शॅलॉट (एककंद लसूण) : कंदांचा झुबकाशॅलॉट : (म. एककंद लसूण हिं. एककली लसन, गंदना गु. एककलियो लसण सं. गृञ्जन क्षुद्र लशून लॅ. ॲलियम ॲस्कॅलोनिकम कुल – लिलिएसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही वनस्पती कांदा व लसूण यांच्या ॲलियम प्रजातीतील आहे. या प्रजातीत सुमारे ५०० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त ३० आढळतात. शॅलॉटचे मूलस्थान पॅलेस्टाइनमधील ॲश्केलॉन हे आहे. सोळाव्या शतकात ही जाती इंग्लंडमध्ये नेण्यात आली. भारतात केयदेव (१३६७) व मदनपाल (चौदावे शतक) यांच्या निघूंट ग्रंथांत लसणाचा उल्लेख आला आहे, राजनिघंटूत पंडित नरहरी यांनी (१२३५–१२५० मध्ये) लसूण व एककंद लसूण यांचे गुणधर्म सारखे असल्याचे नमूद केले आहे.

शॅलॉट ही वनस्पती सुमारे ३० सेंमी. उंच, चिवट व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) लहान रोपटे [→ औषधी] असून द.भारतात तिची बागेतून लागवड केलेली आढळते. ह्या वनस्पतीला जमिनीजवळ लहान कोनयुक्त, आयत-टोकदार ५ x २·५ सेंमी., एकत्र जुळलेल्या ४-५ कंदांचा झुबका असतो. प्रत्येक कंदावर साध्या, लहान, आखूड, दंडगोलाकृती, आराकृती व पोकळ पानांचा झुबका असतो. फुलोरा दाट चवरीसारखा [→ पुष्पबंध] व फुले फिकट निळी किंवा लालसर असतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लिलिएसी   कुलात (अथवा पलांडू कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. हे कंद टिकाऊ असून स्वयंपाकात स्वादाकरिता वापरतात त्यांचे लोणचेही करतात ते कांद्यालसणाइतके तिखट नसतात. शॅलॉटची हिरवी कोवळी पाने खातातही. तुपात कंद तळून मधाबरोबर केलेला पाक कामोत्तेजक आहे. कानदुखीवर हा कंद कानात ठेवतात (यावरून ‘कर्णशूल पलांडू’ हे सार्थ नाव बनविलेले आढळते.). विटाळ साफ होण्यास कंद वापरतात. लागवडीकरता बहुधा कंदच वापरतात. खतावलेली, सकस व निचऱ्याची भुसभुशीत जमीन व भरपूर सूर्यप्रकाश पिकाला आवश्यक असतात.

पहा : कांदा लसूण लिलिएसी.                                                                                

परांडेकर, शं. आ.