टॅक्सेलीझ : उघडी बीजे असलेल्या वनस्पतींचा [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] हा एक गण असून टॅक्सस  (इं. यू) टोरेया  व ऑस्ट्रोटॅक्सस  ह्या तीन वंशांचा अंतर्भाव करणारे टॅक्सेसी हे एकच कुल त्यात समाविष्ट करतात. हा गण व हे कुल यांच्या वर्गीकरणाबद्दल मतभेद आहेत. शंकुमंत वनस्पतींच्या [→ कॉनिफेरेलीझ] गणात इतर सहा कुलांबरोबर ह्या कुलाचा अंतर्भाव काही शास्त्रज्ञ करतात व वरील तीन वंशांशिवाय इतर काही वंशही त्या कुलात घालतात. तथापि बिरबल सहानी व फ्लोरीन या शास्त्रज्ञांनी वरच्या तीन वंशांच्या लक्षणांवरून टॅक्सेसी ह्या कुलाला वरचा म्हणजे गणाचा दर्जा दिला आहे. इतर शंकुमंत वनस्पतींप्रमाणे हे वंश पृथ्वीतलावर अनेक वर्षे वाढत असून त्यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) उत्तर ट्रायासिक कल्पातील (सु. २० कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) खडकांत आढळतात. भारतात (राजमहालात) टॅक्साइट्स, टॅक्सोझायलॉन  आणि टोरेयीट्स या नावांनी ओळखले जाणारे जीवाश्म आढळतात. या कुलातील तिन्ही वंशांतील मिळून सु. अकरा जाती सध्या, विशेषतः उत्तर गोलार्धात आढळतात त्या उ. अमेरिका, आफ्रिका, आशिया, यूरोप, चीन व जपान इ. प्रदेशांतील थंड हवेत व उंचीवर निसर्गतः वाढतात. उद्यानांतूनही शोभेकरिता काही जाती लावल्या जातात. टॅक्सस वंशातील दहा जातींपैकी एक भारतात मध्य हिमालयात २,००० मी. उंचीवर आढळते. तिला टॅक्सस बॅकेटा (यूरोपीय यू) हे नाव आहे. ह्या वृक्षाची सामान्य लक्षणे कॉनिफेरेलीझ गणाच्या व पाइनच्या वर्णनात दिल्याप्रमाणे आहेत. तथापि विशेष लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

टॅक्सेलीझ : यू (टॅक्सस बॅकेटा) (१) पुं.-शंकूसह फांदी (२) कक्षास्थ पुं-शंकू (३) कक्षास्थ स्त्री-शंकू (४) स्त्री-शंकू असलेल्या प्ररोहाचा उभा छेद : (अ) बीजकरंध्र, (आ) आवरण, (इ) प्रदेह, (ई) गर्भकोश, (उ) आद्य अध्यावरण, (ऊ) प्राथमिक कक्षास्थ प्ररोह (५) अध्यावरणासह पक्व बीज (६) बीजाचा छेद : (अ) अध्यावरण, (आ) बीजचोल, (इ) पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश), (ई) गर्भ.

यू : (हिं. बर्मी, बिरमी). सु. नऊ ते अठरा मी. उंचीचा व अडीच मी. व्यासाचा घनदाट सदापर्णी वृक्ष. प्रसार : यूरोप, अल्जीरिया, आशिया मायनर, कॉकेशिया, उ. इराण. फांद्या काहीशा लोंबत्या व आडव्या पसरलेल्या असून पाने साधी, लहान, सपाट, अरुंद, हिरवी, तळाशी पिळवटलेली, लहान देठाची, एकाआड एक व दोन रांगांत दिसतात. खवले, राळ-नलिका व ऱ्हस्व प्ररोह (आखूड व मर्यादित वाढीच्या लहान फांद्या) नसतात. नर-वृक्षावर पिवळट पुं-शंकूवर (अक्षावर परागधारक खवले धारण करणाऱ्या भोवऱ्यासारख्या अवयवावर) छत्राकृती लघुबीजुकपर्णे (परागकोशासारखे प्रजोत्पादक अवयव असणारी लहान पाने) व छत्राखाली सहा ते आठ लोंबते लघुबीजुककोश असतात. लघुबीजुके (परागासारखे सूक्ष्म प्रजोत्पादक कण अथवा कोशिका) असंख्य व पंखहीन, स्त्री-वृक्षावर स्त्री-शंकूत अनेक खवले व टोकास पेल्यासारख्या अध्यावरणाने (विशेष प्रकारच्या आच्छादनाने) वेढलेले एकच सरळ बीजक बीजकातील प्रमुख भागाला प्रदेह (अनेक कोशिकांचा समूह) म्हणतात व त्यात गर्भकोश असतो. पिकल्यावर लाल अध्यावरणामुळे पक्ष्यांकडून बिया पसरविल्या जातात बी रुजताना दलिका अवभौम (जमिनीत राहणाऱ्या) असतात. हा वृक्ष सु. ९००–३,००० वर्षे वाढत राहतो. त्याचे लाकूड लालसर, घन, कठीण, जड, टिकाऊ व उपयुक्त असून पेट्या, कपाटे, चाकूच्या मुठी व कातीवकामास चांगले असते. घोडे व गुरे ह्यांना पाला विषकारक असतो. या जातीतील अनेक प्रकार बागेत शोभेकरिता लावतात. स्वित्झर्लंडातील काही भागांत पानांचा काढा जनावरांना त्रास देणाऱ्या कीटकांना मारण्यास वापरतात. पाने व फळे शामक, जंतुनाशक व आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारी) असतात. दमा, कफ, उचकी, अपचन, अपस्मार इत्यादींवर पाने उपयुक्त असून ती कामोत्तेजकही असतात ही वनस्पती मत्स्यविष आहे.

पहा : पाइन वनस्पति, विषारी.

परांडेकर, शं. आ.

टॅक्सेलीझ : बिर्मी (यू) ची मांसल बियांसह फांदी.