सालई : (सळई, सालफळी हिं. लुबन, सलई, सालार गु. धूप क. मादीमर सं. धूपम्, शल्लकी, सल्लकी, कुंदुरु इं. इंडियन फ्रँकिंसेन्स, इंडियन ऑलिबॅनम ट्री, इसेन्स ट्री लॅ. बॉस्वेलिया सेराटा कुल-बर्सेरेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक पानझडी वृक्ष. भारतात आसाम व प. बंगालखेरीज इतरत्र सर्वच डोंगराळ व रुक्ष प्रदेशांत (पंजाब, प. हिमालयाचा पायथा, प. द्वीपकल्प, सातपुडा, खानदेश, मध्य भारत, राजस्थान इ.) तो आढळतो. हा सु. ९ मी. उंच वाढत असून त्याचा घेर १·५–१·८ मी. असतो. साल जाड, पिवळट किंवा हिरवट असून तिचे अनियमित पातळ तुकडे सोलून निघतात. सोट (शाखाहीन खोड) जमिनीपासून ३·५०–४·५० मी. उंच असून त्याचा घेर ०·९–१·५० मी. असतो. पाने संयुक्त, असमदली, एकाआड एक, २०–३८ सेंमी., पिसासारखी दलसंख्या १७–३१ असते प्रत्येक दल बिनदेठाचे, अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखे), तळाशी असमात्र (मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंना सारख्या आकाराचे नसलेले), दातेरी (करवती काठाचे), काहीसे लवदार व टोकांना गोलसर असते. सर्व दले समोरासमोर व सर्व पाने फांद्यांच्या टोकांना झुबक्यांनी येतात. दलांच्या किनारीप्रमाणे पूर्वी दोन जाती मानल्या जात होत्या परंतु आता दातेरी किनार व लवदारपणा असल्यास सेराटा प्रकार आणि अखंड किनार व गुळगुळीत पृष्ठभाग असल्यास ग्लॅब्रा प्रकार असे मूळच्या वनस्पतीसंबंधी वर्णन करतात. फुले लहान व पांढरी असून ती पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस मंजरीवर फेब्रुवारी ते जूनपर्यंत येतात. पाने मार्च ते एप्रिलमध्ये गळून नवीन पालवी जूनमध्ये येते. फळे (आठळीयुक्त) त्रिधारी व तीन शकलांनी फुटणारी असून आत तीन हृदयाकृती अष्ठिका (आठळ्या) जुलै ते ऑगस्टमध्ये तयार होतात. बिया चपट्या व लोंबत्या असून अभिवृद्घीस बिया व कलमे वापरतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ बर्सेरेसी (गुग्गूळ) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

सालई(बॉस्वेलिया सेराटा): (अ) पानाफुलोऱ्यांसह फांदी, (आ) फूल, (इ) त्रिधारी फळाचा छेद.उपयोग : सालई वृक्षाचे लाकूड व त्यापासून मिळणारा राळयुक्त पदार्थ ही महत्त्वाची उत्पादने असल्यामुळे त्याला व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे. लाकडातील मध्यकाष्ठ तपकिरी व कमी प्रमाणात असून रसकाष्ठ पांढरट व अधिक प्रमाणात असते. एकूण लाकूड मध्यम प्रतीचे, कठीण व टिकाऊ असून कापण्यास व रंधून साफ करण्यास सोपे जाते. हलक्या प्रतीचे सजावटी सामान, पेट्या, खोकी, फळ्या, तक्ते, अभ्रकाच्या पेट्या, आगकाड्या, खेळणी इत्यादींकरिता आणि कापीव व कोरीव कामांस हे लाकूड चांगले असते. दारूगोळा ठेवण्याच्या पेट्यांकरिता ते फार उपयुक्त असल्याचे आढळले आहे. तसेच ते सरपण व कोळसा या दृष्टीनेही चांगले आहे.

कुंपणास लावलेले मोठ्या फांद्यांचे ठोंब पुढे वाढून अनेक नवीन झाडे बनतात. लाकडातील राळेमुळे ते जळताना धूर होतो. ते लवकर जळते म्हणून जळणास वापरीत नाहीत. वृत्तपत्राच्या कागद कारखान्यांत त्याचा लगदा वापरतात. हा वृक्ष समूहाने वाढत असल्याने याचा पुरवठा भरपूर होतो. भारतातील प्रमुख ठिकाणांहून एकूण लगद्याचा पुरवठा दरवर्षी सु. एक लक्ष टन होतो. याचा पाला गुरांना चारा म्हणून वापरतात.

वृक्षाच्या खोडावर खाचा मारून त्यातून गळणारा रस जमा करतात तो ‘ओलिओ-गम-रेझीन’ (इंडियन ऑलिबॅनम) होय. त्याला कोणी ‘गुग्गूळ’ असेही म्हणतात. तथापि तो विशिष्ट प्रकारचा राळयुक्त पदार्थच असतो. खरा ⇨ गुग्गूळ दुसऱ्या वनस्पतीपासून (कॉनिफोरा मुकूल ) मिळवितात. चरकसंहितेत वैद्यकीय द्रव्यांत तसेच बृहत्‌संहितेतील सुगंधी द्रव्यांतील यादीत ‘गुग्गुलू’ चा निर्देश आढळतो. आयुर्वेदात वातरोगावर त्याचा उपयोग सांगितला आहे हाच वर उल्लेखिलेला खरा गुग्गूळ (सं. गुग्गुल) असून त्याला ‘देवधूप ’ असेही म्हणतात. प्रस्तुतचा सालईतील राळयुक्त पदार्थ चिकट व सोनेरी पिवळा असून कॅनडा बाल्समासारखा दिसतो [⟶ बाल्सम] व तो सुगंधित असतो. त्याला ‘सालई-गुग्गूळ’ म्हणतात. ही राळ लवकर जळते व सुगंध दरवळतो म्हणून हिचा उपयोग धूपाकरिता करतात. ही अनेक मलमांत मिसळतात संधिवातावर लावण्याच्या मलमांत विशेषेकरून घालतात. ही राळ मूत्रल (लघवी साफ करणारी), स्तंभक (आकुंचन करणारी), आर्तवजनक (स्त्रियांचा मासिक स्राव सुरू करणारी), स्वेदकारी (घाम आणणारी) असून कातडीचे विकार व तंत्रिका (मज्जातंतू) विकारांवरही उपयुक्त असते. हिचे कित्येक गुण ⇨ इसेससारखे आहेत. सालई-गुग्गुळापासून औषधोपयोगी तेल काढतात. तेल टर्पेंटाइनासारखे असून त्यात भिन्न राळी विरघळतात. या तेलातील रोगण लवकर सुकते तेल रंगलेपासाठी वापरतात. लोबान, कुंदर किंवा माशगुग्गुळ या नावांनी बाजारात हा राळयुक्त पदार्थ मिळतो. मुळाच्या रसापासून डिंक काढतात. तथापि आर्थिक दृष्ट्या तो लाभदायक नाही.

इंडियन ऑलिबॅनममध्ये प्रतिशत प्रमाणात पाणी १०-११ बाष्पनशील तेल ८-९ रोझीन ५५–५७ गोंद २०–२३ अविद्राव्य भाग ४-५ इ. असतात. गुग्गूळ सरासरीने दरवर्षी एका वृक्षापासून सु. १ किग्रॅ. मिळतो.

पहा : कागद धूप बर्सेरेसी रेझिने.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, 1948 and Vol. II, New Delhi, 1950.

२.काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

३. पदे, शं. दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.

देशपांडे, के. बी. परांडेकर, शं. आ.