पल्ला : (पांचोटी क. हडसले इं. इंडियन गटापर्चा ट्री लॅ. पॅलॅक्कियम एलिप्टिकम कुल- सॅपोटेसी). ⇨गटापर्चा हा रबरासारखा एक पदार्थ ज्या वृक्षांच्या चिकापासून बनवितात त्यांमध्ये दोन-तीन वंशांतील जातींचा समावेश होतो व त्यांची लागवड मलेशियात केलेली आहे. यांतील एका वंशात ( पॅलॅकियम ) आठ जाती असून त्यांपैकी चार भारतात आढळतात एका जातीचे पल्ला हे नाव आहे. हा सु. ३० मी. उंच व ३·६ मी. घेराचा चिकाळ वृक्ष सह्याद्री घाटात सु. १, २०० मी. उंचीपर्यंत व उ. कारवारपासून दक्षिणेकडे विपुल आहे. खोडावर खोबणी असून कोवळे भाग लवदार असतात. साल पिंगट व त्यावर पांढुरके ठिपके असतात. पाने साधी, एकाआड एक, गुळगुळीत, अंडाकृती-लंबगोल ७–१०×३–६ सेंमी.,चिवट, खाली फिकट पण वर गर्द हिरवी असतात. फुले लहान, पांढरी, सुगंधी असून पानांच्या बगलेत फेब्रुवारीत येतात. संवर्त व पुष्पमुकुट यांची तीन दलांची दोन मंडले असून केसरदले १२–१८ व किंजपुट लवदार असतो [⟶ फूल ]. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨सॅपोटेसी कुलात ( मधूक कुलात ) वर्णिल्याप्रमांणे असतात. एकबीजी मृदुफळ ३·७५ सेंमी. लांब आयत-गोलाकार व मांसल असून बी पिंगट असते.

याचे लाकूड लालसर, मध्यम कठीण, जड, मजबूत व टिकाऊ असून घरबांधणी, शिडे, फळ्या, तक्ते, साधे सजावटी सामान, छत, जमीन, चहाच्या पेट्या व इतर प्रकारची खोकी इत्यादींकरिता उपयोगात आहे. ते विमान बांधणीत लागणारे तक्ते बनविण्यास सोयीचे असून बाकदार भाग असणाऱ्‍या सजावटी सामानाकरिताही वापरतात. या वृक्षाच्या खोडाच्या पृष्ठभागावर सु. ४० ठिकाणी चिरा पाडून दुधी चीक जमवितात तो सु. ५·६ लि. असतो अशा चिरा वारंवार पाडल्यानंतर वृक्षास विश्रांती द्यावी लागते. या चिकात अल्कोहॉल व क्रिओसोट (२० : १) यांचे मिश्रण, अमोनिया, कॉस्टिक सोडा किंवा चुन्याची निवळी घालून तो साकळतात. अनेक ठिकाणच्या साक्याच्या (पाल्ला-गमच्या) विश्लेषणात गट्टा २४·९ – ३३·६ रेझीन (राळ किंवा तत्सम पदार्थ) ६०·५ – ६५·७ आणि अविद्राव्य (न विरघळणारे) पदार्थ ५·९ – ११·६ % आढळतात तथापि याला फारसे व्यापारी महत्त्व नसते. चिकापासून ‘पल्ला-गम’हा चिकट पदार्थ मिळतो तो खऱ्‍या गटापर्चासारखा उपयुक्त नसतोतो खऱ्‍या गटापर्चामध्ये मिसळण्याकरिता, दोरावर व बुटांच्या तळव्यावर लेप देण्यास व जलाभेद्यता आणण्यास (पाण्यापासून संरक्षणाकरिता) सिमेंटसारखे वापरतात हेविया या वनस्पतीपासून मिळणाऱ्‍या रबरात [⟶रबर] मिसळतात. बियांतील तेल साबण व दिवे यांकरिता उपयुक्त असते. नवीन लागवड बियांनी करतात. पॅलॅक्कियम गटा या मूळच्या मलेशियातील वृक्षापासून खरा गटापर्चा बनवितात हल्ली तो वृक्ष बोर्निओ, सुमात्रा, फिलिपीन्स आणि उष्ण कटिबंधातील इतर काही प्रदेशांत लागवडीत आहे.

पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.