चिकाळ नलिका : (१) संधियुक्त नलिका (सॅल्सिफाय), (२) संधिहीन नलिका (यूफोर्बिया स्प्लेंडेन्स), (३) संधियुक्त नलिका (कोकसाघीज).

चीक : (सं. क्षीर, आक्षीर लॅ. लॅटेक्स ). फुलझाडांच्या अनेक कुलांतील जातींत दाट व दुधी किंवा पातळ पाण्यासारखा अथवा पिवळट, लालसर, क्वचित चिकट असा द्रव पदार्थ आढळतो. त्याला हे नाव दिले आहे. यामध्ये स्टार्च, प्रथिने, शर्करा, टॅनीन, गोंद, पायसरूप (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांच्या मिश्रणाच्या रूपातील) मेद (चरबी), एंझाइमे (सजीव पेशींत तयार होणारी, प्रथिनयुक्त व रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी संयुगे), अल्कलॉइडे, रबर इत्यादींसारखे (संचित किंवा उत्सर्ग), उपयुक्त किंवा टाकाऊ पदार्थ असून त्या वनस्पतींच्या चयापचयात (वनस्पतीमध्ये सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींत) ते निर्माण झालेले असतात. काही विरघळलेले व काही सूक्ष्म कणांच्या स्वरूपात असतात. भिन्न जातींत यांचे प्रमाण भिन्न असते. चिकाचे कार्य अद्याप निश्चित माहीत नाही. पाणी, अन्न, टाकाऊ पदार्थ इ. स्वतंत्रपणे साठविणे त्यांची ने-आण करणे वनस्पतीचे संरक्षण करणे, इ. चिकाची कार्ये असावीत असे काही शास्त्रज्ञ मानतात.

चीक विशिष्ट प्रकारच्या जिवंत कोशिका (पेशी) व वाहिन्यातून शरीरभर खेळवला जातो. तो त्याच जिवंत कोशिका आणि वाहिन्या यांमध्ये निर्माण होतो. कोणत्याही कारणाने वनस्पतीस जखम झाल्यास त्या शरीरघटकातील दाबामुळे तो थेंबाथेंबानी बाहेर गळू लागतो. त्याची गणना स्त्रावक पदार्थांत होते. हवेशी संपर्क होताच चीक बहुधा गोठतो. चिकाची निर्मिती, साठवण व वहन करणारे जिवंत घटक दोन प्रकारचे असतात : कोशिका व वाहिन्या. कोशिकांना ‘संधिहीन चिकाळ नलिका’  व वाहिन्यांना ‘संधियुक्त चिकाळ नलिका’ म्हणतात. दोन्हींचा उगम वनस्पतीची वाढ होत असताना अग्रस्थ (टोकाच्या) ⇨ विभज्येत (सतत संख्यावाढ होत असलेल्या कोशिकांच्या समूहात) होतो. संधिहीन नलिका स्वतंत्रपणे एका कोशिकेपासून बनतात आणि शाखायुक्त होतात परंतु संधियुक्त नलिका अनेक कोशिकांच्या रांगेपासून बनतात. त्यावेळी स्वतंत्र कोशिकांतील भिंती अंशतः नाश पावतात. त्यांच्या शाखा परस्परांत गुंतून जाळे बनते. दोन्ही प्रकारच्या घटकांच्या शाखा इतर ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीच्या समूहांत) पसरतात. त्यांच्या भिंती नरम व बहुधा जाड असून (पहा : आकृती) प्राकलात अनेक प्रकल (केंद्रक) असतात [→ कोशिका]. त्यांची गणना वनस्पतींतील स्त्रावक ऊतकांत होते. संधियुक्त नलिका पॅपॅव्हरेसी (अहिफेन कुल), कॅरिकेसी (पपई कुल), कंपॉझिटी (सूर्यफूल कुल), झिंजिबरेसी या कुलांतील जातींत व रबराच्या झाडात आणि संधिहीन नलिका ॲस्क्लेपीएडेसी (रुई कुल), ॲपोसायनेसी (करवीर कुल), यूफोर्बिएसी (एरंड कुल), मोरेसी (वट कुल) वगैरे वनस्पती कुलांतील जातींत आढळतात. रबर, अफू, गटापर्चा, चघळण्याचा गोंद इ.पदार्थ भिन्न वनस्पतींच्या चिकापासून बनवितात. अमेरिकेच्या उष्ण भागातील गोवृक्षाचा चीक त्या प्रदेशातील लोक दुधाप्रमाणे वापरतात. काही वनस्पतींतील चीक फार विषारी असतो. बोर्निओ, सुमात्रा व फिलिपीन्स येथे लागवडीत असलेल्या पॅलॅक्वियम गटा  या मूळच्या मलायी वृक्षापासून गटापर्चा मिळवितात.

पहा : ऊतके, वनस्पतींतील; दुधळ; रबर; वनस्पति, विषारी.

परांडेकर, शं. आ.