घोडवेल : (१) फुलोरा, (२) पान, (३) शेंग.

घोडवेल : (दारी हिं. बिलाइकंद; गु. विदारीकंद; क. गुमदिगिड; सं. इक्षुगंधा; इं. इंडियन कुडझू; लॅ. प्युरॅरिया ट्युबरोजा, कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). ⇨ कुडझूची ही तिसरी जाती मोठी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), महालता असून ती भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते. काष्ठयुक्त खोडाचा व्यास सु. १२ सेंमी. असून त्रिदली पाने, मोठी मांसल मुळे आणि इतर सामान्य लक्षणे ‘कुडझू’ मध्ये वर्णन केलेल्या दोन जातींप्रमाणेच असतात फुलोरे १५–३० सेंमी., फुले निळी किंवा जांभळी शेंगा ५–७ सेंमी, लांब व ३–६ बिया असतात. भारतातील काही ठिकाणी (पंजाब, प. उत्तर प्रदेश, मध्य भारत) हिची लागवड विशेषतः जमिनीची सुधारणा  होण्यास व तिचे स्थैर्य वाढविण्यास अधिक फायदेशीर असल्याचे आढळले आहे. बियांचे उत्पादन बरेच होते व मुळांची वाढही (३०—६० × २५—३० सेंमी.) चांगली होते (वजन ३५ किग्रॅ.)मुळांची चव ज्येष्ठमधाप्रमाणे असून ती शिजवून किंवा कच्चीच खातात. घोड्यांना व शिंगरांनाही खाऊ घालतात. मुळांपासून स्टार्च काढतात, पाला गुरांना व घोड्यांना चारतात. मुळांत आणि पानांत कार्बोहायड्रेटे, प्रथिने, शर्करा, तंतू इ. भरपूर प्रमाणात असतात. मुळे शामक, दुग्धवर्धक आणि ज्वरात तृषाशामक असतात. सोलून व चुरगळून सुजेवर लावतात. सुक्या मुळांचे उभे कापलेले बिनसालीचे सपाट, पांढरट काप बाजारात मिळतात. त्यांना विचित्र वास व गोडसर चव असते.

पहा : कुडझू; लेग्युमिनोजी.

परांडेकर, शं. आ.