पुत्रजीवी : (पुत्रवंती, जीवपुत्रक,जीवनपुत्र हिं. जयपुत  क. पुत्रंजी सं. पुत्रजीव  इं. चाइल्ड लाइफ ट्री, इंडीयन ॲम्युलेट प्लँट लॅ.पुत्रंजीवा रॉक्सबर्घाय कुल-यूफोर्बिएसी). सु. १८ मी. उंच व २ मी. घेर असलेला हा सदापर्णी व लोंबत्या फांद्यांचा वृक्ष भारतातील उष्ण भागांत व गर्द जंगलांत ७५० मी. उंचीपर्यंत आढळतो. हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेस व दक्षिणेस पेगू ते श्रीलंकेपर्यंत त्याचा प्रसार झाला आहे. कोकण व कारवार भागांत तो सामान्यपणे आढळतो. साल गर्द करडी करडी पण कोवळेपणी पांढुरकी, ⇨ त्वक्षायुक्त असून तीवर असंख्य आडवी वल्करंध्रे [→वल्क] दिसतात. पाने सोपपर्ण (उपपर्णे असलेली), साधी, ५–१० X २–४ सेंमी., दीर्घवृत्ताकृती-आयत, कडेला तरंगित, दोन्ही टोकांस निमुळती, काहीशी चिवट, गर्द हिरवी व चकचकीत असून त्यांच्या बगलेत एकलिंगी, लहान, पिवळट फुले मार्च ते मेमध्ये येतात  पिवळट पुं-पुष्पे अनेक गोलसर झुबक्यांवर व त्यांत केसरदले १–४ स-पुष्पे हिरवी, एकाकी किंवा

पुत्रजीवीः (१) पुं-पुष्पांच्या फुलो-यांसह फांदी, (२) पुं-पुष्प,(३) केसदल, (४)स्त्री-पुष्प, (६) किंजपुटाचा आडवा छेद, (७) फळांसह फांदी, (८) आठळी.

दोन-तीन एकत्र पण भिन्न झाडांवर येतात. अश्मगर्भी (आठळी असलेले) फळ लांबट गोलसर, गुळगुळीत, पांढरे, फार कठीण व एकबीजी, १५–१८ मिमी. असून ते पुढच्या फेब्रुवारीत पिकते. बीजे सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेली) इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨यूफोर्बिएसी कुलात (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. हरणे व वटवाघळे यांना फळे आवडतात व बियांचा प्रसारही तीच करतात. नवीन लागवड बियांनी करतात. सावली व शोभा यांकरिता ही झाडे बागेत, कुंपणाकडेने व रस्त्यांच्या दुतर्फा लावतात. ही वनस्पती सुगंधी, शीतकर, तिखट, कामोत्तेजक, सारक व मूत्रल असून डोळ्यांस हितकारक आहे. पित्त, तहान, दाह व हत्ती रोग यांवर ती गुणकारी आहे. लाकुड करडे, मध्यम कठीण, जड व टिकऊ असून घरबांधणी, शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे व कातीव काम इत्यादींसाठी वापरतात. पानांचा चारा जनावरांना खाऊ घालतात. बियांच्या जपमाळा करतात व लहान कंठमाळा करुन मुलांच्या गळ्यात घालतात त्यामुळे मुलांना निरोगी जीवन लाभते अशी समजूत आहे तसेच पुत्रप्राप्तीसाठीही स्त्रिया त्या माळा गळ्यात घालतात व त्यावरूनच वर दिलेली नावे पडली आहेत. बियांपासून भुरकट रंगाचे स्निग्ध व तिखट वासाचे तेल काढतात व ते दिव्यात जाळण्यासाठी वापरतात. पाने व फळे यांचा काढा पडसे, ज्वर व संधिवात   यांवर देतात.

जमदाडे, ज.वि.