मालती : (विलायती मेंदी हिं. मूरद गु. मुरा, माकली-ना-पत्रा इं. कॉमन मिर्टल लॅ. मिर्टस कॉम्यूनिस कुल-मिर्टेसी).फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सुवासिक पाने व पांढरी शुभ्र सुगंधी फुले असलेले एक सदापर्णी ⇨ क्षुप (झुडूप). याच्या मिर्टस या प्रजातीत सु. १०० जाती असून त्यांपैकी ही एकच जाती भारतात बागेत लावलेली आढळते. सर्व जातींचा प्रसार द. यूरोप, द. अमेरिका, प. आशिया आणि ऑस्ट्रेलिया येथे असून आझोर्स ते बलुचिस्तानमध्ये व भूमध्य सामुद्रिक प्रदेशापासून ते वायव्य हिमालयापर्यंत मालती रानटी अवस्थेत आढळते. या झुडपाची उंची सु. १–३ मी. पर्यंत असते पाने साधी २·५–३·८ सेंमी. लांब, समोरासमोर, सुगंधी, चिवट, गुळगुळीत व चकचकीत, अखंड, अंडाकृती अथवा भाल्यासारखी असतात. याला मार्च ते एप्रिल मध्ये पानांच्या बगलेत लहान, २ सेंमी. व्यासाची पांढरी, सुगंधी फुले एकेकटी येतात. छदके (फुलाच्या तळाशी असलेली सूक्ष्म उपांगे) दोन, पाकळ्या व संदले (पाकळ्यांखालची पुष्पदले) प्रत्येकी पाच आणि केसरदले असंख्य व सुटी असतात [→ फूल] अधःस्थ किंजपुटात २–३ कप्पे आणि बीजके मध्य अक्षावर असतात. मृदुफळ लांबट गोलसर, सु. ५ सेंमी. व्यासाचे, संवर्ताने पूर्णपणे वेढलेले, मांसल व जांभळट काळे असून त्यात अनेक, कठीण, वृक्काकृती (मूत्रपिंडाच्या आकाराच्या) बिया असतात. फळे थंड ऋतूत येतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ मिर्टेसी अगर जंबुल कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. या जातींत अनेक प्रकार असून त्यांमध्ये पानांचे आकार व आकारमान आणि झाडांची उंची यांत फरक आढळतात. विविध रंगांचे व आकारांचे ठिपके असलेली पाने काही प्रकारांत आढळतात. अनेक उद्यानांत याचे कुंपण करतात. याची लागवड बिया, छाट कलमे व दाब कलमे लावून करतात.

मालती : (१) फुलांसह फांदी, (२) फुलाचा उभा छेद, (३) किंजपुटाचा आडवा छेद, (४) फळ.

मालतीची सुवासिक पाने स्वयंपाकात स्वादाकरिता वापरतात.फुले व पाने यांचे हार व तुरे करतात. पाने आणि फुले यांतून बाष्पनशील (उडून जाणारे) तेल काढतात त्याला ‘मिर्टल ऑइल’ म्हणतात. ते हिरवट पिवळे किंवा पिवळे असून त्याला विशिष्ट उत्तेजक सुवास येतो. खाद्यपदार्थांना स्वाद आणण्यास सुक्या पानांऐवजी हे तेल वापरतात तसेच साबण व सुगंधी द्रव्यांत (ओ द कोलोनमध्ये) ते घालतात.जंतुनाशक, पूतिरोधक व चर्मरक्तकर (कातडी लाल करणारे) या दृष्टीने त्याचा वापर करतात मूत्राशय व श्वासनलिका यांच्या विकारांवर ते उपयुक्त असून संधिवातावरच ते बाहेरून लावण्यास वापरतात अत्तरे व सुगंधी तेले यांतही ते वापरतात. फळात बाष्पनशील तेल, सायट्रिक अम्ल, मॅलिक अम्ल, रेझीन आणि टॅनीन असते. मद्ये व अन्न यांना स्वाद आणण्यास हे तेल उपयोगात आहे. बियांत १२–१५ टक्के तेल असते. पाने स्तंभक (आकुंचन करणारी) असून त्यांचा उपयोग मेंदूचे विकार (अपस्मार, फेफरे इ.), अग्निमांद्य, पोटाचे आणि यकृताचे विकार, फुप्फुसासंबंधी तक्रारी इत्यादींवर करतात. पानांचा काढा तोंड आल्यास चुळा भरण्यास वापरतात. इसब, जखमा व क्षते यांवरही पाने उपयुक्त असतात. फळे वायुनाशी असून आमांश, अतिसार, रक्तस्त्राव, संधिवात इत्यादींवर देतात. याचे लाकूड रंगीबेरंगी असल्याने ते आकर्षक दिसते व कातीव कामास चांगले असते.

हिपॉक्राटीझ, प्लिनी, गेलेन आणि अरब लेखकांनी मिर्टलचा (मालतीचा) उल्लेख आणि त्याच्या गुणधर्मांचा निर्देश केला आहे. कौटिलीय अर्थशास्त्रसुश्रुतसंहिता, अमरकोश व इतर अनेक संस्कृत ग्रंथांत ‘मालती’ नावाच्या वनस्पतीचा उल्लेख आढळतो परंतु ती वेल आहे. त्यामुळे ती जुई अथवा चमेली असावी, असे दिसते.

दोंदे, वि. पं. परांडेकर, शं. आ