साल–१ : (वल्क).वनस्पतीचे खोड व मूळ यांच्यावरील बाह्य आवरणाला साल म्हणतात. एका वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व मुळे व खोडे यांवर साल आढळते. लाकडाप्रमाणे सालीत वार्षिक वलये आढळत नाहीत. झाडाची वाढ होऊ लागल्यावर मुळाच्या वाहक ऊतकाबाहेरील (अन्नाची ने-आण करणाऱ्या पेशीसमूहाबाहेरील) स्तराचे हळूहळू सालीत रूपांतर होते किंवा वनस्पतीच्या खोडाचा जो स्तर त्याला बाह्य आकार देण्यास मदत करतो त्यापासून साल तयार होते.

साल (आडवाछेद) : (१)वल्करंध्र, (२) परित्वचा, (३) मध्यत्वचा, (४) परिकाष्ठ, (५) ऊतककर, (६) साल, (७) वार्षिक वलय.तयार झालेली नवीन सालही पुढील दोन स्तरांची बनलेली असते : आतील द्वितीयक ⇨ परिकाष्ठ  आणि बाहेरील ⇨ परित्वचा. परिकाष्ठात अन्न व संवहन या कार्यांसाठी विशिष्ट भाग विकसित झालेले असतात. परित्वचा त्रिस्तरीय ऊतक असून ती त्वचेप्रमाणे संरक्षणाचे कार्य करते. तिचे कोशिकावरण (पेशीचे बाह्य आवरण) जलरोधी असून ते सुबेरिन या मेद पदार्थापासून तयार झालेले असते. परित्वचेच्या आतील भागाला उपत्वक्षा किंवा द्वितीयक ⇨ मध्यत्वचा  म्हणतात. तीमध्ये सजीव कोशिका (पेशी) असून त्या ⇨ प्रकाशसंश्लेषण  व अन्न साठविण्याचे कार्य करतात. वनस्पती आणि वातावरण यांच्यातील हवेचा विनिमय छोट्या ⇨ वल्करंध्रांच्या मदतीने होतो. वल्करंध्रे ही त्या जातीच्या वनस्पतीचे वैशिष्ट्ये असतात. जुनाट साल काढून टाकल्यानंतर त्यामागील परित्वचेचा स्तर नवीन आवरण तयार करतात.

 

सालीपासून व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची मिळणारी वस्तू म्हणजे ⇨ रबर  होय. हेविया  व इतर झाडांच्या सालीपासून चीक मिळतो, त्यापासून रबर तयार करतात. ओक वृक्षाच्या सालीपासून ⇨ बूच  मिळते. बाभूळ, चेस्टनट, हेमलॉक, ओक इ. वृक्षांच्या सालीचा उपयोग कातडी कमविण्यासाठी करतात. कॅस्केरा व क्विनीन ही औषधे कॅस्केरा सॅग्रेडा  व सिंकोना वृक्षाच्या सालीपासून मिळवितात. कौरी, स्प्रूस, बाभूळ, लिंब इ. वृक्षांच्या सालीपासून डिंक मिळतो. फ्लॅक्स व हेंप यांपासून तलम तंतू मिळतात. ताग, रॅमी व केनाफ (अंबाडीचा एक प्रकार) यांच्या सालीपासून मिळणाऱ्या तंतूच्या विविध उपयोगी वस्तू बनवितात. उंबर, वड व रुई यांच्या सालीचा चीक औषधी असतो, तर नांग्या शेर व शेंड यांचा चीक विषारी असतो.

पहा: त्वक्षा परिकाष्ठ परित्वचा वल्करंध्र शारीर, वनस्पतींचे.

जाधव,  ज्योती