ट्रॅडेस्कँशिया झेब्रिना : (इं. वाँडरिंग ज्यू, स्पायडरवर्ट लॅ. झेब्रिना पेंड्युला कुल-कॉमेलिनेसी). ही जमिनीवर पसरत वाढणारी  ⇨ओषधी मूळची अमेरिकेच्या उष्ण भागातील (मेक्सिको) असून फांद्यांची टोके वर वळलेली असतात. पाने मांसल, अंडाकृतीआयत, टोकदार असून वरच्या बाजूवर झीब्र्याप्रमाणे पट्टे (एक जांभळट व दोन पांढरे) असतात व ती खाली किरमिजी रंगाची व केसाळ असतात. आवरक (वेढणाऱ्या) देठाच्या तळाशी व टोकांशी केसांचा झुबका फुले थोडी, बिनदेठाची, जांभळट लाल व प्रत्येकास तळाशी दोन गुलाबी छदे असतात. संवर्त व पुष्पमुकुट नळीसारखे, पाकळ्या जुळलेल्या, केसरदले पांढरी, सहा व सारखी असतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके असून [→ फूल] बोंड त्रिखंडी [→ कॉमेलिनेसी] असते. बागेत खडकाळ जमीन झाकण्यासाठी, कुंडीत किंवा लोंबत्या परडीत शोभेकरिता ही लावतात कलमांपासून नवीन लागवड सहज होते. हिचा रूपेरी प्रकार विशेष लोकप्रिय आहे. सावलीत ओलसर जागी चांगली वाढते आणि नयनमनोहर दिसते.

जमदाडे, ज. वि.

ट्रॅडेस्कॅशिया झेब्रिना