अननस : (इं. पाइन-ॲपल लॅ. अननस कोमोसस, अननस सटिव्हस कुल—ब्रोमेलिएसी). या प्रसिद्ध खाद्याफळाचे झुडूप (क्षुप) सु. १·५ मी. उंच व द्विवर्षायू असून ते मूळचे दक्षिण अमेरिकेतील आहे. ब्राझिलमध्ये त्याचे जंगली प्रकार आढळतात, ‘अननस’ हे नाव तेथील कृष्णवर्णी इंडियन लोकांनी दिलेले असून स्पॅनिश व पोर्तुगीज लोकांनी त्याची लागवड उष्ण कटिबंधातील देशांत केली. याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨बोमेलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिनदेठाच्या, जाड, चिवट, काटेरी टोके व किनार असलेल्या, अरुंद पानांचा गुच्छ असतो त्यातूनच फुलोरा (कणिश) वर येतो. फुले अनेक, लहान द्विलिंगी असून फुलोऱ्याच्या शेंड्यावर पुन्हा लहान पानांचा झुबका येतो व तळाशी अनेक कळ्या (कंदिका) येतात.सर्व कणिशाचे एक संयुक्त पिवळट ⇨फळ  बनते (फलपंज) फुलोऱ्याचा अक्ष, फुलांची छदे, संदले व प्रदल यांनी बनविलेल्या रसाळ गोळ्यात अनेक किंजपुटे पूर्णपणे वेढलेली असतात [→ फूल]. हेच अननस या नावाने विकले जाते ते साधारणतः पाइन वृक्षाच्या शंकूप्रमाणे दिसते त्यामुळे ‘पाइनॲपल’ असे इंग्रजी नाव पडले आहे. लागवडीतल्या प्रकारात बी नसते. फळ गोड, स्वादिष्ट व पथ्यकर असते.

अननसभारतात १५४८ साली आणि यूरोपमध्ये १५५५ साली अननसाचे झुडूप आणण्यात आले. मलाया, जावा, सुमात्रा, द. आफ्रिका, हवाई बेटे, क्वीन्सलँड, सिंगापूर, श्रीलंका व भारत हे अननस पिकवणारे प्रदेश आहेत. भारतात आसाम, बिहार, केरळ हे अननसाच्या लागवडीचे महत्त्वाचे प्रदेश असून कोकणासारख्या समुद्रकिनारपट्टीच्या इतर भागांतही त्याची लागवड करतात. त्याचप्रमाणे किनाऱ्यापासून दूर अंतर्भागात ९०० ते १,२०० मी. उंचीच्या प्रदेशातही लावतात.

उत्तम निचरा होणारी सर्व तऱ्हेची ४.५–५.५ pH असलेली [→ पीएच मूल्य] जमीन, ७५ ते ५०० सेंमी. पर्यंत वार्षिक पर्जन्यमान व १५–३२ से. तापमान लागते. खत व पाणी भरपूर उपलब्ध असल्यास भारतात इतरत्र पुष्कळ भागात अननस लावता येईल.

लागवड : शाकीय पद्धतीने (वनस्पतीचे बीजाव्यतिरिक्त इतर भाग लावून) अधश्वर, प्ररोह किंवा शेंडे लावून लागवड करतात. अधश्वर म्हणजे बुंध्यापासून अगर पानाच्या कक्षेतून निघालेली फूट व प्ररोह म्हणजे फळाच्या दांड्यावर निघालेली फूट आणि शेंडा म्हणजे फळाच्या माथ्यावरील पानांच्या झुबका. अधश्वरापासूनच्या पिकाला चौदा ते अठरा महिन्यांनी आणि प्ररोह व शेंडे यांपासूनच्या पिकाला दोन वर्षांनंतर फळे येतात.

जमीन नांगरून, कुळवून तयार करतात. पावसाच्या पाण्यावरील पीक पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पाणभरते पीक हिवाळ्यात, दोन ओळींत दीड ते दोन मी. व एकच ओळीतील दोन झाडांत एक ते दीड मी. अंतर ठेवून लावतात. पुरेसे पाणी, हेक्टरला १२ टन शेणखत आणि मार्च, जून, जुलै व सप्टेंबर मध्ये खांदणी दिल्यास पीक चांगले येते. तसेच ५०-८० किग्रॅ. नायट्रोजन, २५-४० किग्रॅ. फॉस्फरस व ५०-८० किग्रॅ. पोटॅश किंवा नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम यांचे १२: ६: १२ असे प्रमाण असलेले मिश्रखत ५४०-९०० किग्रॅ. लागवडीनंतर २-३ हप्यांत विभागून देतात. साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल या मुदतीमध्ये झाडांना फुले येतात व जुलै व सप्टेंबर पर्यंत जातीप्रमाणे फळे पिकतात. ‘क्यू’ जातीच्या काही झाडांना आडसाली फुले येऊन डिसेंबरपर्यंत त्यांची फळे पिकतात. ‘जायंट क्यू’ जातीची फळे इतर जातींपेक्षा उशिरा पिकतात. फळे चार ते सहा किग्रॅ. वजनाची होऊन ऑगस्ट-सप्टेंबरात पिकतात. तयार फळे जरा हिरवीच असताना काढून बाजारात पाठवितात. शेंडा काढीत नाहीत काढल्यास फळे लवकर पिकून नासतात.

उत्पन्न : जमीन, मशागत, खत, पाणी, जाती इत्यादींवर अननसाचे उत्पन्न अवलंबून असते. हेक्टरमधील जास्तीत जास्त जागतिक उत्पन्न हवाईमध्ये १०० टनांपर्यंत येते भारतात ते सरासरी साडेतेरा टन पण ‘क्यू’ जातीचे पंचवीस टनांपर्यंत येते.

सर्वसाधारणपणे चार-पाच वर्षांनी नवीन लागवड केल्यास फळे अधिक मोठी येतात. आसामातील डोंगराळ प्रदेशात एकदा लागवड केलेला अननसाचा मळा वीस ते तीस वर्षेंपर्यंत तसाच चालू ठेवतात.

उपयोग : अननसात ब आणि जास्त प्रमाणात क ही जीवनसत्त्वे असतात. पक्व फळे तशीच ताजी खातात. चकत्या करून हवाबंद डब्यात भरण्यासाठी ‘क्यू’ जात फार चांगली समजतात. पक्व फळांपासून रस, मुरंबा, कडी, आसव व शिर्का तयार करतात. साधारणत: दोन वर्षे वाढलेल्या पानांपासून हाताने ‘पिना फायबर’ नावाचा पांढरा चकचकीत, बळकट, उत्तम टिकाऊ व रेशमासारखा धागा काढून त्याचे तलम व किंमती ‘पिनाकापड’ बनवितात (चीन, फॉर्मोसा व फिलिपीन्स बेटे). भारतात हा अननसाचा दोरा गळ्यातील मणिमालांकरिता वापरतात.

परांडेकर, शं. आ. चौधरी, रा. मो.

रोग : अननसावर ‘फलकूज’ व क्वचित ‘खोडकूज’ हे रोग आढळतात. फलकूज हा रोग सिरॅटोस्टोमेला पॅराडॉक्सा या कवकामुळे [→ कवक] बहुधा फळ साठवणीत अथवा त्यांची वाहतूक करताना होतो त्यामुळे फळे काळसर पडून कुजते. म्हणून फळे तोडताना त्यांना इजा होऊ देत नाहीत तसेच वाहतूक करताना काळजी घेतात. खोडकूज हा रोग फायटॉप्थोरा पॅरासिटिका कवकामुळे होतो. रोग वाढू नये म्हणून जमिनीतील पाण्याचा चांगला निचरा करतात.

पिठ्या ढेकूण या किडीचा उपद्रव होतो. त्यासाठी डायझिनॉन वापरतात.

कुलकर्णी, य. स.