मॅरॅटिएलीझ : टेरिडोफायटा [⟶ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] अथवा नेचाभ पादप विभागातील ⇨ नेचे या नावाने सामान्यपणे ओळखल्या जाणाऱ्या पुष्पहीन (फुले नसणाऱ्या) वनस्पतींच्या वर्गातील (फिलिसिनी) पाच गणांपैकी एक गण. याचे ⇨ ऑफिओग्लॉसेलीझ (अहिजिव्ह गण) या गणाशी काही बाबतींत साम्य असून दोन्हींचा समावेश यूस्पोरँजिएटी (स्थूल बीजुक कोशी) या उपवर्गात काहींनी केला आहे, कारण दोन्हींतील बीजुक कोश (प्रत्येकी एका कोशिकेचे-पेशीचे-असे अनेक प्रजोत्पादक घटक एकच पिशवीसारखे असलेले अवयव) प्रारंभिक प्रकारचे असतात. ह्या गणात सात (ए. जे. स्मिथ यांच्या मते सहा) विद्यमान प्रजाती असून यांत सु. दोनशे जाती आहेत. यांचे काही पूर्वज कार्‌बॉनिफेरस कल्पात (सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात) व पूर्व पर्मियन कल्पात (सु. २७ ते २६ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) असल्याचे जीवाश्मरूपातील (शिळारूपातील) अवशेषांवरून कळून येते. त्यांची संख्या व प्रसार हल्लीपेक्षा त्या काळी अधिक होता. सध्या सर्व जाती फक्त उष्ण व उपोष्ण कटिबंधात आढळतात. अँजिओप्टेरिस ही यातील सर्वांत मोठी प्रजाती भारतात व अतिपूर्वेत, विशेषतः दक्षिण समुद्रातील बेटांत आढळते. मॅरॅटिया प्रजाती प्रसार सर्वच उष्ण कटिबंधीय देशांत असून डॅनिया प्रजाती अमेरिकेच्या उष्ण भागातच आढळते. ह्या तीन प्रजाती प्रमुख आहेत. क्रिस्तन्सनिया, कौल्फुसिया, आर्‌कॅन्जिओप्टेरिस, मॅक्रोग्लॉसमप्रोटोमॅरॅटिया ह्या इतर प्रजाती ए. जे. इम्स यांनी मान्य केल्या आहेत. या सर्वांचा अंतर्भाव त्यांनी एकाच कुलात (मॅरॅटिएसीत) केला आहे; परंतु सी. क्रिस्तन्सन (१९३८) यांनी दोन कुलांत (अँजिओप्टेरिडेसी व मॅरॅटिएसी यांत) केला आहे. या दोन्ही कुलांना ई. बी. कोपलंड (१९४७) उपकुले मानतात.

आ. १. मॅरॅटिया ॲलाटा : (१) संयुक्त पान, (२) संधानीसह दलक, (३) संधानी (छेदीय दृश्य).

 

सर्व जातींत खोड खुजे व सरळ असून प्रत्येक पानाच्या तळाशी दीर्घस्थायी (कायम राहणारी) उपपर्णांची (लहान उपांगांची) जोडी असते. कळीमध्ये पान अवसंवलित (टोकाकडून तळाकडे गुंडाळलेले) असते व नंतर पानाचे पाते संयुक्त पिसासारखे व मोठे असते. पानाच्या दलांच्या मागील बाजूस अनेक कोशिकांपासून बनणारे जाड आवरणाचे अनेक बीजुककोश एकत्र जुळून संधानी बनते. बीजुककोश समबीजुक (सर्व बीजुके सारखी असलेला) असून त्यांवर स्फुटनास (तडकण्यास वा आपोआप फुटण्यास) उपयुक्त असे वलय (विशिष्ट प्रकारे बनलेल्या घन आवरणाच्या कोशिकांचा थर) नसते किंवा नाममात्रच असते तथापि बीजुककोश उभा तडकून फुटतो किंवा त्याच्या टोकास भोक पडते. गंतुकधारी (लैंगिक प्रजोत्पादक सूक्ष्म घटक निर्मिणारी पिढी) मोठा (२·५–६सेंमी.), द्विपार्श्व (दोन बाजू असलेला), दीर्घायू, हृदयाकृती, पट्टाकृती अथवा शाखित हरितकणयुक्त, जमिनीच्या पृष्ठभागावर वाढणारा व ऑफिओग्लॉसेलीझप्रमाणेच अंतस्थित संकवकयुक्त [कवकतंतू आत असणारा ⟶ कवक] असतो. प्रजोत्पादक लैंगिक अवयव (रेतुकाशय म्हणजे पुं.-प्रजोत्पादक कोशिका असलेले अवयव व अंदुककलश म्हणजे स्त्री-प्रजोत्पादक कोशिका असलेले अवयव) त्याच्या खालच्या बाजूस मध्यरेषेवर खोलवर रुतलेले असून रंदुकापासून (पुं व स्त्री कोशिकांच्या संयोगापासून बनलेल्या संयुक्त कोशिकेपासून) अंतरग्र (अंदुककलशाच्या तळाकडे वाढणारा) गर्भ बनतो त्याशिवाय अनेक मूलकल्प (मुळाचे कार्य करणारे) केस असतात रेतुके (पुं.- प्रजोत्पादक कोशिका) बहुकेसली (जीवद्रव्याचे-कोशिकेतील जिवंत द्रव्याचे-अनेक तंतू असलेली) असून पद (तळभाग), प्ररोहाग्र (सूक्ष्म खोडाचे टोक) व प्रथम पर्ण हे गर्भाचे भाग प्रथम व मूळ नंतर या क्रमाने गर्भाची वाढ होते [⟶ गर्भविज्ञान]. काही प्रजातीत (डॅनियाअँजिओप्टेरिस) आलंबक (गर्भाच्या वाढीत बहुधा वरच्या बाजूस बसलेला लांबट तंतूसारखा भाग) आढळतो. मॅरॅटिएलीझ गणाचे लेप्टोस्पोरँजिएटी (तनुबीजकोशी नेचे) या उपवर्गाशी असलेले अधिक साम्य यावरून (व अवसंवलित पिसासारख्या पानांवरून) स्पष्ट होते. ह्या गणातील मेगॅफायटॉन ॲस्टेरोथेका ऑर्बोरेसेन्स हे सु. दहा मी. उंच वृक्ष प्राचीन काळी अस्तित्वात होते. समबीजुक प्रायमोफिलिसेस या गटापासून (अतिप्रारंभिक नेचांपासून) या गणाचा उगम झाला असावा.

आ. २. मेगॅफायटॉन (प्राचीन नेचा वृक्ष)

मॅरॅटिया डग्लसी जातीपासून काढलेल्या चिकट द्रव्याचा उपयोग श्वासनलिकादाह व अतिसार यांवर हवाई बेटांतील लोक करतात. दुष्काळात ही वनस्पती खाण्यास वापरतात. मॅ. फ्रॅक्सिनिया या न्यू साउथ वेल्समधील जातीच्या खोडातील भेंड तेथील आदिवासी खातात तसेच अँजिओप्टेरिसचेही भेंड क्वीन्सलँडमधील आदिवासींचे खाद्य आहे.

मॅरॅटिएलीझ गणात समाविष्ट केलेल्या मॅरॅटिऑप्सिस आणि डॅनिऑप्सिस या दोन जीवाश्म-प्रजातींतील काही जाती भारतात आढळतात. मॅ. मॅक्रोकार्पा ही जाती दक्षिण गोदावरी जिल्ह्याच्या मध्यजीव महाकल्पातील (सु. २३–९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांत व राजमहाल टेकड्यांत आढळते. मॅरॅटिऑप्सिसची दुसरी जाती दक्षिण रेवाच्या ट्रायासिक कल्पातील (सु. २३–२० कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांत आढळते. डॅनिऑप्सिस ग्रॅसिलीस ह्या जातीचे जीवाश्म मध्य प्रदेशातील दक्षिण रेवा गोंडवन प्रदेशात (बेली येथे) आणि डॅ. राजमहालेन्सिसचे जीवाश्म बिहारातील राजमहाल टेकड्यांत आढळतात. अँजिओप्टेरिस डॅनिऑप्सिस यांत साम्य आहे.

परांडेकर, शं. आ.

अँजिओप्टेरिस : अँजिओप्टेरिडेसी या कुलात या नेचांच्या प्रजातीचा अंतर्भाव असून त्यामध्ये सु. १०० जाती आढळतात व त्यांचा प्रसार मॅलॅगॅसी, आशियातील उष्ण प्रदेश आणि पॉलिनीशिया येथे आहे. मॅरॅटिएलीझमध्ये पानांच्या खालच्या बाजूवर कडेने, बहुधा जुळलेले (कधी स्वतंत्र उदा., अँजिओप्टेरिडेसी) बीजुककोशपुंज अथवा संधानी असतात बीजुककोशांचा उगम व विकास अनेक कोशिकांपासून होतो. पानांच्या तळाशी दोन मांसल उपपर्णे असतात. अँजिओप्टेरिसच्या सर्व जातींत जाडजूड पण काष्ठहीन खोड, मोठी, संयुक्त व पिच्छाकृती (पिसासारखी) पाने, स्वतंत्र बीजुककोश आणि त्यांवर स्फुटनाला कारणीभूत असलेले जटिल (गुंतागुंतीचे) वलय असतात. बीजुककोशांचा पुंज नावेसारखा लांबट असून बाजूस चीर पडून त्यातील बीजुककोश तडकतात.

आ. ३. अँजिओप्टेरिस इव्हेक्टा : (१) वनस्पती, (२) दल (कडेने बीजुककोशपुंजाची रांग), (३) बीजुककोशपुंज.

अँजिओप्टेरिस इव्हेक्टा ही जाती भारत आणि जपान ते मॅलॅगॅसी व क्वीन्सलँडकडे पसरली आहे. महाराष्ट्रात (दक्षिण कोकण, सावंतवाडी इ. भागांत) व भारतात २,१७० मी. उंचीपर्यंत ही आढळते. खोड सु. ०·६ मी. उंच, सरळ व शाखाहीन असून त्याचा बराच भाग जमिनीत असतो. पाने संयुक्त एकदा किंवा दोनदा विभागलेली (२–७ मी. लांब), नरम किंवा चिवट असून दलांवर किंवा दलकावर प्रत्येक बीजुककोशपुंजात १०–३० बिनदेठाचे बीजुककोश असतात. सर्व बीजुके एकाच प्रकारची असून ती रुजल्यावर मोठे, उभयलिंगी, दीर्घजीवी गंतुकधारी निर्माण होतात. खोडातील भेंडात भरपूर स्टार्च असून आदिवासी लोक ती खोडे खातात. पॉलिनीशियात ह्या वनस्पतीतील तेल खोबरेलास सुगंध आणण्यास वापरतात. इतरत्र ही वनस्पती शोभेकरिता बागेत लावतात.

मुजुमदार, शां. ब.

सारोनियस : पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांमध्ये आढळणाऱ्या वृक्षासारख्या नेच्यांच्या एका जीवाश्म-प्रजातीचे नाव. त्यांपैकी मॅरॅटिएसी ह्या कुलाशी या प्रजातीतील सु. पाच जातींचे साम्य असूनही कित्येक वनस्पतिविज्ञ याचा त्या कुलात समावेश करीत नाहीत. ह्या कुलात आढळणाऱ्या, एकत्र जुळलेल्या बीजुककोशांच्या पुंजासारखे (किंवा संधानीसारखे) प्रजोत्पादक अवयव असलेली पेकॉप्टेरिससारखी पाने कित्येक अश्मीभूत (शिळारूप झालेल्या) खोडांशी संलग्न असून त्यांना सारोनियस प्रजातीत घातले आहे. [⟶ बीजी नेचे] त्यावरून सारोनियसचा पर्णसंभार पेकॉप्टेरिससारखा असावा, असे मानतात. सारोनियस वृक्षाची उंची सु. दहा मी. किंवा अधिक आणि व्यास अर्धा मी. असावा. खोडाच्या टोकास मोठ्या (सु. तीन मी. लांब) संयुक्त व पिसासारख्या पानांचा झुबका असतो व त्यांची मांडणी दोन किंवा अधिक रांगांत असते त्यामुळे खोडाच्या संकोचनावरचे (विशिष्ट प्रकारच्या जीवाश्मावरचे) पर्ण-किण (पानांच्या तळाचे वण) दोन (मेगॅफायटॉन) किंवा अधिक (कॉलोप्टेरिस) रांगांत आढळतात. हे पर्ण-किण मोठे व लंबगोल (दहा सेंमी. किंवा अधिक लांबीचे) ठशासारखे असून त्यांच्या पृष्ठावर घोड्याच्या नालासारखा पर्णलेशाचा (पानातील वाहक ऊतकाशी-समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहाशी-जोडणाऱ्या खोडातील वाहक ऊतकांच्या संचाचा) छाप दिसतो. पानांच्या झुबक्याखालून निघणाऱ्या असंख्य मुळांचे प्रावार (आवरण) खोडाच्या तळापर्यंत झग्यासारखे लोंबत राहते ह्याचा त्या वृक्षास भरपूर आधार मिळतो.

खोडात द्वितीयक वृद्धी [⟶ शारीर, वनस्पतींचे] नसते त्यातील वाहक भाग फार लहान असून त्यांभोवती ⇨ दृढोतकाचे (कठीण आवरणाच्या मृत कोशिकांचे) वलय असते. पर्णलेशामुळे ते खंडित होते व त्यावरून पानांची मांडणी कळून येते. रंभातील (मध्यवर्ती वाहक ऊतकांच्या व्यूहातील) सर्व भाग मृदूतकाने (पातळ आवरणाच्या कोशिकांच्या समूहाने) भरलेला असून त्यात अनेक समकेंद्री ⇨ वाहक वृंद (पाणी व अन्नरसाची ने-आण करणाऱ्या ऊतकांचे समूह) विखुरलेले आढळतात ते भिन्न आकारांचे व स्पर्शरेखीय दिशेत लांबलेले असतात तसेच त्यांची माडणी गुंतागुंतीची असते.

आ. ४. सारोनियस खोडाचा आडवा छेद : (१) मध्यवर्ती वाहक तंत्र, (२) मुळांचा थर (प्रावार; चित्रात फक्त अंशमात्र दाखविला आहे).

यूरोपात कार्‌बॉनिफेरस कालातील अनेक जातींचे जीवाश्म आढळलेले असून अलीकडे आग्नेय इलिनॉयमध्ये आढळलेल्या असंख्य जीवाश्मांची माहितीही उपलब्ध झाली आहे. त्यावरून सारोनियसमधल्या रंभ तंत्राचा विकास आधुनिक नेचातल्याप्रमाणे उलट्या शंकूसारख्या आकाराचा झाला असावा, असे दिसते. ह्यांमध्ये खोडाच्या तळात बारीक व साधा रंभ असतो. सारोनियस ब्लिकली ह्या जातीत रंभ दोन सेंमी. व्यासाचे असून वाहक तंत्रात एका मध्यवर्ती पट्टाभोवती अनेकांचे एक वलय असते. ह्याला द्विचक्रिक म्हणतात. खोडाची उंची व घेर जसजसा वाढत जातो, तसतसा वाहक तंत्राचा विस्तार होऊन बहुचक्रिक रंभ बनतो व त्यामध्ये दहा किंवा अधिक चक्रे आढळतात. ह्या जातीत खोडाच्या भोवती असणाऱ्या मुळांच्या प्रावारात दोन भाग असून आतील भागातील लहान मुळे मृदूतकाने वेढलेली असतात व बाहेरचा भाग मोठ्या व सुट्या मुळांनी बनलेला असतो. मुळांमध्ये मध्यवर्ती तारकाकृती रंभ व त्याभोवती मध्यत्वचेत हवेने भरलेल्या अनेक पोकळ्या असल्याने हे वृक्ष दलदलीत वाढत असावेत, हे उघड आहे. काही जातींचे खोड एक मी. व्यासाचे असून ते कापून व तासून झिलई केल्यास आकर्षक, रंगीत व आलंकारिक नमुन्याप्रमाणे दिसते. काही वर्षांपूर्वी याचे तुकडे स्वस्त जवाहीर (खडे) म्हणून विकले जात असत.

 

पहा : नेचे; पुरावनस्पतिविज्ञान; बीजी नेचे; वृक्षी नेचे.

संदर्भ : 1. Andrews, H. N. Studies in Paleobotany, New York, 1967.

2. Arnold. C. A. An Introduction to Paleobotany, New York, 1947.

3. Eames, A. J. Morphology of Vascular Plants, Lower Groups, New York, 1964.

4. Surange, K. R. Indian Fossil pteridophystes, New Delhi, 1966.

परांडेकर, शं. आ.