चिमणी -२ : (इरिवेल लॅ. थन्बर्जिया फ्रॅग्रेन्स, कुल-ॲकँथेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वेल बागेत शोभेकरिता (लॅटिन नावाप्रमाणे वासाकरिता नव्हे) लावतात. श्रीलंका, मलाया, फिलिपीन्स व उ. अमेरिका येथे आणि भारतात कोकणात व सह्याद्रीच्या परिसरात आढळते. पाने साधी, संमुख (समोरासमोर) शराकृती व मुख्य शिरा हस्ताकृती असतात. फुले कक्षास्थ (बगलेत) नलिकाकृती, एकएकटी वा जोडीने सप्टेंबर ते नोव्हेंबरात येतात. ती पांढरी शुभ्र व तीन ते चार सेंमी. रुंद असतात. नवीन लागवड बियांपासून करतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲकॅँथेसी  वा वासक कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

पहा : थन्बर्जिया.                                                      

पाटील, शा. दा.