पाइन : (लॅपायनस कुल पायनेसी). काही असामान्य वृक्षांचे इंग्रजी नाव. प्रकटबीज वनस्पतींपैकी [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] शंकुधारी अथवा शंकुमंत [⟶ कॉनिफेरेलीझ] गणात पायनेसी (ॲबिटेसी) हे सर्वांत मोठे कुल असून पाइन वृक्षांचा समावेश असलेले पायनस  हे त्यातील प्रमुख वंशाचे शास्त्रीय नाव आहे. या वंशाशिवाय सीड्रस [⟶ सीडर ], लॅरिक्स [⟶ लार्च], ॲबिस, पिसिया  इ. दहा वंश त्याच कुलात अंतर्भूत केलेले असून त्यांच्या एकूण सु. २५० जाती आहेत. पायनस वंशात सु. ७५–१०५ जाती असून त्यांचा प्रसार बव्हुंशी उ. गोलार्धातच आहे. भारतात त्यांपैकी फक्त चार किंवा पाच जाती नैसर्गिक अवस्थेत आढळतात : पायनस जिरार्डियाना (चीड, चिलगोझा), पा. इन्सुलॅरिस अथवा पा.खासिया पा.लागिफोलिया अथवा पा.रॉक्सबर्घाय (चिर, चिल), पा.एक्सेल्सा अथवा पा.ग्रिफिथाय वा पा. वालिचियाना (कैल, ब्ल्यू पाइन). मध्य व प. हिमालयात सु. १,५५० मी. किंवा अधिक उंचीवर यांचे नैसर्गिक वसतिस्थान आहे. यांशिवाय पा. नायग्रा (ऑस्ट्रियन पाइन) व पा.सिल्व्हेस्ट्रस (स्कॉच पाइन) या परकीय जातीही भारतात सामान्यपणे दिसतात. कुलू, निलगिरी, श्रीनगर, मनाली, डेहराडून, समुंदर इ. ठिकाणी सु. १०–१२ आयात जाती शोभेकरिता व विशेष उपयोगाकरिता लावलेल्या आढळतात.

आ.१ पाइन : (अ) पुं-व स्त्री-शंकूंसह फांदी : (१) पुं-शंकू, (२) स्त्री-शंकू, (३) ऱ्हस्व प्ररोह, (४) पाने, (५) खवले (आ) पुं-शंकू: (१) खवले. (२) लघुबीजुककोश (इ) स्त्री-शंकू (ई) गुरू बीजुकपर्णे : (१) छद, (२) बीजुकपर्ण (शल्क), (३) बीजक (उ) लघुबीजकपर्णाचा उभा छेद (ऊ) सपक्ष पराग (ए) सपक्ष बीज.

पाइनची बहुतेक झाडे मोठे सदापर्णी वृक्ष असून काही झुडपेही आहेत. वृक्षांचे खोड सु. २५–६० मी. उंच आणि गोलसर खांबाप्रमाणे सरळ असून त्यावर साधारण जाड खवल्यांनी सोलून जाणारी साल असते. खोड व लांब फांद्यांवर (दीर्घ प्ररोहांवर) फक्त खवल्यासारखी पाने (शल्कपर्णे) असून खोडाच्या टोकाजवळ खवल्यांच्या बगलेतून नवीन लांब फांद्या दरवर्षी येतात. त्यांच्या मंडलाकार मांडणीमुळे व खालून वर लांबी कमी होत गेल्याने लहान वृक्ष त्रिकोनी व आकर्षक दिसतात. पुढे पुढे खालच्या फांद्यांच्या नाशामुळे फक्त वरच्या फांद्या राहतात. व वृक्षाला छत्रासारखा आकार येतो. या फांद्यांच्या झुबक्यातून खोडाची टोकावरची (अग्रस्थ) कळी अनिर्बंधपणे वाढत राहिल्याने खोड सलगपणे सरळ (एकपद) वाढत राहते. लांब फांद्यांवर मर्यादित वाढीच्या आखूड फांद्या (ऱ्हस्व प्ररोह) खवल्यांच्या बगलेत येतात. त्यावर हिरव्या, लांब आणि बारीक जाडसर सुईप्रमाणे (सूच्याकृती) २–५ (क्वचित एक) पानांचा झुबका येतो तथापि त्यांची मांडणी एकाआड एक असते (आ. १). सर्वच पाने एकदम गळून पडत नाहीत परंतु अनियमितपणे सर्वच ऱ्हस्व प्ररोह मात्र गळून पडतात. बीज रुजल्यावर आरंभापासून वाढत आलेले प्रधानमूळ सतत वाढत राहते व त्यावरच्या अनेक शाखा व उपशाखा यांमुळे सामान्य द्विदलिकित फुलझाडांतल्या प्रमाणे प्रधानमूल तंत्र (प्रमुख जाड मूळ आणि त्याच्या फांद्या यांनी बनलेला मुळांचा विस्तार) बनते मात्र मुळे फार खोल जात नाहीत.

आ. २. पानाचा आडवा छेद : (१) अपित्वचा, (२) त्वग्रंध्रे, (३) अभित्वचा, (४) मध्योतक, (५) मध्यशीर, (६) संचरणोतक, (७) रेझीन-नलिका.शारीर : पाइनच्या झाडांची शारीरिक अंतर्रचना सामान्यपणे फुलझाडांपैकी द्विदलिकित गटातील वनस्पतींत आढळते त्याच प्रकारची असते परंतु काही महत्त्वाचे फरकही आढळतात. मुळांचा व कवकतंतूंचा निकट संपर्क [संकवक ⟶ शवोपजीवन] आल्यामुळे व मुळांवरील केसांचे कार्य कवकतंतूंनी केल्यामुळे मूलकेशांचा अभाव असतो. खोडांत मूळ प्रारंभिक वाढ पूर्ण झाल्यावर नवीन द्वितीयक वाढ होते व त्यांची जाडी वाढते. खोडातील वार्षिक वाढ वलयांच्या स्वरूपात होते [⟶ शारीर, वनस्पतींचे] मध्यत्वचेत रेझिनाने भरलेल्या नलिका, प्रकाष्ठात (पाण्याची ने-आण करणाऱ्या घटकांत) काष्ठ-सूत्रे (लांबट, कठीण तंतूसारख्या मृत घन कोशिका म्हणजे पेशी) आणि वाहिकांवर (लांबट, कठीण व मृत पण वाहक कोशिकांवर) अनुलिप्त खाचा (वर्तुळाने वेढलेले कोशिकावरणाचे पातळ ठिपक्यासारखे भाग) असतात. मुळातील ⇨ अंतस्त्वचेत टॅनीन व प्रकाष्ठाभोवती रेझीन-नलिका असतात. पानावर जाड ⇨ अपित्वचा (सर्वांत बाहेरचे आवरण) आणि त्यावरील खाचांत असणारी ⇨ त्वगंध्रे (छिद्रे), ⇨ अभित्वचेचे (अपित्वचेखालील कोशिकांच्या थरांचे) दोन-तीन थर, विशेष प्रकारच्या मध्योतकात (दोन अपित्वचांच्या थरांमधील सर्व कोशिकांच्या थरात) फारच पोकळ्या, दोन मध्यावर्ती वाहक वृंद (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणारे जुडगे), रेझीन-नलिका इ. लक्षणे आढळतात ⇨ सायकसच्या झाडाप्रमाणे येथेही पाणी व अन्नरसाची ने-आण करणारे विशेष प्रकारचे कोशिकांचे समूह (संचरणोतक) पानात असून त्याभोवती अंतस्त्वचेचे वर्तुळ असते (आ.२).


आ.३ बीजकाचा उभा छेद:(१)बीजरंध्र, (२)आवरण, (३)परागनलिका, (४)प्रदेह, (५)पुं-गुंतुक, (६)अंदुककलश, (७)स्त्री-गंतुकधारी, (८) अंदुक.

प्रजोत्पादन : या कार्यास विशेषत्व पावलेले अवयव (लघुबीजुकपर्णे व गुरूबीजुकपर्णे) इतर प्रकटबीजी वनस्पतीतल्याप्रमाणे शंकूसारख्या इंद्रियात गोवलेले असतात (आ.१). शंकूंना कोणी फुलांशी तर कोणी फुलोऱ्याशी [⟶ पुष्पबंध] तुल्य मानले आहे तसेच बीजुकपर्णांना फुलातील केसरदलांशी व किंजलदलांशी अथवा फुलोऱ्यातील परिदले नसलेल्या फुलाशी तुल्य मानले आहे. पुं- शंकू व स्त्री-शंकू एकाच झाडावर येतात व ते क्विचत काटेरी असतात. काही अपवादात्मक जातींत एका शंकूत दोन प्रकारची बीजुकपर्णे येतात. शंकूमध्ये बीजुकपर्णे सर्पिल पद्धतीने (एकाआड एक) अक्षावर मांडलेली असतात पुं-. शंकूत प्रत्येक लघुबीजुकपर्णाच्या खालच्या बाजूस दोन लघुबीजुककोश [परागकोश ⟶ पराग] असतात व त्या प्रत्येकात असंख्य सपक्ष (पंखधारी) लघुबीजुके (परागकण) तयार होतात. स्त्री-शंकूतील अक्षावर अनेक सच्छद व खवल्यासारखी गुरूबीजुकपर्णे (किंजदले) असून त्या प्रत्येकावर दोन गुरूबीजुककोश (बीजके) असतात ह्या खवल्यासारख्या अवयवांना गुरूबीजुकधारी शल्क (खवले) असेही म्हणतात. गुरूबीजुककोशाचे तोंड (बीजकरंध्र) अक्षाकडे वळलेले असते. प्रत्येक बीजकात एक गुरूबीजुक अधिक विकास पावून त्यात अनेककोशिका स्त्री-गंतुकधारी (प्रजोत्पादक अवयव धारण करणारी पिढी) व त्यात दोन अंदुककलश (प्रजोत्पादक स्त्री-कोशिका असणारा सूक्ष्म अवयव) तयार होतात नेचाभ [⟶ वनस्पती, वाहिनीवंत अबीजी विभाग] पादपाशी (वनस्पतिसमूहाशी) तुलना केल्यास याची संरचना ऱ्हसित (ऱ्हास पावलेली) असते. बीजकात पराग तात्पुरते साठविणारी पोकळी (परागसंपुट) नसते प्रत्येक अंदुक कलशात एकच अंदुक (स्त्री-कोशिका) असते (आ. ३). पुं-शंकू पक्क झाल्यावर लघुबीजुककोशातून बाहेर पडलेली असंख्य लघुबीजुके (पराग) वाऱ्याने पसरविली जातात व त्यापैकी काही बीजकातून स्त्रवणाऱ्या श्लेष्मक (बुळबुळीत) पदार्थाच्या थेंबात सापडतात आणि ⇨  परागण  घडून येते नंतर ती तेथे रुजतात व त्यातून निघणारी पराग-नलिका बीजकात वाढते (आ. ३). सायकसगिंको [⟶ गिंकोएलीझ] या वृक्षांच्याप्रमाणे पाइनच्या जातीत चर रेतुके (हालचाल करणारी पुं-गंतुके) नसतात. अचर पुं-गंतुके अंदुकाशी संयोग पावून (फलन) आ. ४. गर्भविकास : (१-४) रंदुकाचा तळभाग व त्यात होणारे बदल आणि बहुगर्भत्व, (५) आलंबक, (६) पूर्णगर्भ.एक किंवा अधिक रंदुके (संयुक्त कोशिका) बनतात. प्रथम या सर्वांचा विकास होऊन साधे बहुगर्भत्व (अनेक गर्भ एकाच वेळी बनण्याची क्षमता) आढळते परंतु शेवटी एकच गर्भ पूर्णत्व पावतो. रंदुकापासून ह्या गर्भाचा विकास होत असताना एक गर्भपूर्व अवस्था (पूर्वगर्भ) असते. तीपासून पुढे चार लांबट कोशिकांच्या (आलंबक) टोकास प्रत्येकी एक या प्रमाणे चार पूर्णगर्भ स्वतंत्रपणे बनतात यालाच ‘पाटन-बहुगर्भत्व’ म्हणतात (आ.४). यांपैकी शेवटी एकच पूर्णपूणे वाढतो व बीजात समाविष्ट होतो. पूर्ण वाढ झालेल्या बीजात (आ.५) बीजावरणाखाली पातळ परिपुष्काचा (प्रदेहापासून गर्भाभोवती बनलेल्या अन्नांशाचा) थर, पुष्काचा (गर्भाभोवती गंतुकधारीपासून बनलेल्या नित्य प्रकारच्या अन्नांशाचा) थर व त्यांनी वेढलेल्या ३–१८ दलिका आणि गर्भाचा अक्षही असतात. आदिकोरक (प्राथमिक कळी), आदिमूल (प्राथमिक मूळ), अधराक्ष (दलिकांच्या खाली व आदि मूलाच्या वरचा अक्षाचा भाग)

आ. ५. बीजाचा उभा छेद : (१) बाह्यवरण, (२) घन मध्यावरण, (३) अंतरावरण, (४) दलिका, (५) आदिकोरक, (६) अधराक्ष, (७) आदिमूल, (८) पुष्क.आणि अप्याक्ष (दलिकांच्या वरचा अक्ष) असे या परिपक्व गर्भाचे भाग स्पष्ट दिसतात [⟶ बीज]. बीजावरण तीन पदरांचे असून मधला जाड व कठीण असतो. कधीकधी बीज धारण करणाऱ्या खवल्याचा (शल्काचा) काही भाग त्याला चिकटून पंखाप्रमाणे प्रसारास मदत करतो. वर उल्लेख केलेल्या फलन क्रियेनंतर शंकूही बराच वाढतो व शेवटी तो सुकून कठीण (काष्ठमय) बनतो व लोंबता राहतो. गुरूबीजुकपर्णे अलग होऊन त्यांतून बीजे सुटून वाऱ्याने पसरविली जातात. दीर्घकालानंतर ती रुजतात व आदिमूल बाहेर येऊन प्रधानमूळ बनते. (आ.६). दलिका जमिनीवर येऊन हिरव्या बनून अन्ननिर्मिती करतात [⟶ अंकुरण] व आदि कोरकाच्या वाढीस पोषक बनतात पहिली पाने (बालपर्णे) रेषाकृती असतात.

वरील विवेचनावरून पाइनच्या तपशीलवार जीवनवृत्तामध्ये दोन पिढ्यांचे (बीजुकधारी आणि गंतुकधारी) एकांतरण सायकस  व द्विदलिकित वनस्पतीप्रमाणे [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग एकांतरण, पिढ्यांचे ] असल्याचे दिसून येते.

 

आ. ६. बीजाचे अंकुरण : (१) दलिका, (२) अधराक्ष, (३) आदिमूल, (४) बालपर्णे.पुरातनत्व : पायनस पायनाइट्स  म्हणून ओळखले जाणारे जुरासिक(सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील जीवश्म (शिळारूप अवशेष) पाइनशी तुल्य असल्याने त्याचे पूर्वज असावेत असे दिसते तथापि नि:संशय पायनसाचे जीवाश्म उ. जुरासिक व पू. क्रिटेशस (सु. १५ ते १३·५ कोटी वर्षांपूर्वींच्या) काळापासून पुढे आढळतात. पाइनच्या काही जाती दीर्घकाल जगतात. अमेरिकेतील इन्यो नॅशनल फॉरेस्ट मधील पायनस ॲरिस्टॅटा हा वृक्ष सु. ४,६०० वर्षांचा असून त्याला अद्याप शंकू येतात [⟶ आयु:काल, प्राण्यांचा व वनस्पतींचा].

उपयोग: बांधकाम, कागदाचा लगदा, खोकी, आगपेट्या, तक्तपोशी (लाकडी जमीन), छत इत्यादींसाठी पाइनच्या भिन्न जातींच्या खोडाचा फार उपयोग करतात टर्पेंटाइन, रेझीन, रोझीन, अंबर इ. पदार्थही त्यापासून काढतात. चिलगोझाच्या बिया चांगले खाद्य आहे. शोभा व सावली यांकरिता ही झाडे लावतात. जंगली पशु-पक्ष्यांना अनेक वृक्षांच्या बिया खाद्य म्हणून उपयोगी पडतात. जपानातील ‘हिनोकी’ वृक्षाचे (इं. जॅपनीज सायप्रस, सन ट्री, फायर ट्री) लाकूड सुगंधी व सर्व प्रकारच्या हवामानात टिकणारे असते. शोभेकरिताही तेथे त्या वृक्षाची लागवड केली जाते त्याला शेंदरी शंकू येतात अंतर्भाव पायनेसी कुलात करतात.

पहा : कॉनिफेरेलीझ; देवदार; पुरावनस्पतिविज्ञान; सायकॅडेलीझ; सीडार.

संदर्भ : 1. Datta, S.C. An Introduction to Gymnosperms, Bombay, 1966.

2. Maheshwari, P. Konar, R. N. Pinus, New Delhi, 1971.

3. Strasburger, E. Textbook of Botany, London, 1965.

परांडेकर, शं. आ.