शेर : यूफोर्बिएसी कुलातील या वनस्पतीचे नांग्या शेर व विलायती शेर असे दोन प्रकार आहेत.

नांग्या शेर (यूफोर्बिया तिरूकाली) : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) स्त्री-पुष्प, (३) स्त्री व नर-पुष्प (चषकासह).नांग्या शेर : [शेर, निवळ, नेवाळी शेर, कांडया शेर हिं. सेहुंद, कोनपाल, सैंड क. मोंडुकळ्ळी गु. परदेशी शेर (थोर) सं. त्रिकंटक, वजद्रूम, गंदेरी इं. मिल्क बुश, इंडियन ट्री स्पर्ज लॅ. यूफोर्बिया तिरूकाली कुल-यूफोर्बिएसी]. फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग ]. हा सु. ६ मी. उंचीचा, बिनकाटेरी, लहान वृक्ष असून त्याचे मूलस्थान आफ्रिका आहे. भारतात बहुतेक सर्वत्र व इतरत्र रूक्ष प्रदेशात तो आढळतो. नांग्या शेर कुंपण म्हणून लावतात. याच्या प्रजातीत सु. २,००० जाती असून भारतात त्यांपैकी सु. ६० जाती आढळतात.

या शेराची साल भुरी किंवा हिरवट रंगाची व भेगाळ असून फांद्या पसरट कांड्यासारख्या हिरव्या व बहुधा पर्णहीन असल्यामुळे यास ‘ कांड्या शेर ’ (नांग्या शेर) हे नाव पडले असावे. सर्वच भाग गुळगुळीत असून त्यात पांढरा ⇨ चीक असतो. याला प्रथम लहान, अरूंद व लांबट पाने येतात परंतु लवकरच ती गळून पडतात. फुले एकलिंगी व अपूर्ण असतात. ऑगस्ट-सप्टेंबरात लहान फांद्यांमध्ये पेल्यासारखे (चषकरूप) फुलोरे [→ पुष्पबंध] येतात त्यात स्त्री-पुष्पे अधिक असतात (प्रत्येक नर-पुष्प हे एक केसरदल प्रत्येक स्त्री-पुष्प हे देठावरचे तीन किंजदलांचे मंडल). फुलोरा व फुले यांची संरचना व इतर लक्षणे ⇨ यूफोर्बिएसी अगर एरंड कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शेराच्या झाडांपासून लाल रंग मिळतो. शेराचा चीक अंगाला लागल्यास कातडी लाल होते व फोड येतात. हा चीक रेचक व कफनाशक असून दातदुखी, कानदुखी, दमा, कावीळ, उपदंश, संधिवात इत्यादींवर उपयुक्त आहे. पोटात घेतल्यास तो दाहक आणि वांतिकारक ठरतो. चामखीळ, संधिवात, तंत्रिका शूल व दातदुखी यांवर बाहेरून तिळाच्या तेलातून हा चीक लावतात. कोवळ्या फांद्या व मुळे यांचा काढा जठरशूलावर गुणकारी ठरतो. ही वनस्पती मत्स्यविष असून उंदीर-घुशींनाही ती विषारी असते. बिहारमध्ये आंब्याच्या लहान रोपट्यांना प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण देण्याकरिता ती वापरतात. लाकूड हलके, कठीण व बळकट असते. ते किडीपासून सुरक्षित असून तराफे, खेळणी व कोळसा करण्यास वापरतात. कोळसा बंदुकीच्या दारूस उपयुक्त असतो. फांद्यांचे फाटे लावून नवीन लागवड करतात.

परांडेकर, शं. आ.

विलायती शेर : (गु. वेलाटी खरसाणी इं. लेडीज स्लिपर, स्लिपर प्लँट, बर्ड प्लँट, बर्ड कॅक्टस लॅ. पेडिलँथस टिथायमॅलॉइड्स कुल- -यूफोर्बिएसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. १. ५ मी. उंचीचे हे पानझडी झुडूप मूळचे द. अमेरिकेतील असून भारतात ते शोभेकरिता, कुंपणासाठी लावलेले आढळते. खोड चिकाळ, साधारण जाड व हिरवे असते. पाने गर्द हिरवी, मांसल, अंडाकार, टोकदार, काहीशी दातेरी व उन्हाळ्यात झडणारी असतात. फुले लहान असून त्यांची छदमंडले (आवरण) लालभडक वा शेंदरी असतात व ती एप्रिल – जूनमध्ये फांदीच्या शेंड्याला वल्लरीवर येतात. त्यांचा आकार साधारणत: नावेसारखा किंवा सपाता (स्लिपर) सारखा असतो. फुलोरा पेल्यासारखा असतो. त्यातील फुले एकलिंगी, परिदलहीन असतात व किंजपुट किंजधरावर आधारलेला असतो. एका केसरदलाचे एक पुं-पुष्प असते. बोंडफळ त्रिखंडी, पालिभेदी (सिझोकार्पिक), एकबीजी व तडकणारे असते.

हिरव्या-पांढऱ्या पानांचा एक अधिक शोभिवंत प्रकारही विलायती शेरात आढळतो. बागेत वाफ्याच्या कडेने विलायती शेर लावतात. जनावरे ते खात नाहीत म्हणून कुंपणाकरिताही लावतात. लाल फुलोऱ्यामुळे झाडाला शोभा येते. विलायती शेर विशेषतः शैलोद्यानात लावतात. छाट कलमे लावून नवीन लागवड करतात.

विलायती शेराचे मूळ अत्यंत वांतिकारक असून वेस्ट इंडीजमध्ये ते इपेकॅक्युन्हा [→ इपेकॅक] या नावाखाली वापरतात. चीक वांतिकारक, दाहक असून संसर्गजन्य रोगांसंबंधीच्या तकारींवर वापरतात. तसेच चामखिळीवर व श्वेत कुष्ठावरही तो लावतात. चिकात यूफोर्बिन, सेरीन, मिरिसीन, राळ व मेदाम्ल इ. घटक असतात.

पटवर्धन, शां. द.