कॉफी : जगभर भरपूर खप असलेले व त्यामध्ये असणाऱ्या कॅफीन या अल्कलॉइडामुळे तरतरी आणणारे, विशिष्ट चव आणि स्वाद असलेले, भाजलेल्या कॉफीच्या बियांपासून तयार करण्यात येणारे पेय रुबिएसी कुलातील कॉफिया  वंशातील लहान वृक्ष. कॉफीची पहिली लागवड जरी दक्षिण अरेबियात झाली असली, तरी जंगली अवस्थेतील कॉफी ही वनस्पती प्रथम आफ्रिकेतच आढळल्याने तिचे मूलस्थान आफ्रिका मानतात.

कॉफी (कॉफिया अरॅबिका) : (१) पाने, फुले व फळे यांसह फांदी ; (२) फूल; (३) अर्धवट कापलेले फळ; (४) बी.

कॉफीला तुर्की भाषेत ‘काहव्हेह’ (Kahveh) म्हणतात, त्यावरून अरबी ‘काहवाह’ (Qawah, Kahvah) व या ‘काहवाह’ चा ‘कॉफी’ म्हणजे अरबी मद्य अशा अर्थाने इंग्रजीमध्ये अपभ्रंश झाला असावा. काहींच्या मते इथिओपियातील (ॲबिसिनिया) ‘काफ्फा’ (Kaffa) या कॉफीच्या जन्मगावाचे नाव तिला मिळाले असावे. कडवट चवीच्या तरतरी आणणाऱ्या रसाला (पेयाला) संस्कृतात ‘कटु’ म्हणतात. अशा पेयाला द्रविड ‘कडू’ म्हणत, तर याच अर्थाचा ‘करूआ’ हा शब्दही हिंदूंच्या वापरात आहे. काहींच्या मते या शब्दांवरूनही अरबीतील ‘काहवाह’ हा शब्द आला असावा. इंग्रजी कॉफी हा शब्दच भारतात त्याच अर्थाने प्रचारात आहे. भारतात कॉफीच्या फळाला ‘बुंद’ व तिच्या बियांना ‘बुंद बीज’ म्हणत असा उल्लेख सापडतो. निरनिराळ्या भाषांमध्ये कॉफीला निरनिराळी नावे आहेत. उदा., चिनी : कैफी (Kai-fey); जपानी : कीही (kehi); रशियन : कोफे (Kophe); पर्शियन : कीह्‌व्ही (qehve); लॅटिन : कॉफिया  वगैरे.

 कॉफीचा शोध इथिओपियात नवव्या शतकाच्या उत्तरार्धात लागला असावा. तिच्या शोधासंबंधी अनेक कथा, दंतकथा प्रसिद्ध आहेत. कॉफीमुळे तरतरी येत असल्याने ते एक उत्तेजक मादक पेय असावे आणि कुराणात अशा पेयपानावर बंदी घातलेली असल्याने ते पिणाऱ्यास कडक शासन व्हावे असे विचार जरी सनातनी कडव्या मुल्ला-मौलवींनी मांडले, तरी अरब मुस्लीमांत कॉफीचा प्रसार वाढतच गेला. पंधराव्या शतकात कॉफी इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. तेथून मक्का, मदिना, एडन, कैरो या मध्य आशियातील ठिकाणांहून ईजिप्त, तुर्कस्तानद्वारा तिचा प्रसार सोळाव्या आणि सतराव्या शतकात यूरोपात जर्मनी, फ्रान्स व इंग्लंड येथे झाला. याच सुमारास कॉफीचा प्रसार जावा व इतर बेटे, डच गियाना व नंतर उष्णकटिबंधातील प्रदेशांत, उदा. ब्राझील (१७२७), जमेका (१७३०), क्यूबा (१७४८), मेक्सिको (१७९०) व हवाई बेटे (१८४०) येथे झाला.

 भारतात कॉफी १६०० च्या सुमारास आणली गेली. मक्केहून आलेल्या बाबा बुढण नावाच्या एका मुसलमान फकिराने आणलेले कॉफीचे बी कर्नाटक राज्यातील चंद्रगिरी टेकड्यांवर लावण्यात आले. या लागवडीचा पुढे विस्तार होत गेला. कर्नाटकातील कॉफीच्या लागवडीखालील काही डोंगराळ भाग आजही या फकिराच्या नावाने ओळखला जातो. या मळ्यातून नेलेल्या रोपांपासून १७०० मध्ये डच ईस्ट इंडियामधील कॉफीची लागवड सुरू झाली असे म्हणतात. ब्राझीलमधील कॉफीची लागवडही गोव्यातून नेलेल्या रोपांपासून सुरू झाली असावी असे म्हणतात. दक्षिण भारतात कॉफीची लागवड सुरू होऊन दोन शतके लोटली तरी तिला म्हणावे तसे महत्त्व मिळाले नाही. १७९९ साली ईस्ट इंडिया कंपनीने प्रयोगासाठी तेलचेरी येथे कॉफीची लागवड केली. ती यशस्वी झाल्यामुळे दक्षिण भारतातील घाटांच्या उतारावर पद्धतशीर लागवडीस प्रारंभ झाला. एका शतकाच्या अवधीत या घाटांतील जंगले तोडून उतारावरील अनेक हेक्टर क्षेत्र कॉफीच्या लागवडीखाली आणण्यात आले. १८७२ च्या सुमारास म्हणजे भारतात कॉफी आल्यापासून सु. पावणे तीनशे वर्षांनी येथून २५,००० टन कॉफी निर्यात करण्यात आली.

कॉफी (कॉफिया अरॅबिका) हा लहान सदापर्णी छायाप्रिय वृक्ष असून कमी उंचीच्या प्रदेशात सु. दोन मी., कधीकधी तीन-चार मी. वाढतो. अनुकूल नैसर्गिक परिस्थितीत तो सहा-सात मी. उंचही वाढतो. त्याची सामान्य लक्षणे ⇨रुबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पाने साधी, समोरासमोर, गर्द हिरवी व चकचकीत असतात. फुलातील प्रत्येक मंडलात पाच दले असतात फुले जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान येतात. ती लहान, पांढरी आणि सुवासिक असतात. आठळी-फळ निंबोणीएवढे, गोल व शेंदरी असते. ते कधी लांबट वाटोळे असून साधरणतः १·५ सेंमी. लांब असते. प्रत्येक कॉफीच्या फळामध्ये दोन हिरवट करड्या बिया असतात. त्यांचा आकार एखाद्या कवडीसारखा असतो. या बियांची एक बाजू सपाट व दुसरी बाजू फुगीर असते. प्रत्येक बीजाची सपाट बाजू दुसऱ्या बीजाच्या सपाट बाजूस जोडलेली असते. प्रत्येक बीजावर पातळ चिवट कागदाप्रमाणे एक आवरण (अंतःकवच) असून ते सपाट बाजूकडे दुमडलेले अगर सुरकतलेले असते. दोन बियांवर चिकट, बुळबुळीत अशा पिवळट गराचे आवरण (मध्यकवच) असून तो चवीस गोड असतो. या गरावर एक जाड साल (बाह्यकवच) असते. फळ पिकल्यावर ते एका बाजूस दोन बोटांनी दाबले असता त्यातील दोन बिया दुसऱ्या बाजूने सहज बाहेर पडतात.

 कॉफिया  वंशात अनेक जाती आणि प्रकार असून त्यांपासून तयार होणाऱ्या कॉफीचा स्वाद, चव, उत्पन्न तसेच फलोत्पादनाचा काल, झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वगैरे गोष्टींचा विचार करून लागवडीसाठी योग्य अशा जाती निवडल्या जातात. ह्या वंशातील अरॅबिका, रोबस्टा, लायबेरिका स्टेनोफायला (एक्सेलसिया) या चार जातीच जगभर विशेष लागवडीत आहेत.

 कॉफिया अरॅबिका  : प्रथम शोध लागलेली व पूर्वापार लागवडीत असलेली हीच जाती असून जगातील कॉफीखालील एकूण क्षेत्रापैकी सर्वांत जास्त म्हणजे ७०% इतके क्षेत्र या जातीच्या लागवडीखाली आहे. तिच्या पोटजातीचे भारतात अनेक प्रकार लावले जातात. त्यापैकी चिक्स, कूर्ग, केंट्स हे प्रकार महत्त्वाचे आहेत. कर्नाटकातील चिकमंगळूर भागात लागवडीत असणाऱ्या अरॅबिकाच्या प्रकाराला चिक्स हे नाव दिलेले आहे. याची फळे गोल आणि मोठी असतात. याच्या कॉफीला परदेशात चांगला भाव मिळतो. परंतु या प्रकारच्या झाडांना खोडकिड्यांचा फार उपद्रव होत असल्यामुळे त्याच्या खालचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. कूर्ग  हा चिक्सपासून तयार केलेला खोडकिड्यांचा प्रतिकार करू शकणारा प्रकार असून याच्या लागवडीखालीही बरेच क्षेत्र आहे. याचे फळ लांबट, हिरवट किंवा निळसर व चिक्सपेक्षा अधिक चपटे असते. कूर्गपासून तयार केलेला केंट्स हा प्रकार सध्या भारतात लोकप्रिय आहे. हा प्रकार भरपूर उत्पन्न देणारा असून त्याचे फळ राखी रंगाचे असते.

 कॉ. रोबस्टा  : हिचा बेल्जियम काँगोमधून व जावातून भारतात प्रवेश झाला असावा. अरॅबिका  आणि लायबेरिकापेक्षा जोराने वाढणारी, भरपूर उत्पन्न देणारी, रोगप्रतिकारक व लवकर बहार येणारी ही जाती आहे. हिच्या बियांत कॅफिनाचे प्रमाण १·५ ते २·५% असते. फळे फिक्कट तांबडी. ही जाती समुद्रसपाटीपासून ३०० ते ६०० मी. उंचीवर जास्त लागवडीत आहे. केळी, आंबे, नारळ यांच्यामधूनही उपपीक म्हणून लावतात. जगात ही २८% इतकी लागवडीत आहे.

 कॉ. स्टेनोफायला मूलस्थान प. आफ्रिकेतील सिएरा लिओन. झाड किरकोळ असून पाने लहान असतात. फळे लांबट असून पिकल्यावर काळी पडतात. बहार उशीरा येतो. या कॉफीची लज्जत अरॅबिकापेक्षा चांगली असते.

 कॉ. लायबेरिका : या जातीचे झाड खूप उंच १२ ते १५ मी. वाढते. कमी दर्जाच्या जमिनीत, उष्ण हवामानातही वाढू शकते. उत्पन्न भरपूर असून फळे पिकल्यावर झाडावरून गळून पडत नाहीत. ह्या जातीच्या कॉफीचा स्वाद कडक असतो, पण दर्जा मात्र अरॅबिकापेक्षा कमी असतो. हिच्यातील कॅफिनाचे प्रमाण १·००–१·४५% असते. पानांवर रोग पडतो. ही सर्वांत कमी लागवडीत म्हणजे सु. १% इतकीच आहे.

हर्डीकर, कमला श्री.

आफ्रिकेतील अंगोला, आयव्हरी कोस्ट, इथिओपिया, न्यासालॅंड, टांगानिका, काँगो, घाना इ. देशांत आशियातील मुख्यत्वे भारत, श्रीलंका व इंडोनेशिया या देशांत आणि अमेरिकेतील ब्राझील, कोलंबिया, पेरू, एक्वादोर, मेक्सिको, व्हेनेझुएला व एल् साल्वादोर या देशांत कॉफीची लागवड होते.

 भारतात कर्नाटक (६१%), केरळ (२२%), तमिळनाडू (१६%) आणि आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, आसाम, प. बंगाल, अंदमान-निकोबार बेटे (१%) येथे कॉफीची लागवड करण्यात येते. भारतातील कॉफीच्या लागवडीचे एकूण क्षेत्र १,३९,४७८ हे. असून त्यापैकी ८४,३६३ हे. अरॅबिकाखाली व ५५,११५ हे. रोबस्टाखाली आहे. आंध्र प्रदेशातील ८१० हे. जंगल–जमीन कॉफीच्या लागवडीखाली आणण्यात येत आहे.

 हवामान : ह्या पिकाकरिता लागवडीच्या वेळी उष्ण दमट हवामान, तर फळे पिकण्याच्या वेळी कोरडे हवामान लागते. या झाडांना थंडीचा कडाका सोसवत नाही. सरासरी तापमान २१ से. असावे. कमीत कमी १२ से. व जास्तीत जास्त २६ से. तापमान झाडांना सोसते. वार्षिक पर्जन्यमान १७५–२०० सेंमी. लागते. वर्षभर जर अधूनमधून पाऊस पडत असेल, तर अधिक पाऊसही चालतो पण पाण्याचा निचरा झाला पाहिजे. दीर्घकालीन अवर्षणाने पिके मरतात. कमी उंचीवर झाडांना सावलीची गरज असते. मात्र ९००–१८०० मी. उंचीवर ती चांगली वाढतात.

 जमीन :  जैव (सेंद्रिय) पदार्थ भरपूर असणारी, अम्ल प्रकृतीची, कमी pH मूल्याची (विद्रावाची अम्लता व क्षारता म्हणजे अल्कलायनिटी दाखविणाऱ्या मूल्याची), खोल, निचऱ्याची व कोणत्याही रंगाची जमीन कॉफीच्या लागवडीसाठी चालते. कॉफीचे पीक चांगले येण्यासाठी लागवड करताना जमिनीची परिस्थिती व उघडी बाजू यांचा विचार करावा लागतो. दक्षिण भारतात कॉफीचे मळे दऱ्याखोऱ्यांच्या उतरणींवरील जमिनीत लावतात. डोंगरमाथ्यावरील पठारे आणि वारा घुमणाऱ्या दऱ्यांमध्ये लागवड करीत नाहीत. कारण अशा ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडतात व पावसाने जमिनीची धूप होते. जंगले तोडून कॉफीच्या लागवडीसाठी जमीन तयार करताना तेथील काही झाडे सावलीसाठी राखतात. कमी उंचीवर कॉफीच्या झाडांना सावलीची आवश्यकता असल्याने लावगडीबरोबरच भारतात सिल्व्हर ओक, पांगारा, आंबा, जांभूळ, काजू, फणस यांसारखी जलद वाढणारी झाडे ३·५ X ३·५ मी. एवढ्या अंतरावर लावतात. रोपे वाढल्यावर सु. १०·५ X १०·५ मी. इतक्या अंतरावरची झाडे ठेवून इतर झाडे काढून टाकतात. सावलीसाठी अल्पकाळ टिकणारी, ताग किंवा निळीच्या जातीची पिके चांगली असतात. त्यांच्या डहाळ्या गाडून हिरवळीचे खतही कॉफीच्या पिकाला देता येते.

लागवड : निरनिराळ्या देशांत कॉफीच्या झाडांच्या लागवडीच्या निरनिराळ्या पद्धती प्रचारात आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांची कलमे लावून, तर काही ठिकाणी फांद्या वाकवून त्या जमिनीत पुरून त्यांपासून वेगळी रोपे तयार करून, ती रोपे इतरत्र लावून लागवड करतात. काही ठिकाणी प्रत्यक्ष बी पेरून, तर काही ठिकाणी बियांपासून रोपे तयार करून घेऊन लावतात. भारतामध्ये शेवटी दिलेली पद्धत अधिक प्रचारात आहे.

 रोपे तयार करणे  : चांगल्या वाणाच्या, भरपूर उत्पन्न देणाऱ्या, निरोगी व परिपक्व अशा कॉफीच्या झाडावरच्या फळातील बी रोपे तयार करण्यासाठी निवडतात. बी निवडण्यासाठी व सुटे करण्यासाठी प्रथम पक्व फळे पायाखाली तुडवितात किंवा हातांनी कुस्करतात. तयार झालेला लगदा पाण्यात घालतात. सुटे झालेले हलके बी पाण्यावर तरंगते असे बी चांगले नसते म्हणून पेरणीसाठी वापरीत नाहीत. पाण्याच्या तळाशी असलेल्या जड बिया काढून निथळतात व चांगल्या कोरड्या करण्यासाठी राखेत घोळतात. त्यानंतर त्या चांगल्या खळखळीत वाळवितात व त्यांच्यातून किडके वा खराब बी, खडे इ. वस्तू निवडून फेकून देतात.

 रोपासाठी नवाद्याची, कसदार, झाडे नसलेली जमीन निवडतात. गादी वाफे तयार करताना जमिनीत भरपूर शेणखत मिसळतात. तसेच योग्य त्या प्रमाणात कळीचा चुना व खनिज फॉस्फेटही घालतात. पाऊस जास्त असणाऱ्या भागात वाफे उंच करतात. अन्यथा ते जमिनीच्या पातळीतच असतात. माती चांगली घोळून १५ ते २५ सेंमी. उंच, ९० सेंमी. रुंद व ६ मी. लांब असे गादी वाफे तयार करतात. दोन वाफ्यांमध्ये ५० सेंमी. इतकी जागा सोडतात. एकेक बी गोल बाजू वर करून हाताने वाफ्यात टोकतात. चांगली रोपे तयार होण्यासाठी भरपूर पाणी पुरवठा आवश्यक असतो व निचऱ्याचीही गरज असते. एका गादी वाफ्यात सु. ७,५०० बिया लावतात. बिया टोकल्यानंतर वाफ्यावर शेणखताचा हलकासा थर पसरतात. त्यावर २–२·५ सेंमी. जाडीचा भाताच्या कोंड्याचा थर पसरतात. लाकडाचा कुजलेला भुसा या कामी चांगला असतो. यासाठी केळीची पाने व सोपटे सर्वांत चांगली असतात. त्यामुळे पाणी देताना बी विस्कटत नाही. ३० ते ५० दिवसांनंतर बी उगवू लागते. यावेळी वरचा कोंडा काढून टाकतात. वाढणाऱ्या रोपांना सावलीसाठी १२X७·५X१·५ मी. या मापाचा मांडव घालतात. त्यावर डहाळ्या टाकून आच्छादन करतात. रोपांचे गुरांमुळे व पाखरांमुळे नुकसान होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतात. प्रत्यक्ष जमिनीत लागवडीकरिता नेण्यापूर्वी तयार झालेली ही रोपे बांबूच्या पाट्यांत अथवा टोपल्यांत बदलून लावतात.या टोपल्यांत जंगलातील पालापाचोळा ज्यात कुजलेला आहे अशी माती व शेणखताची भुकटी मिसळून भरतात. अशा रीतीने तयार केलेल्या टोपल्या मांडवाखाली ठेवून देतात. एका मांडवात सु. ५,००० टोपल्या मावतात. या टोपल्या बांबू बांधून तयार केलेल्या १ X११ मी. मापाच्या एका चौकटीत बसवितात. अशा एका चौकटीत १,००० टोपल्या बसतात. एका मांडवात पाच चौकटी असतात. टोपल्यांत रोपे तयार केल्याने ती लांबवर वाहून नेता येतात व त्यांच्या मुळांना इजाही पोहोचत नाही, हा फायदा या पद्धतीत मिळतो. या टोपल्या तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. टोपल्या प्रथम ४% मोरचुदाच्या विद्रावात उकळतात. नंतर त्यांच्या तळाशी फणसाची पाने आडवी उभी लावून खत-मातीचे मिश्रण भरतात व हाताने घट्ट दाबतात. टोपल्यात नुकतीच उगवून आलेली कॉफीची सु. २० सेंमी. उंचीची रोपे प्रत्येकी एक याप्रमाणे लावतात. हे काम फार काळजीपूर्वक करावे लागते. वाफ्यातून रोपे काढताना मुळांना इजा होणार नाही अशा बेतानी हळूवार आणि त्यांना मातीचा बराच भाग चिकटून येईल अशा रीतीने काढतात. मुळे कोरडी निघाल्यास ती लगेच शेणकाल्यात बुडवितात. रोपांना सकाळ-संध्याकाळ पाणी देतात. पावसाळ्यात मांडव काढून टाकतात. झाडे कायम जागी लावण्याकरिता, हलक्या प्रकारच्या जमिनीत सु. दीड मी. अंतरावर, मध्यम प्रकारच्या जमिनीत दोन मी. अंतरावर, तर उत्कृष्ट जमिनीत दोन ते तीन मी. अंतरावर सु. ४५ X ४५ X ४५ सेंमी. आकाराचे खड्डे ओळीने रांगांत खणतात. रोबस्टाची रोपे लावताना, अरॅबिकापेक्षा खड्ड्यामध्ये जास्त अंतर सोडतात. काही वेळा रोपे १५–१८ महिन्यांची झाल्यावर वाफ्यातून काढून एकदम खड्ड्यात लावतात. ही लागवड सामान्यतः पावसाळ्याच्या आरंभी जून–जुलैमध्ये करतात. पाऊस नसेल तर झाडांना पाणी द्यावे लागते. टोपल्यांत वाढविलेली रोपे, पावसाचा जोर कमी झाल्यावर सप्टेंबरमध्ये खड्ड्यांत लावतात. जमीन पुरेशी ओली नसल्यास अगर चिखल झालेला असल्यासही ती लावीत नाहीत. तयार केलेल्या रोपांतील अर्धवट वाढलेली, रोगट वा कमजोर रोपे फेकून देतात. निवडलेली रोपे खड्ड्यात टोपल्यांसह किंवा टोपल्यांतून काढून लावताना खत मातीने भरून ठेवलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी टोपलीच्या आकाराचा खळगा करतात. टोपलीचा तळभाग कापून व मुळाचे टोक थोडेसे छाटून टोपली खळग्यात ठेवतात. तिची एक बाजू कापून टोपली काढून घेतात. रोपाचे सोटमूळ सरळ ठेवतात, माती भोवतालच्या जमिनीच्या वर येईल अशी बुंध्याशी घालून हाताने घट्ट बसवितात. शेजारी काठी रोवून रोपाला आधार देतात. डिसेंबर–जानेवारीच्या पुढे कोरड्या हवेत झाडांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी डहाळ्यांची झाडांवरती खोपीसारखी रचना करतात. पावसाळ्यात ह्या डहाळ्या काढून टाकतात. झाडे चांगली तग धरेपर्यंत त्यांना पाणी देतात.

 खते व जोपासना : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रोपांच्या मुळांना धक्का लागणार नाही अशा रीतीने मधली जमीन हलवून मोकळी करतात. तण काढतात. जमीन भुसभुशीत असल्यास आणि तिच्यावर सावली असल्यास कॉफीचे पीक चांगले येते. पिकाला वरखते देणे आवश्यक असते. कॉफीसाठी खालील दोन प्रकारची खतमिश्रणे वापरतात.

 

संयुगाचे नाव मिश्रण १

(किग्रॅ. मध्ये )

मिश्रण २

(किग्रॅ. मध्ये )

यूरिया १९·८
रॉक फॉस्फेट

(३०% P2O5 )

२२·५ ४५·०
म्युरीएट ऑफ पोटॅश

(६०% पोटॅश)

१५·३ १५·३

एका वेळी कोणते तरी एकच मिश्रण वापरतात. पहिले मिश्रण दर रोपाला २·२५ ग्रॅ. तर दुसरे दर रोपाला ३·५० ग्रॅ. या प्रमाणात बुंध्यापासून २० ते २५ सेंमी. अंतरावर मातीत मिसळतात. पहिला हप्ता ऑक्टोबर-नोव्हेंबरात तर दुसरा फेब्रुवारीत देतात. लागवडीनंतर पाच-सहा महिन्यांनी झाडांचे शेंडे छाटून सु. ६० सेंमी. उंची ठेवतात. या छाटणीमुळे झाड डेरेदार बनते आणि त्याची वाढ जोरात होऊन फळे भरपूर लागतात. न छाटता झाड तसेच उंच वाढू दिल्यास फळे तोडण्यास त्रास पडतो. कॉफीच्या झाडाला सामान्यपणे तिसऱ्या वर्षापासून बहार यावयास सुरुवात होते. पण सुरुवातीचे बहार न घेता पाचव्या वर्षापासून नियमित फळे गोळा करण्यास सुरुवात करतात. अरॅबिका, रोबस्टा, लायबेरिका स्टोनोफायला यांचा बहार अनुक्रमे सप्टेंबर ते नोव्हेंबर, नोव्हेंबर ते फेब्रुवारी, डिसेंबर ते मार्च व फेब्रुवारी ते जून या दरम्यान येतो. कॉफीची फुले नाजूक, सुंदर व सुवासिक असतात. या काळात फुलांभोवती खूप मधमाश्या गोळा होत असल्याने मधमाश्या पाळणे हाही एक जोडधंदा करता येतो. मधमाश्यांमुळे परागणाला (परागसिंचनास) मदत होते आणि त्याचबरोबर मधही मिळविता येतो. सुयोग्य परिस्थितीत वाढविलेल्या निरोगी झाडापासून पंधराव्या वर्षापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळू लागते व पन्नास वर्षांपर्यंत असे उत्पन्न मिळते. युगांडामध्ये काही झाडे ८०–१०० वर्षांपर्यंत चांगले उत्पन्न देत असल्याच्या नोंदी आहेत.

 प्रत्येक झाडापासून दरसाल २·२५ किग्रॅ. फळे मिळतात. त्यांतील बियांपासून सु. ४५० ग्रॅ. कॉफी मिळते. दरसाल हेक्टरी कॉफीचे ४५०–५०० किग्रॅ. उत्पन्न मिळते.

 पाटील, ह. चिं.

 रोग व कीड : तांबेरा : हा रोग हेमिलिया व्हास्टाट्रिक्स या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूवर मोठे, वाटोळे व नारिंगी ठिपके पडतात आणि त्यामुळे पाने गळू लागतात. उष्ण दमट हवेत रोग वाढतो. रोग निवारणासाठी बोर्डो मिश्रणासारखे कवकनाशक (३ : ३ : ५००) पिकावर पावसाळ्यापूर्वी आणि नंतर येईल अशा रीतीने वर्षातून तीनदा फवारतात.

 काळी कूज :  हा रोग उंच जागांवरील, दऱ्यांतील पिकावर जोरदार पाऊस पडल्यावर पडतो. तो कोर्टिकम कोलोरोगा  या कवकामुळे होतो. फांद्या, पाने व फळे कुजून गळू लागतात. गळून पडणाऱ्या पानांवर व फळांवर कवकजाल असते व ते झाडावरच अडकून राहिल्याने रोगप्रसारास मदतच होते. रोगनिवारणासाठी पावसाळ्यापूर्वी, विशेषतः एप्रिलमध्ये, बोर्डो मिश्रणासारखे कवकनाशक (२·३ : २·३: २२५) फवारतात.

 काळ्या किंवा तपकिती ठिपक्यांचा रोग :  हा रोग सर्कोस्पोरा कॉफीकोला  या कवकामुळे होतो. पाने व फळे यांवर तपकिरी डाग दिसू लागतात. फळे आकसून त्याची वाढ खुंटते आणि ती पिकण्यापूर्वीच झाडावरून गळून पडतात. या रोगाच्या निवारणासाठीही बोर्डो मिश्रण नेहमीच्या संहतीचे (प्रमाणाचे) फवारतात.

 खोड कूज : या रोगात झाडे एकएकटी किंवा एकदम दोनतीन मेलेली आढळतात. सावलीसाठी असलेल्या झाडांच्या कुजलेल्या मुळांवरील ऱ्हायझोक्टोनियासारख्या कवकामुळे हा रोग होतो. मेलेल्या झाडाच्या मुळांवर कोळशासारख्या पण तपकिरी, माती, लहान खडे व कवकतंतू असलेल्या गाठी आढळतात. रोगनिवारणासाठी मेलेली झाडे काढून टाकून दूर फेकतात व संसर्गित झाडांचा इतर झाडांपासून मध्ये चर खणून संबंध तोडतात.

वरील रोगांशिवाय कॉफीचा आणखी एक भयंकर शत्रू म्हणजे झायलोट्रेकस क्वाड्रिप  हा खोडकिडा होय. खोडकिड्यांनी खराब केलेली झाडे काढून दूर जाळून किंवा पुरून टाकतात आणि ऑक्टोबरमध्ये सारी खोडे एखाद्या बोथट पात्याने अथवा खरबरीत दोराने खरडतात. बॅलॅनोफोरा  ही जीवोपजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारी) वनस्पतीही अरॅबिकाच्या मुळांवर आढळते. तिच्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि उत्पन्नही कमी होते. अशी मुळे खणून काढून नष्ट करतात.

 वर उल्लेखिलेल्या रोगांशिवाय इतरही रोग कॉफीवर पडतात. दिवसेंदिवस रोगप्रतिकारक अशा कॉफीच्या संकरज जाती तयार केल्या जात असून रोगनिवारणाच्या दृष्टीनेही योग्य ते उपाय योजण्यात येत आहेत.

मोघे, पू. गं.

बियांवरील आवरण काढण्याच्या पद्धती : कॉफीच्या फळातील दोन बियांवर असलेले पातळ, चिवट कागदासारखे आवरण (पार्चमेंट) काढून टाकल्यावर ज्या बिया राहतात त्या भाजून त्यांपासून कॉफी करतात. ते पातळ आवरण दोन पद्धतींनी काढतात. एका पद्धतीस कोरडी पद्धत व दुसरीस ओली पद्धत म्हणतात.

कोरडी पद्धत : या पद्धतीने तयार केलेल्या कॉफीला ‘चेरी’ किंवा ‘स्थानिक’ (नेटिव्ह) कॉफी म्हणतात. या पद्धतीत वाळलेल्या फळातील बिया त्यांवरील ‌अावरणापासून अगर वाळलेला गर ‌अाणि साल यांपासून दगडाच्या अगर लाकडाच्या खलबत्त्यात अगर उखळीतून सडून मोकळ्या करतात. याकरिता बी चांगले कोरडे होईपर्यंत फळे वाळवावी लागतात. फळे पिकल्यावर अगर वाळल्यावर झाडे हलवून फळे जमिनीवर पाडतात. फळे गोळा करण्यासाठी झाडाखाली चटया अगर गोणपाट पसरतात. नंतर अशी फळे उन्हात वाळवतात. फळे जरी वरून वाळलेली दिसली, तरी आतील बी चांगले कोरडे व कठीण झाल्याशिवाय सडून मोकळे करता येत नाही. ही पद्धत सोपी असून लहान शेतकरी या पद्धतीचाच अवलंब करतात. अशी पद्धत रोबस्टाच्या बाबतीत सोईस्कर असते, कारण या जातीचे झाड मोठे असून झाडावरील पिकलेली फळे हाताने वेचणे कठीण असते. या जातीच्या कॉफीचा दर्जा विशेष चांगला नसतो.

 ओली पद्धत : या पद्धतीने तयार केलेल्या कॉफीला ‘पार्चमेंट कॉफी’ म्हणतात. मोठ्या प्रमाणात लागवड असलेल्या कॉफीच्या मळ्यात ही पद्धत, विशेषतः अरॅबिकाच्या फळांसाठी, सर्व जगभर वापरात आहे. या पद्धतीने तयार केलेली कॉफी उच्च दर्जाची असते व तिला किंमतही चांगली मिळते. या पद्धतीस भरपूर पाणी लागते आणि पुष्कळशी कामे यंत्राच्या मदतीने केली जातात. या पद्धतीत प्रथमतः अगदी पक्व तांबूस रंगाची फळे निवडून घेतात, नंतर उरलेली व शेवटी सर्व कच्ची अथवा अर्धपक्व अशी फळे तोडून घेतात आणि ती कारखान्यात आणली जातात. कारखान्यामध्ये पाण्याचे रुंद पाट असून ते मध्यभागी असलेल्या टाकीकडे नेलेले असतात. मळ्यातून आणलेली कॉफीची फळे पाटाच्या तोंडाशी ओततात. वाहणाऱ्या पाण्याच्या साहाय्याने हलकी, खराब, तरंगणारी फळे, दगडगोटे, माती यांसारख्या वस्तू वेगळ्या केल्या जातात. एका विशिष्ट यंत्राने फळांवरील साली काढतात. नंतर फळांच्या पक्व गरापासून किण्वनाने (आंबवण्याने) बिया वेगळ्या केल्या जातात. यासाठी स्वतंत्र टाक्या असतात. यांत ओतलेली फळे अधूनमधून हलवितात. ही प्रक्रिया पुरी होण्यास सामान्यपणे १२ तास लागतात, पण काही वेळा यापेक्षाही अधिक वेळ लागतो. हवामान, तापमान इ. गोष्टींवर  प्रक्रियेचा वेग अवलंबून असतो. प्रयोगांवरून असे आढळले आहे की, एंझाइमे (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) घालून हा वेग आणखी वाढविता येतो. ही प्रक्रिया चालू असताना पाऊस आल्यास किण्वनाला वेळ लागतो, म्हणून नेहमी टाक्या छपराखाली बांधलेल्या असतात. प्रक्रिया पुरी होत आली म्हणजे एखादे फळ काढून हाताने दाबले असता गर बाजूला होऊन बिया आतल्या आत घसरतात, पण हात चिकट होत नाहीत. फळे जास्त वेळ पाण्यात ठेवली तर आवरण ठिसूळ होते व बिया वाळविताना फुटते. याउलट कमी वेळ पाण्यात ठेवल्यास आवरणावर तपकिरी डाग पडतात व कॉफीचा दर्जा कमी होतो. याकरिता हे काम फार काळजीपूर्वक करावे लागते.

 किण्वनानंतर फळे तुडवितात अथवा त्याचा लगदा करतात आणि तो पाटाच्या पाण्यात धुण्यासाठी सोडतात. आवरणासह बिया वेगळ्या होतात. नंतर बिया सपाट सिमेंट काँक्रिटच्या जमिनीवर किंवा उंच केलेल्या टेबलांवर शक्य तितक्या लवकर वाळवतात. शक्यतो बिया उन्हात वाळविणे चांगले असते. सात दिवस उन्हात वाळविल्या असता बिया पूर्ण वाळतात, पण रात्री दमट हवेमुळे त्या पुन्हा ओलसर होतात. याकरिता जाळीच्या मोठमोठ्या चाळण्यांवर त्या पसरून चाळण्या एकावर एक राहतील अशा रीतीने घडवंच्यांवर ठेवतात. त्यातून गरम हवा खेळवता येईल अशी व्यवस्था केलेली असते. बी चांगले वाळले म्हणजे पातळ आवरण नखाने खरवडले जाऊ शकते. नंतर असे वाळलेले बी यंत्राने सडून पातळ व रुपेरी आवरणापासून मोकळे करतात आणि त्यांना चकाकीही आणतात. चांगले बी सतेज (चकचकीत), निळसर हिरव्या रंगाचे असते.

 बियांची प्रतवारी : बिया विकण्यासाठी त्यांची प्रतवारी लावणे जरूर असते. बिया सरसकट विकण्यापेक्षा प्रतवारी लावण्याने त्यांना जास्त किंमत मिळते. बियांची प्रत त्यांची लांबी, रुंदी, जाडी, चकाकी व रंग यावरून ठरवितात. मोठ्या प्रमाणात उत्पादन असणाऱ्या मळ्यांत बिया वेगवेगळ्या करण्याकरिता निरनिराळ्या आकाराची भोके असलेल्या चाळण्या वापरतात. रोबस्टाच्या बिया लहान असल्यामुळे त्यांची निराळीच प्रत लागते. काही वेळेस दोन बियांऐवजी एकच वाटोळी बी तयार होते. अशा बियांना वाटाण्या बिया (पीबेरीज) म्हणतात. त्या वेगळ्या निवडतात व त्यांना भावही चांगला मिळतो. किडक्या, काळपट, फुटक्या, तुटक्या बिया वेगळ्या काढतात. अशा बियांना कमी किंमत येते. सर्वांत उत्कृष्ट व महाग कॉफी जमेकाची ‘ब्ल्यू मौंटन’ होय. या बिया मोठ्या, चकचकीत असतात व त्यावर निळसर झाक असते. भारतात कूर्ग  चिक्स  हेच कॉफीचे प्रकार अधिक लोकप्रिय आहेत. कृत्रिम रीतींनी बियांवर निळसर झाक आणून त्यांचा उच्च प्रतीच्या बियांत भेसळ करण्याचा किंवा त्या तशाच विकण्याचा प्रयत्न केला जातो.

 बियांची प्रतवारी करून त्या विक्रिकरीता पाठविण्यासाठी पोत्यांत अगर पिशव्यांत भरून ठेवतात. अशा पोत्यांवर कॉफीची प्रत दाखविणारा शिक्का उठविलेला असतो. ब्राझीलमध्ये कॉफी बियांची ६० किग्रॅ. वजनाची पोती भरतात. सर्वत्र हे प्रमाण वापरले जात असले, तरी काही ठिकाणी याहून जास्त म्हणजे एक क्विंटलपर्यंत वजनाची पोती भरण्याचीही प्रथा आहे. सर्वसामान्य ग्राहकांना विक्रिकरीता पाठवावयाच्या बिया भाजून, दळून व त्यांचा स्वाद कायम टिकावा म्हणून त्यांची पूड बंद डब्यांतून, पॉलिथीन पिशव्यांतून किंवा काचेच्या बरण्यांतून विक्रिकरीता पाठवितात.

 बी भाजणे : बिया भाजल्याशिवाय कॉफीला चव, स्वाद वा लज्जत येत नसल्यामुळे त्या भाजाव्याच लागतात. हे काम काळजीपूर्वक करावे लागते. बिया अर्धवट भाजल्या किंवा करपविल्या तर कॉफीची सारी लज्जतच निघून जाते. कॉफीचे बी तयार झाले म्हणजे ते तव्यावर, पत्र्यावर अगर फिरत्या यंत्राच्या साहाय्याने भाजतात. प्रथम बियांवरील ओलावा निघून जाऊन त्या तडकावयास लागतात. बी जास्त वेळ न भाजता थोड्याच वेळात सर्व बाजूंनी सारखे भाजले गेल्यास कॉफीचा स्वाद व चव चांगली वाढते. चांगल्या भाजलेल्या बियांच्या सपाट बाजूवर मध्यभागी एक स्वच्छ पांढरी उभी चीर दिसते. बी भाजल्यावर सोनेरी पिवळ्या रंगाचे होते. त्यास जास्त तांबूसपणा आल्यास कॉफीचा स्वाद कमी होतो. कॉफीचा स्वाद बिया भाजून त्या लगेच दळल्यास चांगला राहतो. भाजलेल्या बिया साठवून नंतर दळण्याने त्यांचा स्वाद रहात नाही.

 बिया दळण्यासाठी काही देशांत अद्यापि दगडाची जाती वापरतात. काही ठिकाणी लाकडाची तळी असलेली चक्की वापरतात. मोठ्या प्रमाणावर बिया दळण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींच्या हाताने फिरवावयाच्या किंवा यांत्रिक शक्तीवर चालणाऱ्या चक्क्या वापरतात.

 कॉफीची चव, स्वाद वाढविण्यासाठी व विविधता आणण्यासाठी तिच्यात चिकोरीसारखे [→कासनीसारखे, कासनी] काही इतर पदार्थ मिसळतात. हे मिश्रणाचे प्रमाण अनुभवांवरून ठरवावे लागते.

 विरघळणारी किंवा ‘झटपट’ (इन्स्टंट) कॉफी : या कॉफीचा शोध जरी सन १८६५ इतक्या पूर्वी लागला असला, तरी तिची लोकप्रियता मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच वाढली आहे. भाजून दळलेल्या कॉफीचा पाण्यातील अर्क वाळविला म्हणजे विरघळणारी किंवा झटपट कॉफी तयार होते. ती तपकिरी असून तिचे कण सुटेसुटे व एकसारख्या आकाराचे असतात. सामान्यपणे व्यापारी उत्पादनांमध्ये १००% विरघळणारी कॉफीच असते. परंतु काही वेळा इतर विरघळणारी मिश्रणेही या कॉफीत मिसळतात. चिकोरीचा वाळविलेला अर्क या कॉफीत मिसळून असे मिश्रणही विकले जाते. तथापि १००% विरघळणारी कॉफी असणारी उत्पादनेच अधिक लोकप्रिय आहेत.

कोष्टक क्र. १ कॉफीच्या बियांत आढळणारे रासायनिक घटक

घटक कच्ची बी

%

भाजलेली बी

%

हेमिसेल्युलोज २३·०० २४·००
सेल्युलोज १२·०७ १३·०२
लिग्नीन ५·६ ५·८
वसा ११·४ ११·९
राख ३·८ ४·००
कॅफीन १·२ १·३
सुक्रोज ७·३ ०·३
क्लोरोजिनिक अम्ल ७·६ ३·५
प्रथिने ११·६ ३·१
ट्रायगोनेलाइन १·१ ०·७
अज्ञात, अद्याप न शोधलेले १४·०० ३१·७

 

झटपट कॉफीसाठी विशेषतः आफ्रीकन रोबस्टाच वापरली जाते. कारण ती सर्वाधिक विद्राव्य असून तिची किंमतही कमी असते. इतर जातीही या कॉफीसाठी वापरतात. सामान्यपणे या कॉफीसाठी बिया भाजताना त्या थोड्या अधिक भाजतात. परंतु हे प्रमाण कॉफीचा स्वाद, चव व लज्जत यांवर अवलंबून असते. ‘एस्प्रेसो’ या नावाने ओळखली जाणारी कडक कॉफी तयार करण्यासाठी कॉफीच्या बिया अधिक पण न करपविता भाजतात.

 पाण्यातून अर्क काढतानाच तो गाळला जावा यासाठी निस्यंदक गाळणी (पर्कोलेटर) वापरतात. या निस्यंदकाचा प्रसार लक्षात घेऊन कॉफी दळताना तिची पूड जाड वा बारीक काढतात. सामान्यतः नेहमीच्या कॉफीपेक्षा हिची पूड अधिक खरबरीत जाडसर असते. अर्क काढण्यासाठी दाबाखालील गरम पाणी वा वाफ वापरतात. अर्क वाळवून त्यापासून विरघळणारी कॉफी मिळविताना तिचा स्वाद, वास, लज्जत कमी होवू नये, सुटी एककणी पूड मिळावी, हवा तो रंग मिळावा आणि तिच्यात ३·५% पेक्षा जास्त ओलावा राहू नये, अशी काळजी घ्यावी लागते. हा अर्क वाळविण्यासाठी निरनिराळ्या पद्धती प्रचारात आहेत. अर्कातून गरम हवा खेळती ठेवून कॉफीची पूड मिळविताना तापमान २०५ ते २६०से. इतके कमी ठेवल्यास स्वाद चांगला राहतो. ही कॉफी बंद डबे, बाटल्या किंवा मोठ्या पिशव्या यांत भरून विक्रिकरीता पाठवितात. अशी कॉफी उघडी राहिल्यास बाष्प शोषून घेते व तिचा वास, स्वाद कमी होऊन खराब होते.

 कॅफीनविरहित कॉफी :  कॉफीमध्ये कॅफीन हे अल्कलॉइड असते. त्यामुळे काही लोक जरुरीपेक्षा जास्त उत्तेजित होतात व त्याचा त्यांना त्रास होत असल्यामुळे कॅफीन काढून टाकलेला कॉफीचा एक प्रकारही प्रचारात आहे. यूरोपात १९०० च्या सुमारास एका जर्मन व्यापाऱ्याने कॉफीपासून कॅफीन वेगळे काढण्याची एक पद्धत शोधून काढली. तथापि त्याने आपली पद्धत गुप्त ठेवली. नंतर १९०४ च्या सुमारास ही कॉफी तयार करण्याची मूलभूत पद्धती प्रचारात आली, ती अशी : कॅफीन काढून टाकण्यासाठी हिरव्या बिया उकळून त्यांच्यातील ओलसरपणा, वाफेच्या साहाय्याने २०% पर्यंत वाढवितात. पाण्यामुळे व उष्णतेने बियांतील कॅफीन वेगळे होते आणि वर येते. ओल्या बियांपासून ट्रायक्लोरो एथिलीन, क्लोरोफॉर्म किंवा बेंझीन यांसारख्या कार्बनी विद्रावकांच्या (विरघळविणाऱ्या पदार्थांच्या) साहाय्याने ते वेगळे केले जाते. पूर्वी भिजलेल्या बियांपासून विद्रावक वेगळा करताना बिया उकळाव्या लागत. हल्लीच्या पद्धतीत बियांचा विद्रावकाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्यामुळे वेळ वाचून प्रक्रियेचा वेगही वाढला आहे. नंतर या बिया वाळवून, भाजून दळल्यावर नेहमीसारखी कॉफी तयार होते. या बियांपासून ‘झटपट’ कॉफीही तयार करता येते. हल्ली कॅफीन वेगळे करण्याचे सर्व काम यांत्रिकरित्या करण्यात येते. कॅफीन काढून टाकल्यावरही कॉफीची कडवट चव तशीच राहते. या पद्धतीने मिळविलेले कॅफीन इतरत्र वापरतात.

 कॉफी पेय : व्यक्तिगत आवडीप्रमाणे जरी कॉफी कडवट, गोड, कडक, सौम्य अशी तयार केली जात असली, तरी कॉफी तयार करण्याच्या काही विशिष्ट पद्धती प्रचारात आहेत. कॉफी उकळल्याने तिचा स्वाद कमी होतो. तसेच ती कपात फार काळ राहू दिल्यासच चांगली लागत नाही. चांगली कॉफी करण्यासाठी एका कपास दोन चमचे कॉफी घालून तिच्यावर उकळते पाणी ओतून ती ५–७ मिनिटे मुरू द्यावी. विरघळणारी कॉफी मुरवावी लागत नाही. नंतर तिच्यात आवडीप्रमाणे साखर, दूध घालावे. काही लोक कोरी कॉफी पितात. प्रशीतकात (थंड करण्याच्या उपकरणात, रेफ्रिजरेटरमध्ये) थंड केलेली तसेच बर्फमिश्रित कॉफी हे प्रकारही लोकप्रिय आहेत. कॉफीत वेलदोडे, जायफळ इ. पदार्थ स्वादासाठी घालण्याचाही प्रघात आहे. ‘एक्स्प्रेसो’ कॉफी तयार करण्यासाठी कॉफीच्या पुडीवर दाबाखालील वाफ किंवा उकळते पाणी सोडतात.

 कॉफीचे शरीरावरील परिणाम : कॉफी प्यायल्यामुळे शरीरावर होणारे सर्वच परिणाम तिच्यात असणाऱ्या कॅफीन या अल्कलॉइडामुळेच होतात असे नाही, तथापि त्यांपैकी बहुतेक परिणाम या अल्कलॉइडामुळेच होतात. या अल्कलॉइडामुळेच केंद्रीय तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) उत्तेजित होते; उत्तेजनामुळे श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, चयापचय (शरीरात होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) आणि उत्सर्जन यांचा वेग वाढतो. परंतु कॅफीन शरीरात गेल्यापासून काही तासांतच त्याचे ⇨ऑक्सिडीभवन  होऊन किंवा त्याच्या काही भागाचा  मिथिलनिरास होऊन (मिथिल गट काढून टाकला जाऊन) ते मूत्रातून बाहेर टाकले जाते. तसेच ते शरीरात साठूनही रहात नाही त्यामुळे त्याचे परिणाम अल्पकालीन असतात व त्यांपासून धोका नसतो. दररोज वाजवी प्रमाणात कॉफी प्यायल्यास सशक्त माणसाच्या शरीरावर कोणत्याही तऱ्हेचे अनिष्ट परिणाम होत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत कॉफीमुळे बद्धकोष्ठतेसारखे विकार उद्भवतात, तर काहींना तिच्यामुळे जास्त तरतरी येते.

उत्पादन व  व्यापार : कॉफीच्या विशिष्ट स्वादामुळे आणि कडवट चवीमुळे तिला बरीच मागणी आहे. विशेषत: अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स वगैरे देशांत तर हे पेय फार लोकप्रिय आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत वर्षाला सु. ७० लक्ष किग्रॅ., तर युरोपात सु. ४·५ कोटी किग्रॅ. इतकी कॉफी खपते. आफ्रिका, आशिया व अमेरिका या खंडांतील काही देशांत १८५० सालानंतर कॉफीचे उत्पादन बरेच वाढलेले आहे. ब्राझीलमध्ये कॉफीचे उत्पादन इतके वाढले आहे की, जगातील एकूण उत्पादनापैकी एक तृतीयांशाहून अधिक कॉफी तेथे तयार होते. तेथील कॉफी हलक्या दर्जाची असते व तिच्यात केवळ अयोग्य पद्धतीने उत्पादन केल्याने माती व लाकडाचा भुसा यांची भेसळ होते. या कॉफीस कडक (हार्ड) कॉफी म्हणतात. तर चांगल्या कॉफीस (अरॅबिकाच्या) सौम्य (माइल्ड) कॉफी म्हणतात. रोबस्टा  जातीपासूनही सौम्य कॉफी तयार होऊ शकते.

 कोष्टक क्र. काही प्रमुख देशांतील कॉफीचे उत्पादन (१९६९)

देश उत्पादन (हजार टनांत)
ब्राझील १,२८३·५
कोलंबिया ४८६·०
आयव्हरी कोष्ट २७६
इथिओपिया २०५
अंगोला २०४
मेक्सिको १६८
युगांडा १६२
इंडोनेशिया १५७
एल् साल्वादोर १५०
भारत ७४·२
जागतिक ४,२३१·०

कॉफीचा जागतिक व्यापार बराच मोठा आहे. चांगल्या कॉफीस बरीच मागणी असते व किंमतही चांगली मिळू शकते. ज्या देशांत उत्पादन होत नाही अशा देशांत कच्ची कॉफी नेऊन साठवितात. कॉफी उत्पादन करणाऱ्या देशांत हवेतील ओलाव्यामुळे कॉफी चांगली टिकत नाही.

 भारतीय कॉफी उद्योग : जवळजवळ दोन शतकांहून अधिक काळ भारतात कॉफी लागवडीत आहे. भारतीय कॉफी उद्योगात नेहमीच चढउतार होत गेले आहेत. काही काळ तर ह्या उद्योगाकडे खूपच दुर्लक्ष झाले होते. स्वातंत्र्योत्तर काळात ह्या उद्योगाकडे परकीय चलन मिळवून देणारा एक उद्योग म्हणून लक्ष वेधले गेले. ह्या दृष्टिकोनातून १९५० च्या सुमारास कॉफीच्या लागवडीस सुरुवात झाली.

कोष्टक क्र. ३. भारतीय कॉफी उत्पादन (टनांत)

वर्ष अरॅबिका रोबस्टा एकूण
१९७०–७१ ५८,३४८ ५१,८८३ १,१०,२३१
१९७१–७२ ४४,१०० २४,९०० ६९,०००
१९७२–७३ ६१,००० २९,००० ९०,०००

भारतातून १९७०–७१ मध्ये ३२,१८९ टन (२५ कोटी रुपयांची), १९७१–७२ मध्ये ३५,६९५ टन (२२ कोटी रुपयांची) व १९७२–७३ मध्ये ५०,८५५ टन (३३ कोटी रुपयांची) कॉफी निर्यात झाली. भारतातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, पूर्व व पश्चिम जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, स्वीडन, नॉर्वे, युगोस्लाव्हिया, पोलंड, रशिया, हंगेरी, मध्य पूर्वेतील देश, ऑस्ट्रेलिया इ. देशांत कॉफी निर्यात करण्यात येते. कॉफीच्या एकूण जागतिक व्यापारापैकी भारतीय कॉफीचा भाग फक्त १·२% आहे. भारत सरकारने कॉफीच्या निर्यातीवर दर क्विंटलमागे ५० रुपये कर बसविलेला आहे. या उद्योगात सु. २,३६,००० लोक गुंतलेले आहेत. देशात एकूण ५१,६६१ कॉफीचे मळे असून त्यांपैकी ४९,७९१ मळे लहान आहेत व त्यांचे प्रत्येकी क्षेत्र दहा हे. किंवा त्यापेक्षा कमी आहे. कर्नाटकात १८,४४३ लहान व १,३५१ मोठे मळे आहेत. भारतात मुख्यत्वे अरॅबिका  रोबस्टा  या जातीच मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहेत. निरनिराळ्या मळ्यांमध्ये सावलीसाठी संत्री, मिरी व काही ठिकाणी विशेषतः दऱ्यांमध्ये वेलदोड्याची झाडे लावतात.

 भारतीय कॉफी उद्योगाच्या विकासासाठी ‘भारतीय कॉफी मंडळ’ (इंडियन कॉफी बोर्ड) स्थापण्यात आलेले असून त्याचे पुढील उद्देश आहेत : (१) भारतात तयार होणाऱ्या कॉफीचा देशात आणि परदेशांत खप वाढविणे, (२) कॉफी उद्योगाच्या भरभराटीसाठी कॉफीसंबंधीच्या यांत्रिक व कृषिविषयक संशोधनाला प्रोत्साहन देणे, (३) कॉफी मळ्यांच्या उत्कर्षासाठी त्यांना मदत देणे, (४) कॉफी मळ्यांतून काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना स्थैर्य आणि नोकरीची शाश्वती मिळावी या दृष्टीने प्रयत्न करणे, (५) कॉफी कायद्यात (१९४२ चा कायदा क्र. ७) सुचविल्याप्रमाणे जादा झालेल्या कॉफी उत्पादनाची व्यवस्था लावणे.

या मंडळाचे अध्यक्षासह एकूण तेहतीस सभासद असतात. त्यांपैकी काही कॉफी मळ्यांच्या मालकांचे प्रतिनिधी, काही तमिळनाडू, केरळ व कर्नाटक या राज्यांचे प्रतिनिधी, काही कामगारांचे व काही केंद्रीय सरकारला योग्य वाटतील अशा व्यापारी संस्थांचे प्रतिनिधी या मंडळावर असतात. या मंडळाने कर्नाटकमध्ये बालेहोनूर आणि कूर्गजवळ चेथल्ली येथे कॉफी संशोधन केंद्र स्थापन केली आहेत. या ठिकाणी कॉफीच्या नवनव्या, रोगप्रतिकारक व जास्त उत्पन्न देणाऱ्या संकरज जाती शोधून काढून त्यांचा प्रसारही केला जात आहे. अशा प्रकारच्या २१ जाती आणि उपजाती या केंद्रात लागवडीत आहेत. मंडळातर्फे इंडियन कॉफी हे मासिक व जर्नल ऑफ कॉफी रिसर्च  हे त्रैमासिक प्रसिद्ध करण्यात येते.

 मंडळातर्फे कॉफी मळ्यांच्या उत्कर्षासाठी नवी व आधुनिक अवजारे यंत्रसामग्री वगैरे खरेदी करणे. नवी लागवड वगैरेंसाठी दीर्घ आणि अल्प मुदतीची कर्जे दिली जातात. या मंडळाने दहा वर्षांत जवळजवळ एक कोट रुपये कर्जरूपाने वाटले आहेत.

 बर्वे, द. बा.; देशपांडे, ज. र.

 संदर्भ : 1. Aiyer, Yegna Narayan, A. K., Field Crops of India with Special Reference to Mysore, Banglore, 1958.

2. Haarer, A. E. Modern Coffee Production, London, 1962.

3. Wellman, F. L. Coffee : Botany, Cultivation and Utilization, London and New York, 1961.