करंबळ : (मोठे करमळ हिं चलता क. कंगला सं. भव्य इं. एलेफंट ॲपल, डायलेनिया लॅ.डायलेनिया इंडिका कुल-डायलेनिएसी). सुमारे. ९ – १२ मी. उंच (घेर १ – १.५ मी.) वाढणाऱ्या ह्या सदापर्णी डेरेदार वृक्षाचा प्रसार हिमालयाखालच्या प्रदेशात (कुमाऊँ व गढवाल ते पूर्वेस आसाम व बंगाल) आणि दक्षिणेस मध्य व द्वीपकल्पीय भागांतील जंगलात आहे. हा जंगलातील नाल्यांच्या काठाने वाढलेला दृष्टीस पडतो, तसेच मोठ्या बागेत शोभेकरिता लावता. तो ब्रह्मदेश, श्रीलंका व मलाया येथेही आढळतो. कोवळ्या भागांवर रेशमी लव असते. खोडावरची साल तांबडी व गुळगुळीत असून तिचे खवले निघतात.

करंबळ : (१) फांदीचा भाग, (२) फुलोरा, (३)फूल, (४) फळ.

फांद्यांच्या टोकाला पाने येतात ती मोठी (२० – ३५ ते ५ – ९सेंमी.), चिवट, दातेरी, टोकदार, वरून गुळगुळीत व खालून लवदार असतात फुले एकाकी (एक एकटी), (१३ –२० सेंमी. व्यासाची) मोठी, पांढरी, सुगंधी असून मे – ऑगस्टमध्ये येतात [सामान्य संरचना, → डायलेनिएसी] फळे गोल (७ – १३ सेंमी.) साल कठीण पण मगज (गर) मांसल बीजे अनेक, चपटी, मूत्रपिंडाकृती असतात.

याचे लाकूड तांबूस भुरे किंवा करडे, कठीण व मजबूत असून पाण्यात चांगले टिकते. घरबांधणी, नावा, वल्ही, बंदुकीचे दस्ते, हत्यारांचे दांडे, कपाटे, सजावटी सामान वगैरेंकरिता फार चांगले. पानांनी हस्तिदंत व शिंगे यांना झिलई देतात. मांसल संदले (पुष्पकोशाचे पानासारखे भाग) आंबट असून ती खातात त्यांची जेली किंवा सरबते करतात. फळ पाण्याच्या साहाय्याने पसरविले जाते हत्तींना ही फळे आवडतात व बियांचा प्रसार तेही करतात. फळ शक्तिवर्धक, रेचक व उदरवेदनांवर देतात फळांचा रस साखर व पाणी मिसळून ज्वरात थंड पेय म्हणून देतात आणि खोकल्यावरही तो गुणकारी असतो. साल व पाने स्तंभक (आकुंचन करणारी), साल कातडी कमाविण्यासाठी वापरतात पाने टसर जातीच्या रेशमी किड्यांचे खाद्य असते. साल दह्यात उगाळून अतिसारावर देतात. पानांच्या पत्रावळी करतात.

करमळ : (हिं. अग्गाई, कडुकणिगला इं. डायलेनिया लॅ. डायलेनिया पेंटागायना). करंबळाच्या वंशातील ही दुसरी जाती अनेक लक्षणांत त्यासारखीच आहे. हा वृक्ष पानझडी आहे व याचा प्रसार उत्तरेस हिमालयाच्या पायथ्याशी (औधपासून पूर्वेस आसामापर्यंत) व दक्षिणेस मध्य व पश्चिम भारतात आणि अंदमानात आहे. याचे खोड करंबळापेक्षा घेराला अधिक मोठे, तसेच पाने तिप्पट मोठी व फुले पिवळी, बरीच लहान (२⋅५ सेंमी.), विपुल व चवरीसारख्या फुलोऱ्यात मार्च-एप्रिलमध्ये येतात. फळे पिवळट शेंदरी जायफळाएवढी लहान, मांसल व खाद्य असतात. या वृक्षाचे लाकूड सर्वसाधारणपणे करंबळाच्या लाकडाप्रमाणेच असते व उपयोगही तसाच करतात. सालीपासून काढलेल्या धाग्यांचे दोर – दोरखंड करतात. मोठी पाने पत्रावळीकरिता व झिलई करण्यासाठी उपयोगात आणतात. कोवळी फुले व कळ्या ही कच्ची किंवा शिजवून खातात. जनावरे फळे आवडीने खातात. हिरव्या पानांचे खत बनवितात. 

जमदाडे,ज. वि.