भामुर्डी : (निमुर्डी, बुरंडो हिं. व म. जंगली मुळी, कुकुर्बंदा हिं. कक्रोदा गु. कलहाड सं. कुकुर्द्र,

भामुर्डी : पाने व फुलोरे यांसह फांदी

मृदुच्छदा, ताम्रचूडा लॅ.ब्लुमिया लॅसेरा कुल-कंपॉझिटी). टर्पेंटाइनसारखा उग्र वास येणारी ही वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारी) ⇨ औषधी भारतात सर्वत्र सपाट प्रदेशात विशेषतः भातशेतांच्या आसपास आणि अमेरिकेशिवाय इतर उष्ण कटिबंधातील देशांत आढळते. खोड राखी रंगाचे, सरळ, ०.३-०.९ मी. उंच, लवदार व ग्रंथीयुक्त असून त्यावर एकाआड एक साधी काहीशी वीणाकृती, खालची देठ असलेली, काहीशी विभागलेली आणि वरची बिनदेठाची, लांबट गोलसर आणि दोन्ही बाजूंस लवदार व तीक्ष्ण दातेरी किनारीची पाने असतात. पानांच्या बगलेत वल्लरीवर वा फांद्यांच्या टोकास शाखायुक्त फुलोऱ्यावर [परिमंजरीवर⟶ पुष्पवंध] स्तबक प्रकारचे (६-८ मिमी. व्यासाचे) लहान पिवळट फुलोरे जानेवारी ते एप्रिलमध्ये येतात छंदमंडले दाट लवदार बाहेरची छदे हिरवट लंबगोल व आतील रुक्ष व रेषाकृती, संवर्त पांढऱ्या केसांचा झुबका [⟶ फूल]. संस्कृत्स्न [⟶ फळ] प्रकारचे रुक्ष एकबीजी फळ लहान, आयात आणि काहीसे चौकोनी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कंपॉझिटीत (सूर्यफूल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

वनस्पतीचे सर्व भाग तिखट, उष्ण व कडू असतात. पानांचा रस कृमीचा नाश करणारा, स्तंभक (आकुंचन करणारा), ज्वरनाशी, मूत्रल (लघवी साफ करणारा) असतो काळ्या मिरीबरोबर रस घेतल्यास रक्ती मूळव्याध नाहीशी होते. मूळ काळ्या मिरीबरोबर पटकीवर देतात. तोंडात मुळाचा तुकडा धरल्यास मुखरोग कमी होतात. दाह, तहान , ताप, रक्त विकार, कफ इत्यादींवर ही वनस्पती उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात वर्णिलेले आहे. ह्या वनस्पतीत ०.०८५% बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. त्याचा उपयोग कापूर उद्योगात करतात, कारण तेलात ‘ब्लुमिया कॅम्फर’ असते. भामुर्डीच्या वंशात (ब्लुमियात) एकूण सु. ८० जाती असून त्यांपैकी सु. ३५ भारतात (एच्.सांतापाव यांच्या मते एकूण ७५ जातींपैकी 30 भारतात आढळतात. अनेक जातीत बाष्पनशील तेल असते. विशेषतः ब्लु. बालसमीफेरा पासून ‘नागी’ कापूर मिळतो.

पहा: कंपॉझिट कापूर.

संदर्भ : Kritikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, Delhi, 1975.

आफळे, पुष्पलता द. परांडेकर, शं. आ.