शेवगा : (शेगट, अचझाड, शेगूल; हिं. मुनगा, सहिजन गु. सेकटो, सरगवो, मधुसरगवो क. नुग्गे, नुग्गीकाई; सं. शिगू , शोभांजन, अक्षीव, अक्षीत; इं. ड्नम-स्टिक ट्री, इंडियन हॉर्स रॅडिश ट्री; लॅ. मोरिंगा ओलिफेरा, मो. टेरिगोस्पर्मा; कुल-मोरिंगेसी). हा वृक्ष सु. १० मी. उंच वाढतो. खोड मऊ व ठिसूळ असते. साल जाड, त्वक्षीय व भेगाळलेली. कोवळ्या भागांवर बारीक लव असते. पाने संयुक्त, सु. ४५ सेंमी. लांब, लंबगोल असून सर्व दले व दलिका समोरासमोर असतात. फुलोरे परिमंजरी प्रकारचे असून फांद्यांच्या टोकांस येतात व त्यावर सुगंधी पांढरी फुले येतात. फुलांची संरचना व वनस्पतीची अन्य लक्षणे ⇨मोरिंगेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. याची शेंगांप्रमाणे येणारी फळे सु.४५ सेंमी. लांब व १.८ सेंमी. व्यासाची असून कोवळेपणी त्रिकोणी, हिरवी, मऊ, बारीक असून त्यावर नऊ खोबणी (कंगोरे) असतात. पक्व शेंगा आपोआप तडकून बिया वाऱ्याने पसरविल्या जातात.

शेवगा वृक्षाच्या वाढीसाठी ह्यूमसयुक्त व भुसभुशीत जमीन चांगली असते. उष्णकटिबंधीय हवामान त्याला चांगले मानवते. बिया व कलमे लावून नवीन लागवड करतात शेंगा चांगल्या मिळण्याच्या दृष्टीने छाट कलमे लावणे श्रेयस्कर असते. त्यांना लवकर मुळे फुटून काही महिन्यांत झाडे मोठी होतात. रोपे लावूनही लागवड करतात. ती डोक्याएवढ्या उंचीची झाल्यावर छाटतात व त्यामुळे अधिक फांद्या फुटतात आणि त्या उंचीला कमी राहतात.

शेवग्याची लागवड ५ x ५ मी.अंतरावर करतात.सुरूवातीच्या काळात त्यात आंतरपीक घेतात. त्याला फारसे पाणी लागत नाही व खते देत नाहीत मात्र नियमित व योग्य प्रमाणात खते व जोरखते आणि आंतरमशागत केल्यास उत्पन्न वाढते. एका झाडाला सु. १,००० शेंगा येतात.

दक्षिण भारतात जाफना (शेंग ६०-९० सेंमी. लांब), चवकारी चेरी मुरूंगा (शेंग ९०-१२० सेंमी. लांब) व चेम मुरूंगा (लाल टोकाच्या शेंगा) हे प्रकार आढळतात. संशोधनाने वर्षात एकापेक्षा जास्त बहार येणारे, बिगर हंगामी व जास्त उत्पन्न देणारे चवदार प्रकार विकसित करण्यात आले आहेत. त्यांपैकी कोईमतूर-१, कोईमतूर-२, पीकेएम्-१, पीकेएम्-२ व कोकण रूचिरा हे प्रकार महाराष्ट्रात लागवडीत आहे. अवर्षणगस्त भागात लागवडीस तो योग्य आहे. याची आता निर्यातही होऊ लागली आहे.

शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. शेंगांतील गर व बिया स्वादिष्ट व औषधी असतात. पाने व फुले भाजीसाठी वापरतात. शेळ्यामेंढ्याही ती खातात. बिया भाजून शेंगदाण्याप्रमाणे खातात. पाने पौष्टिक असून त्यांत अ-जीवनसत्त्व असते, तसेच टोमॅटो, मुळा, गाजर व वाटाण्यापेक्षा अधिक क-जीवनसत्त्व असते.

शेंगेत पुढील प्रतिशत घटक आढळतात : ८६.९ जलांश, २.५ प्रथिन, ०.१ मेद, ३.७ कार्बोहायड्रेटे, ४.८ तंतू व २.० खनिजे. याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे, आयोडीन, ऑक्झॅलिक अम्ल, केरोटिन, निकोटिनिक अम्ल व ॲस्कॉर्बिक अम्ल यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

शेवग्याचे सर्व भाग वैदयकात महत्त्वाचे मानले आहेत. त्यातील मोरिंगिन व मोरिंगिनिन ही अल्कलॉइडे अधिक महत्त्वाची आहेत. बियांपासून फिकट पिवळे, न सुकणारे, मंद सुगंधी तेल मिळते. बेन तेल असे त्याचे व्यापारी नाव आहे. ते खाण्यासाठी, दिव्यात जाळण्यासाठी व सौंदर्यप्रसाधनात मिसळण्यासाठी वापरतात. घड्याळे व इतर सूक्ष्म यांत्रिक उपकरणांच्या दुरूस्तीसाठी ते ऑलिव्ह तेलासारखे वापरतात. पेंड खतासाठी वापरतात. शेवग्याच्या सालीपासून पांढरट डिंक स्रवतो. गूळ तयार करताना रसातील मळी काढण्यासाठी सालीचा वापर होतो.

शेवग्यावर फारसे रोग व किडी पडत नाहीत. तमिळनाडूत डिप्लोडिया या कवकामुळे (हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) खोड कूज हा रोग होतो. दोन प्रकारच्या अळ्या व खोडाला भोक पाडणारी कीड यांचाही उपद्रव होतो. केसाळ सुरवंटामुळे (यूप्टिरोटी मॉलिफेरा) पाने गळून जातात. त्यावर फिश ऑइल रोझीज सोप द्रावण फवारतात. तसेच नूर्डा बलायटिॲलिस या सुरवंटामुळे झाड निष्पर्ण होते. नूर्डा मोरिंगीची अळी कळ्यांचे नुकसान करते. महाराष्ट्रात सायक्लोपेल्टा सिक्विफोलिया ही कीड आढळते.

शेवग्याची भारतात सर्वत्र व म्यानमार, श्रीलंका येथे मोठया प्रमाणावर लागवड होते. दक्षिण कॅलिफोर्नियात तो अनेक वर्षे लागवडीत आहे.

मुजुमदार, शां. ब.; परांडेकर, शं. आ.