बाहवा: (बावा, बहावा हिं. अमलतास गु. गरमाळो क. कक्के सं. आरग्वध, राजतरु, कर्णिकार, हेमपुष्पा, रेचना इं. पर्जिंग कॅसिया, गोल्डन शॉवर, पर्जिंग फिस्‌चुला, पुडिंग पाइप, इंडियन लॅबर्नम लॅ. कॅसिया फिस्‌चुला कुल-लेग्युमिनोजी). सुंदर फुलोऱ्याकरिता सुपरिचित असलेल्या व सरळ खोडाच्या ह्या आकर्षक, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), पानझडी आणि शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) भारतीय वृक्षाचा प्रसार श्रीलंका, मलाया, पाकिस्तान, भारत इ. देशांत असून आफ्रिका, द. अमेरिका व वेस्ट इंडीज येथेही त्याचे स्वाभाविकीकरण झाले आहे म्हणजे बाहेरून आणून लावला असला, तरी तो तेथील स्थानिक वृक्ष असल्याप्रमाणे वाढतो आहे. कोकणात व घाटमाथ्यावरच्या जंगलात तो सामान्यपणे आढळतो. महाभारतात व रामायणात त्याचा कर्णिकार असा उल्लेख झाला असून कौटिलीय अर्थशास्त्रात याचा उपयुक्त वृक्षांच्या यादीत समावेश केला आहे. आयुर्वेदीय ग्रंथांत व संस्कृत वाङ्‌मयातही त्याचा उल्लेख आढळतो. ⇨टाकळा, ⇨तरवड,कासूद इत्यादींच्या कॅसिया या वंशात त्याचा समावेश होत असल्याने त्यांच्याशी बाहव्याचे साम्य आहे. कॅसिया वंशात सु. ५०० जाती असून त्यांपैकी भारतात सु. २४ जाती आढळतात.

बाहव्याचा वृक्ष सु. ६ – १५ मी. उंच व १ – १.५ मी. घेराचा असून साल खरबरीत, पिंगट असते पाने संयुक्त, मोठी, समदली पिसासारखी (२२ – ४० सेंमी. लांब) व दले ४ – ८ जोड्या प्रत्येक दल ५ – १२ सेंमी. लांब असते. पाने नसताना मार्च ते जूनमध्ये पिवळ्या जर्द फुलांच्या मोठ्या, सुंदर लोंबत्या मंजऱ्या येतात. फुले ४ सेंमी. व्यासाची मध्यम आकाराची असून केसरदले १० व काही वंध्य [⟶ फूल]. शिंबा (शेंग) ५० – ६० सेंमी. लांब, २ – २.५ सेंमी. रुंद, गोल दंडाकृती व गर्द पिंगट असते. ती उभी तडकून फुटत नाही. बिया सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) ४० – १०० आडव्या पडद्यांनी परस्परांपासून अलग झालेल्या, काळपट मगजाने (गराने) वेढलेल्या, काळसर पिंगट व साधारण चपट्या असतात. अभिवृद्धी (लागण) बियांनी करतात. फळांतील गोड मगज माकडे व अस्वले आवडीने खातात. वर दिलेली इंग्रजी व संस्कृत नावे अवयवांच्या लक्षणांवरून व गुणांवरून पडलेली आहेत. जातिवाचक लॅटिन नाव फिस्‌चुला (म्हणजे नळी) हे फळाच्या आकारावरून दिलेले आहे. याची सामान्य शारीरिक लक्षणे  ⇨ लेग्युमिनोजीमध्ये (शिंबी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

खोडाची साल ‘सुमारी’ या नावाने ओळखली जाते बाहव्याच्या सालीचा कातडे कमविण्यास उपयोग केल्याने ते नरम होते पण रंग फिका असतो लहान फांद्याच्या शाखांवरील साल वापरल्यास रंगात सुधारणा होते. द. भारतात काही ठिकाणी हीच साल फार वापरली जाते जंगलांतून दरवर्षी सु. १०० ते २०० टन कोवळी साल जमा केली जाते. फळातील मगज पाण्याच्या साहाय्याने काढून व गाळून तो बाष्पीभवनाद्वारे लेपाप्रमाणे बनवितात त्याचा वापर औषधात करतात. त्यात पेक्टीन, हायड्रॉक्सिमिथिल अँथ्रॅक्विनोने व शर्करा यांचे प्रमाण जास्त असते. तो मगज रेचक असतो. लहान मुले व गरोदर स्त्रियांनाही तो देतात.

बाहव्याचे लाकूड उपयुक्त असून ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. ते जड, कठीण व टिकाऊ असून रंधून व घासून गुळगुळीत व चकचकीत होते. ते घरातील खांब, पुलांचे खांब, मुसळे, चाके, नांगर आणि गाड्यांचे भाग, कुऱ्हाडी व खोरी आणि हत्यारे यांचे दांडे इत्यादींकरिता विशेषेकरून वापरले जाते. मुळांची साल, पाने व बिया सारक मुळ्या पौष्टिक, ज्वरनाशक, तीव्र रेचक व पांढऱ्या कोडावर गुणकारी असतात. पाला वाटून गजकर्णावर व बिब्बा उतरल्यावर लावतात. रस्त्याच्या दुतर्फा व बागेत शोभेकरिता हा जलद वाढणारा सुंदर वृक्ष लावतात. तंबाखूला स्वाद आणण्यास फळांतील मगज वापरतात.

संदर्भ :  1. C. S. I. R.The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.

            2. Dastur, J. F. Medicinal Plants of India and Pakistan, Bombay, 1962.

           3. Santapau, H. Common Trees, New Delhi, 1966.

           4. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

परांडेकर, शं. आ.