प्रपट्टन :(फॅसिएशन). उच्च दर्जाच्या (वाहक ऊतके – समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचे समूह – असलेल्या) वनस्पतींचा प्रमुख अक्ष (खोड) बहुधा गोलसर दांड्याप्रमाणे (चितीय) असतो परंतु कधीकधी तो पसरट व फितीप्रमाणे वाढत असलेला आढळतो, त्यामुळे त्याचा काही भाग (लहान किंवा मोठा) बदललेला दिसतो ह्या सपाट होऊन विकृत दिसण्याच्या प्रक्रियेस ‘प्रपट्टन’ म्हणतात. हा बदल विशिष्ट प्रकारची ‘अतिविरूपता’ (रूपवैचित्र्य) मानतात व कधी-कधी ही इतर अवयवांतही आढळते. याचे प्रमुख कारण वनस्पतींच्या चयापचयातील (शरीरात सतत चालणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतील) बिघाड होय. अतिपोषणामुळे उपलब्ध झालेली ऊर्जा वापरणे आवश्यक झाल्याने तिचा विनियोग अतिवृद्धीत होतो. यामध्ये ऊतकांचे उत्पादन अधिक व अपसामान्य होते इतके की, ते त्या वनस्पतीस हानिकारक ठरण्याचा संभव असतो. ह्याला अनेक बाह्य व आंतरिक कारणे जबाबदार असतात.

वनस्पतींतील वाढ बव्हंशी संप्रेरकांनी [⟶ हॉर्मोने] नियंत्रित केली जाते. वाढ व संप्रेरके ह्यांच्या परस्परसंबंधात बिघाड झाल्यास किंवा वृद्धि-संप्रेरकाची विषम वाटणी झाल्यास वर सांगितलेली अतिविरुपता उद्‌भवते, असे सामान्यपणे मानतात. प्रपट्टन ⇨ उत्परिवर्तनामुळे होऊ शकते अशा वेळी ते आनुवंशिक असते मग बाह्य परिस्थिती कोणतीही असो. तसेच प्रपट्टन वंशपरंपरेने चालू राहण्यास ते शरीर-कोशिकांतील (पेशीतील) ज्या जनुकांद्वारे [⟶ जीन] एका पिढीतून दुसरीत नेले जाते, ती अनेक असू शकतील किंवा एकाच जनुकाद्वारे ते कार्य होईल. कधीकधी अनेक परिस्थितिजन्य कारणांमुळेच प्रपट्टन घडून येते व ते आनुवंशिक नसते परंतु एकदा ते निर्माण झाल्यावर शाकीय प्रजोत्पादनाद्वारे (एरवी फक्त पोषणाचे कार्य करणाऱ्या कंद, खोड, फांदी यांसारख्या भागापासून करण्यात येणाऱ्या प्रजोत्पादनाद्वारे) पिढ्यान्‌पिढ्या चालू राहते. ह्या प्रक्रियेत प्रपट्टनापूर्वीची नित्य संरचना पुन्हा निर्माण होण्याची शक्यता असते, ह्याला ‘प्रत्त्युत्परिवर्तन’ (पूर्वजानुवर्तन) असे म्हणतात. वंशागत असलेली व नसलेली परंतु दिसण्यात सारखी अशी प्रपट्टने आजपर्यंत आढळली आहेत. जनुकाधारित व परिस्थितिजन्य प्रपट्टनाचे प्रकार अनेक व्यक्तींच्या समुदायात आढळल्यास त्यांच्या अनुहरणासंबंधी खरी वस्तुस्थिती कळणे कठीण पडते. [⟶ आनुवंशिकी].

प्रपट्टनामुळे होणारा बदल खोडापुरताच असल्यास त्याची सुरुवात ती वनस्पती विकासाच्या पूर्णावस्थेत आल्यावरच होते. प्रथम खोडाच्या टोकाशी असलेला वर्धन-बिंदू रुंदावत जातो त्याचा नित्याचा शंकुसारखा [⟶ विभज्या] आकार बदलून तो (१) लांबट टोकदार व फणीसारखा कातरलेला (दातेरी) होतो किंवा (२) तेथे अनेक वर्धन-बिंदू निर्माण होतात. पहिल्या प्रकारात अक्षाची विषम वाढ झाल्याने तो अक्ष सर्पिल किंवा मेंढ्याच्या शिंगाप्रमाणे पिळलेला बनतो अथवा अतिशय जटिल प्रकारचा गुंता बनतो. दुसऱ्या प्रकारात अनेक वर्धन-बिंदूंपासून बनलेल्या अनेक फांद्यांमुळे खोडाच्या त्याटोकास खराट्याचे स्वरूप प्राप्त होते (उदा., शतावरी आकृती पहा). ॲरिझोनातील राक्षसी निवडुंगाच्या (सेरियस जायगँशियस ‘कॅक्टेसी’ या नोंदीतील आकृती पहा) कर्करूप प्रकारांचे आणि पू. ऑस्ट्रेलियातील ‘हूप पाइनांचे’ (ॲरॉकॅरिया कनिंगहॅमी) उदाहरण रुंदावलेल्या वर्धन-बिंदूच्या संबंधी देतात. कधीकधी खोड फुगीर व पोकळ बनते. खोड, मूळ, फांदी व फुलोरा ह्यांसारख्या विशिष्ट अवयवांत प्रपट्टन होते वेळी त्याचा दृश्य परिणाम फक्त त्या त्या अवयवातच किंवा वनस्पतीच्या इतर भागांतही दिसतो उदा., मयूरशिखेमध्ये [⟶मयूरशिखा] खोड व पुष्प यांच्या क्षेत्रातच ही आनुवंशिक घटना दिसते. न्यूझीलंडातील एका शंकुमंत (सूचिपर्णी) वृक्षाचे फक्त पुं-शंकू चपटे झाले आहेत काही ⇨ गोराडूंच्या जातींच्या मुळातही प्रपट्टन आढळते. टोमॅटोचे पूर्वज दोन कप्प्यांच्या लहान फळांचे व जंगली असून त्यांच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) इतिहासपूर्व काळात घडलेल्या उत्परिवर्तनामुळे त्यांचे आकारमान मोठे झाले व फळात अनेक कप्पे निर्माण झाले.हा बदल मनुष्याच्या दृष्टीने इष्ट असाच असल्याने त्याने त्याची निवड केली व आज त्याला व्यापारी महत्त्व आले आहे. टोमॅटोचा फुलोरा, फुले, फळे इ. अवयवांत प्रपट्टनाची बाधा होते तथापि प्रत्यक्ष परिणाम फुला-फळांतच दिसतो. फळात कधी दोनशेपर्यंत कप्पे आढळतात. फुलझाडांच्या ⇨ कॅक्टेसी (निवडुंग कुल), ⇨ युफोर्बिएसी (एरंड कुल), ⇨ क्रॅसुलेसी (घायमारी कुल) इ. कुलांतील मांसल वनस्पतीत प्रपट्टनामुळे घडून येणाऱ्या (फणीसारख्या) बदलाचे अनेक वनस्पतिरसिकांना कौतुक वाटल्यामुळे त्यांची विशेष लागवड सुरू आहे. ह्यांना बीजे नसल्याने त्यांची अभिवृद्धी कलमांनी करतात. प्वेर्त रीकोत लागवडीतील अननसाच्या जातीत फळावर एकाऐवजी तीसपर्यंत झुबके आढळले आहेत. खोडाच्या व फुलांच्या प्रपट्टनामुळेच व्यापारी महत्त्वाच्या तंबाखूच्या प्रकारात पुष्पदलांचा (फुलातील भागांचा) बदल संदले ५, प्रदले ५, केसरदले ५ व किंजदले २ ह्यांवरून अनुक्रमे १२, २२, १५ व २१ असा झाला [⟶ फूल] येथे फुलांतील भागांत संख्यावाढ झाली, तसेच पानांची संख्या २८ पासून १६० पर्यंत गेली व पर्णविन्यासही (पानांची मांडणीही) अनियमित झाला.

प्रपट्टन : शतावरी-पिवळटलेले खोड व खराट्यासारख्या शाखा. 

शरीररचनेच्या संदर्भात मिळालेल्या प्रपट्टनाच्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, एकाच वर्धन-क्षेत्रातून अनेक प्रकारची प्रपट्टने निर्माण होतात, तसेच प्रपट्टित प्रकार व नित्याचे प्रकार ह्यांतील रंगसूत्रांमध्ये (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमध्ये) सहसंबंध नसतात. ऊतकांच्या वजनातील व विस्तारातील वाढ व वर्धन-क्षेत्रावरील नियंत्रणाचा अभाव ही प्रपट्टनाची प्रमुख लक्षणे मानली आहेत, यामुळेच वनस्पतींतील गुल्मे (गाठी) व कर्करोग ह्यांच्याशी साम्य दर्शविणारी अपसामान्य व विलक्षण वृद्धि-लक्षणे दिसून येतात.

प्रपट्टन हे बहुधा अनिश्चितपणे वाढणाऱ्या एखाद्या सामान्य गुल्माप्रमाणे असून ते अनेक कारणांमुळे उद्‌भवते. प्राण्यांत ज्याप्रमाणे एकाठिकाणाहून दुसरीकडे अपसामान्य कोशिकांचे स्थलांतर होऊन नवीन वाढ होण्याची केंद्रे निर्माण होतात, तसे प्रसार तंत्राच्या अभावी वनस्पतीत होत नाही प्राण्यांतील कित्येक अर्बुदांची (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या आणि शरीरक्रियेस निरुपयोगी असलेला गाठींची) लक्षणे वनस्पतींच्या प्रपट्टनात आढळत नाहीत ह्यांमुळे प्रपट्टनांपासून वनस्पतींच्या जीवाला धोका नसतो.

प्रपट्टनांची उदाहरणे जरी सु. एक तृतीयांश वाहिनीवंत वनस्पतींच्या कुलांत आढळून आली असली, तरी त्यापेक्षा अधिक कुलांत ती सापडणे अशक्य नाही. जंगली अवस्थेत किंवा लागवडीत असलेल्या काही वंशांत व जातींत ती सामान्यपणे जगभर आढळतात. उदा., शतावरी, गुलाबवेल, मुळा, ⇨ इनोथेरा रोजिया, रताळी, सूर्यफूल, वाटाणा, सालीट (लेट्यूस) इत्यादी. भोपळ्यांच्या वेलीच्या खोडाचे रूपांतर नागाच्या फडीप्रमाणे दिसल्याने काही हिंदू भाविकांना ‘शेषा’ची आठवण झाल्यास नवल नाही. अमेरिकेतील उष्ण प्रदेशात आढळणाऱ्या कांचनाच्या जातींची खोडे वानरांना शिड्यांप्रमाणे उपयोगी पडतात. तीही प्रपट्टित असावीत असे मानतात. बांडगुळांमुळे काही वृक्षांवर ‘रोझ ऑफ हेल’ नावाचे प्रपट्टन बनते आणि दक्षिण मेक्सिकोत व ग्वातेमालात ते सामान्यपणे आढळते.

संदर्भ : 1. Braun, A. C. Plant Pathology, Vol.1, 1959.           2. Sinnott, E. W. Plant Morphogenesis, New York, 1960.

परांडेकर, शं. आ.