हाडसंधी (सिसम ॲड्नॅटा) : (१) पानाफळांसहित फांदी, (२) बी.हाडसंधि : [नादेन, कोलेझान हिं. हडसंगरी सं. अस्थिसंधी गु. हाडसांखळ लॅ. सिसस (व्हायटिस) ॲड्नॅटा कुल-व्हायटेसी]. ही ओषधी प्रतानयुक्त मोठी कांडवेली च्या प्रजातीतील वेल असून कित्येक लक्षणांत या दोन्हींत साम्य आढळते. सिसस प्रजातीमध्ये सु. ३०० जाती असून त्यांपैकी ७ जाती भारतात आढळतात. या वेलीचा आढळ सस.पासून सु. ७५० मी. उंचीपर्यंत असून तिचा प्रसार पश्चिम हिमालयातील गढवाल ते आसाम, सिल्हेट, पश्चिम बंगाल व पश्चिम द्वीपकल्प इ. प्रदेशांत आहे शिवाय जावा, बोर्निओ, फिलिपीन्स व श्रीलंका येथेही ती आढळते.

 

हाडसंधी ही लवयुक्त प्रतानरोही वेल सु. १० मी. उंचीपर्यंत वाढते. तिचे खोड त्रिधारी, मऊ व मांसल असून प्रताने द्विखंड पाने साधी, सोपपर्ण, मोठी (७–१२ ? ५–८ सेंमी.), तळाशी हृदयाकृती, टोकदार आणि दोन्ही बाजूंना ३०–३५ दातेरी कडा असून ती लांब देठाची (२.५–१२ सेंमी.) असतात. फुले लहान, ३ मिमी. व्यासाची, हिरवट पिवळी व जांभळट रंगाची छटा असलेली असून डिसेंबरमध्ये शाखित चामरयुक्त वल्लरीवर येतात मृदुफळ लहान, गोलसर, मगजयुक्त, काळे, एकबीजी ( क्वचित द्विबीजी) व १ सेंमी. व्यासाचे बी लहान आणि मऊ असून त्यावर कोनीय खाचा असतात. खोड व फुलोरा यांवर शेंदरी लव असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे व्हायटेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. हिची अभिवृद्धी वेलीचा फाटा लावून करतात.

 

हाडसंधी वनस्पतीची मुळे व ग्रंथिक्षोड उपयुक्त असून वाढलेल्या ग्रंथिक्षोडापासून काढा तयार करतात. सुके कंद मूत्रल, रक्तशुद्धिकारक व आरोग्य पुनःस्थापक असतात. पानांचा अर्क मुतखड्यावर उपयुक्त आहे. मोडलेल्या हाडावर खोड ठेचून तीन दिवस बांधतात. मुळांचे चूर्ण गरम करून कापलेल्या भागांवर किंवा अस्थिभंगावर लावतात. सर्व वातरोगावर ही वनस्पती उपयुक्त आहे. बांगला देशामध्ये या वनस्पतीचे पारंपरिकउपयोग आहेत. तिचा उपयोग केसतूट, जखमा, अपस्मार, ताप, विषबाधा, जठर अर्बुद, कावीळ, संधिरोग, फेफरे, सर्पदंश इत्यादींवर करतात. त्रिधारीऐवजी चौधारी कांडवेलही वापरतात.

परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.