रंभ : (स्टीली). सर्व उच्च दर्जाच्या वनस्पतींत अन्नरस व पाणी यांची ने-आण करणाऱ्या व सर्व शरीरावयवांत अखंडपणे आढळणाऱ्या सर्व वाहक ऊतक तंत्राला [→ ऊतके, वनस्पतींतील] प्राथमिक वाहक संरचनेने एकक मानतात व यालाच ‘रंभ’ म्हणतात. यामध्ये सर्व वाहक ऊतकांचा समावेश प्रामुख्याने होतो शिवाय त्यांच्याशी संलग्न असलेल्या तल्पऊतकांपैकी इतर कोशिकांचाही (पेशींचाही) समावेश होतो उदा., ⇨ भेंड (मज्जा), ⇨ परिरंभ (रंभाभोवती असलेले ऊतक) इत्यादी. रंभ-सिध्दांतानुसार प्राथमिक मूळ आणि खोड यांमध्ये ⇨ मध्यत्वचेने वेढलेला मध्यवर्ती रंभ हा भाग बव्हंशी सारखा असल्याने ते दोन्ही मूलतः सारखेच होत. पूर्वी वाहक ऊतकयुक्त ⇨ प्रकाष्ठ (पाण्याची ने-आण करणाऱ्या घटकांचा समूह) व ⇨ परिकाष्ठ (अन्नरसाची ने-आण करणाऱ्या घटकांचा समूह) यांचा बनलेला ⇨ वाहकवृंद हा प्राथमिक वाहक संरचनेचे एकक मानीत असत.

रंभाचे अनेक प्रकार आढळतात, कारण प्रकाष्ठ व परिकाष्ठ यांच्या परस्परसापेक्ष प्रमाणात, स्थानात व विभागणीत वनस्पतींच्या भिन्न भिन्न गटांत अथवा एकाच वनस्पतीच्या भिन्न अवयवांत फरक आढळतात (आकृती पहा).

(१) सर्वांत साधा व जातिविकासाच्या दृष्टीने प्रारंभिक रंभाला ‘आद्यरंभ’ म्हणतात. हा भेंड नसलेला प्रकार असून रंभामध्ये भरीव प्रकाष्ठ व त्याभोवती वेष्टनाप्रमाणे परिकाष्ठ असते. खालच्या दर्जाच्या वाहक वनस्पतींत नेचांच्या [→ नेचे] खोडांच्या आरंभावस्थेत व काही पाण्यांतील आवृतबीज वनस्पतींच्या (फुलझाडांच्या) खोडांत हा प्रकार आढळतो. काहींत [उदा., लायकोपोडियम (→ लायकोपोडिएलीझ) व सिलाजिनेला (→ सिलाजिनेलेलीझ) यांच्या काही जातींत] प्रकाष्ठाचे व परिकाष्ठाचे विविध मिश्रण आढळते. कित्येक भेंडहीन मुळांतही आद्यरंभ असतो.

रंभ

(२) भेंडयुक्त रंभात प्रकाष्ठ व परिकाष्ठ भेंडाभोवती नळीप्रमाणे असतात याला ‘नलिकारंभ’ म्हणतात. यात दोन उपप्रकार आढळतात : एकात परिकाष्ठ फक्त प्रकाष्ठाबाहेर आणि दुसऱ्यात ते आत व बाहेर बनलेले असते. पहिले बाहापरिकाष्ठी व दुसरे द्विपरिकाष्ठी अशा नलिकारंभापासून ज्या वेळी खोडावर वाढणाऱ्या पानात किंवा फांदीत रंभाचा लहान भाग जोडला जातो त्या वेळी त्याला अनुक्रमे ‘पर्णलेश’ व ‘शाखालेश’ म्हणतात तसेच रंभावर यामुळे कधीकधी फट पडते तिला अनुक्रमे ‘पर्णविवर’ व ‘शाखाविवर’ म्हणतात. खोडाच्या एका कांडावर (दोन पेऱ्यांमधील भागांवर) एकच विवर असल्यास आडव्या छेदात रंभाची आकृती तुटलेल्या कडीप्रमाणे (अपूर्ण-खंडित वलयाकृती) दिसते परंतु एका कांडावर अनेक विवरे असल्यास संपूर्ण रंभनलिका जाळीदार (जालरंभ) दिसते. आडव्या छेदात रंभाचे अनेक तुटक खंड दिसतात. बाह्यपरिकाष्ठी नलिकारंभाचा प्रत्येक खंड संलग्न वाहक वृंदाप्रमाणे (बाहेर परिकाष्ठ व आत प्रकाष्ठ असलेला) दिसतो व त्या सर्वांचे एक वर्तुळ दिसते हा रंभ अनेक प्रकटबीज वनस्पतींत [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] व बहुतेक सर्व द्विदलिकित वनस्पतींत आढळतो, त्याला ‘वृंदरंभ’ म्हणतात. द्विपरिकाष्ठी नलिकारंभाचे अनेक खंड पडल्यास प्रत्येक खंड ‘एकमध्य वृंद’ किंवा ‘द्विसंलग्न वृंद’ (प्रकाष्ठाच्या आतील व बाहेरील बाजूस परिकाष्ठ असलेला वृंद) असतो कारण आतला व बाहेरचा परिकाष्ठ जुळून प्रकाष्ठाला वेढून टाकतो (उदा., नेफ्रोलेपिस) किंवा तसाच राहतो. प्रत्येक वृंद आद्यरंभाप्रमाणे दिसत असल्याने पूर्वी अशा रंभाला ‘बहुरंभ’ म्हणत असत परंतु हल्ली ती संज्ञा मानीत नाहीत. आद्यरंभ, नलिकारंभ व जालरंभ हा क्रम जातिविकासातही पाळला गेला असावा कारण नेचासारख्या (उदा., चिंचफर्न नेचा नेफ्रोलेपिस) वनस्पतीत खोडाच्या विकासात असा क्रम आढळतो. बहुतेक एकदलिकित वनस्पतींत जालरंभापासून निघालेले अनेक वाहक वृंद भेंडात व मध्यत्वचेत विखुरलेले आढळतात. त्यामुळे रंभाचे नळीसारखे मूळचे स्वरूप नाहीसे होते.

भरीव आद्यरंभापासून पोकळ नलिकारंभाच्या विकासाबद्दल दोन सिद्धांत मांडले आहेत : ‘प्रसरण-सिद्धांत’ व ‘आक्रमण-सिद्धांत’. पहिल्या सिद्धांतान्वये अग्रस्थ विभज्येपासून [→ विभज्या] वाहक ऊतक तंत्राचे प्रभेदन (कार्य विभागणीनुसार होणारा फेरबदल) होत असताना रंभामधल्या जागेत वाहक ऊतकांची निर्मिती न झाल्याने तेथे तल्पऊतक बनते व त्याला भेंड म्हणतात याचा अर्थ भेंड हे मूलतः वाहक ऊतक होय. दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे पर्णविवरातून रंभाबाहेरील मध्यत्वचेने वाहक नलिकेत प्रवेश (आक्रमण) केल्यामुळे तेथे भेंडाची उत्पत्ती झाली म्हणजेच भेंड हे मूळचे रंभबाह्य ऊतक होय. बीजी वनस्पतींच्या [→ वनस्पति, बीजी विभाग] बाबतीत तरी दुसरा सिद्धांत ग्राह्य मानला असून बहुतेक वाहिनीवंत अबीजी वनस्पतींतही [→ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] तो लागू पडतो.

पर्णलेशात वाहक वृंद संख्येने कमी जास्त असतात परंतु एखाद्या जातीत किंवा गटातील सर्व जातींत ती संख्या कायम असते, तसेच मध्यत्वचेतून पानांकडे (देठाकडे) जाताना त्यांची संख्या संयोगाने कमी किंवा विभाजनाने जास्त होते देठात पोचल्यावरही ही संख्या बदलते. त्याआधी काही लहान वृंद उपपर्णात (उपपर्णे असल्यास) जातात. या सर्व पर्णलेशात सुरुवातीस फक्त प्राथमिक प्रकाष्ठ असून पुढे त्यात परिकाष्ठाची भर पडते, तसेच दुय्यम ऊतके निर्माण होतात. पानाचा आकार, प्रकार, आयुर्मान वगैरेंवर पर्णलेशांची संख्या अवलंबून असते. रंभापासून बाहेर पडणारे पर्णलेश क्वचित सरळ (काटकोन करून) देठात जातात. बहुधा रंभाशी कमीजास्त अंशांचा कोन करून व काही अंतर मध्यत्वचेत वर समांतर जाऊन किंवा वळण घेऊन नंतर त्याचा देठाशी संयोग होतो. यामुळे खोडाच्या आडव्या छेदात त्यांच्या मांडणीत फरक आढळतात.

शाखालेश बहुधा दोन पण कधीकधी एकच असतो. दोन असल्यास लवकरच त्यांचा संयोग होऊन रंभ बनते. एकच असल्यास तो लेश प्रथम अर्धचंद्राकृती पण नंतर पूर्ण वर्तुळाकृती बनून शाखेत जातो.

पहा : ऊतके, वनस्पतींतील परिरंभ भेंड वाहक वृंद शारीर, वनस्पतींचे.

संदर्भ : Eames, A. J. MacDaniels, L. H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953 .

परांडेकर, शं. आ.