला रुई किंवा रू म्हणतात. कापसाचे काही प्रकार बागेत शोभेकरिता लावतात.

जाती :  कपाशीच्या मुख्यतः लागवडीत असलेल्या चार जाती म्हणजे (१) गॉसिपियम अर्बोरियम (देवकापूस), (२) गॉसिपियम हर्बेशियम, (३) गॉसिपियम हिरसुटम आणि (4) गॉसिपियम बार्बांडेन्स. यांच्यापैकी अर्बोरियम मूळची भारतातील आहे असे समजतात. मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले धागे अर्बोरियम जातीचे आहेत असे सिद्ध झालेले आहे. दुसरी जात मध्यपूर्व देशांतून भारतात आणलेली आहे. तिसरी जात अमेरिकन असून ती ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आणली आहे. चौथी जात मूळची पेरू देशातील आहे.

अर्बोरियम कापूस आखूड धाग्याचा व जाडाभरडा असतो, पण या जातीतील कसही प्रकारांचा मध्यम आणि साधारण नरम असतो. ही जात कापूस पिकविणाऱ्या सर्व प्रदेशांत लागवडीत आहे. हर्बेशियमचा धागा अर्बोरियमच्या धाग्यापेक्षा लांब व बारीक असतो. त्याची लागवड गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत होते. हिरसुटमचा धागा वरील दोन्ही जातींच्या धाग्यांपेक्षा मध्यम ते लांब आणि बारीक व मृदू असतो. ही जात पंजाब, पश्र्चिम उत्तर प्रदेश, राजस्थानचा बिकानेर भाग, आंध्र प्रदेशाचा काही भाग, तमिळनाडू व महाराष्ट्र राज्यांत जास्त प्रमाणांत लावतात. या जातीची लागवड कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांत वाढत आहे. बार्बाडेन्स या जातीची लागवड कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत करण्यात येते.

हवामान : कपाशी हे उष्ण हवामानातील पीक आहे. ज्या भागात २०० दिवसांपेक्षा अधिक दिवस थंडीचा कडाका नसतो व हवेतील तपमान २१०से. किंवा जास्त, पुष्कळ दिवस टिकते त्या भागात व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड करतात. कडाक्याच्या थंडीने झाडे मरतात. कपाशीच्या वाढीला पुढील गोष्टींची आवश्यकता असते : (१) वार्षिक सरासरी तपमान १६० से. वर  लागते. पण जेथे पाऊसकाळ व ऊन अनुकूल असेल तेथे १०० से. तपमानसुद्धा चालण्यासारखे असते. (२) चांगले विभागून पडणारे वार्षिक पर्जन्यमान, किमान २१० मिमी. व कमाल १,५२० मिमी. पर्यंत असल्यास पिकाला फायदेशीर असते. (3) ऊन स्वच्छ असावे. अंशतः ढगाळ किंवा पूर्ण ढगाळ हवामान पिकाला अपायकारक ठरते. विषुववृत्ताच्या उत्तरेस ४०० व दक्षिणेस ३०० या पट्ट्यात कापूस पिकवितात. अमेरिकेत हा कापूसपट्टा ३७० उत्तर व ३२० दक्षिण यांच्यामध्ये आहे. सोव्हिएट रशियात ४१ ते ४२ उत्तर अक्षांशापर्यंतच्या पट्ट्यात कापूस पिकवितात.

क्षेत्र व उत्पादन विभागणी:- पूर्व गोलार्धात कापूस पिकविणारा प्रदेश ४७ उ. अक्षांश ते ४७ द. अक्षांश यांच्यामध्ये पसरला आहे,  तर पश्चिम गोलार्धात  ३७ उ. अक्षांश ते ३० द. अक्षांश यांच्यामध्ये तो सामावलेला आहे.

कोष्टक क्र. १. निरनिराळ्या देशांतील कापूस क्षेत्राची व उत्पादनाची वाटणी (१९६८-६९)

अमेरिकेची काही संस्थाने, दक्षिण ब्राझील, अर्जेंटिना, काँगो, चीन आणि भारत या देशांत कापूस संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावरच पिकविला जातो, तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील बराचसा प्रदेशा (कॅलिफोर्निया, टेक्सस इ.) मेक्सिको, पेरू, बराचसा रशिया आणि ईजिप्तचा प्रदेश या भागांत तो कालव्याच्या पाण्यावर पिकविला जातो.

कोष्टक क्र. २ जगातील प्रमुख उत्पादक देशांचे  १९७० अखेरचे कापूस उत्पादन हजार गाठींंमध्ये (१ गाठ = २२३ किग्रॅ.)

जगात एकूण ५५ देशांमध्ये ३ कोटी हेक्टरांपेक्षा जास्त क्षेत्रात कापूस पिकविला जातो. त्यापासून अंदाजे ५.५ कोटी गाठींचे (१ गाठ =२२३ किग्रॅ  .) उत्पादन होते. प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये क्षेत्राच्या बाबतीत भारताचा क्रमांक जरी पहिला लागत असला, तरी हेक्टरी उत्पादनामध्ये तो बराच खाली आहे. कोष्टक क्र. २ मध्ये जगातील प्रमुख देशांतील कापसाचे १९७० सालचे उत्पादन दाखविले आहे. यूरेशिया खंडाचा कापूस उत्पादनात पहिला क्रमांक लागतो.

उत्तर अमेरिका खंडातील संयुक्त संस्थानांत सर्वांत जास्त कापूस पिकतो. आफ्रिका खंडात ईजिप्तचा तर यूरेशिया खंडात रशियाचा प्रथम क्रमांक लागतो. दक्षिण अमेरिका खंडात ब्राझील हा सगळ्यात जास्त कापूस पिकविणारा प्रदेश आहे.

यूरेशिया खंडात जागतिक उत्पादनाच्या निम्मा कापूस पिकतो आणि त्यापैकी अर्धा कापूस रशिया व चीन या दोन देशांतच निर्माण होतो. म्हणजे जागतिक उत्पादनाच्या एक चतुर्थांश कापूस वरील दोनच देशांत होतो. तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्त कापूस एकट्या अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत होतो. म्हणजेच अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, रशिया आणि चीन या तीन देशांतच जगातील निम्मा अधिक कापूस पिकविला जातो. यूरेशिया खंडात रशिया आणि चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, चीन, भारत, ब्राझील, मेक्सिको आणि ईजिप्त या सात देशांची उत्पादनानुसार अशी क्रमवारी लागते व त्यांचे जागतिक उत्पादनाशी शेकडा प्रमाण अनुक्रमे ३२.५, १४.६, १०.८, ९.६, ४.७, ४.५ व ३.९ असे आहे. जागतिक उत्पादनाच्या ८० टक्क्यांहून अधिक कापूस ह्या सात देशांतच पिकविला जातो. वरील सात देशांमध्ये जरी सुदानचा क्रमांक लागत नसला, तरी कापसाच्या प्रतीत त्याचा अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ईजिप्त यांच्या बरोबरच पहिला क्रमांक लागतो. रशियन कापसाची प्रत गेल्या काही वर्षांत खूपच सुधारली आहे. भारतीय व चिनी कापूस मध्यम प्रतीचा असतो.

दर हेक्टरी कापसाचे उत्पादन रशियात सर्वांत जास्त म्हणजे ६५० किग्रॅ. इतके आहे. तेथे कापूस मुख्यतः मध्य आशियात होतो. उझबेकिस्तानातच एकूण उत्पादनाच्या १/३ कापूस पिकतो. नवीन सोप्या पण आर्थिक दृष्ट्या स्वस्त अशा लागवडीच्या पद्धती, साधनांची मुबलकता, शेतीची आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि रचना, कालव्यांची सोय, कापूसनिर्मितीचे यांत्रिकीकरण इ. महत्त्वाच्या कारणांमुळे रशियात एवढे जास्त हेक्टरी उत्पादन काढणे शक्य झाले आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील हेक्टरी उत्पादन त्याच्या खालोखाल म्हणजे ६०० किग्रॅ. आहे. हा कापूस उत्तम प्रतीचा असून अमेरिका बराचसा कापूस निर्यात करते. रशिया बहुतेक सर्व कापूस स्वतःसाठीच वापरतो. चीनचीसुद्धा तीच स्थिती आहे. प्रतिवर्षी भारतातील कापसाचे उत्पादन वाढत आहे. बहुतेक सर्व कापूस देशातच वापरला जातो. तरीसुद्धा सु.२५ लाख गाठी कापूस भारत जपानला निर्यात करतो, तर त्याच्या तिप्पट चांगल्या प्रतीचा कापूस आयात करतो.

कोष्टक क्र. ३ मध्ये निरनिराळ्या तंतूच्या उत्पादनाची जागतिक व भारतातील टक्केवारी दाखविली आहे.

या कोष्टकावरून असे दिसून येईल की, जगात अजून कापूसनिर्मिती इतर तंतूच्या मानाने सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. सु.३/४ एवढे उत्पादन फक्त कापूस व सेल्युलोज तंतूचेच आहे. अर्थात संश्लिष्ट (कृत्रिम) तंतूचेही उत्पादन बरेच म्हणजे १/५ इतके आहे. संश्लिष्ट तंतूचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे, तथापि त्यापासून कापूस उत्पादनाला अद्याप गंभीर असा धोका निर्माण झालेला नाही. या दृष्टीने कापूस उद्योग हा तंतू उद्योग क्षेत्रातील सर्वांत मोठा असा उद्योग आजही आहे व ही परिस्थिती नजीकच्या काळात तरी तशीच राहील असे दिसते. भारतासारख्या कापूसप्रधान देशात तर कापूस व सेल्युलोज तंतूचे उत्पादन ९७% आहे.

भारताच्या बहुतेक प्रदेशांतील जमीन आणि हवामान कापसाला अनुकूल अशा स्वरूपाचे आहे. जास्त कापूस पिकविणाऱ्या राज्यांत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा, पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादींचा समावेश होतो. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये भारतातील सर्वांत जास्त कापूस पिकवणारी राज्ये होत. भारतातील निम्मा कापूस येथेच पिकतो.

कोष्टक क्र. ४ मध्ये भारतातील प्रमुख राज्यांतील कापूस लागवडीचे क्षेत्र व उत्पादन दिलेले आहे.

जमीन :  पिकाच्या जरूरीप्रमाणे भरपूर पाऊस पडत असेल, तर कपाशी साधारणपणे कोणत्याही प्रकारच्या म्हणजे हलक्या, रेताड, मध्यम, भारी आणि चिकण जमिनीतही येते. परंतु जमिनीच्या प्रकाराप्रमाणे उत्पादनात फरक पडतो. हलक्या रेताड जमिनीस खत दिले नाही तर उत्पन्न फारच थोडे होते. मध्यम जमिनीत चांगले येते आणि भारी जमिनीत, पुरेशी ओल असल्यास, फारच चांगले उत्पन्न निघते. जमीन आणि तीतील ओल यांवर कापसाचा दर्जा बराच अवलंबून असतो. नाईल नदीच्या सुपीक खोऱ्यात कापसाच्या वाढीस योग्य अशी ओल भरपूर असल्याने तेथे फार पूर्वीपासून लांब धाग्याचा कापूस पिकविला जातो. अमेरिकेमधील लांब धाग्याचा बराचसा कापूस तेथील नदीकाठच्या सुपीक जमिनीत आणि इतर पाणभरत्या जमिनीत पिकवितात. रेताड जमिनीत पुरेशी ओल रहात असल्यास आखूड धाग्याचा कापूस होतो. भारतात देखील सिंधू व गंगेच्या खोऱ्यात पश्चिम भागात व मध्य भागातील मळीच्या जमिनीत आणि भारतीय द्वीपकल्पाच्या काळ्या जमिनीच्या प्रदेशात कपाशीची लागवड केंद्रित झाली आहे. पण आसामच्या टेकड्यांच्या पूर्वेकडील उतारावर आणि देशाच्या मध्य दक्षिण भागांत जांभ्या, जाड्याभरड्या, रेताड आणि रेवट तांबड्या जमिनीतही काही प्रमाणात कापूस होतो. ठोकळ मानाने बहुतेक सर्व स्थानिक आणि आशियाई जाती पावसावरील पीक म्हणून करतात आणि अमेरीकन जाती पाणभरत्या करतात. पाणभरते पीक बहुतेक सिंधु-गंगेच्या खोऱ्यातील सपाट जमिनीवर आणि कर्नाटक, तमिळनाडू व महाराष्ट्र या राज्यांतील काही हलक्या जमिनीच्या भागात मर्यादित आहे. साधारणतः सुपीक जमिनीवर कपाशी चांगली वाढते. कापूस पट्ट्यातील जमिनी रेताड ते भारी चिकण असतात आणि त्यांचे pH मूल्य [→ पी एच मूल्य] ५.२ ते ८.०  असते. उत्तम कपाशीच्या जमिनी चिकण माती व रेतीमिश्रित पोयट्याच्या आणि जैव (सेंद्रिय) पदार्थ योग्य प्रमाणात असलेल्या व नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश जरूर तितक्या प्रमाणात पुरविणाऱ्या असतात.

मशागत : कपाशीला हलकी मशागत पुरेशी होते अशी सर्व साधारण समजूत आहे. ५-८ सेंमी. खोलीपर्यंत जमीन नरम (मऊ) व भुसभुशीत केली, तिच्यामधील तणे वेचून वरून फळी हाकली म्हणजे ती कपाशी पेरण्यायोग्य होते. फार मशागत केल्याने कपाशीला विशेष काही फायदा होतो असे दिसून न आल्यामुळे आधीचे पीक काढल्यावर ती जमीन धसकटे वगैरे न काढता बरेच दिवस तशीच ठेवतात. बिकानेरच्या पूर्व भागात व उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात गहू मार्च – एप्रिलमध्ये काढतात व पाणभरते कपाशीचे पीक एप्रिल – मेमध्ये पेरतात. तेव्हा पूर्व मशागतीला फारच कमी वेळ मिळतो म्हणून जमिनीला भरपूर पाणी देऊन वाफसा आल्यावर हलक्या नांगराने ती एक दोन वेळा नांगरतात, तिला पुन्हा र्भिजवून आणखी एकदा नांगरून पेरणी करतात.

उत्तर प्रदेशाच्या इतर भागात गव्हाचे पीक लवकर काढतात. त्यामुळे जमिनीची मशागत चांगली करता येते. जुलैमध्ये पेरावयाच्या कोरडवाहू पिकाच्या जमिनीला एक नांगरणी जास्त देता येते. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत कुंदा, हरळीसारखी तणे काढण्यांसाठी चारपाच वर्षांतून ऑक्टोबर ते मे या काळांत जमीन एकदाच नांगरतात. ज्वारी-बाजरी नंतर कापूस घ्यावयाचा असल्यास मळणीची कामे संपल्यावर दोनतीन वेळा वखराने धसकटे काढून जमीन तयार करतात. खरीप किंवा रबी पिके काढल्यावर काळ्या जमिनीतील ओल हळूहळू कमी होऊन ती कडक बनून खोल भेगा पडतात. उन्हाळ्यांत भेगांच्या बाजूंची माती ढासळते. त्यामुळे पृष्ठभागावरील जमीन ढिली होते म्हणून नांगरण्याची जरूरी नसते. भूईमूग नांगरून अगर खोल वखरून काढतात म्हणून जमिनीतील तण निघून ती भुसभुशीत होते उन्हाळ्यात वखरणीस सोपी जाते. दोनतीन वखरण्यांत जमीन कपाशीसाठी तयार करण्यांत येते. काळ्या जमिनीच्या प्रदेशांत कोरडवाहू कपाशीसाठी सामान्यतः वखराच्या दोनतीन पाळ्यांनी ५-८ सेमीं खोल जमीन भुसभुशीत कस्न बी पेरण्यालायक बनवितात. कर्नाटकमध्ये कोरडवाहू अमेरिकन कापसाकरिता पावसाचे पाणी अडून जमिनीत जिरेल अशी मशागत करतात. तमिळनाडूमध्ये सप्टेंबर – ऑक्टोबरात जिरायत कापूस पेरण्या करिता जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्याबरोबर तीन चार नांगरण्या जमिनीला देतात.

आसाममधील डोंगराळ भागात जानेवारी ते मार्च या कोरड्या हंगामात उतारावरील जमिनी भाजून, कुडवण्यांनी उकरून कपाशी  पेरण्यालायक करतात.

वरीलप्रमाणे कपाशीला हलकी पूर्व मशागत दिली जाते. परंतु कधी-कधी कुंदा, हरळी यांसारखी खोल मुळांची बहुवर्षायू तणे काढण्याकरिता किंवा पुष्कळ वर्षे औते सतत वापरल्यामुळे ठराविक खोलीवर जमिनीत बनलेली कडक तळी फोडण्याकरिता कपाशीच्या जमिनी खोल नांगरतात. भारतात आणि इतरत्र मशागतीसंबंधी केलेल्या संशोधनावरून असे आढळून आले की, मामुली पद्धतीच्या मशागतीने काढलेल्या कपाशीच्या उत्पन्नाइतकेच खोल मशागतीच्या पिकापासून मिळणारे उत्पन्न असते. खोल नांगरटीमुळे कोरड्या उष्ण प्रदेशात जमिनीत ओल उडून जाऊन तिच्यातील जैव पदार्थांचाही नाश होतो. जरूरीपेक्षा जास्त मशागत केल्याने पिकावर परिणाम होतो म्हणून खोल मशागतीची आवश्यकता नसते.

पेरणी : हवामान, जमीन आणि कपाशीची जात यांच्यामधील भिन्नत्वामुळे, तसेच ते पीक कोरडवाहू आहे किंवा बागायती आहे त्याप्रमाणे भारतातील निरनिराळ्या भागांत पेरणीच्या वेळांत बराच फरक आढळतो. सर्वत्र उपयुक्त अशी एक ठराविक वेळ नसते. बी पेरण्याच्या वेळी जमिनीत प्रमाणशीर ओल आणि किमान १६० से. तपमान असणे जरूर असते. योग्य प्रमाणापेक्षा जास्त ओल असल्यास बियांची उगवण व नंतरची रोपांची वाढ समाधानकारक होत नाही. नेहमीच्या सर्वसाधारण पेरणीच्या वेळेपेक्षा जरा आधी पेरणी केल्यास पुष्कळदा उत्पन्न वाढते तर उशीरा केल्यास उत्पन्न घटते.

पंजाब, बिकानेर व उत्तर प्रदेश या भागांत बी फोकून पेरतात. तेलंगण व तमिळनाडूमधीलही काही शेतकरी बी फोकून पेरतात. तमिळनाडूमध्ये काही प्रमाणात कंबोडिया कापूस सऱ्या पाडून वरंब्यावर बी हाताने टोकून लावतात. मध्य, दक्षिण व द्वीकल्पीय भारतातील काळ्या व तांबड्या जमिनीत बी औताने ओळीत पेरतात. बी तीन ते चार सेंमी. पेक्षा खोल पेरल्यास चांगले उगवत नाही पीक एकसारखे येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बियांची उगवण जलद होणे जरूर असते.

जमीन कपाशीची जात, खत व पीक जिरायती किंवा बागायती यांवर ओळीतील दोन झाडांमधील अंतर अवलंबून असते. तसेच ठराविक क्षेत्रात पेरावयाच्या बियांचे प्रमाण हे झाडांमधील अंतर, बियांचा आकार, वजन, अंकुरणशक्ती वगैरेंवर अवलंबून असते. पंजाबात बागायती पीक दोन ओळींत ७५ ते ९० सेमीं अंतर ठेवून पेरतात. हेक्टरमध्ये ११ ते १३ किग्रॅ. बी पेरतात. राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत सरळ वाढणाऱ्या जातींचे बी ओळींत ३० ते ४५ सेंमी. अंतर ठेवून हेक्टरी १८ ते २२ किग्रॅ. पेरतात. गुजरातच्या सुरत भागात १५० सेंमी., भडोच भागात १२० सेंमी अंतर ठेवून हेक्टरी ११ ते २२ किग्रॅ. बी पेरतात.

तमिळनाडू व आंध्र या भागांत ओळीत ७५ सेमीं., कर्नाटकमध्ये हलक्या जमिनीत ४५ सेंमी., व भारी जमिनीत ७५ सेंमी., अंतर ठेवून हेक्टरी १३-१८ किग्रॅ. बी पेरतात. देशातील बऱ्याच मोठ्या भागात सरळ वाढणाऱ्या देशी कापसाचे पीक ओळींत ३०-४५ सेमीं अंतर ठेवून हेक्टरी १३-१८ किग्रॅ. बी पेरण्याची पद्धत सर्वोत्तम दिसते. फांद्या फुटणाऱ्या देशी व जोरदार वाढणाऱ्या अमेरिकन जाती आणि बागायत पिकात ओळींमध्ये ९० सेंमी किंवा जास्त अंतर ठेवणे किफायतशीर असते. वरंब्यावर चारपाच बिया एकेका जागी हाताने टोकतात व उगवणीनंतर काही दिवसांनी तेथील दोन जोमदार रोपे ठेवून बाकीची काढून टाकतात. कपाशीचे बीप पुष्कळ वर्षे अंकूरणक्षम रहाते, परंतु नेहमीच्या साठवणीच्या पद्धतीत ती शक्ती हळूहळू कमी होत जाते म्हणून एक वर्षापेक्षा जास्त दिवस साठविलेले बी सहसा पेरीत नाहीत.

आंतरमशागत : तणांचा कपाशीवर फार वाईट परिणाम होतो म्हणून आंतर मशागतीची फार जरूरी असते.   दक्षिण गुजरातमध्ये ओळींत जास्त अंतर ठेवण्यात येत असल्याने कुळवून नंतर नांगरून तण नाहीसे करतात व जमीन भेगाळत नसल्याने ओल टिकून राहते. इतर ठिकाणी चारपाच वेळा कोळपणी करतात.

खत : त्याच त्या जमिनीत दरसाल कपाशी घेतल्याने जमिनीचा कस कमी होत जातो म्हणून पिकाला खत देणे जरूर असते. भारतात कपाशीचे पीक एक हेक्टर जमिनीमधून सामान्यतः २५ किग्रॅ. नायट्रोजन, २० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि ८८ किग्रॅ. पोटॅश घेते. बागायती पिकांच्या बाबतीत हे प्रमाण दुप्पट किंवा तिप्पट असते. त्याचा पुरवठा शेणखत, किंवा कंपोस्ट घालून, शेळ्यामेंढ्या शेतात बसवून अगर रासायनिक खते देऊन करतात. सर्वसाधारणतः जिरायत लवकर तयार होणाऱ्या देशी कपाशीला फक्त एखाद्या वेळेस प्रत्यक्ष शेणखत किंवा कंपोस्ट देतात. परंतु कपाशी आधीच्या ज्वारी, मका, चारा, ऊस वगैरे बागायती पिकांना खत देतात. त्यांनी वापरून उरलेला खताचा अवशेष फेरपालटीतील कपाशीच्या पिकाला उपयोगी पडतो. रासायनिक खत प्रत्यक्ष हेक्टरी ४५ ते ९० किग्रॅ. नायट्रोजन, बागायत पिकास फुले येण्याच्या अगोदर सर्वच्या सर्व किंवा अर्धे पीक विरळ करण्याच्या वेळी व उरलेले अर्धे फुले येण्याच्या अगोदर अमोनियम सल्फेटाच्या रूपाने देतात. ते तिप्पट-चौपट कोरड्या बारीक मातीत मिसळून पिकात पिस्कारतात आणि लगेच पिकाला पाणी देतात. पुष्कळदा ते शेणखत, कंपोस्ट किंवा पेंडीबरोबरही मिसळून देतात.

पाणी : पाण्याच्या बाबतीत कापूस फार संवेदनशील आहे. पाणी जास्त झाले किंवा कमी पडले, तर त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पिकाच्या वाढीच्या निरनिराळ्या अवस्थांत जमिनीत योग्य प्रकारची ओल रहाण्यावर उत्पादन वाढ अवलंबून असते. ज्या ठिकाणी पाऊस कमी असून पाणी देण्याची योस नसते तेथे दुर्जल शेतीच्या तत्त्वावर पीक घेतात.

पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांत शक्य तेथे पावसाच्या पाण्याला पूरक म्हणून विहीरीचे, तळ्याचे, ओढ्याचे अगर पाटाचे पाणी वापरतात. ज्या ठिकाणी पाऊस फार पडतो त्या ठिकाणी पिकातून पाणी काढून द्यावे लागते. एक दिवस जरी पाणी पिकात राहिले, तरी लहान रोपे मरतात व मोठ्या झाडांना नुकसान पोहोचते. योग्य तऱ्हेने पाणी दिल्यास पिकाची पालेवाढ चांगली होऊन कैऱ्या (हिरवी बोंडे) जास्त लागतात, गळत नाहीत. व त्यामुळे उत्पादन जास्त येते. सुपीक जमिनीस खत व पाणी देणे जास्त फायदेशीर होते  मात्र पेरणी लवकर केली पाहिजे व झाडांत अंतर जास्त ठेवले पाहिजे.

उत्तर भारतात व महाराष्ट्रात उसाच्या प्रदेशात बागायती पीक एप्रील-मेमध्ये जमीन चांगली भिजवून वाफश्यावर पेरतात. उगवण चांगली झाली नसल्यास पेरणीनंतर आठ-दहा दिवसांनी ती चांगली होण्यासाठी बेताचे पाणी देतात. एरव्ही साधरणतः पाच-सहा आठवड्यांनी पाणी देतात. पिकाला फुले येईपर्यंत पाणी देणे शक्य तेवढे टाळतात. मात्र झाडे कोमेजू देत नाहीत. फुलांच्या वेळी पाणी कमी पडल्यास पात्या गळून पडतात व कैऱ्या पोसत नाही. उत्पादन व त्याची प्रत कमी होते. कैर्र्‍या तयार होऊन फुटावयास लागल्या म्हणजे पाणी देणे बंद करतात. पाणी देत राहिल्यास पालवी फुटून पीक लवकर तयार होत नाही, कीड वाढते. पिकाला एकंदर पाच ते सही वेळा पाणी द्यावे लागते.

वेचणी : कपाशीला बी पेरल्या पासून दोन-अडीच महिन्यांनी फुलांची सुरुवात होऊन ती पुढे आठ-दहा आठवडे येत राहतात. बोंडे तीन-चार महिनेपर्यंत पक्व होत असतात. त्यामुळे पिकातील सर्व कापूस एका वेचणीत वेचता येत नाही तीन-चार वेचण्या कराव्या लागतात. वेचणी हातानेच करतात. अमेरिकेत काही ठिकाणी वेचणी विशिष्ट यंत्राने करतात पण त्यात वाळलेली पाने व नकट्या मिसळतात. कापूस मातीवर टाकल्याने त्याला माती व कचरा चिकटतो. कापसाच्या वेचणीची वेळ व अवधी ही पीक पेरणीची वेळ, जातीप्रमाणे बोंडे पक्व  होण्यास लागणारे कालमान, पाऊसकाळ, जिरायत की बागायत लागवड व लागवडीचा प्रदेश यांच्यावर अवलंबून असतात. पंजाब शेजारील उत्तर प्रदेशाचा भाग आणि राजस्थानमध्ये जिरायत पिकाची वेचणी ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत आणि बागायती अमेरिकन कापसाची ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत चालते. पाऊस अपेक्षेप्रमाणे लवकर थांबला तर वेचणी सप्टेंबरात सुरू होऊन नोव्हेबरात संपते. मध्य प्रदेश, वऱ्हाड, खानदेश व मराठवाडा भागांत जिरायत पिकाची वेचणी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊन डिसेंबर अखेरपर्यंत चालते. अंशतः पाणी दिलेल्या, एप्रिल मेमध्ये पेरलेल्या अमेरिकन जातींची वेचणी सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत चालते. गुजरांत व सौराष्ट्रांत वेचणी जानेवारीत सुरू होऊन मार्च – एप्रिलपर्यंत चालते.

आंध्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत कापूस वेचणीच्या वेळा निरनिराळ्या आहेत. कोकोनाडा कापसाची वेचणी जानेवारी–फेब्रुवारीपर्यंत, हर्बेशियमची जानेवारी–मार्चपर्यंत, कंबोडियाची फेब्रुवारीपासून जूनपर्यंत चालते जूनपर्यंत चालण्याचे कारण असे की, उन्हाळी पावसानंतर आलेल्या फुलांची बोंडे मे-जूनमध्ये तयार होतात. पाणभरत्या अमेरिकन जाती फेब्रुवारी – मार्चमध्ये पेरतात, त्यांची वेचणी जूनपासून-सप्टेंबरपर्यंत चालते. कर्नाटक राज्यात मेमधील लवकर येणाऱ्या पावसावर अमेरिकन कापूस आणि आंध्र राज्यात मुंगारी कापूस जूनमध्ये पेरतात, त्यांची वेचणी ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत चालते. तंजावरच्या दुआबात भातानंतर अगाप बागायती अमेरिकन जात डिसेंबर-जानेवारीत पेरतात. त्या कपाशीची वेचणी मार्चपासनू मेपर्यंत चालते. दक्षिण भारतात थंडीचा कडाका कधी पडत नाही, म्हणूनच जमिनीत पुरेशी ओल असल्यास जवळजवळ वर्षभर केव्हाही कापसाचे पीक लावता येते. एकीकडे कापसाची वेचणी तर त्याच वेळी दुसरीकडे पेरणी हे दृश्य ह्या एकाच प्रदेशांत पहावयास मिळते. तीन वर्षेपर्यंत वाढत राहणाऱ्या ‘नादम’ कापसाची वेचणी सर्व वर्षभर चालूच असते.

पिकांची फेरपालट : महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांच्या बऱ्याचशा भागांत कापूस, ज्वारी अगर गहू या द्विवार्षिक फेरपालटीऐवजी तृणधान्ये – भुईमुग-कापूस अशी त्रिवार्षिक फेरपालटीची  पद्धत आहे. भारतातील पुष्कळ भागांत जिरायत कापसात खरीप ज्वारी, तूर, अंबाडी, कुळीथ, तीळ, भात, धने, भेंडी व इतर भाजीची पिके मिश्रपीक म्हणून घेतात.

उत्पन्न :– भारतातील बागायती पिकापासून सु. २१५ किग्रॅ. आणि कोरडवाहू पिकापासून १२५ किग्रॅ. रुई दर हेक्टरमधून मिळते. इतर देशांशी तुलना करता भारतातील उत्पादन फारच कमी आहे. (कोष्टक क्र. ५).

भारतातील कमी उत्पादनाची कारणे अनियमित पर्जन्य, अपुरा खतपुरवठा, निम्म्यापेक्षाही जास्त क्षेत्रात सुधारलेल्या बियांचा वापर, किडींवर व रोगांवर वेळीच उपाय न करणे वगैरे आहे. हे सर्व उपाय करून जिरायत पिकापासून हेक्टरी १२५ किग्रॅ. च्यावर व खतपाणी देऊन ४४८ किग्रॅ.च्यावर उत्पन्न काढण्यात आलेले आहे.

कापूस धागा : कपाशी मुख्यतः धाग्याकरिताच लावतात. कापसाच्या बियांच्या (सरकीच्या) बाह्य त्वचेवर एकेरी कोशिकेचे (पेशीचे) वाढलेले केस म्हणजेच धागा किंवा तंतू किंवा तार. फुले उमलण्याच्या वेळेपासून बीजांडावर त्यांची वाढ सुरू होऊन  २०–२५ दिवसांत ती पूर्ण लांबीपर्यंत पाहोचते.

कोष्टक क्र. ५. निरनिराळ्या देशांतील रुईचे हेक्टरी उत्पादन.

त्यानंतर आणखी २०–२५ दिवसांत त्यांची जाडी वाढते. बोंड पक्व होऊन फुटण्यापुर्वी धागा नळकांड्यासारखा गोल व पोकळ असतो, बोंड फुटल्यावर तो चपट्या पिळ बसलेल्या पट्टीसारखा होतो. एक सेमीं लांबीत ८० ते १६० पर्यंत पीळ असतात. या पिळांमुळे धागे कातताना एकमेकांना चिकटून पिळवटून सुत तयार होते. १ ग्रॅम वजनात साधारणतः सव्वा दोन लाखांच्यावर धागे असू शकतात. धाग्याची लांबी ही कापसाच्या मूलभूत महत्वाच्या गुणधर्मांपैकी एक असून धाग्याची शक्ती व त्याची सुक्ष्मता यांच्याशी ती निगडीत असते. कातलेल्या सुताचा बारीकपणा आणि पर्यायाने कापडाचा तलमपणा मूळ धाग्याच्या लांबीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतो. कापसाचे धागे साधारणतः १० मिमी. पासून ते ७५ मिमी. पर्यंत लांबीचे असतात. पेरू , सूदान व ईजिप्त या देशांतील कापसाचा धागा सरासरीने सर्वांत लांब म्हणजे २७ ते ३५ मिमी असतो. भारतातील कापसाच्या धाग्याच्या लांबीची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.

लांब धागा  :               (१) श्रेष्ठ लांब धागा -२७ मिमी. च्या वर;  (२) लांब धागा      – २४⋅५ ते २६ मिमी.

मध्यम धागा :             (१) श्रेष्ठ मध्यम धागा  – २२ ते २४ मिमी.; (२) मध्यम धागा   – २० ते २१⋅५ मिमी

आखूड धागा :          १९ मिमी. च्या खाली.

 

कोष्टक क्र. ६. भारतातील कापसाच्या धाग्याच्या वर्गवारीप्रमाण  क्षेत्र व उत्पादन (१९६८-६९).

जगातील एकूण कापसापैकी १ टक्का ३८ मिमी व त्याहून लांब, ९ टक्के ३० ते ३८ मिमी., ७० ते ७५ टक्के २२ ते ३० मिमी. आणि १२ ते १५ टक्के १० ते २२ मिमी. लांब धाग्याचा कापूस असतो. लांब धाग्याच्या कापसात रुईचा उतारा (प्रमाण) कमी व आखूड धाग्यात सर्वांत जास्त असतो.

सध्या भारतातील कापड गिरण्यांना लांब धाग्याच्या कापसाची उणीव भासते. प्रतिवर्षी ५० कोटी रु. किंमतीच्या २५ मिमी. अथवा त्याहूनही जास्त लांब धाग्याच्या सहा लाख गाठी परदेशातूनच आयात केल्या जातात. पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांच्या काळात भारतास कापड व्यवसायासाठी कोष्टक क्र. ७ मध्ये दर्शविल्याप्रमाणे कच्चा कापूस लागला.

धाग्याची लांबी ही कापसाच्या जातीप्रमाणे, उगवण्याच्या परिस्थितीप्रमाणे व उत्पादन क्षेत्राप्रमाणे बदलत असते. एकाच प्रकारच्या कापसात सुद्धा धाग्याच्या लांबीत फरक पडू शकतो.  धाग्यांच्या लांबीतील फरकामुळे कताईक्रियेमध्ये व्यत्यय येऊ शकतो, इतकेच नव्हे तर सुताची प्रतसुद्धा बदलू शकते. अशा प्रकारे धाग्याच्या लांबीचे महत्त्व पुढील दोन कारणांमुळे आहे : (१) कापूस प्रक्रियेतील यंत्रांची रचना व अभिकल्प (आराखडा) धाग्याच्या लांबीवरच अवलंबून असते. (२) कताई केलेल्या सुतात किती धागे एकमेंकावर बसतात हे धाग्याच्या लांबीवरच अवलंबून असते. जितके जास्त धागे एकमेंकावर बसतील तितक्या सुलभपणे ते पीळ देऊन कातता येतात. यामुळे जर धाग्यांची लांबी जास्त असेल, तर त्यांना कमी पीळ द्यावा लागून बारीक सूत काढता येते व त्याची चकाकीही अधिक राहते.

एकजीव धागा-लांबीचे महत्त्व फार पूर्वीपासून ओळखण्यात आलेले आहे.  किंबहुना कापसाची प्रत ठरविताना धागा-लांबी थोड्याफार प्रमाणात बदलत असते. आखूड धाग्यांमुळे टाकाऊ कापसाचे प्रमाण वाढते व त्यामुळे कापसावरील पुढील प्रक्रियांमध्ये त्रास होतो. हे आखूड धागे जर पूर्णपणे काढले गेले नाहीत, तर त्यांच्यामुळे असमान सूत तयार होऊन गुंडाळणीत व विणकामात ते वारंवार तुटते.

धाग्याच्या लांबीवर व मजबुतीवर सुताचा तलमपणा व मजबुती अवलंबून असते. मेट्रिक पद्धतीत १०० मी. सुताची एक लडी आणि लड्यांची (१,००० ममी,) एक गुंडी या  हिशेबाने ५०० ग्रॅम वजनातील गुंड्यांच्या संख्येला ‘कर्तनमूल्य’ म्हणतात. ब्रिटिश पद्धतीत १२० वार सुताची एक लडी व ७ लड्यांच्या ८४० वारांची (७६८ मी.) एक गुंडी धरतात आणि एक पौंड (४५४ ग्रॅम) वजनातील गुंड्यांच्या संख्येवरून कर्तनमूल्य काढतात.  ब्रिटिश पद्धतीतील कर्तनमूल्याला ०⋅८४७ या संख्येने गुणले असता सुताचे मेट्रिक पद्धतीतील कर्तनमूल्य काढता येते.

कापासाची प्रत :कापूस अनेक कामांसाठी वापरला जातो व प्रत्येक कामासाठी विशिष्ट प्रतीचा कापूस निवडावा लागतो.  ‘कापसाची प्रत’ या संज्ञेत धाग्याचे कताईला उपयोगी पडणारे निरनिराळे गुणधर्म समाविष्ट असतात. स्वच्छ चांगल्या तऱ्हेने फुललेली व समरूप् दिसणारी, समाधानकारक धागा-लांबी, शक्ती व सूक्ष्मता असलेली रूई म्हणजे चांगल्या प्रतीचा कापूस असा सर्वसाधारण समज आहे. कापसापासून स्वच्छ, शक्तीमान, व समरूप धागा मिळविणे हे अंतिम उद्दिष्ट असते आणि धाग्याची प्रत त्वरित कळत नल्यामुळे कच्चा कापूस निवडण्याच्या क्रियेला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

कापसाची विक्री किंवा खरेदी प्रतकर्त्याच्या अंदाजावर अवलंबून असते. तो कापसाची प्रत व धागा-लांबी ह्यांविषयी स्वतःचे मन बनवितो. कापसाची प्रत ठरविण्यासाठी पुढील मुद्यांचा विचार करण्यात येतो : (1) कापसातील बाह्य पदार्थांचे (उदा., वाळलेली बोंडे, पाने, माती) प्रमाण, (2) रंग व बहर आणि (3) सरकी काढण्याची सुलभता. यांखेरीज चकाकी, ताणबल, पक्वता इ. गुणधर्मही विचारात घेण्यात येतात.

कापसाच्या 1 ते 9 अशा प्रती करण्यात येतात. टाकाऊ कापसाचे प्रमाण प्रतीनुसार वाढत जाते. जास्त घाण असेल तर टाकाऊ कापसाचे. प्रमाण जास्त असते व अशा कापसाचे धागे खलच्या प्रतीचे असतात.अमेरिकन अपलॅंड कापसाच्या बाबतीत प्रती व टाकाऊ कापसाचे सरासरी प्रमाण (%) खालीलप्रमाणे असते.

चांगल्या प्रतीचा कापूस फिकट किंवा अधिक दुधी रंगाचा असतो. कमी प्रतीचा कापूस निळसर किंवा पारव्या रंगाचा असतो. हा कापूस विरंजनक्रियेत (रंग काढून टाकण्याच्या क्रियेत) पांढराशुभ्र होत नाही. त्यावर फिकट रंजनक्रियाही समाधानकारकपणे होत नाही. रेचाई (सरकी काढण्याची क्रिया) योग्य प्रकारे झालेली नसेल तर रूई मळकट दिसते व धागे तुटलेले असतात.

प्रतकर्ता वरील सर्व मुद्यांचा विचार करतो. अनेक वर्षाच्या अनुभवाने नुसत्या डोळ्यांनी पाहून व हातांनी धाग्याच्या लांबीचा अंदाज घेऊन तो कापसाची प्रत ठरवितो. धाग्याची लांबी मोजण्याची पद्धत प्रतकर्त्यानुसार भिन्न असू शकते व केवळ अनुभवानेच त्यांचे ठोकताळे ठरलेले असतात. वरील पद्धतीत जरी थोडा फार तोटा असला, तरी ही पद्धत अतिशय जलद असल्यामुळे कापूस व्यापारात तिचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. याशिवाय धाग्याची लांबी मोजण्यासाठी विविध यंत्रांचाही उपयोग करण्यात येतो.

कापसासंबंधी संशोधन व कापूस समिती : कापसाचे उत्पादन भारतात सर्वत्र जास्त होत असल्यामुळे आणि त्यासाठी निरनिराळ्या पद्धती उपयोगात आणल्या जात असल्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरूवातीस मध्यवर्ती संस्थेची जरूरी भासू लागली. त्याच सुमारास इंग्लंडमधील गिरण्यांना अमेरिकेतील कापसावर अवलंबून रहावे लागत असे. ते परावलंबित्व कमी करावे व भारतात लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन करावे व कापसाचे सर्वसाधारण उत्पादनही वाढवावे, अशी इंग्रज राज्यकर्त्यांना जाणीव होऊ लागली. त्यासाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापून तिच्यामार्फत कापूस उद्योगाची चौकशी करावी व नंतर उत्पादन वाढीसाठी उपाय ठरवावेत असे सरकारने ठरवले. त्यातूनच 8 ऑक्टोबर 1917 रोजी इंडियन कॉटन कमिटीची (भारतीय कापूस समितीची) स्थापना झाली. या समितीवर एन्‌. एन्‌. वाडिया हे एकटेच भारतीय सभासद होते. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे निरनिराळ्या प्रांतांतील कापूस उत्पादनाची माहिती गोळा करणे व लांब धाग्याच्या कापसाच्या उत्पादनासाठी सरकारला शिफारशी करणे असे होते. त्याप्रमाणे समितीने कापूस उत्पादन करणाऱ्या पंजाब , सिंध, मध्य भारत, मुंबई, मद्रास, गुजरात, हैदराबाद  इ. महत्त्वाच्या प्रांतांतून दौरा काढून कापूस उत्पादनाची चौकशी केली.

                                           कोष्टक क्र. ८. भारतातील कापसाचे काही प्रमाणित प्रकार.

समितीच्या अहवालावरून असे  दिसून आले की,  इंग्लंडमधील गिरण्यांना  उपयोगी पडेल असा कापूस फक्त मद्रास व पंजाब या प्रांतांतच  होतो व सिंधमध्ये लागवड केल्यास तोही उपयोगी पडू शकेल. समितीची  उद्दिष्टे जरी मर्यादित होती तरी तिने अनेक मुद्यांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. उदा., शेतकर्‍याला कापसाची योग्य किंमत मिळवून देणे,  लांब धाग्याच्या कापसाबरोबरची भेसळ थांबवणे, कापूस उद्योगाचा सांगोपांग विचार इत्यादी.

भारतीय कापूस समितीचा अहवाल दोन भागांत प्रसिद्ध झाला. पहिल्या भागात कृषी व जलसिंचन यासंबंधी माहिती असून दुसर्‍या भागात कापसाच्या व्यापारी महत्त्वाविषयी उल्लेख आहे. ह्या अहवालातील एक महत्त्वाची शिफारस म्हणजे सेंट्रल कॉटन कमिटीची (मध्यवर्ती कापूस समितीची) स्थापना करण्याविषयी होय.

या मध्यवर्तीची समितीची स्थापना 1921 झाली. तिचे स्वरूप सल्लागार मंडळासारखे होते. 1923 मध्ये ही समिती प्रशासकीय संस्था झाली. (1) कृषी क्षेत्रातील संशोधन वाढवणे व (2) तांत्रिक क्षेत्रांत संशोधन करून कापसाची प्रत व उपयोग वाढविणे ही या संस्थेची महत्वाची उदि्‌दष्टे ठरली.

कापूस कायद्यामध्ये निरनिराळ्या पद्धतींनी उत्पादन करणे व कापूस विक्री करणे ही  कामेही ह्या समितीकडे सोपविण्यात आली.

भारतीय कृषी संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष ह्या समितीचे कायमचे अध्यक्ष असतात. समितीचा खर्च कापसावरील कर आणि सरकारकडुन मिळालेले अनुदान यांतून चालविला जातो. मुंबई येथे 1924 मध्ये कॉटन टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरीची स्थापना झाली. देशातील सर्व ह्या संस्थेच्या संशोध्नाचा फायदा घेत आहेत. कापसाच्या धाग्याची प्रत व सुधारणा यांसंबंधी येथे संशोधन चालते.

भारतातील कापसासंबंधी झालेल्या संशोधनानुसार ठरविण्यात आलेल्रूा कापसाच्या विविध प्रमाणित प्रकारांची माहिती कोष्टक क्र. 8 मध्ये दिली आहे.

हायब्रीड (एच)-4 या जातीची मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत यशस्वीपणे लागवड होऊ लागली आहे.

सरकी : कपाशीच्या बियांना सरक म्हणतात. दुभत्या जनावरांचे खाद्य व तेलबिया म्हणून सरकी उपयुक्त आहे. सरकीचे जागतिक उत्पादन सु. दोन कोटी टन असून भारतातील 16 लक्ष टन आहे. सरकी उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक आहे[ →सरकी].

रोग : मर, कोनाकार टिक्का, मूळकूज, कवडी, दहिया (भुरी), पर्णगुच्छ द. रोग कपाशीवर प्रामुख्याने आढळतात.

(१) मर : हा रोग युजेरियम ऑक्सिस्पोरम प्रमेद व्हास इन्फेक्टम या कवकामुळे (बुरशीसारख्या हतिरद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतरमुळे) होतो. याचा प्रादुर्भाव अमेरिका, ईजिप्त, रशिया, व भारतामध्ये आढळतो. भारतात हा रोग मध्य व दक्षिण गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, व तामिळनाडू या राज्यांत आडळून येतो.

रोग प्रामुख्याने मध्यम काळ्या जमिनीवरील पिकास होतो. रोगामुळे लहान झाडांची पाने सुकू लागतात. बऱ्याच वेळा खालच्या फांद्या सुकतात तर काही वेळा सर्व झाडच सुकून मरते. रोगट झाडाच्या खोडाचा उभा छेद घेतल्यास वाहकवृंद (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणाऱ्या पेशीसमूहांचे जुडगे) तांबूस काळसर झालेले आढळतात. त्यात कवकाची वाढ आढळते. कवक-वाढीतून विषनिर्मिती होऊन झाउ मरते. कवक कैक जमिनीत जिवंत रहात असल्यामुळे मरप्रतिकारक जाती लावणे हाच रोग निवारण्याचा प्रभावी उपाय ठरतो. प्रतिकारक जाती निवडण्याचे काम खर्चाचे असते. अशा प्रतिकारक जाती शोधून काढयाचे काम करणारे एक केंद्र पुणे येथे आहे.

प्रतिकारक जाती शोधून काढण्याचे कार्य पुढीलप्रमाणे असते.

रोगकारक कवकाची प्रयोगशाळेत कृत्रिम रीतीने विस्तृत प्रमाणात वाढ करून ते निर्जंतुक मातीत मिसळतात. त्यामुळे ती माती रोग सवंमित बनते. ती लहान कुंड्यांत भरून त्यांच्यात कापूस संशोधन केंद्राकडून आणलेल्या निरनिराळ्या कपाशीच्या जातींचे बी पेरतात. या कुंड्या कवकास व झाडांच्या वाढीस पोषक हवामान, 220-270 से. सारखे तपमान मिळण्याकरिता काचगृहात ठेवतात व 45 दिवसपर्यंत कुंड्यांतील झाडांचे निरीक्षण दररोज केले जाते. रोगग्रही जाती सवंमित मातीत व काचगृहातील पोषक तपमानात मरून जातात, प्रतिकारक जाती मात्र मरत नाहीत. अशा प्रमिकारक जातीच्या झाडांची लागण 45 दिवसांनंतर कवकयुक्त मातीच्या शेतात करतात. ती झाडे त्यांना बोंडे येईपर्यंत जोपासली जातात. त्या बोंडातील कापूस वेचल्यानंतर त्या झाडांच्या मुळांची तपासणी करून त्यातील वाहकवृंद काळा झाला नसलेल्या झाडांच्या बियांली फेररचना काचगृहात करतात व या दोन्ही चाचण्यांत प्रतिकारक्षम आढळलेल्या जातींचे बी शेतकऱ्यांना लागवडीसाठी देतात.

पुणे येथील केंद्राद्‌वारे अनक वर्षे संशोधन करून लागवडीस दिलेल्या कपाशीच्या प्रचलित जाती खरोखर मर रोगप्रमिकारक ठरल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटकव गुजरात राज्यांत या रोगाद्वारे होणारे 40-60 टक्के नुकसान टळले आहे.

दिग्विजय, विजल्या (गुजरात), विरनार, वाय-1 (खानदेश), जयधर (कर्नाटक), गावरानी 1422, 1446, 1494 (मराठवाडा) या भारतातील मर रोगप्रतिकारक जाती आहेत. भारतातील मर रोगकारक कवक अमेरिकन (हिरसुटम) जातींना उपद्रवकारक नसतो.

(२) कोनाकर टिक्का : हा रोग झॅंथोमोनस माल्व्हेसिऍरम या सूक्ष्मजंतूमुळे होतो व तो विशेषतः अमेरिकन (हिरसुटम) व ईजिप्शियन (वार्बाडेन्स) जातींवर मोठ्या प्रमाणावर पडतो. भारतीय कपाशीवर (हर्वेशियम च अर्बोरियम) तो थोड्या प्रमाणात आढळतो. रोगामुळे पानावर कोनावर ठिपके खोड, देठ व पर्णशिरा काळ्या पडतात म्हणून त्याला ब्लॅक आर्म’ म्हणतात. यावरही रोगप्रतिकारक जाती लावणे इष्ट ठरते.  [→सूक्ष्मजंतूजन्य वनस्पतींचे रोग].

(३) मूळकूज : हा रोग मॅक्रोफोमिना फॅसिओलायरायझोक्टोनिया सोलानी या कवकामुळे होत असून तो भारतात विशेषतः पंजाग व उ. गुजरातेत व इतरत्रही आढळतो. रोगामुळे झाड एकाएकी मरते. अशी झाडे मरीने मेलेल्या झाउापेक्षा सहजगत्या उपटता येतात कारण त्यांची मुळे कुजल्याने मुळांची साल तंतूमय झालेली असते. साधारणतः जमिनीची उष्णता 350-390 से. पर्यंत वाढल्यास रोगाची तीव्रता वाढते. तंतूमय सालीखाली कवकाच्या काळसर व वाटोळ्या स्क्ल्रोशिया (कवकतंतूंचे बनलेले सुप्तावस्थेतील गोळे वा थर) दिसतात. रोग भारतीय आणि अमेरिकन कपाशीच्या जातींना होतो.

(४) कवडी : हा रोग कोलेटॉट्रिकम इंडिकम या ककामुळे प्रामुख्याने भारतीय कपाशीवर आढळतो. त्याचा प्रादुर्भाव बीजदलावर, पुष्पच्छदावर (फुले ज्याच्या बगलेत येतात अशा पानावर), बोंडावर व सरकीवर होता. बी उगवल्यानंतर बीजदलावर काळसर तांबूस डाग पडतात. बांडातील कापसाचे तंतू पिवळे होऊन एकमेकांस चिकटतात व पिवळसर कवडीसारखे बनतात म्हणून या रोगाला कवडी म्हणतात. कचक पालापाचोळा, बोंडांची कवचे व बीयांवरही आढळते. आदर्‌र हवेत रोगाची वाढ व फैलाव होतो. रोगट बी हलके व तांबूस असते. त्याची उगवण फार कमी होते. रोग निवारण्यासाठी शेतातील रोगट पालापाचोळा व बोंडांची कवचे गाळा करून जाळू टाकता. पिकाची फेरपालट करतात. पेरणीपूर्वी बियांस एक टक्का पारायुक्त कवक नाशकाची भुकटी (1 किग्रॅ. बियांस 7 ग्रॅम प्रमाणात) चोळतात.

(५) कोरडी कूज : हा रोग मॅक्रोफोमिना फॅसिओलाय या कवकामुळे होतो. याच्यामुळे 10-12 आठवड्याच्या झाडांच्या खोडांवर प्रारंभी तपकिरी व नंतर काळपट डाग पडून साल रेशामय बनते व झाड कोलमडते. रोगट झाडाचे खोड बारीक झालेले दिसते. रोग निवारण्याचे प्रभावी उपाय उपलब्ध नाहीत.

(६) दहिया : हा रोग रॅम्युरेलिया ॲरिओला या कवकामुळे होतो. तो तामिळनाडु , मध्य प्रदेश, व महाराष्ट्र या राज्यात फक्त देशी जातींवरच आढळतो. झाडाच्या खालच्या पानांवर कोनाकार पांढुरके ठिपके मोठ्या प्रमाणावर पडतात. ठिपके इतर पानांवरही वाढतात व सर्व झाड दही सांडल्यासारखे पांढुरके दिसते. म्हणून रोगास दहीया नाव पडले आहे. रोगामुळे पाने पिवळी पडुन गळतात व झाड वठते. नुसते पर्णरहित खोडच पिकात आढळते. रोगाचा प्रादुर्भाव सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होतो. रोग निवारण्यासाठी झाडावर कमीत कमी दोन वेळा गंधक मारतात. हा रोग अमेरिकन जातीच्या कपाशीवर पडत नाही.

(७) पर्णगुच्छ अथवा स्टेनॉसिस :  व्हायरसामुळे होणारा हा रोग पश्चिम भारत व तामिळनाडु राज्यांत भारतीय राज्याच्या कपाशीवरच तुरळक आढळतो. रोगामुळे दोन महिन्यांच्या झाडावर विशेषतः काही फांद्यांना असंख्य लहान फुले फुटून त्यांची झुपके बनलेले आढळतात. कळ्याही पानासारख्याच होऊन फुले व बोडे लहान होतात. रोगाचा फैलाव झाडाचे कलम चांगल्या झाडावर केल्याने होते. रोग निवारण्याचे प्रभावी उपाय उपलब्ध नाही. रोगट झाडे उपटून जाळतात.

इतर दुय्यम रोग : (१) तांबूस करपा : (रेड लीफ). हा रोग झाडाच्या शरीरक्रियेतील बिघाडामुळे होतो. (२) खोडकूज : (पिथियम आणि स्क्लेरोशियम जाती), (३) बोंडातील कूज : (निमॅटोस्पोरा नागपुराय), (४) पर्ण ठिपके : (मायकोस्फिरिला गॉसिपिना, हेल्‌मिंथोस्पोरियम गॉसिपायऑल्टरनेरिया मॅक्रोस्पोरा), (५) पानाचा तांबेरा : (सेरोटेलियम डेस्मीयम), (६) पानावरील काजळी : (कॅप्नोडियम जात), (७) पानावरील करपा : (ॲस्कोफायटा गॉसिपाय) इ. कवकजन्य रोग कपाशीवर पडतात पण त्यांच्यापासून फारसे नुकसान होत नाही.

कीड : (१) बोंड अळ्या : या कीटकांच्या ठिपक्यांची व शेंदरी बोंड आळी अशा दोन जाती आहेत. ठिपक्याच्या बोंड आळीच्या एरियस फेबियाएरियस इन्शूलाना या प्रकारांपैकी पहिल्या प्रकारच्या पतंगाचे पुढील पंख पांढरट असून त्यावर हिरवा पट्‌टा असतो तर दुसऱ्या प्रकारच्या पतंगाचे पुढील पंख संपूर्ण हिरवे असतात. दोन्ही प्रकारच्या पतंगांच्या अळ्या मात्र सारख्याच असतात. पूर्ण वाढलेली अळी सु.18 मिमि. लांब व करड्या रंगाची असुन तिच्या शरीरावर अनेक काळे तपकिरी ठिपके असतात. शेंदरी बोंड अळीचे (प्लॅटिड्रा गॉसिपिएला) पतंग आकाराने लहान व तपकिरी रंगाचे असून पंखाचा विस्तार सु. 1.25 सेमी असतो. पूर्ण वाढलेली अळी शेंदरी रंगाची असुन डोके तपकिरी रंगाचे असते.

ठिपक्याची बोंड अळी पीक फुलावर येण्यापूर्वी झाडांचे शेंडेही पोखरते आणि फुले व बोंडे आल्यानंतर त्यांचेही नुकसान करते. बहुधा अळी लागलेली बोंडे गळुन पडतात. झाडावर राहिलेली बोंडे अकाली उकलतात व त्यांच्यापासुन हलक्या प्रतीचा कापूस मिळतो. शेंदरी अळ्या मात्र बोंडाचेच नुकसान करतात. भोक पाडुन अळी बोंडात शिरल्यावर भोक बंद होते व अशी बोंडे गळुन पडेपर्यंत त्यांना कीड लागल्याचे समजून येत नाही. बोंड अळ्यांच्या माद्या पाने, कळ्या, फुले आणि बोंडे यांवर अंडी घालतात ती सु. 4 ते 7 दिवसांत उबतात. अळी अवस्था दोन-चार आठवड्यांची असते. शेंदरी बोंड अळी सरकीमध्ये बराच काळ सुप्तावस्थेत राहते व कोशावस्था बोंडांतच अथवा क्वचीत प्रसंगी जमिनीत असून ती आठ-बारा दिवस टिकते. एका हंगामात किडीच्या अनेक पिढ्या होतात.

शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कीड लागलेल्या बियांतून होत असल्यामुळे बियांस 62.80 से. पर्यंत उष्णता देतात अथवा कार्बनडाय सल्फाइडाची धुरी देतात. तसेच वेचनीनंतर धसकटे उपटून त्यांचा नाश करतात. भेंडी अगर अंबाडीसारखे पीक उन्हाळ्यात घेत नाहीत. कारण या कीटकाची वाढ त्यावर होते. किडलेले शेंडे, गळून पडलेली बोंडे आणि फुले गोळा करून त्यांचा नाश करतात. 0.02 ते 0.04 टक्के एंड्रीन आणि गंधक(1:1) फवारा, पीक 6-8 आठवड्यांचे झाल्यानंतर 15दिवसांच्या अंतराने 4-6 वेळा मारतात.

(२) तुडतुडे : (एम्पोएस्का डेव्हास्टन्स). पूर्ण वाढलेले तुडतुडे पाचरीच्या आकाराचे, पिवळसर हिरवट रंगाचे असतातच. पुढील पंखावर एक काळा ठिपका असतो. तुडतुडे पानांच्या खालच्या बाजूस राहून त्यातील रस शोषतात. त्यामुळे पानांच्या कडा वाळू लागतात. माद्यांनी पानांच्या शिरात घातलेली अंडी चार ते अकरा दिवसात उबून त्यातून बाहेर पडलेली पिल्ले 7 ते 30 दिवसात पूर्ण वाढतात. या किटकाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के डीडीटी व गंधक सम प्रमाणात मिसळून अथवा एक टक्का एंड्रीन भूकटी मारतात.

(3) फुलकिडे : (ऍनिफोश्रीप्स डॉसेलीस). हे कीटक आकाराने लहान व नाजुक असतात. ते पाने व हिरवी बोंडे यांच्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने व बोंडे वाळतात. बोंडांवर तपकिरी डाग पडतात. माद्यांनी पानात घातलेली अंडी चार-पाच दिवसात उबून निघालेली पिल्ले दोन ते पांच दिवसात पूर्ण वाढतात. फूलकिडा दहा ते पंधरा दिवस जगतो. या कि उीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के डीडीटी भूकटी अथवा 0.02 टक्के एंड्रीन फवारतात.

(4) पाने गुंडाळणारी अळी : (सायलेप्टा गेरोगेटा). या अळ्या पानांची गुंडाळी करून तीत राहून पाने खातात. किडीचे प्रमाण जास्त असल्यास पाच टक्के बीएचसी किंवा पाच टक्के डीडीटी पिकावर पिस्कारतात.

(5) तांबडे ढेकून : (डिस्डेर्कस सिग्युलेप्टस). हे पानातील, कोवळ्या देठातील व बोंडातील सरकीमधील रस शोषतात. त्यामुळे सरकीतील तेलाचे प्रमाण घटते. नियंत्रणासाठी पांच टक्के बीएचसी भूकटी पिस्कारतात.

(6) पांढरट रंगाचे ढेकून : (ऑक्सिकॅरिनस लिटस). हे ढेकून उकललेल्या अथवा बोंड अळीने खाल्लेल्या बोंडांमध्ये असतात. नियंत्रणासाठी तांबड्या ढेकणांकरीता सांगितलेले उपायच योजतात.

(7) मिलीयग्ज अथवा पिठ्या : (फेरिसियाना व्हीरगॅटा) आणि देवीकीड अथवा खवले कीड (सेसेशिया नायथ्रा) : हे कीटक पानांतील तसेच देठांतील सर शोषून घसेतात. त्यांचे मिश्रण 0.03 टक्के पॅराथिऑन अथवा 0.05 टक्के मॅलॅथिऑन फवारून करता येते.

(8) मावा : (आफिस गॉसिपाय). या कीटकांपासूनही कापसाच्या पिकाला अपाय होतो. [→मावा].

कापूसविषयक कायदे : कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि कापूस पिकविणाऱ्या भागाची आर्थिक उन्नति होण्याच्या दृष्टीने भारतात कापूस कायदे लागू केलेले आहेत. ज्या त्या भागात शृद्ध कापसाची पैदास व्हावी व त्याच्या प्रतीबद्‌दल खात्री निर्माझा व्हावी हे कायद्यांचे मुख्य उद्‌देश आहेत. यापैकी काही कायदे राज्य सरकारांनी व काही केंद्र सरकारने केलेले आहेत. या कायद्यांमध्ये जरूरीप्रमाणे वेळोवेळी बदल करण्यात येत आहेत.

(1) बॉम्बे कॉटन कंट्रोल ऍक्ट, 1942 : हा कायदा राज्य सरकारचा आहे. या कायद्यात पुढील तरतुदी केलेल्या आहेतः (अ) विशिष्ट भागामध्ये मशागतीसाठी कापसाची जात ठरविणे (आ) ठरवुन दिलेल्या जातीव्यतिरक्ति इतर जातीच्या कापसाचा पेरा करण्यास मनाई करणे. (इ) ठरवुन दिलेल्रूा जातीव्यतिरीक्त इतर जातीचा कापूस जवळ बाळगण्यास आणि त्याचा व्यापार करण्यास मनाई करणे.

या कायद्यातील तरतूदीनुसार कोणत्याही शेतकी (कापूस) मदतनिसास शेताची पाहणी करता येते. शेतकी अधिकाऱ्यास गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याच्या दंडाची रक्कम वसूल करून गुन्हा तडजोडीने निकालात काढता येतो

(2) कॉटन ट्रान्सपोर्ट ऍक्ट, 1923 : हा कायदा भारत सरकारचा आहे. कायद्यान्वये संरक्षित केलेल्या भागात कापसाची पंरत टिकविणे व त्याचे श्रेष्टत्व वाढविणे हे या कायद्यसचे मुख्य उद्‌देश आहेत. या कायद्यान्वये संरक्षित विभागात बाहेरून रेल्वेने, रस्त्याने, नदीने अगर समुद्राने संरक्षत भागात परवान्याशिवाय कापूस आणण्यास मनाई आहे. रस्त्याने संरक्षित विभागात येणारा कापूस थोपविण्याकरीता सीमेवर नाकी बसविण्यात आली आहेत.

(3) कॉटन जिनिंग ऍन्ड प्रेसिंग फॅक्टरीज ऍक्ट, 1925 : हा कायदा भारत सरकारचा आहे.या कायद्यान्वये कापसाची सरकी काढणाऱ्या व दाबुन गाठी तयार करणाऱ्या कारखान्यांचे कार्य नियंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये कारखान्यांना दाब चिन्हे देणे, बांधलेल्रूा गाठीवर जरूर ते वर्णन लिहिणे, साप्ताहिक अहवाल सादर करणे वगैरे तरतुदी आहेत. याशिवाय कारखान्यांना परवाना देणे, भेसळीस प्रतिबंध करणे, कापसावर पाणी मारण्यास प्रतिबंध करणे व सरकी काढण्याचे व गाठी तयार करण्याचे जास्तीत जास्त दर ठरविणे वगैरे तरतुदी आहेत.

(4) महाराष्ट्र रॉ कॉटन (प्रोक्युअरमेंट, प्रोसेसिंग ऍन्ड मार्कटिंग) ऍक्ट, 1971 : महाराष्ट्र कपास(खरेदी, प्रक्रियाकरण व विक्री)अधिनियम, 1971,. या अधिनियमान्वये महराष्ट्र शासनाला कपाशीच्या (सरकी न काढलेल्रूा कापसाच्या) खरेदी, प्रक्रीयाकरण आणि विक्री यासंबंधी एकाधिकार प्राप्त झाला. अधिनियम सबंध राज्याला लागू असून तो 30 जून 1980 पर्यंत अंमलात राहील अशी अधिनियमात तरतूद आहे.

या अधिनियमाचा प्रधान उद्‌देश कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्याला किमान दराची हमी मिळावी हा आहे व ही हमीची किंमत कापूस हंगामाच्या सुरूवातीलाच त्याच्या पिकाची वैज्ञानिक परीक्षा होऊन कापसाची प्रत ठरविली जाईल. याचबरोबर ग्राहकाला हमीच्या किंमतीमुळे कापडाला जास्त किंमत द्यावी लागू नये म्हणून मधले व्यापारी व दलाल यांचे उच्चाटन करण्यात आले आहे. स्वतः सरकारच शेतकऱ्याकडुन सरळ कापूस खरेदी कराल व विक्रीही स्वतःच करील. तसेच गाठी तयार करणाऱ्या कारखान्यांही कापूस विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून विकता येणार नाही. त्यांनी फक्त सरकारेन सांगितलेले काम मजुरी घेऊन करायचे आहे. शिवाय कोणाही खाजगी व्यक्तीला व संस्थेला कापसाचा व्यापार करता येणार नाही वा त्याची राज्याबाहेर वाहतूक करून पाठवणीही करता येणार नाही.

या अधिनियमान्वये एक किंमत-वधघट निधी स्थापन केला गेला आहे व त्यात सरकारने सुरूवातीला एक कोटी रूपये गुतविले आहेत. हमीच्या किंमतीपेक्षा बाजारात जर कापसाला जास्त भाव आला,तर हमी किंमत व ही विक्री किंमत यांतील फरकाचा तीनचतुर्थांश हिस्सा शेतकऱ्याला मिळेल व उरलेला भाग वरील निधित जमा केला जाईल. जर विक्रीची किंमत हमीच्या किंमतीपेक्षा कमी असेल, तर शेतकऱ्याला हमीचर पूर्ण किंमत मिळावी (किंमतीतील फरक वरील निधीतून भरून काढून) अशी स्पष्ट तरतूद अधिनियतमात आहे. शिवाय कापसातून निघालेली सरकी व वइस यांबद्‌दलही शेतकऱ्याला मोबदला मिळतो. शेतकऱ्याला जर त्याच्या मालाच्या सरकारने लावलेल्रूा प्रतीबद्‌दल शंका असेल किंवा त्याला मिळालेल्या दराबद्दल नापसंती असेल, तर त्याला त्याबद्दल तक्रार करण्याची व्यवस्था आहे. अधिनियमाच्या (जून 1972) दुरूस्तीनुसार ईस्ट कॉटन असोसिएशन लि. या सरकारमान्य संस्थेला या सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घेऊन निर्णय देण्याचा अधिकार दिलेला आहे.

अधिनियमातील नियमांचा भंग करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावासाची, दंडाची वा दोन्ही प्रकारची शिक्षा करण्याची तरतूद आहे. या अधिनियमाची अंमलबजावणी ऑगस्ट 1972 पासून चालू झाली.

कापसाची विक्री : भारततील निरनिराळ्या राज्यांत स्थानिक कापसाची विक्री करण्याच्या निरनिराळ्या पद्धती चालू आहेत. पण सर्व ठिकाणी नवा कापूस सरकी काढण्यापूर्वीच विकला जातो. तामिळनाडूमध्ये जवळजवळ 65 टक्के आणि कर्नाटक राज्यांत 80 टक्के माल खेडेगावातच विकला जातो. पंजाबातील अमृतसर, जालंधर आणि लुधियाना जिल्ह्यात शेतांचा आकार लहान असल्रूाने 85 टक्के माल खेडेगावातच विकला जातो. परंतु पश्चिमेकडील जिल्ह्यात मोठी शेते असल्याने तेथील 90 टक्के माल ठोक विक्रीच्या पेठेत नेऊन विकला जातो. मध्य आणि दक्षिण गुजरातमध्ये शहरातील सरकी काढण्याच्या कारखान्यांचे दलाल खेडोपाडी जाऊन बराच माल खरेदी करतात, तरीही 40 टक्के माल कापूस खरेदी-विक्री संघामार्फत गोळा केला जातो व तयामधील सरकी काढून रूईच्या गाठी बांधल्यावर विकला जातो.

खेडेगावातच कापसाची विक्री झाली तर शेतकऱ्याला ताबडतोब पैसा मिळतो. परंतु कापसाला किंमत कमी मिळते. काही ठिकाणी शेतकरी स्थानिक व्यापाऱ्याकडुन कर्ज घेतो तेथे आपला माल त्याच व्यापाऱ्याला विकतो.

ठोक विक्रीच्या बाजारपेठेत तेथील अडते अनेक शेतकऱ्यांचा कापूस एकत्र करून तो मोठ्या व्यापाऱ्याला विकतात. बाजारपेठेत विकावयाचा कापूस शेतकरी आपल्या बैलगाड्यातुन आणतात व त्या गाड्या पेठेतील मैदानात किंवा जिनिंग फॅक्टरीच्या आवारात उभ्या करतात. तेथे असलेले अडते आणि दलाल गाडीतील कापसाचा नमुना घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांना दाखवितात व कापसाचा भाव ठरवितात. काही ठिकाणी परगावच्या मोठ्या व्यापाऱ्यांचे प्रतिनीधी असतात ते गाड्यातील कापूस विकत घेतात व मुख्य व्यापाऱ्याकडे पाठवितात. काही ठिकाणी कापड गिरण्यांचे अधिकारीच प्रत्यक्ष माल खरेदी करतात. गाडीतील माल खरेदी केल्यावर तो स्थानिक सरकी कारखान्यामध्ये नेऊन तोलतात व त्याची किंमत त्याच दिवशी मूळ शेतकऱ्याला देतात.

सरकी काढण्याची क्रिया : (जिनिंग). सरकी कारखान्यात आलेला कापूस प्रथम एका यंत्रामध्ये एका यंत्रामध्ये घालुन कापसाबरोबर आलेला कचरा हवेच्या झोकाने काढून टाकतात व नंतर तो सरकी काढण्याच्या यंत्रसत सोडतात. भारतामध्ये शेतातील कापसाची बोंडे हाताने तोडुन त्यातील कापूस पिशव्यांमध्ये किंवा पाट्यांमध्ये भरून नेतात व गाड्यांमध्ये भरतात. त्यात फारसा कचरा मिसळलेला नसतो. त्यामुळे तसा कापूस सरळ सरकी काढण्याच्या यंत्रात टाकता येतो. ज्या देशात मोठ्या शेतातील कापूस निर्यात यंत्राने गोळा करतात तेथील कापसात झाडाचा पाला,काड्या व इतर घाणही मिसळली जाते. असा कापूस प्रथम एका विशेष यंत्रात घालुन स्वच्छ करतात व नंतर तो सरकी काढण्याच्या यंत्रात टाकतात.

कापसातील कचरा काढण्यासाठी वापरीत असलेल्रूा यंत्राचा ण्क प्रकार आ. 1 मध्ये दाखविला आहे या यंत्रात कचरा मिश्रीत

आ. १. कापसातील कचरा काढण्याचे यंत्र

कापूस (1) या तोंडातुन आत टाकतात. तो कापूस नंतर (2), (3), (4), (5) इ. फिरणाऱ्या लाटण्यांवरून सरकविला जाऊन तो स्वच्छ होतो व (6) या मार्गाने बाहेर पडतो. या यंत्रामधील सर्व लाटण्यांच्या पोकळ अक्षातून वाऱ्याचा झोत आत येतो व लाटण्यांच्या गोल पृष्ठातून बाहेर जातो त्यामुळे पृष्ठावरच्या कापसातील कचरा कापसापासून वेगळा केला जातो. तो बाजूला पडून (7) या मार्गाने यंत्राच्या बाहेर जातो.

कचरा काढून स्वच्छ केलेल्या कापसातील सरकी काढण्यासाठी लाटणयंत्र किंवा चक्री करवत यंत्र वापता येते. लाटणयंत्रापासुन मिळणारे उत्पादन कमी असते, परंतु त्यामधुन निघालेल्या रूईचे धागे पूर्वीप्रमाणेच अखंड राहतात. चक्री करवत फार वेगाने चालणारी असते व त्यामधून निघालेल्या रूईचे बरेच धागे तुटलेले असतात परंतु एकंदरीने ते यंत्र फायद्याचे असल्याने अमेरिकेत आणि इतर बऱ्याच ठिकाणी त्याचा जास्त उपयोग करतात. भारतातही चक्री करवत यंत्राचा वापर वाढत आहे.

आ. 2 पायाने दाबून फिरवण्याचे लाटणे आणि पाटा : (1) कच्चा कापूस, (2) रूई, (3) मागे राहिलेली सरकी, (4) पायाने दाब देऊन फिरावयाचा रूळ, (5) लाकडी पाट.

भारतामध्ये कापसातील सरकी काढण्यासाठी हाताने फिरवावयाचे दोन लाकडी लाटण्याचे लहानसे यंत्र फार पूर्वीपासून प्रचारात आहे. त्याच धर्तीवर यांत्रिक लाटणयंत्राची रचना केलेली असते. काही लाटणयंत्रांत दोन लाटणी वापरतात व काही यंत्रांत एक लाटणे व दुसऱ्या लाटण्याऐवजी एक पोलादी पाते बसवितात. यंत्र चालु असताना पोलादी पाते आणि चामडे गुंडाळलेल्या लाटण्याचा पृष्टभाग यांमधील फटीतून रूईचे धागे पुढे ओढले जातात. या फटीमधून सरकी जाऊ शकत नाही. ती मागे राहते व आपल्या वजनाने खाली पडते.

आ. ३. चरखा लाटणयंत्र

चक्री करवत यंत्रात वरील प्रमाणेच एक पोलादी पाते असते व त्याच्या जवळच अनेक पोलादी चक्री करचती एका अक्षावर बसवलेल्या असतात व त्या यांत्रिक शक्तीने फिरतात. प्रत्येक चक्री करवतीचा थोडा भाग एका पष्यामधील फटीतून पोलादी पात्यापर्यंत जातो व फिरताना रूईचे धागे ओढून फटीतूनच परत येतो. करवतीच्या दातांत अडकून पुढे जाणारे रूईचे धागे वाऱ्याच्या झोताने करवतीपासून सुटतात व एका बाजूस पडतात. पात्याजवह अडकून राहणारी सरकी साठत जाऊन आपलया वजनाने खाली पडते व दुसऱ्या मार्गाने बाहेर जाते.

कपसातील सरकी नुसत्या हाताने किंवा पायानेही काढता येते व कित्येक ठिकाणी ही पद्धत अजूनही वापरात आहे. या पद्धतीने आठ तास काम केले तर एक किग्रॅ. कापसातील सरकी अलग काढता येते. यापेक्षा जलद काम होण्यासाठी थोडा थोडा कापूस एका पाटावर पसरतात व तयावर एक लाकडी रूळ दाबून लाटतात व कापसातून सरकी बाहेर काढतात. हे प्राथमिक स्वरूपाचे याधन आ. 2 मध्ये दाखविले आहे. यापेक्षाही जलद व सुबक काम देणारे चरखा लाटणयंत्र आ. 3 मध्ये दाखविले आहे. या यंत्राच्या एका बाजूने कापूस लाटण्याच्या मधल्या फटीवर एका हाताने दाबून धरतात. लाटणी फिरू लागली म्हणजे फटीतून रूईचे धागे ओढले जाऊन पुढे सरकतात.ते हातानेच एकत्र करतात. कापसातील सरकी लाटण्यामधील फटीतून पुढे जाऊ शकत नाही. ती आपल्या वजनानेच खाली पडते. या साध्या यंत्राने कापसातील सरकी काढण्यास बराच वेळ लागतो.

आ. ४. एका लाटण्याचे सरकी काढण्याचे यंत्र

यंत्रयुग सुरू झाल्यावर इंग्लंडमध्ये 1770-85 च्या दरम्यान कापसातील सरकी काढण्यासाठी कित्येक लोकांनी निरनिराळ्या पद्धतीची यंत्रे तयार केली. त्यानंतर 1897 साली मॉरीस, जॉन व विल्कीनसन यांनी एका लाटण्याचे यंत्र तयार केले. त्याची अंतर्गत रचना आ. 4 मध्ये दाखविली आहे.

भारतात बहुतेक ठिकाणी या जातीची यंत्रे बसवितात व ती कित्येक वर्षे चांगले समाधानकारक काम देतात. या यंत्रात (1) या भागातून कापूस खाली सरकतो व (2) या यांत्रिक शक्तीने फिरणाऱ्या लाटण्यावर जातो. या लाटण्याच्या जवळच (3) ही पोलादी पट्‌टी बसविलेली असते. ती थोडी पुढे मागे अशी हलत असल्यामुळे कापसातील सरकी लवकर सुटते. वरच्या बाजूने (4) हे पोलादी पाते लाटण्याला लागूनच बसविलेले असते. खालच्या (4) या पात्यामध्ये व लाटण्यामध्ये रूईचे धागे पुढे जाण्यासाठी थोडी फट असते, ती कमी जास्त करता येते. या फटीमधून लाटण्याने ओढलेली रूई पुढे जाते व (5) या भागात पडते. फटीतून सरकी पुढे जाऊ शकत नाही. ती साठत जाऊन (6) या भागात पडते.

आ. ५. सरकी काढण्याचे चक्री करवत यंत्र

आ.5 मध्ये दाखविलेल्या चक्री करवत यंत्रात (1) या मार्गाने कापूस आत टाकतात. तेथून तो कापूस वाऱ्याच्या झोताने (2) या भागात जातो. तेथे कापसातील कचरा सुटा होऊन खाली पडतो व स्व्च्छ कापसाचे गोळे (3) या भागातून पुढे जाऊन (4) या करवतीवर जातात. या यंत्रात एका फिरणाऱ्या दंडावर अंतराअंतराने बसवलेली पातळ पोलादी पष्याची अनेक करवती चक्रे असतात. त्यापैकी (5) हे एकच चक्र वरील आकृतीत दिसत आहे. ही चक्रे फिरू लागली म्हणजे रूईचे धागे करवतीच्या दातांत अडकून ओढले जातात. हे धागे वाऱ्याच्या झोताने करवतीच्या दातांतून युटे होतात व खाली पडून (6) या मार्गाने यंत्राच्या बाहेर जातात. कापसातील सरकी करवतीच्या फटीतून पुढे जाऊ शकत नाही. ती मागे पडून (7) या मार्गाने यंत्राच्या बाहेर येते.

ईजिप्तमधील कापसाचे धागे 27 मिमि. ते 50 मिमि. लांबीचे असतात. तेथेही कापसातील सरकी काढण्याची जुन्या पद्धतीची एक लाटण्याची यंत्रेच वापरतात. ही यंत्रे भारतात वापरीत असलेल्या  जातींचीच आहेत. अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत तसेच ब्राझीलमध्ये चक्री करवत यंत्रे वापरतात व ती चालविण्याकरीता विद्युत्‌ चलित्रे (मोटारी) जोडतात. मेक्सिकोमध्ये सरकी काढण्याचे कारखाने अतिशय आधुनिक पद्धतीचे आहेत. तेथेही सरकी काढण्यासाठी चक्री करवत यंत्रेच वापरतात.

रूईवरील प्रक्रिया : कापसातील सरकी काढल्यानंतर त्यातील रूई गोणपाटाच्या मोठ्या पिशव्यांमध्ये पायाने तुडवून शक्य तितकी दाबून भरतात व सुरक्षित जागी साठवून ठेवतात व नंतर जवळच्या गिरणीला विकतात. ही रूई लांब अंतरावर पाठवायची असेल, तर ती दाबयंत्रामध्ये दाबून तिच्या 180 किग्रॅ. (काही देशांत यापेक्षा अधिक) वजनाच्या गाठी बांधतात. रूई दाबून तिची गाठ बांधण्याच्या यंत्राला कॉंप्रेसर किंवा प्रेस म्हणतात.

कापसाच्या बाजारपेठेजवळच्या शहरात बहुतेक ठिकाणी कापसातील सरकी काढणे व रूईच्या गाठी बांधण्याचे काम एकाच कारखान्यात करण्याची सोय असते. अशा कारखान्याला जिनिंग आणिप्रेसिंग फॅक्टरी म्हणतात. भारतामध्ये रूई दाबविण्याकरीता वाफेवर चालणारी, जलीय शक्तीने चालणारी किंवा अतर्ज्वलन एंजिनाच्या (ज्यातील सिलेंडरामध्येच इंधन जाळून उष्णता निर्माण केली जाते अशा एंजिनाच्या) यांत्रिक शक्तीने चाालणारी यंत्रे वापरतात. रूई दाबण्याचे काम दोन टप्प्यांत करतात. पहिल्या टप्प्यांत ठराविक वजनाची रूई एका लांबट चौकोनी पेटीत भरतात व ती यांत्रिक शक्तीने दाबून तिची घट्‌ट गाठ करतात. या गाठीभोवती नंतर गोणपाट गुंडाळतात व ती गाठ दुसऱ्या यंत्रात घालून पुन्हा दाबतात. ती पूर्ण दाबलेल्या स्थितीत असतानाच तिच्याभोवती पातळ पोलादी पट्‌ट्या आपोआप आवळल्या जातात. अशा गाठीचे वजन गोणपाट आणि पोलादी पट्‌ट्यांचे असते. अशी गाठीची सर्वसाधारण लांबी 120 सेंमी., रूंदी 50 सेंमी. व जाडी 40 सेंमी. असते. वर्तमानपत्रात एक खंडी रूईचे (एका खंडीत पोलादी पट्‌टया व गोणपाट यांसहित 180 किग्रॅ. वजनाच्या दोन गाठी असतात) भाव दिलेले असतात. या प्रकारच्या साधारण अमेरिकन गाठीचे वजन 500 पौंड म्हणजे जवळजवळ 227 किग्रॅ. असते.

रूईचा पुरवठा आणि विक्री : जगातील निरनिराळ्या देशांत कापसाच्या पेरण्याचा हंगाम आणि कापूस तयार होण्याचा हंगाम यांमध्ये पुष्कळ फरक असतो म्हणून वार्षिक हिशेबाकरिता साधारण संकेताप्रमाणे नव्या कापसाचा हंगाम 1 ऑगस्टपासून पुढील वर्षाच्या 31 जुलैपर्यंत धरतात.

ज्गातील सर्व भागांत रूईच्या कापडालासतत मागणी असल्याने रूई ही व्यापारी दृष्टीने फार महत्वाची वस्तू आहे. रूईच्या व्यापारात लाखो लोक गुतलेले असतात. अनेक वर्तमानपत्रांत रूईची व्यापारी दृष्ट्या दररोजची स्थिती दाखविण्याची वहिवाट आहे. त्यावरून रूईचे भाव ठरविले जातात. अशा माहितीपत्रकात हंगामाच्या सुरूवातीला असलेल्या जुन्या रूईचा साठा, चालू हंगामातील उत्पादन, एकंदर साठा, दैनंदिन खप, नष्ट केलेली रूई व हंगाम संपल्यानंतर उरलेला साठा यांसंबंधी सर्व जगातील रूईची माहिती प्रसिद्ध होते. व्यापारी लोकांचे या माहितीकडे सतत लक्ष असते. रूईच्या तयार साठ्यावर रूईची हजर किंमत अवलंबून असते व कापसाच्या नवीन उत्पादनावर रूईच्या वायद्याची किंमत अवलंबून असते. साधारणपणे या हंगामात जगातील एकंदर कापसाचे उत्पादन वाढण्याचा संभव दिसतो त्यावेळी चालू हंगामातील व पुढील वायद्याचे भाव एतरू लागतात आणि जेव्हा नवीन उत्पादन अंदाजापेक्षा कमी होईल असे दिसते तेव्हा रूईचे भाव वाढू लागतात. कधीकधी लोकांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे रूईच्या भावात फरक पडतो जातो. मंदीच्या काळात लोकांच्याजवळ खेळता पैसा नसतो त्यामुळे कापसाला फारशी मागणी नसते. त्यामुळे रूईला मागणी नसेल तर तिचे भाव उतरू लागतात. अमेरिकेत रूईच्या दैनंदिन हालचालीवरूनही तिचे भाव ठरविले जातात. अमेरिकेची रूई सर्व देशांतील हालचालीवरूनही तिचे भाव ठरविले जातात. अमेरिकेची रूई सर्व देशांतील बाजारपेठेत जाते. दर आठवड्याला अमेरिकेतील किती रूई परदेशांत पाठवली त्याचे आकडे प्रसिद्ध होतात, त्यांच्या रूईच्या भावावर बराच परिणाम होतो.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या शेतकी विभागातर्फे कापसाच्या लागवडीसंबंधी किती एकर जमीन आहे व त्यापासून किती रूईचे उत्पादन होईल याचा अंदाज दिलेला असतो. लागवडीखाली असलेल्या जमिनीचे आकडु जुलै, सप्टेंबर व डिसेंबर या प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेस प्रसिद्ध होतात. ही माहिती फार विश्वसनीय असते असा सर्वाचा अनुभव असल्यामुळे व अमेरिकेतील कापसाचे उत्पादन जगातील एकंदर उत्पादनाच्या मानाने बरंच मोठे असल्याने जगातील सर्व ठिकाणी रूईच्या किंमतीवर या माहितीचा परिणाम होतो. न्यूयॉर्कच्या कॉटन एक्यचेंजतर्फे जगातील सर्व देशांतील रूईची सर्व प्रकारची माहिती मिळविली जाते व प्रसिद्ध करण्यात येते. ही माहिती चांगली विश्वसनीय असते व अमेरिकन सरकारतर्फेही ती प्रसिद्ध करण्यात येते.

इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ मास्टर कॉटन स्पिनर्स ऍन्ड मॅन्युफॅक्चरर्स ही संस्था आहे. तिच्यातर्फे जगातील रूईचा खप आणि गिरण्यंमध्ये असणारर साठा यासंबंधी सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध होतात. त्यामध्ये अमेरिका आणि इतर देशांतील रूईची स्वतंत्र माहिती प्रसिद्ध केली जाते.

भारतातील कापसाच्या लागवडीसंबंधी व देशातील रूईच्या एकंदर साठ्यासंबंधीची माहिती मुंबईच्या ईस्ट इंडिया कॉटन असोसिएशनतर्फे प्रसिद्ध करण्यात येते.

भारतामध्ये अनेक प्रकारचा कापूस पिकतो व तो निरकनराळ्या राज्यांतील अनेक बाजारपेठांत साठविला जातो. निरनिराळ्या राज्यांतील गिरण्यांना लागणारी रूई शक्य तितक्या कमी किंमतीत व शक्य तितक्या जवळच्या बाजारपेठेत मिळावी म्हणून 1955 साली भारम सरकारने नवा रूई नियंत्रण हुकूम प्रसिद्ध केला व केंद्रीय सरकारच्या टेक्साटाइल कमिशनरला रूईच्या वाटपासंबंधी सर्व अधिकार दिले. त्यामुळे एकर राज्यातुन दुसऱ्या राज्यांत रूइ्र पाठवण्यावर त्या निर्बंधामध्ये आवश्यक असतील त्याप्रमाणे बदल करण्यात येतात.

निरनिराळ्या राज्यातील कापूस बाजारात रूईचा थोउासा नमुना पाहून तिचा भाव ठरविला जातो. या पद्धतीने रूईची खरी किंमत समजणे कठिण असते. रूईची खरी किंमत ठरविण्याकरिता तिच्या धाग्याची लांबी, धाग्याचे ताणबल, धाग्यांचा एकसारखेपणा वगैरे अनेक गुण तपासावे लागतात. हे काम एखाद्या मध्यवर्ती संस्थतर्फे करावे लागते. परंतु भारतामध्ये सर्व ठिकाणी अशी सोय नसल्याने कापूस उत्पादकाला त्याच्या मालाची योग्य किंमत मिळणे फार कठिण होते.

कापसाच्या उत्पादकाला रूईच्या खऱ्या किंमतीप्रमाणे पैसा मिळावा यासाठी सरकारतर्फे रूईची प्रत व किंमत ठरविण्यासाठी 1886 साली वऱ्हाउ गातील कारंजा येथे हैदराबादच्या रेसिडेन्सीतर्फे एक अधिकृत कापूस बाजार उघडण्यात आला व 1897 साली बेरार कॉटन ऍन्ड ग्रेन मार्केट्‌स लॉ संमत होऊन वऱ्हाड भागातील सर्व कापूस बाजारावर सरकारर नियंत्रण बसले. त्यामुळे वऱ्हाडातील सर्व रूईची प्रत आणि किंमत योग्य प्रकारे ठरविण्यात येऊ लागली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. 1919 साली केंद्रीय सरकारच्या सूचनेप्रमाणे मुंबई सरकारनेही बॉम्बे कॉटन मार्केट ऍक्ट लागू केला 1928 साली रॉयल कमिशन ऑन ऍग्रिकल्चर आणि डायरेक्टोरेट ऑफ मार्केटींग ऍन्ड इन्स्पेक्शन यांच्या शिफारशीप्रमाणे 1930 साली मुबई येथे एक गाव व वऱ्हाडात 24 असे नियंत्रित कापूस बाजार चालू होतो. ही संस्था वाढत जाऊन 1950 साली सर्व भारतात मिळून 265 झाली.

योजना समितीच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेतील शिफारसीवरून मध्य प्रदेश व सौराष्ट्र येथेही नियंत्रित कापूस बाजार सुरू झाले आणि 1956 साली आंध्रात 78, मुंबई राजयात 186, तामिळनाडूत 19, मध्य प्रदेशात 74, कर्नाटकमध्ये 48, पंजाबात 115 व केरळात 2 असे 10 राज्यांत 522 नियंत्रित कापूस बाजार चालू होते व 1954-55 या हंगामात त्या सर्व बाजारांत 61 कोटी रू. किंमतीची 2.6 कोटी मण रूई विकली गेली. हा माल त्या राज्यांतील एकंदर उत्पादनाच्या 62 टक्के होता व भारतातील एकंदर उत्पादनाच्या 45 टक्के होता.

नियंत्रित कापूस बाजाराचे काम लोकशाही पद्धतीवर चालते. या बाजाराच्या समितीवर कापसाचे उत्पादक, व्यापारी व स्थानिक संस्थांचेप्रतिनिधी असतात. आंध्र प्रदेशात आणि तामिळनाडूमध्ये जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांकरिता एकच बाजार समिती असते. समितीच्या सभासदांची संख्या 12 ते 16 असते व त्यापैकी कमीतकमी अर्धे सभासद कापूस उत्पादकाचे प्रतिनीधी असतात. या समितीला स्थानिक बाजारासंबंधी सर्व सत्ता असते. बाजारातील काम सुरळीत चालण्यासाठी ही समिती रूईचा नमुना घेण्याची पद्धत, रूईचा भाव ठरविण्याची पद्धत, विक्री करण्याची पद्धत आणि जागा, मजुरीचे दर अशा सर्व बाबींसंबंधी नियम ठरवून देते आणि कापूस विकणारा व विकत घेणारा यांमध्ये काही वाद उत्पन्न झाला, तर त्याचा निकाल करण्यासाठी मंडळाची नेमणूक करते.

शेतकऱ्यांनी आणलेला कापूस बाजाराच्या आवारात गोळा करतात व बाजार समितीच्या अधिकाऱ्यासमोर त्याचा लिलाव केला जातो. परंतु कापसाचे वनज करण्यासाठी स्वतंत्र अधिकृत माणसे नेमलेली असतात. कापूस विकत घेणाऱ्यांच्या किंवा दलालांच्या नोरारंना हे काम करू देत नाहीत. समितीतर्फे कापसाचे वनज चालू असतानाही त्यावर देखरेख करण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. वजन करण्यासाठी मानक (प्रमाणभूत) अजनेच वापरावी लागतात. समितीच्या अधिकाऱ्यातर्फे अधूनमधून तराजूची आणि वजनांची चांगली तपासाणी केली जाते. कापसाची विक्री झाल्यावर तेथील अधिकृत दलाल, कापूस विकणाऱ्याला विक्रीपत्र देतात. त्यामध्ये कापूस विकून आलेली किंमत, दलाली वनज करण्याचा खर्च व समितीने मान्यता दिलेला इतर खर्च वजा करून बाकी उरलेली रक्कम यासंबंधी सर्व माहिती दिलेली असते. बाजारांचे नियंत्रण होण्यापूर्वी दलाल लोक विकणाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करीत असत व रोख रक्कम नंतर काही दिवसांनी देत असत. आता विक्रीची किंमत त्याच दिवशी चुकती करावी लागते. या समितीतर्फे कापूस बाजारासंबंधी सर्व माहिती सर्व संबंधित लांकांमध्ये प्रसारित केली जाते.

कापूस बाजार नियंत्रित झाल्यामुळे कापूस उत्पादकाला आर्थिक आणि सामाजिक लाभ झाला. पूर्वी खोटी वजने वापरून नुकसान करणे, कपड्याखाली हात लपवून भाव ठरविणे, कित्येक अनाधिकृत कारणास्तव रक्कम कापून घेणे अशा गोष्टी सर्रास चालत असत, त्या आता बंद झाल्या आहेत. आता कापूस विकताना उघड लिलाव करतात. बाजारात माल विकण्याबद्‌दल समितीला देण्याची रक्कम पूर्वीच्या मानाने 29 ते 69 टक्कयांपर्यंत कमी झाली आहे.

पुष्कळ ठिकाणी बाजार समितीतर्फे कापसाच्या गाड्या उभ्या करण्यासाठी खास जागा राखून ठेवलेली असते. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, बैल उभे करण्यासाठी गोठे, उत्पादकाला विश्रांती घेण्याची जागा, वाचनालय अशा अनेक सोयी केलेल्या असतात. पूर्वी खेडेगावातील व्यापारीच शेतकऱ्याचा 80 टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त माल बाजारात आणतात व बाकीचा माल खुद्‌द उत्पादकच बाजारात आणतात. त्यामुळे उत्पादक व विकत घेण्याऱ्यामध्ये प्रत्यक्ष संबंध येऊन एकमेकांबद्‌दलचा संशय दूर होत आहे.

भारत सरकारच्या 1912 च्या सहकारी संस्थांसंबंधीच्या कायद्यामुळे क्षेत्रात उत्पन्न केलेला माल विकण्यासाठी पतरहित मर्यादित जबाबदारीच्या पेढ्या स्थापन करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर पाच वर्षांनी कर्नाटकातील गदग येथे सहकारी कापूस विक्री संस्था स्थापण्यात आली. आपल्या भागधारकांना सुधारलेल्या कापसाचे बी पुरविणे आणि त्यांनी उत्पन्न केलेला कापूस शक्य तितक्या चढत्या दराने विकण्याची व्यवस्था करणे हे या संस्थेचे मुख्य उदि्‌दष्ट होते. पुढे याच धर्तीवर मुंबई, तामिळनाडू, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांत अनेक पेढ्या निघाल्या आणि त्यांच्यामार्फत कापूस विकण्यात येऊ लागला. मुंबई, गुजरात आणि तामिळनाडू य राज्यांत सहकारी तत्वावर सरकी काढणाऱ्या पेढ्याही चालू झाल्या आहेत. या पेढ्या फक्त रूईच्या विक्रीसंबंधीचे काम करतात व त्याबद्‌दल ठराविक लाभांश कापून घेतात. या पेढ्यांचे काम समाधानकारक रीतीने चालू आहे व त्यांची भरभराटही होत आहे.

गुजरातमध्ये रूई विकण्यासाठी स्थापलेल्या 86 पेढ्या आहेत आणि सरकी काढण्यासाठी आणि गाठी बांधण्यासाठी 26 पेढ्या आहेत. यांपैकी बहुतेक पेढ्या दक्षिण गुजरातेत आहेत. दक्षिण गुजरातेतील बहुतेक पेढ्या येथील श्री दक्षिण गुजरात सहकारी कॉटन मार्केटिंग युनियन लिमिटेड या संघटनेला जोडलेल्या आहेत. रूई विकणाऱ्या प्राथमिक पेढ्या पूर्णपणे लोकशाही तत्वावर चालतात. या पेढ्यांचे सर्व सभासद प्रत्यक्ष शेतकरीच असतात व त्यांच्याच हातात सर्व सतता असते. या भागातील सर्व पेढ्यांनी जमा केलेली रूई एकत्र करतात व तिच्या गाठी बांधतात आणि नंतर त्यांची विक्री केली जाते. रूईच्या गाठींची विक्री सुरतच्या मध्यवर्ती संघटनेतर्फे केली जाते. या संघटनेतर्फे विकण्यात येणाऱ्या रूईची किंमत खासगी रीतीने ठरविण्यात येते. हंगामात विकलेल्या सर्व रूईच्या किंमतीमधून सरकी काढणे, गाठी बांधणे, वाहतूक विमा, वगैरेंसंबंधी सर्व खर्च वजा केल्यावर उरलेली रक्कम सर्व सभासदांमध्ये त्यांनी पुरविलेल्या मालाप्रमाणे एकाच दराने वाटून देण्यात येते. रूई विकणाऱ्या पेढ्यांच्यातर्फे ऍगमार्क पद्धतीने रूईची प्रत ठरविण्याची व्यवस्था करण्यात येते. प्राथमिक सभासदांनी आणून दिलेल्या कापसावर त्याच्या किंमतीच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम 6.25 टक्के दराने लगेच उसनी दिली जाते व अखेरचा हिशोब करताना ती रक्कम कापून घेण्यात येते. या पेढ्यांच्या नियमाप्रमाणे प्रत्येक सभासदाने आपला सर्व कापूस या पेढ्यांमार्फतच विकला पाहिजे असे बंधन असते व हे बंधन पाळेल नाही, तर सभासदाला 50 ते 100 रू. दंढ द्यावा लागतो.

गुजरातमध्ये 1950 मध्ये केलेल्या साधारण सर्वेक्षणावरून असे आढळून आले की उत्पादकाने आपला कापूस स्वतः बाजारात जाऊन विकण्यापूक्षा सहकारी पूढीमार्फत विकला, तर त्याला गाठीमागे सहा रूप्यांचा तरी फायदा होतो. हा फायदा मुख्यतः उत्तम प्रतीचे बी स्वस्त दराने मिळाल्यामुळे व रूईची प्रत ठरविता आल्यामुळे होतो.

कर्नाटक भागातील सहकारी पेढ्या धारवाढ जिल्ह्यात आहेत. त्यांचे काम गुजरातमधील पेढ्यांपेक्षा निराळ्यप पद्धतीने चालते. या भागात सभासदांचा कापूस मध्यवर्ती ठिकाणी एकत्र करून आणि सरकी काढून न विकता प्रत्येक पेढीतर्फे स्थानिक बाजारात लिलाव करून विकण्यात येतो. हे लिलाव साधारणतः दर पंधरा दिवसांनी केले जातात व त्यांचे भाव कापसातील रूईच्या प्रमाणावर ठरविले जातात. दर पंधरा दिवसात जमा होणाऱ्या कापसातील सरकीचे प्रमाण पाहून त्यांचे पाच गट करतात. कापसामध्ये सरकीचे प्रमाण वजनाने साधारणतः 62 ते 64 टक्के व रूईचे प्रमाण 35.5 ते 37.5 टक्के असते. लिलाव करून मिळणाऱ्या रकमेतून विक्रीचा खर्च आणि दलाली वजा करून उरलेली रककम मूळ उत्पादकाला रोख देण्यात येते. हंगामाच्या शेवटी सर्व हिशोब केल्यावर उरलेला फायदा सर्व सभासदांमध्ये ठराविक दराने वाटण्यात येतो. या पेढ्यांच्या सभासदांना आपला कापूस पेढीमार्फतच विकला पाहिजे असे बंधनकारक नसते. कर्नाटक् भागात सुधारलेले बी फक्त सहकारी पेढ्यांमार्फतच वाटण्यात येते. परंतु गुजरातमध्ये ते सहकारी पेढ्यांतर्फे आणि खासगी संस्थातर्फेही वाटले जाते.

वऱ्हाड भागातील कापसाची विक्री विदर्भ बाजार संस्थेतर्फे (मार्केटिंग सोसायटीतर्फे) कापूस एकत्र गोळा करण्याच्या योजनेप्रमाणे (`कॉटन पूल स्कीम’ प्रमाणे) केली जाते. या मध्यवर्ती संस्थेला प्रत्येक तालुक्यातील तालुका कृषी संघटना जोडलेली असते व ती मध्यवर्ती संस्थेचा दलाल म्हणून काम करते. तालुका संघटना ठराविक बाजारपेठेमध्ये त्या भागात येणारा सुधारलेल्या जातीचा कापूय ण्क करते व तो कापूस बाजार संस्थेतर्फे लिलाव करून विकला जातो. याबद्‌दल बाजार संस्था एक खंडी म्हणजे 350 किग्रॅ. वजनावर 1.5 रू. प्रमाणे लाभांश कापून घेते. या लाभांशापैकी दोन तृतीयांश रक्कम तालुका संघटनेला मिळते. या संस्थेमार्फत कापूस विकल्याने शेतकऱ्याला दर खंडीमागे 15720 रूपयांचा फायदा होतो.

भारत सरकारने रूईची निर्यात करण्यासाठी सहकारी संस्थांना परवाने देण्याचे ठरविल्यामुळे काही संस्थांनी रूईच्या निर्यातीचा व्यापार सुरू केला आहे. 195-56 साली मुंबईच्या तीन संस्था व विदर्भ बाजार संस्था यांना अनुक्रमे 35,000 व 33,000 गाठींची निर्यात करण्याचे परवाने मिळाले. ही निर्यात संस्थांनी नेमलेल्या मुंबईमधील दलालांमार्फत केली जाते.

वायद्यांचा व्यवहार : कोणताही माल ताबडतोब पुरविण्याच्या कराराने विकला गेला तर त्याला हजर विक्री म्हणतात. जर माल पुष्कळ दिवसांनंतर पुरविण्याच्या कराराने विकला गेला, तर त्या विक्रीला वायद्याची विक्री म्हणतात. कापसाच्या वायद्यांचे व्यवहार संघटित करण्याच्या दृष्टीने 1875 मध्ये मुंबई येथे बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशन लि. या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे बहुतेक भागधारक यूरोपीय होते. 1890 च्या सुमारास भारतीय कापूस उत्पादक आणि गिरणी मालक यांनी द बॉम्बे कॉटन एक्सचेंज लि. या संस्थेची स्थापना केली. 1915 पर्यंत रूईचा बहुतेक हजर व वायदे व्यवहार या दोन संस्थाच्याच ताब्यात होता. तथापि या संस्थांच्या कायाबद्‌दल असंतोष निर्माण होऊन 1915 साली द बॉम्बे कॉटन ब्रोकर्स असोसिएशन ही संस्था स्थापन झाली. पहिल्या महायृद्ध काळात कापसाच्या किंमतीत अतिशय चढ-उतार होऊन बराच गोधळ निर्माण झाला. 1918 साली सरकारने कापसाच्या व्यापाराच्या करारांचे नियम ठरवून दिले व मुंबई येथील कापसाच्या व्यापाराचे नियमन करण्यासाठी कॉटन कॉंट्रॅक्ट कंपनी स्थापन केली. या कमिटीने दलालांना परवाणे देणे, दैनंदिन दर निश्चित करण्यासाठी व जाहीर करण्यासाठी कमिटी नेमणे, करारांचे प्रकार निष्चित करणे इ. महत्वाचे कार्य केले.

मुंबई सरकारने 1919 मध्ये बॉम्बे कॉटन कॉंट्रॅक्ट ऍक्ट अंमलात आणून कॉटन कॉंट्रॅक्ट बोर्डाची स्थापना केली. या बोर्डाने एकच प्रातिनिधिक संस्था स्थापनण्याच्या दृष्टीने ईस्ट इंडिया कॉटन असोसिएशन (ई. इं. कॉ. अ.) ही संस्था 1921 मध्ये स्थापन केली व 1922 साली सरकारने या संस्थेला मान्यता दिली. या संस्थेच्या नियमाप्रमाणे 100 गाठी रूई हे व्यापाराचे एकक ठरविण्यात आले. 1925 साली द श्री महाजन असोसिएशन नावाची दुसरी संस्था स्थापन झाली. या संस्थेच्या नियमानुसार 20 गाठी हे एकक ठरविण्यात आले. दुसऱ्या महायुद्ध कालात कापसाच्या वायदे व्यवहारावर बंदी घालण्यात आली. परंतु 1943 मध्ये काही अटींवर ईस्ट इंडिया कॉटन असोसिएशतर्फे रूईच्या वायदे व्यवहारास परवानगी दिली. त्यानंतर 1948 साली रूईच्या व्यवहारावरील नियंत्रणे काढून टाकण्यात आली.

मुंबई हे रूई बाजाराचे भारतातील मुख्य केंद्र आहे.येथूनच परदेशी जाणारी रूई निर्यात केली जाते. त्यामंळे वायद्याचे व्यवहार करण्याचेही मुंबइ्र हेच एकमेव अधिकृत केंद्र आहे. पूर्वी मुंबईशिवाय अहमदाबाद, सूरत, ध्रांगध्रा , सुरेंद्रनगर, खागआव, उज्जैन, इंदूर व रतलाम येथेही रूईच्या वायद्याचे व्यवहार करीत असत , परंतु आता त्यांना सरकारी मान्यता मिळत नाही. मुंबईचा वायदेबाजार इं. इ. कॉ. अ. च्या देखरेखेखाली त्यांच्या काळबादंवी भागातील मुख्य इमारतीच्या रिंगणामण्ये चालतो. हा व्यवहार इं. इ. कॉ. अ. च्या सभासदांनाच करता येतो. कोणाही प्रतिष्ठित माणसाला प्रवेशशुल्क, वार्षिक वर्गणी व अनामत रक्कम देऊन या संस्थेचे सभासद होता येते. सभासद नसलेल्या माणसाला कोणत्याही प्रकारचा रूईचा व्यवहार करावयाचा असेल, तर इं. इ. कॉ. अ. च्या अधिकृत दलालामार्फतच करावा लागतो.

इंडियन कॉटन कॉंट्रॅक्टच्या नियमाप्रमाणे 25/32 इंच म्हणजे 20 मिमि. जलांबीच्या धाग्याची फाइन एम. जी. मोगलाई जरीला ही रूईची जात मानक जात समजण्यात येते. परंतु त्याचबरोबर बदली व्यवहाराकरिता (1) एक्स्ट्रॉ सुपरफाइन, (2) सुपरफाइन व (3) फुल्ली गुड या जातीही चालतात. धाग्यांच्या अधिकृत मानलेल्या लांब्या म्हणजे 19, 20, 21, 22, 23, 24, 25 व 26 मिमि. या होत.

कापसाच्या प्रत्येक हंगामात वायद्याच्या पुरवठ्याकरीता मार्च,मे,आणि ऑगस्ट हे तीन महिने ठरविण्यात आले आहे व मालाचा पुरवठा त्या महिन्यातील 1 तारखेपासुन 24 तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी केला तरी चालतो वायद्याचे व्यवहार करताना रूईचा पुरवठा मुंबईमध्ये केला पाहिजे. असे गृहित धरण्यात येते, परंतु पुरवठा जर इतर अधिकृत कंद्रात केला तर त्या केंद्रापासुन मुंबईपर्यंतचा वाहतूक खर्च रूई विकणाऱ्याने सोसलस पाहिजे. या व्यवहाराकरिता 180 किग्रॅ. वजनाच्या 550 गाठी हे एकक ठरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात एक गाठ 223 किग्रॅ. वजनाची धरली जाते.

संरक्षक जातीचा वायदा व्यवहारातील मुख्य बिकट प्रश्न म्हणजे वायद्यावा भाव व हजर भाव यांच्या फरकामध्ये होणारा चढ-उतार हा आहे. हा चढ-उतार हवामान, बाजाराची परिस्थिती, पुरवठा आणि मागणी, सरकारचे आयात आणि निर्यात धोरण व लोकांची सट्‌टेबाजी अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. या भावामध्ये एका हंगामात किती फरक पडू शकतो ते दाखविण्याकरीता 1952 ते 1955 पर्यंतच्या तीन हंगामाच्या मासिक किंमती आ. 6 मध्ये दाखविल्या आहेत.

आ. ६. १९५२-१९५५ या तीन हंगामातील मुंबई बाजारातील हजर व वायद्याचे रुईचे दर दर्शविणारा आलेख.

भारत सरकारने देशातील रूईची खरेदी, विक्री आणि सम प्रमाणात वितरण करण्याच्या दृष्टीने 1970 मध्ये सरकारी क्षेत्रात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. या संस्थेची स्थापना केली. नॅशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशनच्या अखत्यारीखाली गिरण्यांना लागणारी रूई खरेदी करण्यापुरतेच या संस्थेचे कार्य मर्यादित आहे.

कापसाचा व्यापार करताना कापूस जमा करणे, तो साफ करून त्यातील सरकी व रूई वेगळी काढणे, रूईच्या गाठी बांधणे, गाठींची वाहतूक करणे, गाठी साठवुन ठेवणे व त्यांचे वाटप करणे अशा विविध कार्यांसाठी खर्च करावा लागतो. त्याला व्यापाऱ्याचा खर्च म्हणतात. रूई विकत घेणाऱ्याने दिलेल्या रकमेतून हा खर्च वजा केल्यावर उरलेली रक्कम कापूस उत्पादकाला मिळते. भारतामध्ये या खर्चाचे प्रमाण उत्पन्नाच्या 10 ते 18 टक्क्यांपर्यंत असते. हे प्रमाण महाराष्ट्रत 9.5 ब्टक्के, मध्य प्रदेशात 11 टक्के, तामिळनाडूमध्ये 12 टक्के, पंजाबात 14 टक्के व कर्नाटकात 18 टक्के आहे.

रूईच्या हजर व्यवहाराचे जागतिक महत्वाचे बाजार अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील रूईकरिता डलस (टेक्सस), ह्यूस्टन (टेक्सस), मेंफिस (टेनेसी) व न्यू ऑर्लिन्स (लुइझियाना) ईजिप्शियन रूईकरिता ऍलेक्झांड्रिया पाकिस्तानी रूईकरिता कराची चीनमधील रूईकरिता शांघाय जपानमधील कापड गिरण्यांसाठी पाठविण्यात येणाऱ्या रूईकरिता ओसाका ब्राझीलमधील रूईकरिता साऊँ पाउलू यूरोपातील गिरण्यांकरिता लागणऱ्या रूईकरिता लिव्हरपूल (इंग्लंड), ल हाव्र (फ्रान्स), ब्रेमेन (जर्मनी), व मिलान (इटली), येथे आहेत. वायदे व्यवहारांकरिता न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज, न्यू आर्लिन्स कॉटन एक्सचेंज, ऍलेक्झांड्रिया कॉटन एक्सचेंज, बॉम्बे कॉटन एक्सचेंज हे बाजार महत्वाचे मानण्यात येतात. न्ययॉर्क व न्यू ऑर्लिन्स येथे फक्त अमेरिकन रूईचे, ऍलेक्झांड्रिया येथे फक्त ईजिप्शियन रूईचे व मुंबई येथे फक्त भारतीय वायदे व्यवहार होतात.

कापसाचा उपयोग : कापसाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे सूत काढणे व त्यापासून कापउ तयार करणे हा होय. कापसावर विविध प्रकारच्या प्रक्रिया सुलीातेने करता येतात. यामुळे त्याच्यापासुन आवश्यक गुणधर्माचे कापउ बनविता येते. जगाच्या एकुण उत्पादनापैकी सु. 80 टक्के एवढा कापूस कापडनिर्मितीसाठी वापरला जातो. विविध प्रकारचे पट्‌टे, टायरमधील कॉर्ड, पादत्राणे, गाळण्याचे कापड, दोरा व दोर, जखमांवर लावण्यात येणारा निर्जंतुक कापूस इ. साठी कापूस वापरला जातो. गाद्या, उशा, इ. भरण्यासाठी प्रक्रिया करून तयार करण्यात येणाऱ्या गन कॉटन, रेयॉन, कॉर्डाइट इ. नायट्रोसेल्यूलोजांसाठी तसेच लिनोलिअम, प्लॅस्टिक इ. साठीही कापसाचा उपयोग करतात. भारतात वाती, फुलवाती, जानवी इ. धार्मिक बाबीत देवकापसाचा उपयोग करतात.

पहा : कापड उद्योग; कृषि उत्पादन विनिमय केंद्रे; तंतु, कृत्रिम; तंतु, नैसर्गिक; दोरा; विणकाम; सरकी सूत.

संदर्भ : 1. Andrews, W. B. Cotton Production, Marketing and Utilization, Mississippi, 1950.

2. Brown. H. B.; Ware, J. O. Cotton, New York, 1958.

3. Cardozier, V. R. Growing Cotton, New York, 1957.

4. Sikka, S. M.; Singh, Arjan; Singh, Avtar; Gadkari, P. D. & others, Cotton in India, 4.Vols., Bombay, 1960-61

लोखंडे, हि. तु.; ओक, वा. रा.; जोशी, गो. वि.; चौधरी, रा. मो.; कुलकर्णी, य. स.; दोरगे, सं. कृ.; देशपांडे, ज. र.

चित्रपत्र : कापूस

गॅासिपियम अर्बोरियम
गॅासिपियम हर्बेशियम
गॅासिपियम हिरसुटम
गॅासिपियम बार्बाडेन्स