हायड्रिला (हायड्रिला व्हर्टिसिलाटा) : (१) ग्रंथिक्षोडासहित वनस्पती, (२) नर फूल, (३) मादी फूल, (४) दातेरी कडा असलेले पान, (५) तुरिऑन.हायड्रिला : (इं. वॉटर थाइम, वॉटर वीड लॅ. हायड्रिला व्हर्टिसिलाटा कुल-हायड्रोकॅरिटेसी). ही वेलीसारखी ओषधी बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) निमग्न जलवनस्पती आहे. ती मूळची आशियामधील उष्ण प्रदेशातील असावी. तिचा आढळ यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक बेटे, आफ्रिका, दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका येथे आहे.

 

 हायड्रिला वनस्पतीचे खोड अनेक फांद्यांनी मूलक्षोडांतून पसरलेले असते. मूलक्षोडांवर लहान ग्रंथिक्षोड असतात. मूलक्षोडाच्या पर्वातून आणि फांद्यांतून आगंतुक मुळे फुटतात. पाने अवृंत, रेषीय किंवा कुंतसम–४ मिमी. रुंद व ६–२० मिमी. लांब–८ च्या गटात मंडलात असतात. पानांना दातेरी कडा असून त्या स्पष्ट-पणे दिसून येतात. मुळे बारीक असूनवि भा ग ले लीन स ता त. तीटो का व र अं डा भ ग्रंथिक्षोड विकसित करतात. ग्रंथिक्षोड टणक, पांढरा ते तपकिरी-काळ्या रंगाचा आणि १९ मिमी. लांब असतो. नर व मादी फुले लांब धाग्यासारख्या (दोऱ्यासारख्या) पुष्पनलिकांवर असून ती पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. प्रदले व संदले पारभासी, पांढऱ्या ते लाल रंगाची असतात. नर फुले २ मिमी. लांब असून त्यामध्ये ३ प्रदले व ३ संदले असतात. पक्वता आल्यावर झुडपापासून ती वेगळी होतात आणि पाण्यावर तरंगतात व तेथे परागसिंचन करतात. उत्तर अमेरिकेत एकत्रलिंगी (नर व मादी फुले एकाच वनस्पतीवर असतात) आणि एकलिंगी (नर व मादीफुले वेगवेगळ्या वनस्पतींवर येतात) असे दोन्ही हायड्रिलाचे प्रकार आढळतात. फळे अरुंद, लंबगोलाकार आणि मऊ किंवा कधीकधी काटे असलेली असतात.

 

 कॅनडियन वॉटर वीड (एलोडिया कॅनडेन्सिस) या वनस्पतीला कधीकधी हायड्रिला समजण्याचा गोंधळ होतो. या जातीचा आढळ मध्य व उत्तर अमेरिका आणि कॅनडाच्या काही भागांत आहे. पानांच्या मंडलावरून यादोन प्रजातींत भेद करता येतो कॅनडियन वॉटर वीडच्या मंडलात फक्ततीन पानांचा समावेश असतो.

 

 हायड्रिला वनस्पती स्थिर अथवा संथ वाहणाऱ्या पाण्यात वाढते. ज्या परिस्थितीत इतर वनस्पती टिकू शकत नाहीत त्या प्रकारच्या परिस्थितीत ही तग धरू शकते उदा., कमी प्रकाश, मोठ्या प्रमाणावर पाण्यातील घनकचरा, कोरडा काळ आणि अतिउष्ण तापमान इत्यादी. हायड्रिला पाण्याच्या पृष्ठभागावर गालिच्यासारखी (चटईसारखी) पसरलेली असते. त्यामुळे कालवे, धरणे, शक्ति-संयंत्रे आणि इतर जल नियंत्रण संरचनांवर दुष्परिणाम होतो. नौकायन व मासेमारी या उद्योगांवर देखील तिच्या वाढीचा दुष्परिणाम होतो. दक्षिण कॅरोलायना (अमेरिका) येथील मौल्ट्री धरणा-वरील सेंट स्टीफन जलविद्युत् केंद्र तिच्या प्रादुर्भावामुळे बंद करावे लागले. ऊर्जानिर्मिती केंद्राला चार दशलक्ष डॉलरचा तोटा झाला. तसेच तिच्या नियंत्रणासाठी १.२ दशलक्ष डॉलर खर्च झाला.

 

 पारिस्थितिकीय प्रभाव : हायड्रिला आक्रमकपणे वाढणारी जलवनस्पती आहे. ती मूळ स्थानिक जलवनस्पतींपेक्षा अधिक वेगाने वाढते. वनस्पतीच्या विविध भागांद्वारे तिचे पुनर्जनन होते. ती पाण्याच्या पृष्ठभागावर दाट चटईसारखी पसरते व सूर्यप्रकाश पाण्यातील इतर वनस्पतीपर्यंत पोहोचू देत नाही, ज्यामुळे त्यांची वाढ होत नाही. तिच्या पर्याक्रमणामुळे स्थानिक वनस्पती प्रजातींचे बीजोत्पादन होत नाही,त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होते. तिच्यामुळे फायटोप्लँक्टनाच्या अधिवास संरचनेत देखील बदल होतो. ह्या आक्रमणामुळे माशांच्या संख्येवर हानिकारक परिणाम होतो. रात्री ती मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय-ऑक्साइडाचे उत्सर्जन करते, त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनाची पातळी खूप कमी होते व मासे खूप काळ त्याचा सामना करू शकतनाहीत. परिणामी ते मृत पावतात. तसेच तिच्यामुळे अनेक प्रकारच्या डासांच्या प्रजातींना अधिवास उपलब्ध होतो. त्यामुळे डासांमार्फत होणारे आजार बळावतात.

 

 हायड्रिला वनस्पतीच्या पर्याक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह संथ होतो. त्यामुळे पाण्याचा दर्जा खालावतो, अवसादनाची गती वाढते आणि पाण्याचे तापमान वाढते. पाण्याच्या पोषक घटकांवरही विपरीत परिणाम होतो. हायड्रिला काही विषारी नील-हरित शैवालांच्या वाढीस देखील मदतकरते. ह्या विषारी हायड्रिला कारंड या पक्ष्याचे खाद्य आहे. या कारंडांची शिकार गरुड करतात व त्यांतील विषामुळे गरुड मरतात.

 

 हायड्रिला वनस्पतीचे लैंगिक प्रजनन बीजापासून आणि अलैंगिक( शाकीय) प्रजनन ग्रंथिक्षोड, तुरिऑन (कक्षस्थ पर्णमुकुल) व वनस्पतीचे इतर भाग यांपासून होते. तुरिऑन लहान व वजनाने हलके असल्याने पसरण्यासाठी योग्य असतात. ग्रंथिक्षोड मूलक्षोडावर वाढतात, ते वजनाने जड असून हिवाळ्यात टिकून राहण्यास योग्य झालेले असतात. त्यांत मोठ्या प्रमाणात स्टार्च असते. हायड्रिला सुव्यवस्थित जलीय समूह करण्याबद्दल ओळखली जाते. यांत्रिकपणे निर्माण झालेल्या अव्यवस्थेमुळे वा बिघाडा-मुळे तिच्या स्थिरीकरणाच्या शक्यता वाढतात. ग्रंथिक्षोड पाण्यातील प्रवाहात टाकल्यास तग धरून राहतात आणि पाण्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात वाहून नेले जातात. मानवी हस्तक्षेपामुळे तसेच नावा अथवा जहाजांना मूलक्षोड चिकटून इतर भागात तिचा प्रसार होऊ शकतो.

 

 हायड्रिलाच्या पुनरुत्पादनात बीजोत्पादनाचे फारसे महत्त्व नाही. ग्रंथिक्षोड व तुरिऑन पूर्णपणे अंधार असलेल्या जागेत अंकुरतात. अधिकतम अंकुरण कमी तीव्रता असणाऱ्या सूर्यप्रकाशात होते.

 

 विविध प्रकारच्या जलीय अधिवासात हायड्रिलाची वाढ होते. कमी वा अधिक दोन्ही प्रकारची पोषकतत्त्वे असलेल्या पाण्यात ती वाढते. स्वच्छ व ताज्या पाण्यात तिची वाढ चांगली होते, परंतु कमी अम्लतेत ती तग धरू शकते. तसेच विविध पीएच मूल्य (सामू) असणाऱ्या पाण्यातही वाढते, परंतु पीएच मूल्य सात असणाऱ्या पाण्यात ती सर्वोत्तम रीत्या वाढते. उष्ण हवामान असलेल्या प्रदेशांत तिची वाढ अधिक होते. तसेच कमी तापमानात (१०.५° से.) देखील तिची प्रकाशसंश्लेषणक्षमता लक्षणीय असते.

 

 हायड्रिला वनस्पतीचे नियंत्रण करणे अतिशय क्लिष्ट बाब आहे. यामध्ये यांत्रिक निष्कासन, जैविक नियंत्रण तसेच रसायनांचा व वनस्पति-रोधकांचा वापर इ. गोष्टी येतात. हायड्रिलाचे सहजपणे खंडन होते. यांत्रिक नियंत्रणाद्वारे नष्ट केलेली वनस्पती पूर्णपणे निघत नाही. उलट त्याद्वारे हायड्रिलाचे पुनर्स्थापन होण्यास मदतच होते. हायड्रिलाच्या नियंत्रणासाठी टोका, शैवले, पाने कुरतडणाऱ्या माश्या व पतंग यांच्या अनेक प्रजातींचा उपयोग करण्यात येत आहे. (चित्रपत्र).पहा : जलवनस्पति हायड्रोकॅरिटेसी. 

वाघ, नितिन भरत