पेंटोझायली : बीजी वनस्पतींपैकी प्रकटबीज वनस्पती ह्या उपविभागात [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] अंतर्भूत केलेल्या काही विलुप्त (निर्वंश) वनस्पतींचा एक लहान गट. हा गट, वोज्नोव्हस्किएलीझ हा गण आणि तीन-चार वंश हे सर्वच विलुप्त व त्यांचे आप्तभाव विवाद्य असल्याने त्यांचा समावेश प्रकटबीजीतील एका ‘इन्सर्टी’ या स्वतंत्र गटात केला जातो. पेंटोझायलीमध्ये अनेक वंश असून त्यांपैकी काहींचे संबंध पेंटोझायलॉन सहानीआय व काहींचे निपॅनिओझायलॉन यांच्याशी आहेत. यातील भिन्न जातींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) भारताच्या राजमहाल टेकड्यांतील जुरासिक कल्पाच्या (सु. १८.५५ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत विपुल आढळतात. बिहारमध्ये आग्रपारा जिल्ह्यात दुमार्चिर जवळच्या निपानिया खेड्यातून हे जीवाश्म जमा करून व त्यांचा अभ्यास करून ⇨बिरबल सहानी या प्रसिद्ध भारतीय पुरावनस्पतिविज्ञांनी त्यांच्या संबंधीची काही माहिती १९१० मध्ये प्रसिद्ध केली. या वनस्पतींच्या लक्षणांवरून त्यांचे वर्गीकरणातील निश्चित स्थान विवाद्य असून एकंदरीने प्रकटबीज वनस्पतींच्या क्रमविकासाची पूर्ण कल्पना येण्यास ही माहिती उपयुक्त ठरेल, असे त्यांनी त्या वेळी नमूद केले होते. पुढे १९४८ मध्ये त्यांनीच हा गट (पेंटोझायली) निश्चित केला मध्यंतरी १९३२-४६ या काळात सहानी, आर्. एन्. श्रीवास्तव व ए. आर्. राव यांना त्यासंबंधी अधिक माहिती मिळाली. अलीकडे विष्णु-मित्तर यांनी (१९५३-५८) अधिक महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करून या गटाच्या वर्गीकरणातील निश्चित स्थानाविषयी आपली मतेही मांडली आहेत.

या वनस्पती सु. एक मीटर उंच क्षुपे (झुडपे) असून त्यांना कित्येक सेंमी. व्यासाचे खोड व त्यावर अनेक फांद्या, पाने व शंकू यांसारखे अवयव होते (पहा आकृती). या सर्व भागांचे जीवाश्म आढळले असून त्यांतील फरक लक्षात घेऊन काही भिन्न वंश व जाती ओळखण्यात आल्या व त्यांना भिन्न नावे देण्यात आली आहेत उदा., निपॅनिओझायलॉन गुप्ताय, नि टेट्राझायलॉइड्स आणि पेंटोझायलॉन सहानीआय ह्या खोडांच्या जाती निपॅनिओफायलम रावॉय (टीनिऑप्टेरीस स्पॅथ्युलॅटा) हे पानांचे नाव सहानिया निपॅनिएन्सिस हे लघुबीजुकधारी (परागकोशधारक) अवयव आणि कार्नोकोनाइट्स काँपॅक्टम का. लॅक्सम हे गुरुबीजुकधारी अवयव होत. पेंटोझायलॉन सहानीआय या खोडात पाच, एखादे वेळी सहा ⇨रंभ असून प्रत्येकात प्राथमिक उभयवर्धी काष्ठाभोवती [→ प्रकाष्ठ] द्वितीयक (दुय्यम) काष्ठाची वृद्धिवलये (वाढ दर्शविणारी वलये) आढळतात; यांची निर्मिती परिघाजवळच्या ⇨ ऊतककरापासून आत केंद्राकडे होते व लवकरच थांबते. परिणामी सर्व वृंद (जुडगे) केंद्राजवळ येतात ⇨ मेंड व मज्जाकिरण [→ विभज्या] चिरडले जातात. या काष्ठाची संरचना शंकुमंतातील [→ कॉनिफेरेलीझ] काष्ठाप्रमाणे असून वाहिकांवर (पाण्याचे वहन करणाऱ्या व काष्ठात आढळणाऱ्या तीक्ष्ण टोकाच्या लांबट घटकांवर) गोलसर अनुलिप्त (भोवताली वलय असलेल्या) खाचा असतात. या रंभांशी एकांतरित (एकाआड एक) असे काही लहान रंभही असतात त्यांपैकी काही रंभांतील संरचना उत्केंद्र (मध्यबिंदू बाजूला सरकलेल्या) प्रकारची असते. निपॅनिओझायलॉन वंशातील खोडात अनेक रंभ असून द्वितीयक काष्ठ कमी असते भेंडाचे प्रमाण अधिक असते; वृद्धिवलये फार कमी किंवा मुळीच नसतात. द्वितीयक काष्ठ फारच कमी उत्केंद्री असते. या गटातील पानांच्या जीवाश्मांना निपॅनिओफायलम रावॉय म्हणतात; ती पाने  ७-१० ×१ सेंमी., चिवट, चमसाकृती (चमच्याच्या आकाराची) असून तळाशी त्यांना देठाजवळ सूक्ष्म पंख होते. पेंटोझायलॉन  खोडावरच्या पानांपेक्षा निपॅनिओझायलॉन  खोडावरची पाने अधिक रुंद होती. दोन्ही वंशातील पाने सु. ५-७.५ मिमी. जाडीच्या शाखांवर (ऱ्हस्व प्ररोहांवर) दाटीवाटीने परंतु सर्पिल प्रकारे येत असावीत. कारण या शाखांवर चतुष्कोनी पर्णोपधाने (पाने पडून गेल्यावर आढळणारे मांसल तळभाग) आढळतात. पानातील वाहक वृंद (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणारे जुडगे) ⇨सायकसप्रमाणे पण देठात काहीसे चक्राकृती मांडलेले व त्या प्रत्येकात उभयवर्धी प्रकाष्ठ होते त्वग्रंध्रे (पानाच्या पृष्ठभागावरील थरातील सूक्ष्म छिद्रे) काहीशी ⇨बेनेटाइटेलीझमध्ये आढळतात तशी होती सिराविन्यास (शिरांची मांडणी) टीनिऑप्टेरीसप्रमाणे [→ सायकॅडेलीझ] होता.

पेंटोझायली : (१) पर्णधारी शाखा व खोड, (२) स्त्री-शंकुधारक शाखा, (३) पुं- शंकुधारक शाखा, (४) पर्णोपधाने, (५) खोडातील अनेक रंभ.

लघुबीजुककोश धारण करणारे अवयव (सहानिया निपॅनिएन्सिस) म्हणजेच ‘पुं-पुष्पे’, ऱ्हस्व प्ररोहाच्या टोकास असत. यामध्ये अनेक उपांगे (अवयव) तळाशी एका वलयातून उद्भवलेली असून प्रत्येकावर अनेक सर्पिल तंतू असत आणि प्रत्येक तंतूवर एक परागकोश असे व त्यात एकच कोटर असे. परागकणांचे आवरण गुळगुळीत व आकार नावेप्रमाणे असून लघुबीजुकपर्णे सरळ पण अवसंवलित (टोकाकडून तळाकडे आतील बाजूस वळलेली) नसत [→बेनेटाइटेलीझ]. परागकोश व पराग ⇨सायकॅडेलीझ प्रकारचे तर एकूण पुष्प काहीसे बेनेटाइटेलीझ प्रकारचे होते.

गुरुबीजुकधारी अवयव (कार्निओकोनाइट्स काँपॅक्टम  हा पेंटोझायलॉन  वंशात आणि का. लॅक्सम  हा निपॅनिओझायलॉन  वंशात) एका प्रमुख दांड्यावर येत; त्यामध्ये अनेक लहान देठ व त्या प्रत्येकावर एक लंबगोल किंवा चितीय (१०—२०×७-१० मिमी.) शंकू असे. प्रत्येकात अनेक अवृंत (देठ नसलेली) व एकावरणी बीजके (बीजाची पूर्वावस्था) असून त्यांची छिद्रे (बीजकरंध्रे) बाहेर वळलेली असत. प्रदेहाचा (बीजपूर्व अवस्थेतील प्रमुख गाभ्याचा) तळ खाली मुक्त असतो, गुरुबीजुकपर्णे किंवा शल्क (खवले) त्यामध्ये नसत. प्रत्येक बीजकास बाहेरचे नरम व मांसल आणि आतील कठीण आवरण असे सर्व मांसल आवरणांच्या संयोगाने पक्क शंकू ⇨ तुतीच्या फळाप्रमाणे दिसत असे.

आप्तभाव : पेंटोझायलॉन  निपॅनिओझायलॉन  यांच्या खोडातील बहुरंगी संरचना, बेनेटाइटेलीझ व आधुनिक सायकॅडेलीझ यांमध्ये असते तशी नसून तिचे साम्य पुराजीव महाकल्पातील (सु. ६०-२४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) मेड्युलोजांच्या [→बीजी नेचे] खोडाशी अधिक आहे. आधुनिक सायकॅडांच्या पक्व खोडात बहुचक्रिक बहुरंभी संरचना असते. तसेच मेड्युलोजांच्या काही जातींत व काही आधुनिक सायकॅडांच्या खोडात पेंटोझायलॉनच्या खोडातल्याप्रमाणे अनुलिप्त खाचा  व अधिक दृढ काष्ठ आढळते; यावरून पेंटोझायलीचे सायकॅडोफायटाशी आप्तभाव दिसून येतात. बेनेटाइटेलीझ व सायकॅडेलीझ यांच्या ऱ्हस्व प्ररोहांशी पेंटोझायलींच्या ऱ्हस्व प्ररोहांचे बरेच साम्य आढळते. निपॅनिओफायलमच्या पानांची संरचना व स्वरूप या बाबतींत बेनेटाइटेलीझ, सायकॅडेलीझ व कॉर्डाइटेलीझ यांच्याशी त्यांचे साम्य आहे, परंतु त्वग्रंध्रांबाबतचे साम्य पूर्ण नाही. या तीन गणांत आढळणाऱ्या वाहकवृंदातील उभयवर्धी काष्ठ हे लक्षण गौण मानले जाते; यामुळे पेंटोझायलींच्या पानांबाबतही सायकॅडोफायटांशी आप्तभाव आढळतात. तसेच पुं-पुष्पांबाबतच्या संरचनेच्या आराखड्याबाबत बेनेटाइटेलीझशी काहीसे साम्य (काही ठळक फरक वगळून) पेंटोझायलीत आहे त्यावरूनही सायकॅडोफायटाशी आप्तभाव दिसून येतात. स्त्री-शंकूंचा विचार केल्यास पेंटोझायलीतील बीजांची व त्यांच्या देठांची संरचना सर्वसाधारणत: सायकॅडोफायटाशी मिळती जुळती दिसते परंतु पेंटोझायलीची बीजे (बेनेटाइटेलीझप्रमाणे) अक्षावर आधारलेली आहेत, सायकॅडातल्याप्रमाणे पानांवर नाहीत. शंकुमंतामध्ये बीजे अंशत: पानावर व अंशत: अक्षावर असतात.

वर्गीकरणातील स्थान : खोड, पाने, पुं-शंकू व स्त्री-शंकू या बाबतींत पेंटोझायलीचे सायकॅडोफायटाशी (बीजी नेचे, बेनेटाइटेलीझ व सायकॅडेलीझ) असलेले आप्तभाव मान्य झाले असल्याने त्यांना बेनेटाइटेलीझ व सायकॅडेलीझ यांच्या बरोबरीचा स्वतंत्र दर्जा प्राप्त होतो त्यांच्या प्रजोत्पादक अवयवांतील प्रारंभिकता लक्षांत घेऊन पेंटोझायली, बेनेटाइटेलीझ व सायकॅडेलीझ अशी क्रमवार मांडणी करावी, असे विष्णुमित्तर (१९५८) यांचे मत आहे. एच्. जे. लॅम यांनी पेंटोझायली विभागाऐवजी पेंटोझायलेलीझ असा गण सूचित केला असून उपलब्ध माहितीच्या आधारावर तो मान्यता पावला आहे. बीजांचा क्रमविकास (उत्क्रांती) अनेकदा स्वतंत्र रीत्या भिन्न गटांत झाला असावा, या विधानाला अनेकांनी पुष्टीकारक पुरावा म्हणून पेंटोझायलीचा उल्लेख केला आहे.

पहा : पुरावनस्पतिविज्ञान; सहानी, बिरबल.

संदर्भ :     1. Andrews, H. N. Studies in Palaeobotanu, New York, 1961.

2. Datta, S. C. An Intraduction to Gymnosperms, Bombay, 1966.

3. Preston, R. D. Adcances in Botanical Research, Vol. 1,  London, 1963.

परांडेकर, शं. आ.