धैंचा : (रान शेवरी गु. सासी इकड, इकड हिं. धुंची, वनजयंती सं.जयंती इं. धैंचा, प्रिक्ली सेस्बॅन लॅ. सेस्बॅनिया ॲक्युलिएटा, से. कॅनाबिना से. ॲक्युलिएटा प्रकार कॅनाबिना कुल–लेग्युमिनोजी, उपकुल –पॅपिलिऑनेटी) ह्या वनस्पतीच्या वंशातील (सेस्बॅनियातील) सहा जाती भारतात आढळतात. त्या सर्व हिरवे खत, चारा व इतर काही किरकोळ उपयोगांकरिता वापरात व लागवडीत आहेत. धैंचा या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) झुडुपवजा वनस्पतीचे मूलस्थान ऑस्ट्रेलिया असून उष्ण कटिबंधीय आशिया व आफ्रिका येथे तिचा प्रसार आढळतो. भारतात कोकणात आणि दख्खनमध्येही आढळते. पावसाळ्यात सु. १,२२० मी. उंचीपर्यंत तिची सर्वत्र लागवड होते. क्वचित प्रसंगी ती खाजणात व दलदलीच्या जागीही आढळते. हिची उंची सु. २ मी. पर्यंत असते. खोड हिरवे, काहीसे काटेरी असून जमिनीलगत त्याला फांद्या फुटतात. पाने पिसासारखी व सु. ३० सेंमी. लांब असतात. दले रेखीय–आयत, केशहीन असून त्यांच्या २०–५० जोड्या असतात. फुले १·२५ सेंमी. लांब, फिकट पिवळी बिन ठिपक्यांची किंवा लाल ते काळ्या ठिपक्यांची असतात व लोंबत्या फुलोऱ्यावर (मंजरीवर) ३–६ फुले सप्टेंबर ते ऑक्टोबरात येतात. शेंग १५–२५ सेंमी. लांब सरळ अथवा थोडीशी वाकडी असून तिच्या कडा काहीशा दातेरी असतात. बिया सु. २०–३० काहीशा आयत (लंबगोल) असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) व ⇨ अगस्ता या वनस्पतीत वर्णिल्याप्रमाणे असतात.

हिरवळीच्या खताकरिता म्हणून धैंचाची लोकप्रियता खूपच वाढली आहे. ऊस, कापूस, भात, नारळ, चहा, गहू, ज्वारी इ. पिकांना त्याचा बेवड चांगला मानवतो. धैंचाचे हिरवळीचे खत घातल्यास १०६% गव्हाचे, ३६·९% ज्वारीचे व १२% कापसाचे उत्पन्न वाढल्याचे आढळले आहे. पहिल्या पिकाला बेवडाचा चांगला फायदा होतो पंरतु पुढेपुढे तो कमी होतो. धाग्यासाठीही धैंच्याची लागवड केली जाते. खाऱ्या आणि चोपण (क्षार) जमिनी सुधारण्याच्या कामी तो फारच उपयुक्त ठरला आहे. ०·१% सुक्या पानांचा चुरा व खनिज फॉस्फेट जमिनीत घातल्यास विनिमयक्षम कॅल्शियम आणि उपलब्ध फॉस्फरस यांचे प्रमाण वाढते व क्षारता (अल्कलिनिटी) कमी होते. त्याच्या मुळांवरील गाठींमुळे (इतर शिंबावंत वनस्पतीप्रमाणे) हवेतील नायट्रोजनाचे स्थिरीकरण होते. एक हेक्टर क्षेत्रात सु. १८,१५७ किग्रॅ. धैंचा गाडल्यास जमिनीस ७७ किग्रॅ. नायट्रोजन मिळतो. धैंचा झपाट्याने वाढतो. पहिल्या तीन आठवड्यांत १५ ते २२ सेंमी. उंची वाढते. नंतर वाढ फार जलद होते. पीक ६–७ आठवड्यांचे झाल्यावर जमिनीत गाडतात, ते लवकर कुजते.

धैंचाचे मुख्यतः पावसाळी पीक घेतात व त्याला सर्व प्रकारची जमीन चालते. पाणथळ जमिनीतही तो येऊ शकतो. त्याच्या बियांची पेरणी जून–जुलैमध्ये करतात. तथापि पुष्कळ विभागात ती मार्च ते ऑगस्टपर्यंतही चालते. हेक्टरी २०–६० किग्रॅ. बी दोन ओळींत ३० सेंमी. अंतराने पेरतात, मुठीने फेकल्यास ते ९०–११० किग्रॅ. लागते. त्याचे सामान्यतः जिरायती व कधीकधी बागायती पीकही घेतात. पेरणीपूर्वी फॉस्फरसयुक्त खत (सिंगल सुपर फॉस्फेट) दिल्यास पीक चांगले येते. बागायती पिकाच्या तीन कापण्या होतात व जिरायती पिकाची ६–८ आठवड्यांत एकच कापणी होते. हेक्टरी ११·३–१३·८ टन हिरवे द्रव्य मिळते.

बंगालमध्ये बहुधा याची लागवड धाग्यासाठी करतात. खोडे प्रथम कुजवून नंतर वाळवून धागा अलग करतात. खोडापासून ९% धागा मिळतो. धाग्याच्या कोशिका (पेशी) सु. २·४ मिमी. लांब व २१ मायक्रॉन (१ मायक्रॉन = ०·००१ मिमी.) रुंद असतात. धाग्यांपासून कोळ्यांची जाळी, जहाजाची शिडे व दोन बनवितात. तो पाण्यात चांगला टिकतो व दिसायला भरड रेशमासारखा असून समुद्राच्या पाण्याचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. तो तागाच्या धाग्यापेक्षा बराच बळकट व टिकाऊ असतो. खोडातील भेंडापासून ‘राइस पेपर’ (एक प्रकारचा कागद) बनवितात.

गायीम्हशी व शेळ्यामेंढ्या यांच्यासाठी चारा म्हणून धैंचाचा चांगला उपयोग होतो. त्याच्यापासून मुरघासही तयार करतात. त्याच्यामुळे दुग्धोत्पादन आणि मांसोत्पादन वाढल्याचे आढळून आले आहे. नारळ, आंबा व कोकोच्या मळ्यांत त्याची आच्छादक पीक म्हणून पेरणी करतात. तसेच वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यास भाताच्या शेताभोवती व पानमळ्यात धैंचा पेरतात. द. आफ्रिका व क्वीन्सलँड येथे कोंबड्यांचे खाद्य म्हणूनही धैंचाचा उपयोग होतो. न्यासालँडमध्ये चहा व कॉफीच्या मळ्यांत सावलीसाठी धैंचा लावतात. या झाडांच्या बिया जमा करून पुन्हा वापरतात. सुकी फळे हातांनी तोडून एकत्र जमा करतात आणि नंतर बडवून बी निराळे काढतात. दर हेक्टरी सु. १,०००–१,६०० किग्रॅ. बियांचे उत्पन्न येते. ते बी नंतर मडक्यात ठेवून त्यावर मातीचे लिंपण घालतात. त्यामुळे ते संरक्षित राहते.

बी खाद्य असते. ओरिसामधील बियांत (शुष्क वजनावर आधारित) ३२ ते ६७% कच्चे प्रथिन असते. पाकिस्तानमधील बियांत गवारीच्या डिंकासारखे गुणधर्म असलेला २८% डिंक असतो. त्याचा उपयोग पुष्कळ औद्योगिक प्रक्रियांत होण्यासारखा आहे. धैंचाच्या पिठात (शुष्क वजनावर आधारित) सु. ५३·४६% प्रथिन असते. ते पेनिसिलीयम नोटॅटम नावाच्या बुरशीच्या कृत्रिम वाढीसाठी संवर्धनाचे माध्यम म्हणून शेंगदाण्याच्या पिठाऐवजी (पेंडीऐवजी) वापरण्यास योग्य पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. पानांच्या पृथकरणात पुढील प्रतिशत घटक आढळतात : जलांश ७८·२, ईथर अर्क ८·८, प्रथिन २–६, धागा ६·३, नायट्रोजनविहिन अर्क ९·८, राख २·२. धैंचाच्या पिकाला क्लॅडोस्पोरियम वंशातील कवकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा) उपद्रव होतो. तथापि भारतात त्यावर फार गंभीर स्वरूपाचे रोग पडत नाहीत. एझायगोफ्लेप्स स्केलॅरिस हा कीटक खोड आणि मुळांना भोके पाडून नुकसान करतो. त्यामुळे झाड मोडते, अशी झाडे उपटून काढतात. स्ट्रायग्लिना सिटारिया या पाने गुंडाळणाऱ्या कीटकांच्या अळ्या दलांची टोके गुंडाळून त्यांच्या लहान गाठी तयार करतात आणि त्यांत राहतात. त्यांच्या नियंत्रणासाठी ०·१% बीएचसी किंवा ०·१% डिल्ड्रीन फवारतात. थापपोसिड्रा सक्सेसरियाॲम्सॅक्टा मूरेई या कीटकांचे घुले (सुरवंट) धैंचाचे नुकसान करतात. बीएचसी आणि डीडीटी ही कीटकनाशके फवारून त्यांचा बंदोबस्त करता येतो.

पहा: शेवरी.

संदर्भ : C. S. I. R. The Wealh of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.