नांद्रुक: (हिं. पिन्वाल, कामरूप क. पिलीमरा सं. कुबेरक, कणी लॅ. फायकस रेट्यूजा कुल-मोरेसी). मध्यम आकारमानाचा हा सदार्पणी वृक्ष पूर्व हिमालयाचा पायथा, खासी, आसाम, द. भारत ब्रह्मदेश, मलेशिया, चीन, न्यू कॅलिडोनिया इ. प्रदेशांत आढळतो. सामान्यपणे महाराष्ट्रात हा रस्त्यांच्या दुतर्फा सावलीकरिता लावलेला आढळतो. उंची ९–१२ मी. व घेर १·८–३·६ मी. असून पारंब्या फारच थोड्या असतात किंवा नसतात. सर्व भाग गुळगुळीत पाने साधी, चकचकीत व चिवट, लहान, लांबी व रुंदी सारखी, अखंड, अंडाकृती किंवा दीर्घवर्तुळाकृती टोक निमुळते किंवा बोथट उपपर्णे कुंतसम (भाल्यासारखी), लहान कक्षास्थ (बगलेतील) कुंभासनींची (फुलोरा) जोडी गोल व लहान वाटण्याएवढी, अवृंत (बिनदेठाची), पुं-पुष्पे विपुल, केसरदल १, संदले ३, गुल्मपुष्पे व स्त्री-पुष्पे कमी परागण (परागकण किंजल्कावर घालण्याचे कार्य) ‘वरट’ कीटकांकडून [→ अंजीर] होते [→ फूल] औदुंबरिक (उंबरासारखे) फळ [→ फळ] पिवळट किंवा लालसर कृत्स्नफळे अनेक. फळांचे विकिरण (प्रसार) पक्ष्यांनी व प्राण्यांनी फळे खाल्ल्यावर त्यांच्या विष्ठेतून होते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ मोरेसी कुलात (वट कुलात) वर्णिल्याप्रमाणे. लाकूड मध्यम कठीण व हलके असून सामान्य लाकडी वस्तूंसाठी व जळणास उपयुक्त असते. सालीचा रस यकृताच्या विकारांवर देतात. साल व पानांचे चूर्ण संधिवातातील डोकेदुखीवर देतात मुळाची साल व पाने तेलात उकळून जखमांवर लावतात. तुळशीची व याची पाने यांचा समभाग रस मिसळून तो आटवून त्याचा पोटावर लेप लावल्यास आणि गरम विटेने शेकल्यास पोटदुखी थांबते.

आष्टा (लॅ. फायकस रंफाय) आणि पिंपरी (लॅ. फायकस त्सिएला) हे दोन्ही वृक्ष नांद्रुकाच्या वंशातील असून यांची अनेक लक्षणे सारखीच आहेत त्यांचा प्रसार भारतात सामान्य असून रस्त्याच्या दुतर्फा सावलीकरिता हे वृक्ष लावतात. यांची काही लक्षणे मात्र भिन्न आहेत. आष्टा (पायर) हा पानझडी वृक्ष पिंपळासारखा असून पानांना प्रकुंचित (निमुळते) टोक असते पाने साधारण चिवट व औदुंबरिक फळे १·५ सेंमी., जोडीने वाढणारी आणि काळी असतात. पानांचा रस वांतिकारक व कृमिनाशक असून दम्यावर हळद व मिरी यांसह तुपातून पोटात देतात फळे खातात पाने व लहान फांद्या गुरांना वा हत्तींना खाऊ घालतात. लाकूड जळणासाठी वापरतात. भारतीय लाखेच्या किड्याकरिता हे झाड वापरले जाते. सालीपासून बळकट धागा मिळतो. याच्या चिकात ७% काऊछुक असते. पिंपरी (कनीनिका) या वृक्षाला पारंब्या नसतात पाने पातळ औदुंबरिक फळे फांद्यांच्या टोकाशी गर्दीने वाढतात व जांभळी असतात याची साल पोटदुखीवर देतात. फांद्या व पाने गुरांना खाऊ घालतात. लाकूड जळणाकरिता, कोळशाकरिता किंवा किरकोळ उपयोगांकरिता वापरतात.

संदर्भ :  C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, New Delhi, 1956.

ज्ञानसागर, वि. रा.