मिग्नोनेट : (लॅ. रेसेडा ओडोरॅटा कुल-रेसेडेसी). ही सु. १५–६० सेंमी. उंच, वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणारी) आणि फार सुगंधी फुलांची ⇨ ओषधी मूळची आफ्रिकेतील असून यूरोप, इंग्लंड व उ. अमेरिका येथे ही वर्षभर फुले मिळविण्यासाठी व शोभेसाठी भरपूर लागवडीत आहे. ही ईजिप्तमधून प्रथम पॅरिसला व तेथून इंग्लंडला १७४२ मध्ये पाठविली गेली आणि तेथून ती इतरत्र पाठविली गेली. भारतात रेसेडा या तिच्या प्रजातीतील दोनच जातींचा उद्यानांतून प्रसार झाला आहे. एकूण साठ जाती असून रे. ल्यूटिया (इं. डायर्स रॉकेट वेल्ड) ही भारतातील दुसरी जाती आहे. रेसेडेसी या तिच्या कुलात एकूण सत्तर जाती असून त्यांची विभागणी सहा प्रजातींत केली जाते. या कुलांचा अंतर्भाव ऱ्हीडेलीझ गणात करतात. ⇨ क्रुसीफेरी आणि  ⇨ कॅपॅरिडेसी या कुलांशी रेसेडेसीचे आप्तभाव आहेत. 

मिग्नोनेट : (१) फूलांसह फांदी, (२) फूल, (३) फुलाचा उभा छेद, (४) किंजपुटाचा आडवा छेद, (५) फळ, (६) बी (उभा छेद)

रे. ओडोरॅटा या ओषधीला साधी, सोपपर्ण (तळाशी प्रपिंडीय उपांगे असलेली), एकाआड एक, चमच्यासारखी, दीर्घवृत्ताकृती-आयत, अखंड किंवा त्रिखंडी पाने असतात. फुले सच्छद्र (तळाशी लहान उपांगे असलेली), सुगंधी, लहान, पिवळट पांढरी ते नारिंगी वा लाल असून ती लांब फुलोऱ्यांवर [मंजरीवर → पुष्पबंध] फांद्यांच्या टोकाजवळ येतात. ती द्विलिंगी, एकसमात्र (एका उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) असतात संदले (व प्रदले) सहा आणि केसरदले अनेक व लालसर असतात ऊर्ध्वस्थ किंजपुट टोकास उघडा (फुलझाडांत हे फार क्वचित आढळते) व तटलग्न बीजक विन्यास (किंजपुटाच्या आतील भिंतीवर बीजके आधारलेली) असतो. [→ फूल]. बीजके अनेक फळ (बोंड) भोवऱ्यासारखे व त्यावर अनेक उंचवटे असून बी मूत्रपिंडाकृती असते. पक्व फळावरील टोकास असलेल्या ३–६ शिंगासारख्या उंचवट्यामुळे हिला ‘विषाण प्रावर’ व सुगंधी फुलांमुळे ‘सुरभि’ म्हणून ‘विषाण प्रावर-सुरभि’ असे नाव सुचविलेले आढळते.

नवीन वनस्पतीची लागवड बिया लावून करतात. सामान्यपणे कोणत्याही सकस, सुपीक जमिनीत त्यांची वाढ चांगली होते. भरपूर सूर्यप्रकाश व पाण्याचा पुरवठा आवश्यक असतो. योग्य तापमानात वनस्पती वर्षापेक्षा अधिक टिकते. इंग्लंड व अमेरिका येथे ही वनस्पती शीतगृहीत वाढवितात. भारतात हिवाळ्यात सुगंधी फुलांकरिता बागेत, कुंड्यांत व वाफ्यांत लावतात. हिचे अनेक प्रकार उद्यानात आढळतात तथापि मॅचेट, गोल्डन मॅचेट, सनसेट आणि रेड मॉनर्क हे जास्त सुगंधामुळे अधिक लोकप्रिय असून मॅचेट हा लाल फुलांचा मजबूत प्रकार अधिकच पसंत करतात. यूरोपात तो कुंड्यांतून लावतात. फुलांच्या मोसमात त्यांवर मधमाश्यांची गर्दी होते.

ह्या वनस्पतीची मुळे जहाल असून त्यात ०·०३५% बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते त्याला मुळ्यासारखा वास येतो. स्पेनमध्ये मूळ सारक (पोट साफ करणारे), वाजीकर (कामोत्तेजक) व मूत्रल (लघवी साफ करणारे) म्हणून औषधासारखा उपयोग करतात. बियांत ४०% मेदी तेल असते सूज कमी करण्यास बाहेरून बिया लावण्यास वापरतात. रेसेडा प्रजातीतील वनस्पती वेदनाहारक असल्याने त्या अर्थाचे लॅटिन नाव पडले आहे. फुलांपासून सुगंधी बाष्पनशील तेल मिळते त्याला ‘मिग्नोनेट तेल’ म्हणतात. ते सुगंधी द्रव्यांत आणि उच्च प्रकारच्या फ्रेंच अत्तरांत वापरतात. पेट्रोलियम ईथरच्या साहाय्याने व नंतर ऊर्ध्वपातनाने तेल मिळवितात. ते पिवळट व तीव्र सुगंधी असते. 

रे. ल्यूटिओला (इं. डायर्स रॉकेट, वेल्ड) ही सु. ५०–१५० सेंमी. उंच जाती भारतात बागेत लावतात. पंजाबातील टेकड्यांत ही आढळते. हिला पिवळट हिरवी फुले व नंतर वरून खाली तडकत येणारी बोंडे येतात. रेशीम व लोकर यांना गर्द पिवळा रंग देण्यास पूर्वी ही वनस्पती वापरीत. बियांत व शेड्यांकडील भागात ल्यूटिओलीन हे रंगद्रव्य अधिक असते. फुलाखेरीज इतर सर्व भागांत मोहरी तेल असते. बियांत ३०% मेदी तेल असते. वनस्पतीच्या सर्व भागांत मूत्रल, कामोत्तेजक व कृमिनाशक गुण आहेत.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi 1969.

             2. Lawrence G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

             3. Rendle, A. B. The Classification of Flowring plants, Vol, II, Cambridge, 1963.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.