फायकोमायसिटीज: (शैवलकवक). हे ⇨ कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींच्या) यूमायकोफायटा (सत्यकवक) विभागातील एका वर्गाचे नाव आहे. फायको = शैवल या  शब्दापासून या वर्गाला हे नाव देण्यात आले आहे कारण त्यातील कवकांचे शैवलांशी [→ शैवले] काही बाबतीत साम्य आहे. या वर्गात सु. १.५०० जाती असून त्यापैकी पुष्कळ जाती शैवले, इतर कवके, बीजधारी वनस्पती, कीटक, मासे व मनुष्य यांवर परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या) आहेत आणि राहिलेल्या सदा (अनिवार्य ) मृतोपजीवी (मृत प्राणी अथवा मृत वनस्पतींवर उपजिवीका करणाऱ्या) आहेत. परजीवी जातींपैकी पुष्कळशा वैकल्पिक परजीवी व काही सदा परजीवी आहेत. तसेच जलवासी (पाण्यात अगर पाण्याच्या आसपास वाढणाऱ्या), जलस्थलवासी (पाण्यात अथवा जमिनीवर ओलीच्या जागी वाढणाऱ्या) व स्थलवासी (जमिनीवर वाढणाऱ्या) अशा सर्व प्रकारच्या जाती या वर्गात आहेत. या वर्गातील खालच्या स्तरावरील (जलवासी) प्रकारांत कवकतंतूंची वाढ फार अल्प प्रमाणात झालेली असते परंतु वरच्या स्तरावरील कवकांत ती तुलनेने पुष्कळच आढळूण येते. या कवकांचे शरीर बहुधा एकाच बहुप्रकल (कोशिकेच्या-पेशीच्या-कार्यावर नियंत्रण ठेवणारे अनेक गोलसर पुंज-प्रकले किंवा केंद्रके-असलेल्या) कोशिकेचे बनलेले असते.

 

या वर्गातील कवके जगाच्या सर्व भागांत जमिनीत अथवा जमिनीवर गोड्या पाण्यात व महासागरांत आढळून येतात.

 

प्रजोत्पादन: या वर्गात अलिंग प्रजोत्पादन प्रामुख्याने आढळून येते. बीजुके (सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) असंख्य असून ती बीजुककोशात तयार होतात. खालच्या स्तरावरील कवकांची अलिंगी बीजुकेही चरबीजुके (प्रकेसलांच्या सूक्ष्म केसासारख्या साधनांच्या साहाय्याने हालचाल करणारी बीजुके) असतात. वरच्या स्तरावरील कवकांची बीजुके अप्रकेसल असून त्यांचा प्रसार हवेतून होतो.

 

सलिंग प्रजोत्पादन आकारवैज्ञानिक दृष्ट्या (सजीवांचा आकार व संरचना या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या दृष्ट्या) दोन सारख्या किंवा भिन्न गंतुकाशयांतील (ज्यात प्रजोत्पादक कोशिका-गंतुके-तयार होतात अशा अवयवांतील) गंतुकांच्या संयोगामुळे होते. भिन्न गंतुकाशयांच्या संयोगामुळे रंदुके अथवा संयुक्त बीजाणू तयार होतात व सारख्या गंतुकाशयांच्या संयोगापासून गंतुबीजुके तयार होतात. रंदुके आणि गंतुबीजुके ही विश्रामी अथवा प्रसुप्त बीजुके असून प्रतिकूल परिस्थितीतही ती दीर्घकाळ (काही वर्षे) प्रसुप्तावस्थेत राहू शकतात.

 

वर्गीकरण: कवकांच्या वर्गीकरणात कवकशास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. पुष्कळ कवकशास्त्राज्ञ फायकोमायसिटीज हा यूमायकोफायटाचाच एक वर्ग समजतात परंतु काही शास्त्रज्ञांनी यूमायकोफायटाची आठ वर्गांत विभागणी केली असून त्यांतील पहिल्या सहा वर्गांच्या समूहाला त्यांनी फायकोमायसिटीज हे समूहवाचक नाव दिले आहे. म्हणजेच त्यांच्या वर्गीकरणात फायकोमायसिटीज या नावाचा वर्ग नाही. जे शास्त्रज्ञ फायकोमायसिटीज हा यूमायकोफायटाचा एक वर्ग मानतात त्यांपैकी काहींच्या मते एक प्रकेसल (युनिफ्लॅजेलेटी), द्विप्रकेसल (बायफ्लॅजेलेटी) व अप्रकेसल (एफ्लॅजेलेटी) असे तीन उपवर्ग आहेत. हे तीन उपवर्ग पूर्वीच्या आर्किमायसिटीज, ऊमायसिटीज आणि झायगोमायसिटीज या उपवर्गांशी मिळतेजुळते आहेत. [→ कवक].

 

एक प्रकेसल उपवर्गांत तीन गण असून त्यांतील कायट्रिडियालीज गणातील सिनकायट्रियमएंडोबायॉटिकम या परजीवी जातीचा विशेष अभ्यास झाला आहे. या जातीच्या कवकांमुळे बटाट्यांवर फोडासारखी वाढ होते.

 

द्विप्रकेसल उपवर्गात चार गण असून त्यांतील पेरोनोस्पोरॅलीज गणातील वैकल्पिक अथवा परजीवी कवकांमुळे सपुष्प वनस्पतींचे फार नुकसान होते. या गणात पिथिएसी, अल्बुजिनेसी व पेरोनोस्पोरेसी ही तीन कुले असून पहिल्यात पिथियमफायटोप्थोरा, दुसऱ्यात अल्बुगो आणि तिसऱ्यात स्क्लेरोस्पोरा, प्लॅस्मोपॅरा, स्यूडोपेरोनोस्पोरा, ब्रिमियापेरोनोस्पोरा या वंशांतील कवकांमुळे वनस्पतींचे निरनिराळे रोग होतात.

 

अप्रकेसल उपवर्गातील बहुसंख्य कवके मृतोपजीवी असून शिळ्या भाकरीवर वाढणारी बुरशी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या बुरशीच्या बीजुककोशांतील बीजुकांचा प्रसार हवेतून होतो. या उपवर्गातील म्यूकोरॅलीज व एंटॉमॉप्थोरॅलीज हे दोन गण आहेत.

 

म्यूकोरॅलीज गणातील बहुसंख्य कवके जैव पदार्थांवर मृतोपजीवी अवस्थेत वाढतात आणि ती जमिनीत व कुजणाऱ्या वनस्पतींवर आढळून येतात. काही शेणावर वाढतात काही जिवंत वनस्पतींच्या ऊतकांवर (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांवर) सौम्य परजीवी असतात, तर काही इतर कवकांवर किंवा प्राण्यांच्या ऊतकांत परजीवी असतात. या गणातील काही वंशांतील कवकांमुळे फायकोमायकोसिस या नावाने ओळखला जाणारा मनुष्याचा रोग उद्‍भवतो. मधुमेहजन्य अम्लरक्तता (रक्ताची अम्लता वाढल्यामुळे निर्माण होणारी अवस्था) असल्यास चेहऱ्यावरील हाडांच्या पोकळ्या, डोळ्याची खोबण, मेंदू, फुप्फुस आणि पचनमार्ग यांमधील ऊतकांच्या रक्तवाहिन्यांच्या अवतीभोवती कवकतंतूंची वाढ होते. ऱ्हायझोपस आर्टोकार्पी जातीच्या कवकांमुळे फणसाची फळे लहान असताना गळून पडतात.

 

एंटॉमॉप्थोरॅलीज गणातील कवके फलांवर अथवा कीटकांवर मृतोपजीवी अथवा परजीवी अवस्थेत आढळून येतात. कीटकांवरील परजीवी कवकांमुळे त्या कीटकांचे जैव नियंत्रण होते. एंटॉमॉप्थोराम्यूसी या जातीच्या परजीवी कवकांमुळे घरातील माश्या मरतात.


 

वनस्पतिरोग: फायकोमायसिटीज वर्गातील कवकांमुळे अनेक वनस्पतिरोग उद्‍भवतात. त्यांतील प्रामुख्याने आढळून येणारे रोग पुढीलप्रमाणे आहेत.

 

आ. १. रोपट्यांची कूज : (अ) निरोगी रोपटे, (आ) रोगट रोपटे.रोपट्यांचीकूज: हा रोग अनेक कवकांमुळे होतो. परंतु प्रामुख्याने त्यांत पि. डीबॅरीयानम, पिॲफोनिडरमेटम आणि पि. मायरिओटिलम ही कवके असतात. रोपे वाफ्यात असताना कोलमडून पडतात. जमिनीच्या वर रोपांच्या बुंध्याशी खोडांत कवकाचा शिरकाव होतो व रोपे प्रथम पिवळी पडतात. खोडाचा भाग सुरकुततो व रोपे जमिनीलगत कोलमडतात. गवताच्या काही जाती वगळता ओषधीय [→ ओषधि] आणि काष्ठमय वनस्पतींच्या सर्व जातींच्या रोपांना हा रोग होऊ शकतो. पुष्कळ वेळा उगवणीपूर्वी या रोगामुळे बी कुजते.

 

उपाय : रोपे वाफ्यात दाटीने न पेरता विरळ पेरतात. पेरणीपूर्वीं बियांना कवकनाशक लावतात. वाफ्यात पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होईल याची काळजी घेणे आवश्यक असते. नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम यांचे संतुलित मिश्रखत दिल्याने रोपांची योग्य प्रकारे वाढ होते आणि जितक्या लवकर रोपे जून होतील तितकी ती रोगकारक कवकाला प्रतिकारक्षम होतात. बियांना लावलेल्या कवकनाशकाचा परिणाम १-२ आठवड्यापेक्षा जास्त टिकत नाही. यासाठी या काळानंतर रोपे मरत असल्यास ताम्रयुक्त कवकनाशकाची फवारणी करून वाफ्यातील जमीन भिजविणे आवश्यक असते.

  

 आल्याचीकूज: हा रोग पि. अँफानिडरमेटम आणि पि. मायरिओटिलम या कवकांमुळे उद्‍भवतो. रोगामुळे पानांची टोके व कडा पिवळ्या पडतात व हळूहळू सर्व पान पिवळे पडते. थोड्याच दिवसात झाडाचे खोड, बुंधा, गड्डे व मुळे सडू लागतात. जमिनीत पाणी साचल्यामुळे, तसेच जास्त पावसामुळे रोगाचे प्रमाण वाढते. रोगप्रसार सडलेल्या गड्ड्यातील व मुळांतील कवकांमार्फत होतो.

 

उपाय : जमिनीतील पाण्याचा निचरा चांगला होईल अशी काळजी घेतात. बेणे ६% पारायुक्त कवकनाशकाच्या विद्रावात बुडवून लावतात. बेणे लावण्यापूर्वी वाफ्यात व बेणे उगवून आल्यावर १५ ते २० दिवसांच्या अंतराने पिकावर बोर्डो मिश्रण फवारतात. [→ आले].

 

आ. २. ज्वारीवरील केवडा : चिरटलेली पानेआ.३. बाजरीवरील केवडा : पर्णमय कणीस ज्वारीवबाजरीवरीलकेवडा: स्क्लेरोस्पोरा वंशातील पुष्कळसे साधर्म्य असलेल्या दोन जातींच्या (स्क्ले. सोरघायस्क्लेग्रॅमिनीकोला) कवकांमुळे पावसाळ्याच्या हंगामात आढळून येणारा हा रोग आहे. कवकाची वाढ पानांच्या खालच्या बाजूवर दिसून येते. पाने पिवळी पडतात. ज्वारीमध्ये पाने वाळून त्याच्या लांब चिरट्या होतात. बाजरीची रोगट पाने वाळतात परंतु त्यांच्या चिरट्या ज्वारीसारख्या ठळक नसतात. तथापि कणसात पर्णमय वाढ होते. त्यामुळे बाजरीच्या बाबतीत या रोगाला ‘हिरवा गोसावी’ किंवा ‘बुवा’ असेही म्हणतात. रोगामुळे कणसांत दाणे भरत नाहीत अथवा भरल्यास ते पोचट राहतात.

 

उपाय : रोगाचा सुरूवात दिसून येताच रोगट झाडे उपटून नष्ट करतात. त्यामुळे रोगप्रसाराला आळा बसतो. [→ ज्वारी बाजरी].

 

आ. ४. द्राक्षावरील केवडा : (अ) रोगट पान, (आ) रोगट फळेद्राक्षावरीलकेवडाकिंवालवभुरी: प्लॅस्मोपॅराव्हिटीकोला या कवकामुळे होणारा हा रोग आहे. उबदार पावसाळी हवामानात व सावलीच्या जागी हा रोग विशेषकरून आढळतो. प्रथम पानांच्या वरील बाजूवर हिरवट पिवळे डाग दिसून येतात व डागांच्या पाठीमागे कवकाची पांढरट वाढ आढळते. कालांतराने हे डाग वाळतात. कोवळ्या घडांवर रोग पडल्यास ते वाळून गळतात.

 

उपाय : एप्रिलमधील छाटणीनंतर मेच्या मध्यावर आणि जून महिन्यात बोर्डो मिश्रण फवारतात. ऑक्टोबरमधील छाटणीत रोगट वेल छाटून बोर्डो मिश्रणाच्या तीन फवारण्या काही दिवसांच्या अंतराने करतात. [→ दाक्ष केवडा रोग (खंड ४, चित्रपत्र १८)].

 


 

आ. ५. बटाट्यावरील करपा : रोगट पानेबटाट्यावरीलकरपा: (लेट ब्‍लाइट). फायटोप्थोराइन्फेस्टॅन्स या कवकामुळे हा रोग होतो. पानांवर प्रथम काळपट तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात आणि ओलसर हवेत त्यांचे आकारमान मोठे होते. ठिपक्यांच्या खालच्या बाजूभोवती कापसासारखी पांढरट रंगाची कवकाची वाढ दिसून येते. थंड हवा मान व ९०% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास हा रोग झपाट्याने फैलावतो. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने कुजतात व रोगट बटाट्यांवर रोगाचे चट्टे आढळून येतात.

 

उपाय : १ % बोर्डो मिश्रण पिकावर फवारतात. [→ बटाटा].

 

नागवेलीचामररोग: फा. पॅरासिटीका या कवकामुळे होणारा हा रोग आहे. रोगांमुळे वेलींच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये वेली एका एकी कोमेजून वाळू लागतात. शेंड्याजवळील पाने गळतात. कालांतराने वेली पिवळ्या पडून मरतात. रोगप्रसार बीजुकांद्वारे जमिनीमधून होतो.

 

उपाय : वेलींच्या लागणीपूर्वी बेणे २ : २ : ५० बोर्डो मिश्रमात बुडवून लावतात. तसेच हे मिश्रण अगर ताम्रयुक्त कवकनाशक पाण्यातून वेलींच्या रांगांमधील जमिनीत दर महिन्याला टाकतात. रोगट वेली दिसून येताच त्या उपटून नष्ट करतात.[ → नागवेली ].

  

 आ. ६. पपईची पायकूजपपईचीखोडकूजकिंवापायकूज: पि. ॲफानिडरमेटम या कवकामुळे खोडाचा जमिनीलगतचा भाग प्रथम कुजू लागतो. पुढे पाने वाळतात व झाड मरते. पाणथळ जागी हा रोग विशेषेकरून आढळून येतो. यासाठी जमिनीतील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्याच्या दृष्टीने विशेषतः पावसाळ्याच्या हंगामात काळजी घेणे आवश्यक असते. [→ पपई].

 

मोसंबीचाडिंक्यारोग : जमिनीत वास्तव्य करणाऱ्या अनेक कवकांमुळे मोसंबीचा डिंक्या रोग उद्‍भवतो. यांपैकी फायटोप्थोरा वंशातील कवकामुळे खोडावरील डिंक्या रोग होतो. खोडाची साल उभ्या दिशेने तडकते अथवा उकलते आणि त्याचबरोबर खोडातून लालसर पिवळ्या रंगाचा (अंबर रंगाचा) चिकट स्त्राव बाहेर पडतो.

 

उपाय : खोडाच्या रोगट भागावरील व त्याभोवतीची साल काढून त्या जागी कार्‌बॉलिक अम्लाचे ५०% द्रावण अथवा २५ ते ३०% क्रिओसोट तेल लावतात. जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करणे आवश्यक असते. झाडाला पाणी देताना बुंध्याभोवती मातीचा ढीग करून आळे पद्धतीने पाणी देतात. कलमे करतेवेळी डोळे उंच बांधतात.[ → मोसंबे].

 

आ. ७. सुपारीचा कोळे रोग : (अ) निरोगी घड (आ) रोगट घड.सुपारीचाकोळेरोग: (महाली रोग अथवा फळांची गळ). फा. ॲरेकी या कवकामुळे होणारा हा सुपारीचा रोग फार नुकसानकारक आहे. जून ते सप्टेंबर या काळात सु. १९० ते ७५० सेंमी पाऊस असलेल्या भागात हा रोग विशेषेकरून आढळून येतो. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत कोवळ्या फळांवर जलासिक्त (पाणी शोषलेले) ठिपके आढळून येतात. आर्द्र हवेत ठिपक्यांचे आकारमान वाढते आणि फळांवर कवकाची पांढऱ्या रंगाची वाढ दिसून येते. कालांतराने अपक्क फळे कुजतात व घडातून गळून पडतात. त्याच बरोबर झाडाचा शेंडा कोमेजून वाळतो.

 

उपाय : जमिनीवर पडलेली रोगट फळे व पाने आणि मेलेली झाडे जाळून नष्ट करतात. मे महिन्यात १% बोर्डो मिश्रणाची पहिली फवारणी करतात व पुन्हा सहा आठवड्यांनी (पाऊस कमी असताना ) दुसरी फवारणी आणि रोगाचे प्रमाण फार असल्यास आणखी फवारण्या करतात. [→ सुपारी].

 

संदर्भ : 1. Bessey, E. A. Morphology and Taxonomy of Fungi, New York, 1964.

          2. Mundkur, B. B. Fungi and Plant Disease, New York, 1961.

          3. Walker, J. C. Plant Pathology, New York. 1969.

 

भागवत, व. य. गोखले, वा. पु.


 

द्राक्षावरील केवडा रोग तांबड्या भोपळ्यावरील केवडा रोग
उसावरील केवडा रोग